वरील शंकेवर आमचें उत्तर हें :---
ह्या ठिकाणीं अप्रस्तुतप्रशंसा अलंकारच आहे. मात्र अप्रस्तुतप्रशंसा या शब्दाचा अर्थ, ह्या ठिकाणीं अप्रस्तुताचें कथन असा नाहीं, तर अप्रस्तुताच्या द्वारानें केलेलें कथन असा आहे. अर्थात तें कथन मात्र प्रस्तुताचेंच (हे ध्यानांत ठेवलें पाहिजे.) अशा रीतीनें अप्रस्तुत अर्थ वाच्य असो वा व्यंग्य असो, त्याचे प्रस्तुताचें द्वारा - मग तें प्रस्तुत वाच्य असो वा व्यंग्य असो, - साद्दश्य वगैरेपैकिं कोणत्याही एका प्रकाराचें जें कथन त्याला अप्रस्तुतप्रशंसा म्हणावें. (हा वरील विवेचनाचा तात्पर्यार्थ.) [फक्त प्रस्तुत प्रधान असून, असून, अप्रस्तुत गौण असलें व अप्रस्तुताच्या द्वारा प्रस्तुताचें कथना असलें म्हणजे झालें. अशा ठिकाणीं] वाच्यार्थानेंच, व्यंग्यार्थाचें सूचन येथें होईल तीच अप्रस्तुतप्रशंसा असें मुळींच नाहीं. यावर कित्येकांचें म्हणणें असें कीं, “कमलमनम्भसि कमले च कुवलये तानि कनकलतिकायाम्” [पाण्यावांचूनच्या ठिकाणीं एक कमल (म्ह० तोंड) त्यावर दोन निळी कमळें (म्ह० दोन डोळे) व तीं एका सोन्याच्या वेळीवर म्ह० नायिकेच्या शरीरावर], या ठिकाणीं ज्याप्रमाणें निगरणाचा निश्च्य मानून (म्ह० निगरणानें अभेद करुन) संगति लावतां येते; त्याप्रमाणें ‘आपेदिरे०’ या श्लोकांतही निगरणाच्या निश्चयानें (म्हणजे अभेदातिशयोक्ति मानून) संगाति लावता येणें शक्य आहे. आतां हें निरगण पदार्थानें पदार्थाचें अथवा वाक्यार्थानें वाक्यार्थाचें कसेंही असूं शकतें हा विषय निराळा, या निरगणाच्या वेळीं कराव्या लागणार्या लक्षणेचें बीज हेंच कीं, त्या वाक्यांतील पदार्थांचा लक्षणेंवांचून परस्पर अन्वय्च लावतां येत नाहीं. (म्ह० अन्वय न लागणें एतद्रुपी बाध होत असल्यानें, अशा ठिकाणीं लक्षणा घेणें भाग पडतें) अशारीतीनें अतिशयोक्ति अलंकारानेंच काम भागत असतां साद्दश्यमूकल अप्रस्तुतप्रशंसा कशाला ? यावर कुणी असें म्हणतील कीं, ह्या ठिकाणीं (म्ह० आपेदिरे० या श्लोकांत) निगीर्याध्यवसान संभवत नाहीं; कारण अति शयोक्तिस्थळीं लक्षार्थ हा वाच्यतावच्छेदक रूपानं (म्हणजे उपमेयाच्या विशिष्ट धर्माच्या रूपानें) प्रतीत होतो. पण ‘आपेदिरे०’ या श्लोकंत लक्ष्यार्थ वाच्यार्थाशीं तटस्थ राहून प्रतीत होतो, हा या दोहोंत मोठा फारक आहे. (म्हणजे या ट ठिकाणीं अतिशयोक्तीसारखा प्रकार होत नसल्यानें आतिसयोक्ति अलंकार या श्लोकांत मानतां येणार नाहीं.) पण ज्या ठिकाणीं श्लेष वगैरेम्च्या योग्यानें विशेषणांचें साम्य असेल त्या ठिकाणीं त्या साम्याच्या जोरावर अभेदाध्यवसान होत असेल तर भले होवो. यावर (आम्हा अति शयोक्ति ह्या ठिकाणीं मानणार्यांचें) उत्तर असें कीं, “प्रस्तुत श्लोकांतही वाच्य वृत्तांताशीं अभेदानें प्रस्तुत वृत्तांताचा प्रत्यय येत असल्यानें अतिशयोक्ति व यांत फरक कांहींच नाहीं.
[वरील श्लोकांत अतिशयोक्तिच मानावी असें मानणांर्यांच्या मतावर आमचें (म्ह० जगन्नाथाचें) मत असें :--] खरें आहे. “यस्मिन् खेलति०” “दिगन्ते श्रूयन्ते०” इत्यादि श्लोकांत व्यंग्य, वाच्यार्थाशीं तटस्थ राहूनच प्रतीत होतें, ही गोष्ट सर्व सह्रदयांना मान्य आहे. कुठें संबोधन अथवा त्याचें विशेषण जुळत नसल्यामुळें, अभेदांश (म्ह० विषयाचा अंश) घेणें भाग पडतें, ही गोष्ट खरी; पण तेवढयामुळें सगळीकडेच अभेदाची प्रतिति होते, असें मात्र मानतां येत नाहीं. शिवाय अप्रस्तुतप्रशंसेंत प्रस्तुतार्थ व्यंग्य असतो, ही गोष्ट निर्विवाद. निगीर्याध्यवसानांत मात्र प्रस्तुत अर्थ लक्ष्यच असतो. शिवाय ज्या ठिकाणीं व्याच्यार्थ अत्यंत अप्रस्तुत असल्यामुळें, अभिधेचें पर्यवसान होत नसेल (म्हणजे वाच्यार्थ स्वतंत्रपणानें लागतच नसेल) तेथें लक्षणेला कदाचित् जागा असेलही; पण वर सांगितलेल्या प्रकारानें, वाच्यार्थ व व्यंग्यार्थ दोन्हीही अर्थ (उदा० सरोवृत्तांत व राजवृत्तान्त) प्रस्तुत असतील त्या ठिकाणीं, व्याच्यार्थाचा लेशमात्र बाध होत नसल्यामुळें, लक्षणेचा गंधही नसतो. मग लक्षणेचा एक भाग जें निगरण त्याची गोष्टच कशाला ? अशा ठिकाणीं प्रस्तुत अर्थं व्यंग्यच असतो असें मानिलें पाहिजे; आणि अशा स्थळीं साद्दश्यमूल अप्रस्तुतप्रशंसा मानणे भाग असल्यामुळें, त्या सारख्या स्थळीं, (म्हणजे उदा० पुरा यत्र स्त्रोत: इ० श्लोकांत) अप्रस्तुतप्रशंसाच मानणें योग्य आहे. “पण हा साद्दश्यमूल अप्रस्तुतप्रशंसेचा प्रकार ध्वनीचाच एक प्रकार असल्यानें, आणि ध्वनि, अलंकार होत नसून अलंकार्यच असतो हें उघड असल्यानें, अशा ठिकाणीं (खरे म्हणजे) कोणताच अलंकार मानणें योग्य नाहीं.” असें जर खोलांत शिरून म्हणत असाल तर, अप्रस्तुतप्रशंसेचे, हा साद्दश्यमूल प्रकार सोडून, बाकीचे प्रकारच (या अलंकाराचे) विषय होतात असे ही, या बाबतीत काहींचें म्हणणें आहे.
येथें रसगंगाधरांतील अप्रस्तुतप्रशंसा हें प्रकरण पुरें झालें.