याशिवाय कुवलयानंदकारांनीं (वाच्यस्तुतीनें) निंदेचें सूचन करणार्या व्याजस्तुतीचे उदाहरण म्हणून खालील श्लोका दिला आहे :---
“हें राजा शिवाच्या सर्वस्वापैकीं अर्धे विष्णूने घेतलें; व अर्धे पार्वतीनें घेतलें; अशा रीतीनें पृथ्वीनें पृथ्वीवर शंकरांचा संपूर्ण अभाव झाला असतां, (शंकराजवळील पदार्थांपैकीं) गंगा सुमद्राला मिळाली; चंद्रकोर आकाशांत गेली; सर्पराज वासुकी पाताळांत ! गेला; हे राजा ! शंकराचें सर्वज्ञत्व व ईश्वरत्व हीं दोन तुझ्याकडें आली; आणि शंकराचें भिक्षाटन हें माझ्य़ाकडें आलें !” (अशा रीतीनें शंकराच्या इस्टेटीचीम वासलात लागली; यामुळें तूं सर्वज्ञ व अधीश्वर झालास व मी भिक्षेकरी झालो, हाया श्लोकाचा तात्पर्यार्थ.)
व “या श्लोकांत तूं सर्वज्ञ व सर्वेश्वर आहेस, ही राजाची स्तुति व्याजरूप म्हणजे खोटी मानून, माझी विद्वत्ता वगैरे व दारिद्रय वगैरे जाणून ही पुष्कळ दान करून माझें रक्षण करण्यास तूं समर्थ असतांनाही मला कांहीं सुद्धा देत नाहींस, अशी निंदा व्यक्त होते.” असेंही (त्यांनीं) म्हटलें आहे, तें बरोबर नाहीं. कारण,
“हे दूति, फार चांगलें केलेंस; फारच चांगलें केलेंस; याहून आणखी तें काय करायचें ? कारण तूं माझ्याकरतां दातांनी चावली गेलीस व नखांनीं ओरबाडली गेलीस.”
हा श्लोक वरील श्लोकाच्या खालीं लगलीच व्याजस्तुतीचें उदाहरण म्हणून तुम्ही (त्यांनीं) दिलेला आहे, त्याहून वरील श्लोकाचा अत्यंत फरक आहे. ह्या श्लोकांत, ‘फार चांगलें केलेंस, यापैक्षां आणखी तें काय करायचें ?’ या शब्दांनीं ‘तूं चांगले करणारी आहेस’ अशी होणारी जी स्तुति ती (संदर्भ माहीत असल्यानें) ऐकल्याबरोबरच बाधित झाली व नंतर स्वत:चा अर्थ समर्पण करून वरील अर्थाच्या अजिबात उलट अर्थांत म्हणजे निंदारूप अर्थांत त्या स्तुतीरूप अर्थाचें पर्यवसान झालें. पण प्रस्तुत ‘अर्धं दानव०’ इ० श्लोकांत सर्वज्ञत्व व ईश्वरत्व हे जे शब्दांचे वाच्यार्थ प्रतीत झाले आहेत त्यांचा बाध होऊन त्यांच्याशीं संपूर्ण विरुद्धा असा दुसरा अर्थ मुळींच होत नाहीं. कारण राजवर्णनाच्या प्रकारणांत राजाच्या ठिकाणीं अज्ञत्व आणि पामरत्व आहे असें सांगण्याची इच्छा कवीला असणें अशक्य आहे. याच कारणामुळें, तूं सर्वज्ञ असून माझें रक्षण करीत नाहींस, असें टोचून बोलण्यानें होणारी निंदा सुद्धां ह्या ठिकाणीं सांगावयाची नाहीं; उलट, तूम सर्वज्ञ व समर्थ असल्यानें माझ्यासारख्या दरिद्रयाचें रक्षण करणें तुला योग्य आहे, अशी राजाला विनंती करणें हा अर्थ, ह्या ठिकाणीं कवीला सांगावयाचा आहे. आतां घटकाभर असें मानू कीं, तुम्ही म्हणता तसें, टोचून बोलण्यानें होणार्या निंदेचें या ठिकाणीं सूचन आहे; एवढयानें तुम्हाला खुष व्हायचें असेल तर आणि खुशाल व्हा; तरी पण :---
“साधु दूति पुन; साधु” या पद्यांत, ज्याप्रमाणें, ‘दूती चांगलें कृत्य करणारी आहे’ हा अर्थ, विजेच्या चमकेप्रमाणें ओझरता दिसतो व नाहींसा होतो त्याप्रमाणें, ‘अर्धं दानव०’ या श्लोकांत राजाचें सर्वज्ञत्वव ईश्वरत्व हे (हा अर्थ) क्षणभरच (विजेच्या चमकेप्रमाणें) प्रतीत होतें व नाहींसे होतें असें मात्र म्हणणें तुम्हाला शक्य नाहीं. कारण राजा सर्वज्ञ व ईश्वर आहे असें जर न मानलें तर, पुढें त्याला टोचून बोलल्यानें होणारी निंदा डोकेंच वर काढू शकणार नाहीं. आणि शिवाय या श्लोकांत राजा अडाणी व असमर्थ आहे, हा अर्थ प्रतीत होत नसूत, त्याच्या विरुद्ध अर्थ प्रतीत होतो; तेव्हां सह्रदयांनींच विचार करावा कीं, हे सगळे त्या द्रविडश्रेष्ठांनीं (द्रविड बैलोबांनीं हा आंतला निंदार्थ) काय म्हटलें आहे.
येथें रसगंगाधरातील व्याजस्तुति प्रकरण संपलें.