परंतु वर सांगितलेल्या दोन्हीही प्रकारांत, वर्ण्य विषयावर भासमान होणारे जे अनेक प्रकार त्यांच्या समुदायालाच उल्लेखालंकार म्हणावें, असेंही दुसरे कांहीं लोक म्हणतात.
आतां उल्लेखालंकाराच्या ध्वनीचें उदाहरण हें :---
“त्रिविध तापानें अत्यंत पीडित झालेले, ज्यांनीं कोटयवधि पापें केलीं आहेत असे, रोगामुळें जे अत्यंत जर्जर झाले आहेत व संसार दु:खामुळें ए खंगून गेले आहेत असे हे सर्व लोक, जिच्यावर लाटा हेलकावे खात आहेत अशा गंगेला पाहून सुखी होतात.”
ह्या श्लोकाच्या पूर्वार्धांत सांगितलेल्या गंगेला पाहणारे चार प्रकारचे लोक सुखी होतात, असें म्हटल्यानें, क्रमश: तापाचा, पापाचा, रोगाचा, व संसार दु:खाचा नाश करणारी ही गंगा आहे, अशी गंगेविषयी होणारी जीं चार ज्ञानें तीं सूचित केलीं गेलीं आहेत. हा शुद्ध उल्लेखाचा ध्वनि.
आतां मिश्रित उल्लेखाचा ध्वनि असा :---
“हसर्या तोंडाच्या त्या सुंदर स्त्रीला पाहून चकोर पक्षी व भुंगें अत्यंत आनंद पावले.”
ह्या श्लोकांत, सुंदर स्त्रीला पाहणारे जे चकोर व भुंगे त्यांना होणारे भ्रांतिरूप ज्ञान, व्यंग्य आहे. या भ्रांतिज्ञानाशीं मिश्रित झाला आहे. कुणी म्हणतील कीं, ‘ह्या श्लोकांत भ्रांतीचाच चमत्कार प्रतीत होतो, तेव्हां येथील उल्लेखालंकाराला काढून टाकतां येणें शक्य आहे.’ पण तस म्हणतां येणार नाहीं. कारण (चकोर, भ्रमर वगैरे) अनेक ग्रहीते व त्यांना होणारीं अनेक ज्ञानें यामुळें होणारा, भ्रांतीहून निराळा असा, जो उल्लेखालंकार त्याचा विषय अजिबात निराळा असल्यामुळें, व त्या अलंकाराचा ह्या ठिकाणीं चमत्कार होत असल्यामुळें, येथें उल्लेख अलंकाराचा निराळा ध्वनि मानणें भाग आहे.
उल्लेखाच्या दुसर्या प्रकारच्या ध्वनीचें उदाहरण हें :---
“हे राजा, तुझी कीर्ति आकाशांत पसरली असतां, ती अखिल जगाला प्रकाशित करते; रात्रिविकासी कमलांना प्रफुल्लित करते; व ती (कीर्ति) पृथ्वीवर पसरली असतां, सगरसुतांच्या प्रयत्नाला निष्फळ करून टाकते.” (म्ह० सागर निर्माण करणें हें कीर्तीमुळें व्यर्थ झाले :--- सागराचें कार्य कीर्तीनें केल्यामुळें.)
ह्या ठिकाणीं एकाच कीर्तीमध्यें आश्रयाच्या भेदामुलें चांदणें, सागर इत्यादि रूपानें अनेकविधत्व आलें आहे व त्यामुळें उल्लेखालंकराचा येथें ध्वनि झाला आहे. हा उल्लेखालंकार येथील रूपकालंकाराशीं मिश्रित झाला आहे.
येथें रसगंगाधरांतील. उल्लेखालंकाराचें प्रकरण समाप्त झालें.