ह्या ठिकाणीं, श्लोकांत प्रतिज्ञापूर्वक सांगितलेला ( हे श्याम व श्वेत कटाक्ष नसून विष व अमृतच आहे असा, ठासून सांगितलेला) जो अर्थ, त्याच्याविरूद्ध अर्थ कां मानता येणार नाहीं. याचें कारण (म्हा० बाधक कारण) सांगितलें असल्यानें, ही हेतु - अपह्नुति.
ह्या अलंकारांत (सांगितला जाणारा) निषेध, कुठें ‘नाहीं’ (नञ्) वगैरे प्रत्यक्ष शब्दांनीं सांगितला जातो; तर कुठें, ‘दुसरे असें मानतात, मी नाहीं,’ अशा शब्दांनीं सांगून थोडयाशा आडपदद्यानें विषयाचा निषेध सांगितला जात असल्यामुळें, तेथें बहुतकरून (अपहनुन्तीचीं) दोन वाक्यें असतात; परंतु ज्या ठिकाणीं, उपमेयाच निषेध, मिष, छल, छप, कपट, व्याज, वपु, आत्मा, इत्यादी शब्दांनीं सागितला जातो, त्या ठिकाणीं, एकच वाक्य असतें, याशिवाय या अलंकारांत कधीं उपमेयाचा निषेध प्रथम येतो तर, कधीं उपमानाचा आरोप प्रथम येतो; कधीं विषयीचें ताद्रूप्य व विषयाचा निषेध यांपैकीं एक शब्दांनीं सांगितलेला असतो तर, कधीं अर्थबलानें प्रतीत (आर्थ) असतो; कधीं विषयनिषेध व विषयीचा तादात्म्यारोप हे दोन्हीही शब्दांनीं सांगितलेले असतात, तर कधीं ते दोन्हीहीं आर्थ असतात; तर कधीं दोन्हीही विधेय अथवा दोन्हीही अनुवाद असतात. अशा रीतीनें, ह्या अलंकाराचे अनेक प्रकार संभवतात. परंतु त्या सर्वांत कोणत्याही विशेष प्रकारचें वैचित्र्य नसल्यामूळें त्यांची गणना करण्यासारखी नाहीं. तरीपण त्यांपैकी कांहीं प्रकार थोडक्यांत सांगतों :---
यापैकीं, पूर्वीं सांगितलेल्या सावयवा अपह्नुतीमध्यें, पहिली जी अवयवभूत अपह्नुति, तिच्यांत, निषेध प्रथम आला आहे, (तिच्यांतील) निषेध व तादात्म्यारोप हे दोन्हीही शब्दांनीं सांगितले आहेत, दोन्हीही विधेय आहेत, आणि ह्या अपह्नुतीचीं दोन वाक्यें निराळीं आहेत. (या नरंतरच्या) अवयवभूत दुसर्या अपह्नुतींत, ‘मूर्ख लोक असें म्हणतात,’ असें म्हटल्यानें, त्यांना वाटणार्या भ्रांतीचें व्यवधान होऊन, त्यानंतर निषेधाची प्रतीति होते; त्यामुळें येथील निषेध आर्थ आहे; पण यांतील ताद्रूप्य शब्दानें सांगितलें आहे. या दुसर्या अपह्नुतींत, निषेध व आरोप हे दोन्ही विधेय आहेत ते दोन (भिन्न) वाक्यांत आले आहेत: व त्यापैख्कीं निषेध प्रथम आला आहे. (ह्या तिन्ही बाबतींत) ही अपह्नुपि पहिल्या अपह्नुतीसारखीच आहे. आतां चवथ्या (अवयवीभूत) अपह्नुतींत प्रथम आरोप आला आहे, व मागाहून उपमेयाचा निषेध आला आहे. या अपह्नुतींत ही, पूर्वींच्य अपह्नुतीप्रमाणें, आरोप व निषेध हे दोन्हीही शाब्द आहेत; दोन्हीही विधेय आहेत व दोन्हीही निरनिराळ्या वाक्यांत आलेले आहेत.
“ब्रम्हदेवानें, दुष्ट मनुष्यांच्या तोंडांत जिभेच्या रूपानें नागीणच ठेवली आहे. तसें जर नसतें तर, तिनें चाटले गेलेले (दंश केले गेलेले) लोक, कोणत्याही मंत्राचा थोडासाही उपयोग न झाल्यामुळें जिवंत राहत नाहींत, हें कसें शक्य झालें असतें ?
ह्या ठिकाणीं, निषेध व आरोप हे दोन्हीही एका वाक्यांत आलेले आहेत. शिवाय ते दोन्ही आर्थ आहेत; व ते दोन्ही अनुवाद्य आहेत. कारण, ह्या श्लोकांत, ‘ठेवली आहे.’ (विनिवेशिता) हें विधेय आहे. अशा रीतीनें दुसरेही अपह्नुतीचे प्रकार शोधून काढावेत.