तेव्हां आतां यावर, “आम्ही चित्रमीमांसेमध्यें जें रूपकाचें लक्षण केले आहे तें प्राचीनांच्या मताला अनुसरून केलें आहे; व कुवलयानंदामध्यें रत्नाकार वगैरेंच्या मताला अनुसरून, (अपह्नुतीचें लक्षण) केलें आहे.” असें म्हणून कशी तरी तुम्हांला संगति लावावी लागेल. थोडक्यांत हा विषय पुरा झाला.
“ विपुल सुवर्णाची दानरूपी वृष्टि करणारा, त्याचप्रमाणें लोकांत हर्ष उत्पन्न करणारा, व दारिद्यरूपी उष्णता दूर करण्याला समर्थ, असा हा पाण्यानें भरलेला मेघच आहे. हा राजा नाहीं.”
ही (अवयवांमध्यें सुद्धां आरोप असलेली) सावयवारोपा अपह्नुति आहे.
एक आरोप दुसर्या आरोपाला उपाय म्हणून आला असल्यास, ही अपह्नुति, परंपरित अपह्नुति ही होऊं शकते. उदाहरणार्थ :---
“दुष्ट मनुष्याला, मनुष्य असें कोण्या मूर्खानें म्हटलें आहे कोण जाणे ? कारण हा दुष्ट तर, सज्जनरूपी कमलवनांतील मातलेला हत्ती आहे.”
आतां ह्या अपह्नुतीच्या ध्वनीचें उदाहरण हें “हे प्रिये, तुझ्या दातांच्या कांतीच्या मिषाणें तुझ्या तोंडांत, कमळाचे केसरच शोभत आहेत. आणि तुझ्या केसांचा वेष धारण करणारे हे, मधाला लालचावलेले भुंगेच आहेत.”
ह्या श्लोकांत, ह्या दंतकांति नाहींत परंतु कमलकेसरांचा समूह आहे, ही एक, व हे केस नाहींत तर भुंगे आहेत, ही दुसरी, अशा दोन अपहनुति, एक, श्लोकाच्या पूर्वार्धांत, तर दुसरी, श्लोकाच्या उत्तरार्धांत, स्पष्टपणानें (म्ह० शब्दांनीं) सांगितल्या आहेत. व त्या दोन अपहनुतींनीं तूं स्त्री नव्हेस; पण कमललता आहेस,’ ही तिसरी अपहनुति व्यंजनाव्यापारानें प्रधान अपहनुति म्हणून सूचित केली आहे. ह्या अपहनुतींत, (दांत व केस या अवयवरूप) संबंधी वस्तूंचा केलेला निषेष व त्यावर केलेला (केसर व भ्रमर यांचा) आरोप हा, त्या वस्तूंशीं (अवयवी म्हणून) संबद्ध असलेल्या वस्तूच्या (म्ह० स्त्रीच्या) निषेधाला व त्यावर केलेल्या (कमललतेच्या) आरोपाला कारणीभूत झाला आहे, हें व्युत्पत्तिशास्त्राच्या नियमाप्रमाणें योग्यच आहे. ह्या श्लोकांत, (केसर व भ्रमर ह्या दोन अप्रकृतांना समान असलेली जी विलासक्रिया तिच्या योगानें होणारी) तुल्ययोगिता ही आहे; परंतु, ती ह्या अपहनुतींना गौण म्हणून राहिली आहे.