पुढच्या पुढच्या पदार्थांचा (मागचे) पूर्वींचे पदार्थ उपकारक होत असल्यास, त्या ठिकाणीं मालदीपक हा अलंकार होतो. उदा० :--- “आस्वादामुळें रस, (शोभतो,) रसामुळे कविता, कवितेमुळें वाणी, वाणीमुळें लोकांच्या ह्रदयातील प्रेमाचा रसिक असा सभ्य, त्या सभ्यामुळें सभा; आणि दारिद्रयरूपी अग्नीनें होरपळणार्या जगाला अमृताचा मेघ असणार्या हे राजा ! सभेमुळें भूमंडल शोभतें”.
प्राचीनांच्या मताला अनुसरून आम्ही हें, मालादीपकाचें म्हणून उदाहरण दिलें आहे. खरें म्हणजे याला दीपक म्हणताच येणार नाहीं, कारण यांत साद्दश्याचा मुळीं सुद्धा संबंध नाहीं; पण हा एक, एकावली अलंकाराचा प्रकार आहे, हें आम्ही पुढें सांगणार आहों.
ह्या दोन्हीही अलंकारांत (तुल्ययोगिता व दीपक यांत) क्रिया, गुण वगैरे धर्मांचा धर्मींशीं एकरूपानें (म्ह० तंतोतंत एकाच प्रकारानें, सर्व धर्मींच्या लिंग - वचन - वगैरे बाबतींत एकाच प्रकारानें) अन्वय होत नसेल तर, तो दोष म्हटला पाहिजे. उदा० :--- वरील ‘आस्वादेन रसो०’ ह्या क्रियापदाचा (क्रियारूपी धर्माचा), एकवचनान्त धर्मीशीं एकरूपानें (म्ह० धर्मही एकवचनांत व धर्मीही एकवचनांत अशा रीतीनें) अन्वय जरी झाला तरी, सामाजिका: या बहुवचनान्त धर्मीशीं भासते या एकवचनी धर्माचा अन्वय होत नाहीं; म्हणून हा दोष. आतां वचनविपरिणाम म्ह० धर्मीच्या वचनाप्रमाणें धर्माचें वचन बदलून घेतलें तर (म्ह० भासन्ते केलें व त्याचा सामाजिक: याच्याशीं अन्वय केल तर), उपमेंतल्याप्रमाणें येथें ही दोष होईल. वरीलप्रमाणेंच, विशेष्याला अनुसरून स्वत:चें लिंग बदलणार्या विशेषण (नामार्थ) रूपी धर्माची सकृदवृत्ति केली असतां लिंगभेद हा दोष (त्या धर्माचें लिंग हरएक वेळीं बदलावें लागल्यानेंही) होतो उदा० :---
“जगांत नरजन्म (दुर्लभ); नरजन्मांत विद्वत्ता; विद्वत्तेंत कविता, व कवितेंत (रस) परिपाक पुण्यहीनाला दुर्लभ आहे.”
(दुष्प्राप: ह्या एका धर्माचें लिंग पुल्लिंगी, नपुंसकलिंगी अशा धर्मीच्या लिंगानुरूप बदलावें लागतें;) पण ह्या ठिकाणीं ‘तपसा नाल्पेन शक्यते लब्धुम्’ (हें थोडया तपानें मिळणें शक्य नाहीं.) असा क्रियापदरूपी एक धर्म केला तर, लिंगभेदरूपी दोष होणार नाहीं, वरील क्रियापदरूपी धर्माप्रमाणेंच, कोणत्याही विशेष्याबरोबर, न बदलत्या लिंगानें युक्त असा धर्म असल्यास (अजहल्लिंग = खत: चें लिंग न सोडणारा धर्म), त्याची, सकृद्वृत्ति होत असतां, दोष नाहीं. उदा० :--- वरील ‘जगति नरजन्म०’ यांतील चौथा चरण, ‘फलमतिशयितं तपस्याया:’ असा केला तर, फलम् हा एक धर्म, सर्व धर्मीशीं अन्वित होतांना, आपलें लिंग बदलत नसल्यानें, दोष नाहीं.
वरीलप्रमाणेंच ‘पुरुष’ प्रत्येक धर्मीशीं एकरूप नएल तर, दोष. उदा० :---
“स्वर्गांत सूर्य, पृथ्वीवर तूं, पातालांत शेषनाग व दिशांमध्यें दिक्पालांचा समूह हे राजश्रेष्ठा ! शोभतो” (ह्या ठिकाणीं राजते हें तृत्तीयपुरुषी रूप, ‘त्वं’ या धर्मीबरोबर जुळत नाहीं म्हणून दोष). पण ‘त्वम्’ याच्या ऐवजीं भवान् असें तृतीयपुरुषी रूप केलें तर, दोष राहत नाहीं. कालभेदानें होणारा दोषही अशाच रीतीनें समजावा.
वरील विवेचनावरून (हें उघड आहे कीं,) :---
“रणांगणांत येऊन तूं धनुष्य सज्ज केलेस कीं, हे राजा, ऐक, कोण कोण एकदम काय काय मिळवितात तें :--- धनुष्याला बाण मिळतात, बाणाला शत्रूचें डोकें मिळतें, डोक्याला भूमंडळ (जमीन) मिळते, भूमंडळाला तूं मिळतोस, तुला शुद्ध कीर्ती मिळते, व कीर्तीला त्रैलोक्य (विहार करायला) मिळतें.” या प्राचीनांच्या पद्यांत, दीपक मानलें तरी, त्याच्या एका अंशांत, “कोदण्डेन शरा: शरैररिशिर:” येथें दोष आहेच.
येथें रसगंगाधरांतील दीपक प्रकरण संपलें.