बहीणभाऊ - रसपरिचय ८
चार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.
बहिणीच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठीं तो मुसल्मान आतुर असतो, अधीर असतो. तो या मानलेल्या बहिणीकडे येतो. परंतु इतर लोक हंसतात. तें पाहून त्या मानलेल्या बहिणीला वाईट वाटतें. ती म्हणते :
मानीयला भाऊ जातीचा मुसल्मान
नका ग त्याला हंसूं दु:खें जाईल त्याचा प्राण ॥
तो मानलेला मुसल्मान भाऊ आपल्या मानलेल्या बहिणीकडे येतो. लोकांना तें पाहूवत नाहीं. टवाळपणें प्रश्न करतात :
मानीयला भाऊ काय तुला तो ग देतो
दिवाळीची चोळी घेउनीयां घरा येतो ॥
परंतु शेवटीं ती मानलेली बहीण आपल्या मानलेल्या भावास दु:खाने म्हणते :
“तुझा माझा भाऊणपा जगजाहीर नसावा ॥
लोभ अंतरीं असावा भाईराया
आपण गूज बोलूं डाळिंबीसमान
तू भाऊ मी बहीण जडे नातें ॥
कशाला जगासमोर प्रेम मांडायचें ? तें मनांतच आपण ठेवूं मुकेपणानें मनांतलें बोलूं. डाळिंबाचें फळ फोडलें तर आंत हजारों दाणे भरलेले असतात. वरून किती सुकलेलें दिसतें. तसें आपलें प्रेम वरून बोलण्याचालण्यांत दिसणार नाहीं. परंतु हृदयांत आपण एकमेकांशीं गोड बोलूं.
जोंपर्यंत भाऊ आहे तोंपर्यंत बहिणीला आधार वाटतो. दिवाळी आली कीं चोळीबांगडी तो पाठवतो. श्रीमंत असेल तर चोळीला मोतीं लावून पाठवतो :
चोळी शिव रे शिंप्या मोती लाव शिवणीला
चोळी जाते बहिणीला दूरदेशा ॥
अशी सुंदर चोळी यावी. परंतु कुंकवाची पुडी दिसत नाहीं. सासरचीं माणसें बोलूं लागतात “काय बाईं रीत तरी -”. परंतु कावरीबावरी झालेली बहीण म्हणते :
“चोळीयेची घडी कुंकवावीण धाडी
असें नाहीं पडली पुडी कोठें तरी ॥
पुडी पडली असेल. भावाची ती बाजू घेते. श्रीमंत भाऊ मोतीं लावून चोळी पाठवतो. गरीब भावानें काय करावें ? गरीब भाऊ खण कोठून घेणार ? परंतु गरीब भाऊ डोक्याचा रुमाल फाडतो. त्याची चोळी करून धाडतो. बहिणीचें ह्रदय भरून येतें. ती म्हणते :
भाऊ चोळी शिवी शिवी अपुल्या रुमालाची
धन्य तुझ्या इमानाची भाईराया ॥
अशा भावासाठीं बहीण काय करणार नाहीं ?
माझें कीं आयुष्य कमी करून मारुती
घाल शंबर पुरतीं भाईरायाला ॥
माझ्या आयुष्याचा भाईराया तुला शेला
उरल्याची चोळी तुला वयनीबाई ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP