उल्लेखालंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
ह्या श्लोकांत पोपटांनीं व भुंग्यांनीं अधरोष्ट व मुख यांना अनुक्रमें भ्रांतीमुळें तोंडलें व कमल समजणें ह्यांत भ्रांतिमान् अलंकार आहे. त्या भ्रांतिमान् अलंकाराचें निवारण व्हावें. एवढयाकरतां वरील उल्लेखाच्या लक्षणांत, ‘एका (च) पदार्थाविषयीं’ असे शब्द घातलें आहेत. ‘धर्मस्यात्मा भागधेयं क्षमाया:’ इत्यादि श्लोकांत असणार्या मालारूपकांत होणारी या लक्षणाची अतिव्याप्ति टाळण्याकरतां, लक्षणांत अनेक पाहणार्यांनीं, असा (पाहणें ह्या क्रियेचें विशेषण असलेल्या) बहुवचनी कर्त्याचा निर्देश केला आहे. पण लक्षणांतील अनेकग्रहीतृभि: यांतील अनेक शब्दाचा पुष्कळ (दोहोंपेक्षां जास्त) असा अर्थ येथें घ्यायचा नाहीं. (कारण, येथील पाहणारे एकापेक्षां अधिक असावेत, सांगावयाचें आहे.)
“तुझ्या सैन्यांतील थै थै नाचणार्या घोडयांच्या रांगांच्या जोरानें मारलेल्या टापांनीं उडविलेल्या धुळीच्या लोटांनीं, लोक व अलोक या दोन पर्वतांपर्यंत सर्वत्र, तुलना करतां येणार नाहीं असा गडद अंधकार पसरला असतां, या पृथ्वीतलावरील सर्व लोक, ही रात्र झाली या भ्रांतीनें, विसावा घेण्याची इच्छा करीत आहेत; शोकाग्नीनें व्याकुळ झाल्यानें चक्रवाक पक्षी आक्रंद करीत आहेत; आणि घुभडें आनंदित झालीं आहेत.”
ह्या ठिकाणीं धुळीचे लोट या एकच पदार्थाचें, लोक, चक्रवाक व घुबडें ह्या तीन ग्रहण करणार्यांकडून, रात्र ह्या एकाच रूपानें ग्रहण (ज्ञान) झालें आहे. म्हणून ह्या ठिकाणीं झालेल्या भ्रांतिमान् अलंकाराची उल्लेखाच्या लक्षणांत अतिव्याप्ति होऊं नये एवढयाकरतां, एकाच पदार्थाचें अनेक तर्हेचें ज्ञान (अनेकप्रकारकं ग्रहणं) असें म्हटलें आहे. लक्षणां तील ग्रहण शब्दाचा अर्थ ग्रहणांचा समुदाय (म्हणजे अनेक ज्ञानें) असा करावयाचा आहे. ह्या ठिकाणीं ग्रहणं या एकवचनाचा अर्थ ग्रहणजाति असा घ्यावा. कारण अनेक ग्रहीत्यांना एकच ग्रहण म्हणजे ज्ञान होतें. अशी लोकांत प्रसिद्धि नाहीं. म्हणून, दोन किंवा त्यांहून जास्त ग्रहीत्यांना निरनिळ्या निमित्तानें निरनिराळीं ज्ञानें होणें, ही वस्तुस्थितीच ह्या ठिकाणीं सांगितली आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP