याच न्यायानें (म्ह० तुल्ययोगितेंतील कारकतुल्ययोगितेप्रमाणें,) अनेक क्रियांचा (पैकीं कांहीं प्रकृत व कांहीं अप्रकृत असल्यास,) एकाच कारकाशीं अन्वय झाल्यास कारकदीपक अलंकार होतो.
उदा० :--- ‘धन देण्याच्या बाबतींत, यश धारण करण्याच्या बाबतींत, शत्रूंचा संहार करण्याच्या बाबतींत व माझ्यासारख्याचें रक्षण करण्याच्या बाबतींत, तूंच एकटा निपुण आहेस.”
या ठिकाणीं उपजीविकेचें साधन नसणार्या एका गरिबाचे हे उद्नार मानले तर, धन देणें व स्वत:चें (म्ह० त्या गरिबाचें) संरक्षण करणें, ह्या दोन क्रिया प्रकृत; व अरिमर्दन ही क्रिया अप्रकृत; व यश धारण करणें ही क्रिया उभयस्वरूप (म्ह० प्रकृत वा अप्रकृत) होऊन, त्यांचा एक कर्तृकारकपी साधारणधर्माशीं अन्वय होतो (म्हणून येथें कारकदीपक अलंकार).
“राजनीति जाणणार्यांत अग्रणी असा हा राजा, दुर्बलांना थारा देतो; फाजील बळाचे उद्धत पुरुष असतील त्यांची हकालपट्टी करतो; व सर्व सत्रूंत थरकांप उत्पन्न करतो.”
ह्या श्लोकांत, कोणी एक दुर्बळ मनुष्य, अथवा बलिष्ठाचा त्रास सहन न होणारा, अथवा शत्रूंनीं गांजलेला असा मनुष्य, एका राजाला उद्देशून हे बोलत आहे, असा संदर्भ असल्यास, ‘सामान्याचें विशेषानें कथन’ ह्या अप्रस्तुतप्रशंसेचें हें उदाहरण होईल; व या तीन क्रियांपैकीं एक क्रिया प्रकृत व इतर दोन अप्रकृत असून, त्यांचा राजा ह्या एक कर्तॄकारकरूप धर्माशीं अन्वय झाला आहे असें मानल्यास, हें कारकदीपकाचें ही उदाहरण होईल; व वर सांगितलेल्या वक्त्यांहून भिन्न (म्ह० दुर्बळ, घाबरलेल्या अथवा गांजलेल्या वक्त्यांहून भिन्न) असा एखादा राजाची स्तुति करणारा व त्याची राजनीति सांगणारा वक्ता माणून त्याची ही उक्ति आहे असें मानलें तर, या सर्व क्रिया एकच जातीच्या होतील, प्रकृत व अप्रकृत अशा मिश्र स्वरूपाच्या होणार नाहींत, म्हणून येथें (अशा संदर्भांत) तुल्ययोगिता अलंकार होईल.
आतां, “प्रकृत व अप्रकृत धर्मीवर एकच (म्ह० क्रिया, गुण वगैरे) धर्म एकच वेळ सांगितलेला असणें हें एक दीपक, व अनेक क्रियांसीं एकाच कारकाचा एकाच वेळीं अन्वय होणें हेही एक दीपक (असे दीपकाचे दोन प्रकार आहेत),
असें लक्षण सांगून,
“नवी नवरी बिछान्यावर आली असतां, तिला घाम सुटतो; ती संकोचते; ती कापते, ती बाजूला वळते, वांकडया नजरेनें पाहते, मनांतल्या मनांत आनंदित होते, व चुंबनाची इच्छा करते.”