प्रसंग सहावा - शब्द महिमा
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
सांगितला सद्गुरूचा बडिवार । बोलिलों शब्द शब्दांचा प्रकार । तो ऐकोनि आनंदती सुरवर । स्वयें प्रचो प्रचीतीनें ॥६८॥
एकें शब्दें सद्गुरूची विनवणी । एकें शब्दें सद्गुरु सांगती कानीं । एकें शब्दें मूर्खाची बुझावणी । असत्य सत्य वाटोनियां ॥६९॥
एका शब्दाचा रविहून प्रकाश । एक शब्द बोलतां येतें अपेश । एकें शब्दें बोलता होत उपदेश । ईश्र्वर जाणें ऐसा ॥७०॥
एक शब्द अमृताहूनि गोडु । एक शब्द विषाहूनि कडू । एके शब्द जाले कुशळ सुघडु । अभ्यास करितां ॥७१॥
एकें शब्दें घडत तें मोडे । एकें शब्दें न घडत तें घडे । एक शब्द नेणतांचि जाले वेडे । अघोरी भोगतील ॥७२॥
शब्द सत्य नामरत्नांची पेटारीं । उघडितां ईश्र्वर होय अधिकारी । एक भाव धरूनियां परोपरी । चरणसेवा करिती ॥७३॥
शब्दसंकल्पें अनेक दान पुण्य । शब्द संस्कारें वाची गीता पुराण । एकें शब्दें होय अपमान । शुद्ध बोलों नेणतां ॥७४॥
सुशब्द निजकल्पतरूचें फळ । अशब्द तें महा दुःखाचें फळ । शब्द ॐ काराचें स्वयें कल्लोळ । शुभ अशुभ वाटती ॥७५॥
शब्दें शब्द नांव ठेविलें ईश्र्वरा । परतोनि मूळ केले सोऽहंकारा । अमोल सहस्रनामाच्या प्रकारा । सगुण शब्दें वाढला ॥७६॥
सत्शब्दें विकलें ईश्र्वरास । अशब्दें बोलतां होतसे निरास । सगुण शब्दें नांव ठेविलें विश्र्वास । नांवरसी शोधूनियां ॥७७॥
शब्द पाहातां पाण्याहुनि पातळ । धीरत्वें असे नभाहुनी निश्र्चळ । अधिरें निरयाहूनि अमंगळ । छी थू म्हणविलें जगीं ॥७८॥
शब्द वायूहुनी हळुवट । शब्द तो शस्त्राहूनि तिखट । शब्द ध्रुवाहुनि घनवट । सत्यार्थ बोलतां वचन ॥७९॥
शब्द शस्त्राचा गुंडाळा मार आणी । बिन ओढून सेने शिवूं जाणतो ज्ञानी । शाब्दिक नसतां अनंत लोचनी । अधोमुखें धाय घेती ॥८०॥
खड्गाचा घाय मिळेल तातवेळा । न मिळे शब्द प्रचंड गोळा । जों जों सले तों तों करी तळमळा । सद्गुरु न भेटतां ॥८१॥
शब्द सिंधूहूनि खोलपणें । उथळ आलिया म्हणविती उणें । शस्त्रें चालती राजकारणें शब्दें मान्यता चढे ॥८२॥
सत्शब्द कीर्ति करूनि निमाले । ते जगीं असंख्य योग्य जाले । जिव शिवे वैकुंठी घातले । धन्य सुफल जिणें त्यांचें ॥८३॥
अशब्दें अकीर्ति करूनी दाविले । ते जाणिजे जितेचि नर्क पावले । निमाल्या यमपुरीस घातले । महा यातना सोशिती ॥८४॥
सत्शब्द सोयर्याचा सोयरा । अशब्द सोयर्यातें करी मारा । यालागीं परमार्थ पाहिजे बरा । विवेकेंसी ज्ञानें ॥८५॥
शब्दें सज्जन तें होती दुर्जन । शब्दें दुर्जन होती सज्ज्न । शब्दें मारविलें सखे बंधुजन । क्षमा शब्दें नांदणूक ॥८६॥
शब्द बोलतां बंदिखानें फुटती । शब्द बोलतां मोकळे ते गुंतती । एक शब्दें ब्रह्मादिक मानवती । घरास येऊनियां ॥८७॥
शब्द अंतकाळीचा माता पिता । शब्द मायें बापें दुःख देता । शब्दें धनधान्य वैरी चढे हाता । शरण रिघोनियां ॥८८॥
शब्द निज प्रेम सुखाची गोडी । शब्दें निरये भोगिची जोडी । शब्दें होईजे देशधडी । अनामिक ठाव न देती ॥८९॥
शब्दें वदन वैकुंठ जालें असे । अशब्दें वदन ढुंग दिसे । शब्द ऐकतां अंतर्यामी उल्हासे । चित्त समाधान पावे ॥९०॥
ऐकतां सद्गुरूच्या शब्दालागीं । नव्याण्ण्व कोटी राजे जाले योगी । शब्दालागी पार्वती जगीं । शंकर उपदेशिता ॥९१॥
शब्द चौदा रत्नांचे असे सार । शब्द कीर्तनीं हरिनाम उच्चार । शब्द हृदयीं जिव शिव शंकर । ध्यान धरूनियां ॥९२॥
जैसा गुह्य द्वारें सरे वारा । तैसा एकाचा शब्द अवधारा । जगीं कोणी मानीत ना खरा । ढवाळी करतील ॥९३॥
शब्दें जपती गायत्री परमहंस । आणिक निज नामाचा निज ध्यास । साही दर्शनें करिती उपदेश । आपुलाले मार्गी ॥९४॥
शब्दें जालें पीर वल्ली ॠषी । चारी वेद उच्चारिती शब्दासी । एके शब्दें जसी वाये फुल वेलींसी । इंद्रावनीचें ॥९५॥
शब्द शिकोनि पंडित मुल्ला जाले । राव आणिकांतें पढवं लागले । शब्द शिकोनि न सरते केलें । शब्द नांव मुसाफ गीता ॥९६॥
छपन्न भाषां शब्दांचा प्रकार । अनेक भाषांनीं बोले चराचर । सहा राग छत्तिस भार्या ॐ कार । सप्त स्वरें बोल बोले ॥९७॥
वाद्यें तंत वितंत घन सुस्वर । हे तंव ॐ कार शब्दाचे विकास । निःशब्द विकार लयेनें स्वहित थोर । सद्गुरू तुष्टल्या ॥९८॥
सद्रु सोऽहं शब्द तारका । शब्दें शेख महंमद आला पिका । सांगितली शब्दें शब्दांची टीका । श्रोत्यांपाशी आत्मज्ञानें ॥९९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP