आतांपर्यंत साधारणधर्म अनुगामी असल्यानें होणारा दीपक अलंकार (उदाहरण देऊन) दाखविला; पण (साधारणधर्माच्या) बिंबप्रतिबिंबभावानेंही दीपक होऊ शकतें. उदा० :---
“शीलाच्या थोरपणानें युक्त सुंदर स्त्री, फुलांच्या भारानें युक्त लता, व अर्थगांभीर्यानें युक्त वाणी, कांहीं औरच शोभा पावते.”
“फुलांच्या भारानें लता, शीलाच्या थोरपणानें सुंदर स्त्री व अर्थगौरवानें कविता, अपूर्व शोभा पावते.”
वरील श्लोकांत, लता वगैरेपैकीं एक प्रकृत असेल (व बाकीचे धर्मीं अप्रकृत असतील) तर, हें दीपकाचें उदाहरण होईल; नाहीं तर (म्ह० म्हणजे सर्वच प्रकृत अथवा सर्वच अप्रकृत धर्मी असतील तर) हें तुल्ययोगितेचें दाहरण होईल.
ह्या ठिकाणीं (विलक्षण शोभेच्या कान्ता लता इत्यादी आश्रयांच्या) बिंबप्रतिबिंबभावांत, ‘भजते’ हा क्रियारूप धर्म अनुगामी असण्यानेंच केवळ चमत्कार उत्पन्न होतो असें नसून, कुसुम, शील वगैरे बिंबप्रतिबिंबभावापन्न धर्माशीं तो अनुगामी धर्म मिश्रित आहे म्हणूनच, तो चमत्कार उत्पन्न करतो. (अशा रीतीचा बिंबप्रतिबिंबभाव उपमेंतही असतो व दीपक वगैरेंतही असतो) पण या दोहोंत फरक हा कीं :--- उपमा वगैरे अलंकारांची निष्पत्ति, केवळ बिंबप्रतिबिंभावानें सुद्धां होऊ शकते, उदा० कोमलातपशोणभ्र० ह्यांतील उपमेची, पण प्रकृत (म्ह० तुल्यायोगिता व दीपक ह्या) अलंकारांत तसें नसतें (म्ह० केवळ बिंबप्रबिंबभावानें, दीपपकादिकांची निष्पत्ति होत नाहीं.) कारण, ह्या अलंकारांत अनुगामी धर्मावांचून गुणक्रियारूपी एक धर्म, निष्पन्नच होत नाही. केवळ बिंबप्रतिबिंबभावानें, धर्माची सकृदवृत्ति (एकच वेळ येणें) संभवतच नाहीं. (सारांश तुल्ययोगिता व दीपक या अलंकारांत अनुगामी धर्म एकच वेळ येणें हें अत्यंत आवश्यक आहे, नुसत्या बिंबप्रतिबिंबभावानें येथे काम भागत नाहीं). वरीलप्रमाणेंच ‘मृतस्य लिप्सा.’ इत्यादि पूर्वीं आलेल्या श्लोकांत मृत, कृपण, कुलटा वगैरे लिप्सादि क्रियांचीं विशेषणें, बिंबप्रतिबिंबभावानें युक्त आहेत. त्याचप्रमाणें कारकदीपक व कारकतुल्ययोगिता यांचें उदाहरण म्हणून दिलेल्या, ‘वस्तु दातुं०’ या श्लोकांत, दातुं, धातुं यांतील क्रिया धर्मी आहेत; त्या धर्मींचीं वसु, यश, अरिमर्दन वगैरे विशेषणें असून त्यांच्यांत बिंबप्रतिबिंबभाव आहे, असें समजावें.