‘सुरवातीला प्रतीत होणार्या निंदास्तुतींचें क्रमानें स्तुतिनिंदेंत पर्यवसान होणें ही व्याजस्तुति.’
व्याजनें होणारी स्तुति म्ह० व्याजस्तुति (अर्थात् निंदेनें स्तुति), या तृतीयातत्पुरुषानें; व व्याजरूप अशी स्तुति (व्याजस्तुति) या कर्मधारय समासानें निंदारूप स्तुति (म्ह० निंदेंत शेवट होणारी स्तुति) असे वरील व्याजस्तुति या शब्दाचे दोन योगार्थ होत असल्यानें, हे दोन्हीही अर्थ ह्या ठिकाणी घ्यावें. (व्याज म्हणजे मिष.)
आमुख या मुळांतील विशेषणानें, निंदा व स्तुति या दोहोंचे निंदा व स्तुति यांत पर्यवसान होत नाहीं (म्ह० त्या शेवटपर्यंत निंदा व स्तुति राहत नाहीत, म्ह० त्या शेवटीं बाधित होतात) असें सांगून (ग्रन्थकारानेंच) त्या दोहोंचे बाधित होणें येथें अभिप्रेत आहे असें सांगितलें आहे; म्हणूनच (म्हणजे त्यांचा मुख्यार्थ बाधित झाल्यानें) ह्या ठिकाणीं ध्वनि नाहीं (म्हणजे येथें लक्षणा आहे). ध्वनींत वाच्यार्थ अबाधित राहून व्यंजनेच्या बळावर दुसरा अर्थ सूचित केला जातो. तसें प्रकृत व्याजस्तुतींत झालेलें नाहीं (म्हणजे ह्या ठिकाणीं वाच्यार्थानें व्यंग्य सूचित होत नसून, वाच्यार्थाचा बाध होऊन लक्षणेनें दुसरा अर्थ म्ह० लक्ष्यार्थ घेतला जातो.)
निंदेनें होणार्या स्तुतिरूप व्याजस्तुतीचें (म्ह० पहिल्या व्याजस्तुतीचें) उदाहरण :---
“हे राजा ! मी पृथ्वीवार राज्य करीत असतां कोणाही मनुष्यास लेशमात्र उपद्रव होत नाहीं, या तुज्या घमेंडीच्या बोलण्यावर आमचा कसा विश्वास बसावा बरें ! कारण प्रत्यक्ष तुझ्या शत्रूंच्या समूहाकडून ते वर स्वर्गांत उडून जात असतां, रागानें तुमच्या कुळाचा मूळ पुरुष जो सूर्य त्याचा भेद केला जातो.”
या श्लोकांत राजाची निंदा हा अर्थ घेतांना राजाचा मूळ पुरुष जो सूर्य त्याचा भेद होतो हा अर्थ घ्यावा व शेवटीं होणार्या स्तुतिरूप अर्थांत रणांगणावर पडलेले शत्रु आपल्या पुण्याईनें सूर्यमंडळाच्या आरपार निघून जाऊन सदगति मिळवतात असा अर्थ घ्यावा.
==
ह्या ठिकाणीं राजवर्णन प्रस्तुत असल्यानें, श्लोकाच्या सुरवातीस होणार्या निंदेचा बाध होऊन तिचें स्तुतीत पर्यवसान होतें.
दुसर्या (म्हणजे स्तुतिरूप निंदा या) व्याजस्तुतीचें उदाहरण :---
‘हे दिव्य बुद्धीच्या दुष्ट पुरुषा ! तुझा, गुणाचे विषयी असलेला पक्षपात मी काय वर्णन करावा ? गुणशाली अशा अखिल साधुजनांना तूं रात्रंदिवस खरोखरीच विसरत नाहींस.”
ह्या ठिकाणीं दुष्ट बुद्धीच्या पुरुषाचें वर्णन करणें हा प्रस्तुत विषय असल्यानें श्लोकाच्या सुरवातीस दिसणारी स्तुति बाधित होऊन तिचें निंदेमध्यें पर्यवसान झालें आहे.
ह्या ठिकाणीं एकच अर्थ कोणत्या तरी रूपानें प्रथम निंदा अथवा स्तुतीचा विषय होऊन, मग प्रकारण वगैरेंच्या बळावर निराळ्या रूपानें म्ह० स्तुति अथवा निंदेचा विषय होतो.
अशा ठिकाणीं वाच्यार्थाचा जेवढा अंश बाधित असेल तेवढयाचेंच दुसर्या म्हणजे लक्ष्यार्थामध्यें पर्यवसान होतें; व बाकीचा बाधित न झालेला श्लोकांतील वाच्यार्थ, जशाचा तसाच अबाधित (कायम) राहतो.
ही व्याजस्तुति दुसर्या अलंकाराशीं मिश्रित ही होते. त्याचें उदाहरण हें :---
“हे राजा ! तुझी, चोहोकडे कवि, लोभानें वाटेल ती स्तुति करोत; पण तेवढयानें तूं स्तुति करण्यास योग्य थोडाच होणार आहेस ? (अर्थात तूं स्तुतीला योग्य नाहींस); कारण तुझा तरुण (प्रबल) असलेला धनुष्याचा प्रताप, आजकाल पृथ्वीला आपल्या वेघेत दाबून घेत आहे; (म्हणजे पृथ्वीला व्यापून टाकीत आहे हा एक अर्थ आणि वसुमतीचें म्हणजे पृथ्वीचें (म्ह० पृथ्वीरूपी स्त्रीचें) द्दढ आलिंगन घेत आहे हा दुसरा अर्थ; हे दोन्हीही अर्थ येथें घ्यावें.) दिशांना व्यापून टाकतो; (आलिंगन घेतो), स्वर्गाला चिकटतो (व स्वर्देवतेचें चुंबन घेतो, हा दुसरा अर्थ), गमन करण्यास कठीण अशा अमरावतीकडे म्हणजे इंद्राच्या राजधानीकडे बेधडक जातो (उपभोगाला अयोग्य अशा अमरावतीचाही अविवेकानें उपभोग घेतो, हा दुसरा अर्थ).” ह्या ठिकाणीं चाप्रप्रतापावर समासोक्ति अलंकाराच्या मदतीनें, रंगेल मनुष्यांतील अग्रणी मनुष्याच्या व्यवहाराच्या आश्रयाची प्रतीति होत आहे. (म्हणजे चापप्रताप हा कुणी एक रंगेल इसम व तो श्लोकांत सांगितलेल्या पृथ्वी, अमरावती वगैरे परनायिकांशीं अनुचित वर्तत करीत आहे, असें सूचित होतें. अर्थात् येथें जारपुरुषवृत्तांताची प्रतीति होऊन, समासोक्ति झालेली आहे. या समासोक्तीच्या आधाराने होणार्या श्लोकांतील वाच्य निंदेचे स्तुतींत पर्यव्सान झाले आहे.