ह्या अपह्नुतीच्या लक्षणांत आरोप्यमाण हा जो शब्द आला आहे, त्याचा अर्थ, जाणुन बुजून केलेला जो निश्चय त्या निश्चयाला विषय केला गेलेला, असा करावा. केल्यास :---
“रणांगणामध्यें समोरासमोर लढाई करतांना मारले गेलेले ह्या पृथ्वीवरील जे कित्येक राजे त्यांनीं, ज्या सूर्याच्या मंडळाचा मधला भाग आरपार विदीर्ण करून टाकला आहे व त्यामुळें मोठें विवर पडल्यानें, ज्यांतून पलीकडील आकाशाचा नीलवर्ण दिसत आहे, तो सूर्य निखार्याप्रमाणें जाळणार्या आपल्या किरणांनीं सर्व जगाचा ग्रास करून उदय पावत आहे. ह्याला लोकांत, कोण्या पशूनें चंद्र मानला कोण जाणें ?
ह्या श्लोकांत, विरही जनांची उक्ति आहे; व तिचा, ‘हा चंद्र नाहीं, परंतु विवर असलेला हा सूर्य आहे,’ असा अर्थ आहे; तरीपण, ह्या ठिकाणीं अपह्नुति अलंकार नाहीं, केवळ अपह्नुतीची छाया आहे. खरें म्हणजे, ह्या श्लोकांत भ्रांति अलंकारच आहे. कारण हा सूर्य आहे असें येथें विरही जनाला झालेलें ज्ञान, (साद्दश्यमूलक) विशिष्ट (भ्रांति) दोषामुळें झालें असल्यामुळें तें मानलेलें नाहीं, (तर खरोखरीचें आहे, म्हणजे तें ज्ञान अनाहार्य आहे.) त्यामुळें येथें भ्रांति अलंकार आहे.
“हा भ्रमर आहे का हरिण आहे, का हा डोळा आहे. असें ज्याच्यांत कांहींतरी भासत आहे, तें हें कमळ तरी असावें किंवा चंद्र तरी असावा किंवा सुंदर स्त्रीचें मुख तरी असावें.
ह्या श्लोकांत हें मुख आहे, का कमळ आहे, असा कवींला वाटणारा संशय जाणून बुजून निर्माण केला गेला आहे. नंतर, मुखाचा निषेध ज्या ठिकाणीं केला आहे त्याच ठिकाणीं कमळाच्या तादात्म्याची जरी प्रतीति होत असली तरी, त्या तादात्म्याचा, तें निश्चयाचा विषय नसल्यानें, अपहनुति अलंकाराच्या लक्षणांत समावेश होणार नाहीं. ‘ह्या ठिकाणीं विषयाचा निषेध हा अर्थ कोणत्याहि शब्दाचा नाहीं’ असें म्हणूं नये. कारण श्लोकांतील ‘वा’ या शब्दाचा अर्थ निर्षध असाच होतो.