बहीणभाऊ - रसपरिचय २
चार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.
ती असें उत्तर देते. परंतु तिच्या मनाचें त्यानें समाधान नाहीं होत. आपला भाऊ आजारी बिजारी तर नसेल असें तिच्या मनांत येतें. परंतु या मनांतील दुष्ट शंकेचें ती स्वत:च निरसन करते. माझा भाऊ आजारी असता तर हा वारा शीतल व सुगंधी असा येता ना असें ती म्हणते. किती सहृदय व रम्य कल्पना :
“दूरच्या देशींचा शीतळ वारा आला
सुखी मी आईकीला भाईंराया ॥
दूरच्या देशींचा सुगंधी येतो वात
असेल सुखांत भाईराया ॥”
वार्याच्या गुणगुणण्यांत तिला सारी कुशल वार्ता मिळते, दुसरे कोठलें पत्र, कोठला निरोप ?
भाऊ खुशाल आहे. मग कां येत नाहीं ? तिला नाना शंका येतात. लाहान. पणीं मीं चावा घेतला, दादानें भातुकलीचे दाणे खाल्ले म्हणून मी त्याला बोललें, तें आठवून का दादा येत नसेल ? परंतु ती म्हणते :
“अपराध पोटीं प्रेम थोरांचें घालित
येई धांवत धांवत भाईराया ॥”
भाऊ बहिणीवर रागावेल ही कल्पनाच तिला असहय होते. कस्तुरीचा सुगंध कधीं सरत नाहीं, चंद्र कधीं प्रखर होत नाहीं, सोनें सडत नाहीं, आकाशाचा रंग बदलत नाहीं. किती सहृदय उपमा व द्दष्टान्त :
पाठच्या बहिणीवरी भाऊ का संतापेल
कस्तुरी का सोडील निज वास ॥
पाठच्या बहिणीवरी भाऊ कसा रागावेल
चंद्र आग का ओकेल कांहीं केल्या ॥
पाठच्या बहिणीवरी भाऊ कसा हो रुसेल
कधीं सोनें का कुसेल कांहीं केल्या ॥
पाठच्या बहिणीवरी भाऊ का रागावेल
रंग ना बदलेल आकाशाचा ॥
भाऊ माझ्यावर रागावणें अशक्य, मग माझ्या पतीवर का रागावला आहे मागें आला होता एकदां न्यावयाला, तर यांनीं पाठलें नाहीं मला. पुन्हा कशाला येईल दादा अपमान करून घ्यायला ? परंतु बहिणीच्या समाधानासाठीं दादा का तें विसरणार नाहीं ?
आपलेच ओठ दादा आपलेच दांत
थोर सारें विसरत मागील रे ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP