संतचरित्रे - जनाबाई

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
नामयाचे घरीं असे दासी जनी । तिनें चक्रपाणी वश केला ॥१॥
करितां कामधंदा ध्यानीं नारायण । करीत चिंतन अहोरात्न ॥२॥
देखोनियां भाव तिचा पांडुरंग । काम करूं लागे जनीलागीं ॥३॥
रात्रीं येऊनियां जनीचिया घरीं । दळूं लागे हरी तिजलागीं ॥४॥
दळितां काढिली माळ विजयंती । ठेविली परती शालजोडी ॥५॥
जनीचें आवडे देवाजीस गाणें । झालासे तल्लिन पांडुरंग ॥६॥
प्रात:काळ झाला तेव्हां त्या समयासी । जात हृषिकेशी तांतडीनें ॥७॥
घेऊनियां गेले जनीची वाकळ । विसरले माळ शाल जोडी ॥८॥
तेव्हां पुजार्‍यानेंज उघडिलें द्वार ।  पाहिला तो वर रुवक्मिणीचा ॥९॥
देवाच्या अंगावर देखिली वाकळ । नाहीं गळां माळ शालजोडी ॥१०॥
एकमेकां तेव्हां पुसती पुजारी । कोणें केली चोरी देवाजीची ॥११॥
शोध करितांना जनीची वाकळ । आले ते सकळ तिच्या घरीं ॥१२॥
शालजोडी माळ होती तिचे घरीं । दाविती पुजारी सर्वांलागीं ॥१३॥
बांधियेली तेव्हां त्यांनीं दासी जनी । नामया लागुनी श्रुत केलें ॥१४॥
नामा म्हणे जने कांगे केली चोरी । बोलतसे खरें जनी त्यासी ॥१५॥
रात्नी माझ्या घरा आले पांडुरंग । दळितां श्रीरंगा घाम आला ॥१६॥
काढियेली माळ तेव्हां शालजोडी । गातसे आवडी मजसवें ॥१७॥
प्रात :--- काळीं देव गेले ते उठोनी । न कळे करणी कैसी ॥१८॥
बापा मी सांगतें हेंचि हो प्रमाण । पुसावें जाऊन पांडुरंगा ॥१९॥
नामा म्हणे तुम्हां कळेल तैसें करा । नका या विचारा पुसों मज ॥२०॥
नामा म्हणे जने केलें असें कर्म । जाणे एक वर्म पांडुरंग ॥२१॥
धमकावुनी नेली त्यांणीं दासी जनी । सकळ ब्राम्हाणीं मिळोनियां ॥२२॥
श्रुत केली वार्ता गांर्वांच्या राजाला । ते म्हणे जनीला शूळीं द्यावें ॥२३॥
शूळ तो रोंविला चंद्रभागेतीरीं । पहती नरनारी द्दष्टी तेव्हां ॥२४॥
जनी आठवीत तेव्हां पांडुरंगा । कां गा तूं श्रीरंगा मोकलिसी ॥२५॥
घडी घडी येत होतासी तूं देवा । आज कां केशवा निद्रा आली ॥२६॥
कोठें गुंतलासी भक्तीचिया काजा । धांवें महाराजा येईं आतां ॥२७॥
प्रल्हादाकारणें नृसिंह झालासी । स्तंभीं प्रकटसी क्षणमात्रें ॥२८॥
दीनांचा दयाळू तुझें नांव बापा । कां हो अवकृपा केली मज ॥२९॥
द्रौपदीनें केला जेव्हां तुझा धांवा । आलासी केशवा क्षणामाजी ॥३०॥
माझा तुज देवा आला हो कंटाळा । आळ हा घातला मजवरी ॥३१॥
समजलें मज होतें तुझे मनीं । नसावी हे जनी पांडुरंगा ॥३२॥
करितां कामधंदा तुज आला शीण । कंटाळलें मन देवा तुझें ॥३३॥
कासयासी बोल ठेवूं तुज देवा । प्रारब्धाचा ठेवा फळा आला ॥३४॥
आतां ऐक माझी हेचि विनवणी । भेट चक्रपाणी एक वेळां ॥३५॥
न मागें मी कांहीं देवा तुज आतां । पायां पै अनंता ठाव देईं ॥३६॥
ऐकूनियां ऐसी जनीची विनवणी । आले चक्रपाणी धांवोनियां ॥३७॥
जनीच्या सांगातें होते राजदूत । नेलीगे त्वरित शूळापाशीं ॥३८॥
जनीनें तो शूळ पाहातां नयनीं । अकस्मात्‌  पाणी झालें त्याचें ॥३९॥
शस्त्रें जीं कां होतीं राजदूतां करीं । विरालीं तीं सारीं पाणी झालें ॥४०॥
विठोबानें तेव्हां आलिंगिली जनी । म्हणे माय बहिणी श्रमलीसी ॥४१॥
जनी म्हणे देवा तूं पाठीसी असतां । नाहीं भय चिंता आम्हालागीं ॥४२॥
श्रुत झाली वार्ता राजया लागोनी । शूळासूद्धां पाणी शस्त्रें झालीं ॥४३॥
समजलें तेव्हां तयाचे अंतरीं । जनीला श्रीहरी सांभाळितो ॥४४॥
चला जाऊं आतां जनीच्या दर्शना । सिद्ध झाली सेना पाय चाली ॥४५॥
क्षमा करीं माते आमुचे अन्याय । कृपा द्दष्टी पाहें आम्हांकडे ॥४६॥
देऊनियां वस्त्रें भूषणें जनीसी । गेला आश्रमासी राजा तेव्हां ॥४७॥
समजलें तेव्हां पंढरीच्या लोकां । जनीचा हा सखा पांडुरंग ॥४८॥
जनीचे अभंग लिहीत नारायण । करिती श्रवण साधुसंत ॥४९॥
धन्य तेचि जन धन्य तिची भक्ति । नामदेव स्तुति करीतसें ॥५०॥
२.
सोयरिक सांडियली सर्वांची । जोडी केली विठ्ठलाची ॥१॥
लोभ सांडिला सर्वांचा । संग धरिला विठोबाचा ॥२॥
जालों निधडा नि:शंक । गायनाचें कौतुक ॥३॥
प्रेमभरित सर्वदा । मुखीं नाम हरि गोविंदा ॥४॥
ऐसा सर्वकाळ गाय । भावें विठोबाचे पाय ॥५॥
नामा म्हणे ऐकें हरी । दासी जनीची वाट करी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP