अथवा हे दुसरे उदाहरण :---
“कानापर्यंत विशाल डोळे असणार्या हे राजा ! एक गंमत तर ऐक, तुझ्या कमलासारख्या हातांत तळपणारी तुझि तलवार, रणांगणाच्या अग्रभागीं, अरेरे ! तरुण शत्रूंच्या छातीवार जाऊन पडतें. ज्यांच्यांतील कामेच्छा केव्हांही थांबत नाहीं अशा तरुण स्त्रियांचा स्वभाव भलताच निर्लज्ज असतो. (कामातुराणां न भयं न लज्जा, हेंच खरें,) अर्थान्तरन्यास अलंकारानें परिपोषित अशी ही व्याजस्तुति आहे. कुणी म्हणतील, ‘येथें (‘देवत्वां’ इत्यादि व ‘अये राजन्०’ इत्यादी समासोक्तीनें युक्त अशा वरील दोन श्लोकांत व्याजस्तुति कशी होईल ? वाच्य असलेल्या निंदास्तुतींनीं स्तुतिनिंदेचें सूचन केलें असेल तरच व्याजस्तुति होतें, हें सर्वांना मान्य आहे; पण ह्या ठिकाणीं, केवळ चापप्रतापानें केवळ वसुमतीला आलिंगन देणें म्हणजे व्यापून टाकणं हा जो वाच्यार्थ, तो निंदारूपच नाहीं; बरें, समासोक्तीनें प्रकट होणारा जो रंगेल मनुष्याचा व्यवहारा, ‘तो निंदारूप असला तरी तो वाच्यार्थ नाहीं तर व्यंग्यार्थ आहे. ’ पण ही शंका योगा नव्हे. कारण लक्षणांतील आमुखप्रतीत या शब्दाचा अर्थ वाच्यार्थांत म्ह० पहिल्यानें अथवा सुरवातीला प्रतीत होणार्या अर्थावर शेवट न होणें, एवढाच येथें इष्ट आहे. वाच्यार्थापर्यंतच प्रतीत होणारा अर्थ असा वरील पदाचा अर्थ केल्यास गौरवदोष होऊ लागेल. प्रकृतस्थलीं, ‘एवढयानें तूं स्तुतीस योग्य थोडाच होणार आहेस ?’ इत्यादि निंदेला द्दढ करणार्या समासोक्तीच्या मदतीनें, प्रथमच प्रकट झालेली निंदा शेवटीं स्तुतींत पर्यवसान पावतें. अशी वस्तुस्थिति असल्यानें, ह्या ठिकाणीं (व्याजस्तुति मानण्यांत) कांहीं एक दोष नाहीं.
अशा रीतीनें :--- “हे शाल्मली वृक्षा (मराठी, शिवरीच्या वृक्षा), तुझ्या भाग्याचें काय वर्णन करावें ? कारण, तूं रात्रंदिवस फळाच्या आशेनें युक्त अशा द्विजाकडून [(१) ब्राम्हाण हा एक अर्थ (२) व पक्षी हा दुसरा अर्थ] सेविला जातोस.”
ह्या ठिकाणीं व्याजस्तुति अप्रस्तुतप्रशंसेनें मिश्रित ही आहे. वरील विवेचनावरून,
“दुसर्यांच्या घरांतील लफडीं घेऊन मला काय करायचें आहे ? पण मी पडलों दाक्षिणात्य, माझा स्वभाव जात्याच बडबडया, त्यामुळें मला गप्प बसवत नाहीं; (म्हणून सांगतों कीं,) देशोदेशीं, बाजारांत, चव्हाटयावर, दारुच्या गुत्त्यांत, एखाद्या वेड लागलेल्या स्त्रीप्रमाणें हे राजा, तुझी लाडकी कीर्ति भटकत आहे.” ह्या प्राचीनांच्या पद्यांत प्रथम सुरू झालेली, व स्तुतींत पर्यवसान म्ह० शेवट पावणारी निंदा, ‘तुझी कीर्ति’ असें म्हटल्यानें, अजिबात उखडून गेली आहे. त्या निंदेची वाढच या श्लोकांत झालेली नाहीं. (मग तिचे स्तुतींत पर्यवसान कोठून होणार ?)” असें जें अलंकारसर्वस्वकारांनीं म्हटलें आहे व त्याचेंच व्याख्यान करतांना विमर्शिनी या टीकेंत, “हे पद्य व्याजस्तुतीचें उदाहरणच होऊ शकत नाही,” असें जें ध्वन्यालोकलोकचनकारांच्या म्हणण्यावर कटाक्ष करून म्हटलें आहे, त्या सर्वाचें खंडन झालें. करण, ‘किं वृत्तातै:’ या शब्दांनीं, प्रथम, वरील श्लोकांत, निंदेचेंच अनुमान होत असल्यामुळें, पुढें समासोक्ति जरी डोकें वर काढीत असली तरी तिच्यावर हा प्रथम प्रतीत होणारा निंदारूप व्याच्यार्थ अवलंबून नाहीं. (अर्थात या ठिकाणीं वाच्यार्थ, समासोक्तीची मदत न घेतांनाही स्वतंत्रपणें निंदारूप अर्थ सुरवातीस व्यक्त करून स्तुतींत पर्यवसान पावतो; त्यामुळें येथें व्याजस्तुति घेण्यास कांहीं हरकत नाहीं) अन्वयाच्या क्रमानें पाहताही (चौथ्या ओळींत) प्रथम वल्लभा शब्द येत आहे; त्याच्या (लाडकी स्त्री या) अर्थाचाच पहिल्या तीन ओळींतील अर्थाशीं प्रथम अन्वय होतो. नंतर वल्लभा या नामार्थाचा कीर्ति या नामार्थाशीं अभेदानें अन्वय केल्यावर त्याच्याशीं प्रकारण वगैरे पाहून व उलट जाऊन पुन्हा पहिल्या तीन ओळींतील पदार्थांचा अन्वय होतो. यावरून लोचनकारांनीं दिलेलें वरी उदाहरण सुसंगतच आहे हें उघड आहे.