संतचरित्रे - भानुदास

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


पंढरीसी यात्रा मिळाली अपार । नाहीं तो सुंदर पांडुरंग ॥१॥
म्हणती संतजन काय झाला देव । पडलासे संदेह सकळांसी ॥२॥
कांहो उपेक्षिलें कृपाळु अनंता । भेट देईं संतां आपुलिया ॥३॥
अयोध्या नगरासी नेला पंढरीराव । कळला अभिप्राय सकळांसी ॥४॥
असा कोणी भक्त आहे पराक्रमी । रुक्मिणीचा स्वामी आणी येथें ॥५॥
ऐकोनियां मात कोणीच न बोले । म्हणोन उपेक्षिलें पांडूरंगा ॥६॥
बोले भानुदास आणितों मी देव । कैसा पंढरीराव गेला पाहों ॥७॥
भानुदासें केलें सकळिकां नमन । मग आज्ञा घेऊन चालिला तो ॥८॥
अयोध्या नगरासी गेला भानुदास । पंढरीनिवास पाहावया ॥९॥
दुंदुभी वाजती वाजंत्रांची ध्वनि । परी चक्रपाणी द्दष्टी नये ॥१०॥
प्रात:काळीं पूजा केली रामरायें । आणिका न होय दर्शनची ॥११॥
कवाडें अर्गळा कुलुपें असती द्वारा । करूनियां भीतरीं पांडूरंगा ॥१२॥
देखोनि कवतुक बोले भानुदास । भला बसलास देवा येथें ॥१३॥
भाग्यवंत देव झाल सितूं आतां । दुर्बळ अनाथा कोण पुसे ॥१४॥
तेव्हां झाली रात्र पडिला अंधकार । जोडोनियाम कर विनवितसे ॥१५॥
आतां देव तुम्ही चलावें येथूनि । नाहीं तरी आम्ही भले नाहीं ॥१६॥
आम्हांसि टाकूनि येथें बैसलासि । पोटच्या पोरासी कोण पोसी ॥१७॥
आम्हां वांचोनियां नाहीं तुम्हां गति । न करीं फजिती जगामध्यें ॥१८॥
करुणा वचन भाकोनियां येथें । केलासे उपाय भानुदासें ॥१९॥
कुलुपें कवाडा बंधन उघडती । देखिली श्रीमूर्ति भानुदासें ॥२०॥
राउळाभीतरीं गेला भानुदास । साष्टांगीं चरणास नमन केलें ॥२१॥
सद्नदीत कंठ झाल्या दोघां भेटी । आनंद तो पोटीं समायेना ॥२२॥
देवा तुम्हीं कांहो सोडिली पंढरी । लागलीसे गोडी वैभवाची ॥२३॥
म्हणे पांडुरंग बंदीं मी पडिलों । भिमा अंतरलों चंद्रभागा ॥२४॥
नवरत्नाची माळा घालूनियां कंठीं । म्हणे द्यावी भेटी प्रात:काळीं ॥२५॥
देऊळा बाहेरी गेला भानुदास । कुलुपें कवाडास बंधन झालें ॥२६॥
प्रात:काळीं दर्शन भानुदास करी । आठवी श्रीहरि ह्रदयामधीं ॥२७॥
घालूनि आसन बैसला ध्यानस्थ । ठेवोनियां चित्त पांडूरंगा ॥२८॥
प्रात:काळीं पूजा करावया आला । रामराय न देखे माळा रत्नाचि ते ॥२९॥
कोणी नेली माळा झालासे बोभाट । ताडिलें सत्वर पुजार्‍यासी ॥३०॥
चोर पहावयासी सेवक धांवती । माळा दिसे कंठीं भानुदासा ॥३१॥
त्यासी देखूनि ताडिती प्रसिद्ध । म्हणती हाचि पक्का मैंद चोर असे ॥३२॥
चोर धरूनियां रायाराशीं नेला । म्हणती यासी घाला सुळावरी ॥३३॥
शूळ तासोनियां खांदीं जो दिधला । मागें चालविला भानुदास ॥३४॥
भानुदास म्हणे एइकावें वचन । भेटी मी घेईन विठोबाची ॥३५॥
आला भानुदास देवा नमन केलें । शिक्षेसी लाविलें म्हणे आम्हां ॥३६॥
अगा तुझी देवा लोभ असों द्यावा । आठव धरावा ह्रदयामध्यें ॥३७॥
तुजमज वियोग केंवि होय देवा । न सोडूं केशवा चरण तुझे ॥३८॥
सुळ नेवोनियां वेसीबाहेर रोंविला । म्हणती आतां याला वर घाला ॥३९॥
तेव्हां भानुदास आठवी विठ्ठला । म्हणती लवकर घाला सुळावरी ॥४०॥
भक्ताचा कळवळा पांडुरंगा आला । कंठ तो फुगला सद्नदीत ॥४१॥
नेत्रीं अश्रुधारा कांपतो थरथरी । भक्तांचा कैवारी धांविन्नला ॥४२॥
शूळा अकस्मात्‌ पाला तो फुटला । फळें पुष्पें तो झाला घवघवीत ॥४३॥
शूळ वृक्ष झाला सांगती रायाला । विस्मय वाटला सकळिकांसी ॥४४॥
भानुदासा नमन केलें रामरायें । म्हणे हा अन्याय घडिला आम्हां ॥४६॥
पांडुरंग म्हणे कोणी गांजिलें माझ्या भक्ता । सांग भानुदासा काय झालें ॥४७॥
आमचा कैवारी कृपाळु श्रीहरी । असतां साहाकारी कोण गांजी ॥४८॥
आतां तुम्ही देवा बसावें खांदेसी । नेईन मी तुम्हांसी पंढरीसी ॥४९॥
रामराय म्हणे मज उपिक्षिलें । येथोनियां वहिलें तुम्हीं जातां ॥५०॥
आपुलें वचन सत्य केलें देवा । लोभ आम्हावरी असों द्यावा ॥५१॥
घेवोनी खांदेसी देव बैसवीला । पंढरीसी आला भानुदास ॥५२॥
झालीसे दाटणी करती नमस्कार । मोठा संतभार जमला तेथें ॥५३॥
नामदेव म्हणे संतांचे संगतीं । अधमहि होती संतजन ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP