बहीणभाऊ - रसपरिचय ७
चार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.
माझे भाऊ नवानवसाचे आहेत. त्यांच्यावर द्दष्ट नको पडायला. ते कडू असले तरी देवाच्या दारांतले आहेत. देवानें दिलेले आहेत :
माझा भाईराया कसा का असेना
त्याच्यासाठीं प्राणा टाकीन मी ॥
भाऊ कसाहि असला तरी त्याच्यावर प्रेम करायला बहीण तयार आहे. मग गुणी भावाबद्दल तिला किती प्रेम वाटेल ! माझा भाऊ उदार, शहाणा, मातृभक्त आहे. लोकांचीं लांबून आलेलीं पत्रें माझा भाऊ सभेंत वाचून दाखवतो. तो कसा हंसतो, कसा गोड दिसतो. किती वर्णावें ?
काशींतले कागद आले डब्यांतून
वाचले सभेंतून भाईरायांनीं ॥
पूर्वी कोणी काशीस जाई तेव्हां सर्व गांवाचा निरोप घेऊन जाई. सुखरूप परत आला तर सारें गांव सामोरें जाई. बहुधा बरीच मंडळी एकदम निघत. आणि मग नळकंडयांतून पत्र आलें सांडणीस्वाराबरोबर किंवा कोणाबरोबर, तर सारा गांव कुशलवार्ता व इतर बातमी ऐकायला जमा होई. येथें पत्र कोण वाचून दाखवी ? माझा भाऊ. त्याचा तो मान. तो पुढारी, विद्वान् :
माझा आहे भाऊ शहाणा सुरता
त्याच्या लौकीकाची वार्ता चोंहीकडे ॥
असा हा भाऊ आणखी कसा आहे ऐका :
हाताचा उदार मनाचा खंबीर
गुणानें गंभीर भाईराया ॥
गोड गोड बोले हंसणें किती गोड
जगत्रीं नाहीं जोड भाईरायाला ॥
कुणा ना दुखवील हंसून हांसवील
सार्यांना सुखवील भाईराया ॥
भाऊ नुसता गोड बोलणारा, गोड हंसणारा नाही :
दांडपट्टा खेळे करी तलवारीचे हात
घोडा नेत दौडवीत भाईराया ॥
आपल्या बहिणीची अब्रू सांभाळावयासहि तो समर्थ आहे. अब्रू सांभाळण्याची गोष्ट निघाली कीं कांहींच्या डोळ्यांसमोर एकदम मुसल्मान येतील. परंतु आपल्या बहिणींनीं मुसल्मान भाऊ मानले होते. मुसल्मान तेवढे वाईट असें त्यांचें मत नव्हतें. वाईट लोक सर्वत्र आहेत :
मानीयला भाऊ जातीचा सुसल्मान
चिवाळीची चोळी त्याचा कागदीं सलाम ॥
मानीयला भाऊ जातीचा मुसल्मान
दिवाळीची चोळी घरीं आलासे घेऊन ॥
मानीयला भाऊ जातीचा मुसल्मान
सख्ख्या भावाच्या परीस त्याचें आहे ग इमान
दरसाल येतो बहिणीला आठवून
जातीचा मुसल्मान प्रेमासाठीं ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP