प्रकुपित दूत सविस्तर शुंभासि शिवोक्त सर्व आयकवी,
विघ्नितकामखळाचा वर्णील क्रोधवेग काय कवी ? १
त्या दूतोक्तश्रवणें कोपें अत्यंत तापला खळ, गा !
व्यसनांत आपणाला पाडी मद, जेंवि आपला खळगा. २
घ्यावें फ़ुटकें तुंबीफ़ळ गंगालघनार्थ बाहूनीं,
हें कार्य तसें सांगे, मूढा असुराधिपास बाहूनी :- ३
" हे धूम्रलोचना ! त्वां दानें; मानेंहि, नित्य जी तुष्टा,
स्वचमू घेउनि सत्वर जावें, जेथें असेल ती दुष्टा. ४
केशातें धरुनि बळें, आकर्षुनि, करुनि विह्वळा, वीरें
आणावी, जाणावी आज्ञा नि:संशया तुवां धीरें. ५
तीतें रक्षाया जरि तेथें कोणी उठेल जो दक्ष,
मारावाचि, असो पर तो सुर, गंधर्वराज कीं यक्ष. " ६
साठ सहस्त्र असुरबळ घेउनि लंघावयासि तो मळधी
पावे श्रीदुर्गेतें, वेळेतें खवळला जसा जळधी. ७
जी व्यसन आश्रितांस न बाधों दे, जेंवि घनघटा ऊन,
त्या भगवतीस तो खळ बळमत्त असें वदे दटाऊन :- ८
" शुंभनिशुंभापाशीं चाल, तिळहि हित नसे दुरभिमानीं,
त्या प्रभुच्या आज्ञेतें सर्वस्वहितावहा सुरभि मानीं. ९
प्रभुची आज्ञा मोडिसि ? आवडली तुज नवीच कां चाल ?
प्रभुवागवशांसि म्हणे नय, कीं ‘ पाशीं पडोनि कांचाल. ’ १०
तूं नीतिनें जरि न, त्या मत्स्वामिसमीप, धरुनि मद, येसी
केशीं कवळुनि, ओढुनि, नेयिन, कीं कुजन पात्र न दयेसी. " ११
जगदंबा त्यासि म्हणे, " दैत्येंद्रें धादिलासि या काजा;
तूंहि बळी बळविष्टित जरि नेसिल, यत्न काय तरि माजा ? १२
नेसिल बळेंचि मज, कीं तूं बळवान् ज्ञातधर्मनय, शस्त्री,
कळह करुनि पुरुषासीं तेजें साधी न शर्म, न यश, स्त्री. " १३
तो समजे देवीनें रचिल्या विपुळा निजोपहासासी,
तीवरि धांवे व्याघ्रीवरि ओतु - तसा सकोप हा सासी. १४
हुंकारेंचि तयातें सहसा परमेश्वरी करी भसित,
प्रकटी यश दरहिमधरहिमकरदुग्धाब्धिहरहरीभसित. १५
क्रोधें तेहि खवळले, गर्वें कोठेंहि जे न पर माती,
पर माती करि त्यांची, तत्काळचि तो मृगेंद्र, परमा ती. १६
त्या धूम्रलोचनाचा, तत्सैन्याचाहि, नाश कळला हो !
शुंभ म्हणे, ‘ ती दुष्टा या कर्माचें यथार्ह फ़ळ लाहो. ’ १७
आज्ञा करी शिवेवरि जाया तो शुंभ दैत्य पुंडातें,
जेणें निवेदिली ती त्या चंडातें, तयाहि मुंडातें. १८
" रे ! चंडमुंड ! हो ! जा सत्वर घेवूनि विपुळसैन्यातें,
आणा, खाणा तन्मदगद; द्या, धिक्कार करुनि, दैन्यातें. १९
ये ना तरि अंबेतें ओढाचि बळें धरूनियां वेणी,
किंवा बांधुनि आणा; वृकचि तुम्हीं असुरवीर, ती एणी. २०
अथवा गांठुनि समरीं असुरांहीं शस्त्रशतगणें अल्पा,
सिंह वधूनि, करावी, ती सर्वांहीं झटोनि हतकल्पा. २१
मग करुनि बहु कठिन निजमन, बंधन तीस बळकट करा हो !
तुमचें असावध, स्त्री ती धरिल्याही, न पळ कटक राहो. २२
कार्यकरा भृत्यावरि पूर्ण प्रभुचा प्रसाद, हें जाणा,
साधु - असाधु करा, परि बहु सत्वर मत्समीप ती आणा. " २३