प्रथम ज्या वस्तूची स्तुति किंवा निंदा सुरू होते, त्या स्तुतिनिंदांचें त्याच वस्तूच्या निंदास्तुतींत पर्यवसान होत असेल तरच, ही व्याजस्तुति त्या ठिकाणीं होते. पण याच्या उलट म्हणजें, सुरवातीस एका वस्तूची स्तुर्तिनिंदा व त्याचें पर्यवसान भलत्याच वस्तूच्या (अनुक्रमें) निंदास्तुतींत होत असें असेल तर, त्या ठिकाणीं मात्र व्याजस्तुति होत नाहीं, असा अलंकारशास्त्राच्या प्राचीन प्रवर्तकांचा नियम आहे. म्हणूनच “ज्या ठिकाणीं शब्दानें सांगितलेली स्तुति अथवा निंदा बाधित होऊन व वाच्यार्थाचा, परार्थाकरतां स्वसमर्पण झाल्यानें निंदा अथवा स्तुतींत शेवट होतो (ती व्याजस्तुति)” असें व्याजस्तुतीचें लक्षण त्यांनीं त्या त्या ठिकाणीं आपापल्या ग्रंथांत दिलेलें आहे. अशा रीतीनें :---
“दुसर्या जवळ याचनेकरतां जाण्याची जी अखंड चिंता त्या चिंतारूप अग्नीच्या शेकडों ज्वाळांनीं ज्यांनीं अंत:करणें आहाळून गेलीं नाहींत असे वृक्ष, चांगल्या तर्हेनें आपलें जीवन व्यतीत करतात.”
वरील श्लोकांत सांसारिक जनांच्या निंदेंत वृक्षाच्या स्तुतीचें पर्यवसान होत असलें तरी (म्ह० स्तुति वृक्षाची व निंदा सांसारिक जनाची, असा कवीचा अभिप्रेत अर्थ असल तरी) ह्या ठिकाणीं व्याजस्तुति नाहीं. कारण. पहिल्यानें प्रतीत होणारी वृक्षांची स्तुति ह्या ठिकाणीं अबाधितच राहिली आहे. अशाच रीतीनें निंदेनें गम्य होणार्या स्तुतीच्या बाबतींतही समजावें. एकाच्या स्तुतीनें दुसर्याची स्तुति व एकाच्या निंदेनें दुसर्याची निंदा गम्य होत असेल तीहीं, या अलंकाराचा विषय नाहीं. याला कारण वर दिलेंच आहे. उदाहरणार्थ :---
‘जे तुझें सतत ध्यान करतात, तेच पुरुष पुण्यशाली लोकांत श्रेष्ठ, पण तुझ्याहून निराळ्या ठिकाणीं मन असणार्या लोकांचा जन्म, हे शंकरा, फुकट गेला ! (असें मी समजतों.) “या ठिकाणीं पूर्वार्ध व उत्तरार्ध यांत आलेली (शंकराचें) ध्यान करणार्या लोकांची स्तुति व इतर वस्तूंचें ध्यान करणार्या लोकांचीं (अनुक्रमे) निंदा त्यांनीं धानविषय ज्या शंकर व इतर वस्तू त्यांच्या स्तुतीची व निंदेची (अनुक्रमें) प्रतीति होते (म्हणून येथें व्याजस्तुति नाहीं). अशीं वस्तुस्थिति असल्यानें कुवल्यानंदकारांनीं “स्तुतीच्या व निंदेच्या योगानें निराळ्या स्थळीं (वैयधिकरण्येन) निंदेचें व स्तुतीचें ज्ञान झाल्यास वैयधिकरण्यामूलक व्याजस्तुतीचे चार प्रकार जास्त होतात” असें जें म्हटलें आहे, त्याचें आपोआप खंडन झालें. प्राचीनांची नियमरुपी मर्यादा तोडून, स्वत:च्या रुचीला गोड वाटणारा मार्ग स्वीकारायचा असेल तर, भुणीभूत व्यंग्याचे अथवा प्रधान व्यंग्याचे सर्व प्रकार अलंकारांच्या पोटांत टाका; किंवा व्याजस्तुति सुद्धां योगार्थानें किंचित् स्पृष्ट होत असल्यानें, तिलाही अप्रस्तुतप्रशंसेत ढकला व त्या अप्रस्तुतप्रशंसेचे कार्य कारण वगैरे विषय असतात, असा दुराग्रह सोडून द्या, कारण असें केल्यानें विनाकारण फार भानगडी होतील. “पण मग पूर्वीं आम्ही सांगितलेल्या चार प्रकारांचा अंतर्भाव कुठें करावा !” असें विचारीत असाल तर “व्यंग्याच्या प्रकारांत त्यांचा समावेश करा, हें (घ्या) त्याला उत्तर. व्यंग्याचे सर्व अपरंपार प्रकार, अलंकारांच्या छोटाशा गाईच्या खुरांत, समाविष्ट करणे शक्यच नाहीं.