संतचरित्रे - मिराबाई
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
राजियाची कन्या नाम मिराबाई । विठोबाचे पायीं रत सदा ॥१॥
मायबाप तिचे करिती कृष्णसेवा । आवडीनें देवा पूजिताती ॥२॥
सवें मिराबाई जात असे नित्य । वेधलेंसे चित्त कृष्णपायीं ॥३॥
मिरा गुणवंती लावण्याची खाणी । आवडे ती मनीं मायबापां ॥४॥
म्हणती देवा इचा करावा सांभाळ । हांसे ते वेल्हाळ मिराबाई ॥५॥
मायबापें मज केलें कृष्णार्पण । हरुषलें मन फार तिचें ॥६॥
वरिला म्यां आतां द्वारकेचा नाथ । समाधान चित्त झालें माझें ॥७॥
आनंदानें करी देवाचें पूजन । नाचे उल्हासानें प्रेमें डोले ॥८॥
संत आणि साधु येती कीर्तनासी । आनंद मानसीं होय तिच्या ॥९॥
संतांचिया पायीं मिरा असे लीन । अहोरात्र ध्यान देवाजीचें ॥१०॥
समारंभ ऐसा होतां नित्यानित्य । आनंदभरित मायबाप ॥११॥
धन्य मिराबाई भक्तीची आवडी । लागलीसे गोडी देवाजीची ॥१२॥
सज्जन अंतरीं संतोष मानिती । निंदक निंदिती तिजलागीं ॥१३॥
राजियानें कन्या केखोनि उपवर । द्यावें इशीं घर करोनियां ॥१४॥
बोले मिराबाई ऐका तुम्ही ताता । वरिला म्यां आतां चक्रपाणी ॥१५॥
उभयतां तुम्हीं केलें कृष्णार्पण । तें कां हो स्मरण विसरले ॥१६॥
त्यानेम केआ असे माझा अंगिकार । नका पाहूं वर दुजा आतां ॥१७॥
देवाविण मज नावडे आणीक । मोठें आहे सुख देवापायीं ॥१८॥
फार गोडी त्यातें वर्णितांचि नये । बोलूं आतां काय एक मुखें ॥१९॥
तेव्हां मातापिता करिदी उत्तर । बौद्ध अवतार देव झाले ॥२०॥
नामीं रूपीं त्याच्या असों द्यावें चित । असे सर्व हित प्रपंचाचें ॥२१॥
ओळखूनि रूप करावा संसार । सर्व व्यवहार असे त्यचा ॥२२॥
ऐकोनियां ऐसें खहिताचे ठायीं । बोले मिराबाई पितयासी ॥२३॥
आधीं ज्यानें केलें अमृत प्राशन । नावडे त्या धुण कदाकाळीं ॥२४॥
मुंगिये लागली साखरेची गोडी । आवडीनें उडी घालीतसे ॥२५॥
राजहंस पक्षी मोतीयांचा चारा । आणिक इतरा न सेविती ॥२६॥
तैसा म्यां वरिला असे हा गोविंद । नका करूं शोध आणिकांचा ॥२७॥
हरि विणें कांहिं नेणें मी आणीक । सर्वही जनलोक माझे बाप ॥२८॥
तुम्ही म्हणा बौद्ध झाले चक्रपाणी । संशय हा मनीं न धरावा ॥२९॥
भाविकासी द्दश्य अभाविका बौद्धा । मोठा हा सावध नारायण ॥३०॥
लक्षस असे ज्याचें देवाजीचे पायीं । येऊनियां राही ह्रदयांत ॥३१॥
त्याचा सर्व धंदा करी चक्रपाणी । बोलिले पुराणीं व्यासादिक ॥३२॥
संशय चित्तांत नका धरूं आतां । सर्व हा जाणता पांडुरंग ॥३३॥
नाम्यासंगें जेवी आवडी हा जाणा । कैसें त्या म्हणा बौद्ध आतां ॥३४॥
एकनाथा घरीं बाहतसे पाणी । कैसा चक्रपाणी बौद्ध झाला ॥३५॥
कबीराचे मागीं विणितसे शेले । जाटाचें राखिलें शेत तेणें ॥३६॥
आणिकही कामें भक्तांघरीं करी । काय त्याची थोरी वर्णूं आतां ॥३७॥
राजा म्हणे मिरा समजली पूर्ण । परी जग दूषण ठेविताती ॥३८॥
म्हणोनियां त्यानें केली बंदोबस्ती । प्रवेश तो संतीं न होयची ॥३९॥
मिराबाई म्हणे अहो पांडुरंगा । कांहो संतसंगा अंतरलें ॥४०॥
संतांचे संगतीं आनंद सोहळा । दाखवाल डोळां केव्हां देवा ॥४१॥
कनवाळु मोठी सांवळी विठाई । नेई मिराबाई कीर्तनासी ॥४२॥
श्रुत झाली वार्ता तेव्हां राजियासी । जाते कीर्तनासी मिराबाई ॥४३॥
क्रोधावून नृप बोले त्या कांतेला । देईं विष प्याला निरालागीं ॥४४॥
लौकिकाची लाज सांडियेली तिणें । उपाय करणें हाचि आतां ॥४५॥
तेचि वेळीं प्याला भरोनियां विष । आली मंदिरास तेव्हां तिच्या ॥४६॥
येईं मिराबाई लाविलें दूषण । ऐसे सर्व जन बोलताती ॥४७॥
म्हणोनियां नृपें दिला विष प्याला । कुळासि लाविला डाग तुवां ॥४८॥
बोले मिराबाई सांवळ्या अनंता । तूं एक जाणता पांडूरंगा ॥४९॥
गेला तरी जावो सुखें माझा प्राण । निवारीं दूषण राजियाचें ॥५०॥
म्हणोनियां नृपें दिला विष याला । ही लाज तुजला देवराया ॥५१॥
मिरा त्यचे पाटीं झाली अपवित्र । बोलती सर्वत्नजग ऐसें ॥५२॥
कळेल हो तैशी राखीं याची लाज । वारंवार तुज काय सांगूं ॥५३॥
करूनियां तेव्हां कृष्णाचें चिंतन । प्याली आवडीनें विष प्याला ॥५४॥
नाहीं बाधा झाली तयाची ते वेळीं । मूर्ति झाली काळी देवाजीची ॥५५॥
येऊनियां नृपें विलोकिलें डोळां । आणिक सकळा जनानीं ते ॥५६॥
धन्य मिराबाई वंदिती चरण । जन्मलें निधान वंशामाजी ॥५७॥
मिरा वनमाळी नव्हेचि वेगळी । निश्चय सकळीं संतीं केला ॥५८॥
बोले मिराबाई अहो चक्रपाणी । कां तुझी जाचणी सोसितसां ॥५९॥
प्रेमें अश्रुनीर वाहे तिचे डोळां । माझा कळवळा तुम्हां आला ॥६०॥
सांवळे सकुमार गोजिरे चरण । इच्छितसे मन पहावया ॥६१॥
भकांची आवडी पुरवी केशव । पूर्ववत देव झाला तेव्हां ॥६२॥
निळी रेषा असे अद्याप ते कंठीं । देतां प्रीति मिठीं पाहती लोक ॥६३॥
धन्य मिराबाई धन्य तिची भक्ति । करिताती स्तुति साधुसंत ॥६४॥
संतांचा तो दास बोले शिंपिनामा । त्यानें दिला प्रेमा सदां मज ॥६५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 14, 2015
TOP