वरील विवेचनावरून “दोन प्रस्तुत असतां (म्ह० वाच्यार्थ व मगयार्थ दोन्हीही प्रस्तुत असतां) प्रस्तुताडकुर नांवाचा निराळाच अलंकार होतो.” असें जें कुवलयानंदामंत म्हटलें आहे त्याचें निराकरण झालें. ह्यांत कांहीं थोडेंसें निराळेंपण आहे, एवढयानेंच दुसरा अलंकार मानू लगले तर, वाणीच्या वैचितत्र्याचे अनंत प्रकार असल्यामुळें अलंकारही अनंत मानण्याचा प्रसंग येईल. असें आम्ही अनेक वेळीं सांगितलें आहे. या ठिकाणीं हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, या अलंकारांत अत्यंत अप्रस्तुत अर्थाचें वाच्यत्व झाल्यास, (म्हणजे तो अर्थ वाच्यार्थाच्या कक्षेंत आल्यास,) त्याच्या ठिकाणीं अभिधेचें पर्यवसान होत नाहीं; त्यामुळें सूचित असा दुसरा प्रस्तुतार्थ, (अप्रस्तुतार्थाकरतां) नाइलाजानें खेचून घ्यावा लागत असल्यानें, अशा ठिकाणीं ध्वनित्व निर्वेधपणें होऊ शकत नाहीं. पण दोन्हीही अर्थ (म्ह० वाच्यार्थ व गम्यार्थ) प्रस्तुत असतां ध्वनित्व असतें, याबद्दल वादच नाहीं. अशा रीतीनें, साद्दश्यमूल अप्रस्तुतप्रशंसेचे दोन प्रकार झालें. कार्यकारणभावमूलक व सामान्यविशेषभावमूलक यांचें प्रत्येकीं दोन मिळून होणारे चार प्रकार, गुणीभूतव्यंग्याचेच प्रकार आहेत. कारण अभिधा वगैरेचा लेश पण स्पर्श ज्याला झालेला नसतो व जो केवळ सूचित असतो, अशा अर्थालाच ध्वन्यर्थ म्हणताता.
आतां “पक्षी चोहोकडें आकाशांत उडून गेले; भुंग्यांनीं आंब्याच्या मोहोराचा आश्रय केला; पण हे सरोवरा ! तूं सुकून गेला असतां, अत्यंत दीन अशा माशींची काय अवस्था होणार बरें ?”
ह्या ठिकाणीं राज्यहीन झालेला राजा व त्यावर अवलंबून असणार्या एकनिष्ठ पुरुषाचा वृत्तांत प्रस्तुत मानला तर, ही अप्रस्तुतप्रशंसाच होणार, याबद्दल वाद नाहीं, तसेंच ज्या वेळीं सरोवराचा वृतांत व राजाचा वृत्तांत हे दोन्हीही प्रस्तुत असतील त्या वेळींही आम्ही वर सांगितलेल्या पद्धतीनें (म्हणजे दोन्हीही अर्थ प्रस्तुत असतानाही होणारी) अप्रस्तुतप्रशंसाच होणार; पण ज्या वेळीं सरोवराचा वृत्तांत प्रस्तुत असेल त्या वेळीं, राजवृत्तांत गुणीभूतव्यंग्य होत असल्यानें या पद्यांत कोणता अलंकार मानावा ? ह्यांत अप्रस्तुतप्रशंसा तर मानतां येत नाहीं. कारण, येथे प्रस्तुताचेंच कथन झालें आहे; बरे, ही समासोक्तिही नाहीं; कारण समासोक्तीला प्राणभूत असें सर्व आलंकारिकांना मान्य असलेलें विशेषणांचें साम्य तेंही ह्या ठिकाणीं नाहीं. बरें, विशेषणाच्या साम्याच्या प्रकाराप्रमाणें शुद्धसाद्दश्यमूलक असा एक नवा प्रकार समासोक्तीचा मानावा, असेंही म्हणतां येत नाहीं. कारण प्रत्येक अलंकाराचा कांहीं तरीएक असाधारण धर्म असतो; तो नसतानाही अलंकार मानू लागले तर वाटेल तो अलंकार वाटेल तेथे होऊ लागेल व सगळे अलंकार एकाच्याच पोटांत घालण्याची वेळ येईल. शिवाय अलंकारांची व्यवस्था कारणारांनीं, समासोक्तीचा साद्दश्यमूलक हा प्रकार सांगितलेलाच नाहीं. म्हणूनच अलंकारसर्वस्वकार वगैरेंनीं विशेषण वाचकशब्दरूपी साद्दश्याला कायम ठेवून व निराळ्या समासाचा आश्रय करून साद्दश्यमूलक समासोक्ति होते, असें दाखविलें आहे, विशेषणवाचक शब्दांचें साम्य सोडून समासोक्ति दाखविली नाहीं.