असा हा ससंदेहालंकार थोडक्यांत सांगून झाला.
ह्या ससंदेहालंकारातील संदेह कुठें खरा (म्ह० अनाहार्य) असतो, तर कुठें जाणूनबुजून मानलेला (म्ह० आहार्य) असतो. ज्या ठिकाणीं कवीनें समोरील व्यक्तीमध्यें असलेल्या संदेहाचें वर्णन केलें असेल. त्या ठिकाणीं तो संशय बहुतकरून खरा असतो. उदाहरणार्थ :---
‘तीरे तरूण्या:’ ‘मरकतमणिमेदिनी धरो वा’ इत्यादि संशयाचीं उदाहरणें म्हणून पूर्वीं दिलेले श्लोक. ह्या श्लोकांत भ्रमर वगैरेना (खरोखरीचाच संशय उत्पन्न झाल्यानें) समोरील पदार्थांचें निश्चित ज्ञान होत नाहीं; म्हणून त्या ठिकाणचा संदेह खरा पण ज्या ठिकणीं, स्वत:ला संश्अय आला असेल त्या ठिकाणचा संशय हा बुद्धया मानलेला असतो. उदाहरणार्थ :---
“ह्या मुखाचें ठिकाणीं हा डोळा आहे का भुंगा आहे का हरीण आहे असा संदेह उत्पन्न होतो; व या सुंदरीचें हे मुख आहे का कमळ आहे का चंद्र आहे असा संशय वाटतो.”
ह्या श्लोकांत बोलणारा कवि हा खरी खरी गोष्ट जाणणरा असल्यामुळें, ह्यांतील दोन्हीही संशाय बुद्धया मानलेले आहेत.
हा संदेह (रूपकाप्रमाणें) परंपरित पण असू शकतो. उदाहरणार्थ :---
“विद्वानांच्या दैन्यरूपी अंध:काराचा नाश करणारा हा सूर्य़ आहे, अक भयंकर शत्रूच्या वंशरूपी कळकांच्या अरण्याचा दाह करणारा हा वणवा आहे, का अत्यंत उज्ज्वल यशरूपी चंद्राचा (उत्पत्तिस्थान असलेला) हा दुग्धसमुद्र आहे, का मदनरूपी भुजंगानें दंस केलेल्या स्त्रियांना जिवंत करणारे हे औषध आहे ? अशा अनेक कल्पना, ह्या राजाकडे पाहून, कोणाच्या मनामध्ये उत्पन्न होणारा नाहींत ?
ह्या श्लोकांतला संदेह ही आहार्य आहे. कुठें कुठें दुसर्या व्यक्तीच्या ठिकाणीं असलेला संदेहहीं, कवीनें वर्णिलेला असता आहार्य असतो.
उदाहरणार्थ :--- आकाशांतून खालीं गळून पडलेला हा सूर्य आहे का थंड असलेला हा अग्नि आहे ? अशा रीतीनें, रामचंद्राकडे पाहून सर्वज्ञ अरुंधतीपति वसिष्ट मुनींच्या मनांत, संशय उत्पन्न झाला.”
ह्या श्लोकांत, सर्वज्ञ म्हणून म्हटलेल्या वसिष्ट मुनींचा संशय खरा नसून मानलेलाच असणार. ‘ह्या श्लोकांतही, ‘मुनीनां च मतिभ्रम:’ (मुनींच्या बुद्धीला ही भ्रम होतो) ह्या वचनाप्रमाणें, हा संशयही खराच असेल. असें म्हणणें शक्य आहे; तरीपण, ‘आकाशांतून खालीं गळून पडलेला’ व’ थंड झालेला’ ही दोन विशेषणें, संदेहाचे विशिष्ट प्रकार झालेल्या (अणुक्रमे) सूर्य व अग्नि या दोघांना, ह्या ठिकाणीं, लावलीं असल्यानें, येथील संशय कल्पित मानल्यावांचून सुटकाच नाहीं. संहेहाच्या दोन्ही प्रकारांशीं (म्हणजे अग्नि व सूर्य याशीं) संदेहविषय जो राम त्याचा अभेद असल्यानें, या दोहोंमधील साद्दश्याला पक्के करण्याकरितां, ‘आकाशांतून गळून पडणें’ व ‘थंड होणें; या दोन धर्मांचा त्यांच्यावर आरोप करणें वक्त्याला भाग पडलें आहे. अशा रीतीनें ह्या अलंकाराचे होणारे दुसरे प्रकारही तज्ज्ञांनीं स्वत शोधून काढावें.
येथे ससंदेहालंकाराचें प्रकरण समाप्त झालें.