आतां अप्पय्य दीक्षितांनीं अपहनुति ध्वनीचें विवेचन करतांना म्हटलें आहे कीं :---
‘ (हे राजा !) कुतूहलानें बावरलेल्या (त्या) सुंदरीनें काढलेल्या तुझ्यां चित्रांत एका स्त्रीनें, तुझ्या हातांत (प्रथम) चक्र काढलें, व नंतर (शेजारी) गरुडाचेंही चित्र काढलें. पण (इतक्यांत) (सात्विक भावानें) जिचे हात स्वेदयुक्त झाले आहेत, अशा दुसर्या एका स्त्रीनें (येऊन) तें चक्राचें व गरुडाचें चित्र पुसून टाकलें; व त्याऐवजीं तुझ्या हातांत फुलांचें धनुष्य दिलें, व डोक्यावर मगराची आकुति काढली.’
हा श्लोक अपहनुति ध्वनीचें उदाहरण म्हणून द्यावा. कारण कीं, ह्या ठिकाणीं (राजाच्या हातांत) चक्र व (शेजारीं) गरुड काढल्यानें, “हा सामान्य पुरुष नाहीं पण हा भगवान् विष्णु आहे” असें एकीनें सूचित केलें; तर, दुसरीनें त्या दोन्हीही, चक्र व गरुड, ह्यांच्या आकृति पुसून, त्यांच्या ऐवजीं फुलांचें धनुष्य व मकराकृतियुक्त ध्वज अशी आकृति काढली. व विष्णुचेंही इतकें सुदंर रूप असूं शकत नाहीं, अशा अभिप्रायानें, “हा भगवान् विष्णु पण नाहीं. पण (साक्षात्) मदन आहे” असें सूचित केलें.’
हें अप्पय्य दीक्षितांचें म्हणणें वर वर दिसायलाच मात्र रमणीय आहे. (कसें तें पहा :---) त्यांनीं जें म्हटलें आहे कीं, :--- “चक्र व गरुड यांची आकृति काढून, ‘हा सामान्य पुरुष नाहीं पण भगवान् विष्णु आहे.’ असें एकीनें सूचित केलें” (त्यावर आमचें म्हणणें असें कीं,) अपहनुति अलंकाराचे दोन भाग असतात. एक उपमेयाचा निषेध व दुसरा उपमानाचा आरोप. या दोहोंपैकीं उपमानाच्या आरोपाचा भाग, ‘हा (साक्षात्) विष्णु आहे’ अशा दोहोंपैकीं उपमानाच्या आरोपाचा भाग, ‘हा (साक्षात्) विष्णु आहे’ अशा अर्थाचा, चक्र व गरुड यांची आकृति काढून सुचित करणें शक्य आहे, हें कबूल. कारण कीं, चक्र व गुरूड हे भगवान् विष्णूशीं संबद्ध आलेलें पदार्थ आहेत, पण वरील अपहनुतीचा, :--- ‘हा सामान्य पुरुष नव्हे,’ हा उपमेयाच्या निषेधाचा जो भाग, त्याचें येथें सूचन झालेलेंच नाहीं. कारण ह्या श्लोकांतील व्यंजक शब्द, केवळ (भगवान् विष्णूच्या) आरोपाचें व्यंजन करण्यास समर्थ साहेत. उपमेयाच्या निषेधाचें व्यंजन करण्याचें, त्या (व्यंजक) शब्दांत, सामर्थ्य नाहीं. बरें, हा उपमेयाचा निषेध, ह्या श्लोकांत, अनुभवावरून निश्चित करता आला असता तर, त्या निषेधाच्या व्यंजनाचा उपाय शोधला तरी असता; पण त्या व्यंजनाचा उपाय म्हणून, शब्द अथवा अर्थ, शोधून सुद्धां सांपडत नाहीं. तो सांपडला असता तर, निषेधानुभवाविषयीं वादविवाद तरी केला असता. आतां तुम्ही असें म्हणाल कीं, ‘सामान्य पुरुषाचा निषेध केल्यावांचून श्री विष्णूच्या तादात्म्याचा आरोप करणें कठीण आहे; म्हणून तो (सामान्य पुरुषाचा निषेधही) आम्ही सूचित मानला आहे.’ पण असें तुम्हांला म्हणतां येणार नाहीं. कारण, असें तुम्ही म्हटलें तर, रूपक अलंकाराचा उच्छेद होण्याची पाळी येईल. आणि ‘मुखं चंद्र : ।’ इत्यादि वाक्यांत, मुखाचा निषेध केल्यावाचून त्यावर चंद्राचा आरोप करणें कठीण आहे, असेंही म्हणणें सोपें होईल. आणि ‘मुखं चंद्र: ।’ इत्यादि रूपकस्थलीं मुखाच्या निषेधाचेंही ज्ञान होतेंच, असें म्हण्त असाल तर मग, (रूपकाला) अपहनुतीनें जिंकलेंच म्हणायचें ! (म्हणजे सर्वत्र रूपक जाऊन, त्या ठिकाणीं अपहनुतीच होऊ लागेल.)