कुठें कुठें हा उल्लेख, संशय अलंकाराशींही मिश्रित होतो. उदाहरणार्थ :---
“हा सूर्य आहे का हा अग्नि आहे का हा यम आहे, असें तुझ्याविषयी शत्रूंच्या मनांत विकल्प उत्पन्न होतात; व हा बलि आहे का हा कर्ण आहे का हा शिबी आहे, असें तुझ्याविषयीं याचकांच्या मनांत विकल्प उत्पन्न होतात.”
ह्या श्लोकांत, दोन प्रकारचीं ज्ञानें आहेत; व या प्रत्येक ज्ञानांत संशय (अलंकार) आहे; आणि सबंध श्लोकांत उल्लेख अलंकार आहे.
ज्या वेळीं, कोणत्याही वस्तूविषयींच्या केवळ स्वरूपाचा उल्लेख (अनेक प्रकारांनीं) केला जातो, त्या वेळी त्याला, ‘स्वरूपोल्लेख अलंकार’ म्हणावें. हा प्रकार आम्ही पूर्वीच सांगितला आहे.
आताम अनेक फलांचा उल्लेख केला असतां होणारा जो फलोल्लेख अलंकार, त्याचें उदाहरण :---
“हे राजा, ‘ तूं आम्हांला दान देण्याकरतांच जन्माला आला आहेस, असें याचक समजतात; तर ‘तूं आमचें रक्षण करण्याकरताच जन्माला आला आहेस, असें भित्रे लोक समजतात; आनि ‘तू आम्हाला ठार मारण्याकरतांच जन्माला आला आहेस,’ असें (शत्रूंचे) योद्धे समजतात,”
अनेकविध हेतूंचा उल्लेख आला असतां होणार्या हेतूल्लेख अलंकाराचें हें उदाहरण :---
“हे भागीरथी, श्रीहरीच्या चरणावरील नखांच्या समागमुळें, तुला कोणी अत्यंत पुण्यशाली समजतात; तर कुणी शंकराच्या मस्तकावर तूं विराजत आहेस म्हणून तुला अत्यंत पुण्यकारक मानतात; तर, दुसरे कुणी (केवळ) तूं भागीरथी नदी आहेस ह्या वस्तुस्थितीच्या माहात्म्यामुळेंच, तुला अत्यंत पुण्यवती मानतात.”
आतां दुसर्या द्दष्टीनें (प्रकारानें) उल्लेखालंकार झालेला दिसतो. तो असा :---
ज्या ठिकाणीं ग्रहींते अनेक नसून सुद्धां, विषय, आश्रय व बरोबर राहणारे (समानाधिकरण) वगैरे संबंधी पदार्थ, यांपैकीं कोणत्यातरी एका संबंधी पदार्थामुळें एका वस्तूचें अनेकत्व होतें; व त्यामुळें ती एक वस्तु अनेक प्रकारची भासते. (तोही उल्लेखालंकाराचा एक प्रकार होऊं शकतो) हा उल्लेखही दोन प्रकारचा - एक शुद्ध व दुसरा कोणत्यातरी अलंकाराशीं मिश्रित असणारा.
ह्यांपैकीं शुद्ध उल्लेखालंकाराचें हें उदाहरण :---
“हे राजा, जन्मापासून रम्य असणारी तुझी चित्तवृत्ति विविध प्रकारची होते, ती अशी :---
दीन लोकांच्या समूहाविषयीं ती चित्तवृत्ति दयार्द्र होते; अखिल शत्रुकुलाच्या ठिकाणीं ती निर्दय होते; काव्याचा आस्वाद घेत असतां
ती मृदु होते; आणि वादीला तर्कयुक्त उत्तर देण्याच्या बाबतींत ती कठोर होते; धर्माविषयीं ती निर्लोभी होते; व दुसर्यांचें दु:ख पाहून ती भयत्रस्त होते.”
ह्या ठिकाणीं दीनांचा समूह इत्यादि विषय अनेक असल्यामुळें, चित्तवृत्तीही अनेक प्रकारची झाली आहे. राजाविषयींच्या भक्तिभावाला उपस्कारक म्हणून हा उल्लेख अलंकार आहे. ह्या श्लोकांतील चित्तवृत्ति निरनिराळ्या प्रकारच्या असल्यामुळें तिला एक चित्तवृत्ति म्हणतां येणार नाहीं. तरी सुद्धां चित्तवृत्ति ह्या सामान्यस्वरूपानें तिला एक असें म्हणण्याचा कवीचा अभिप्राय आहे.