तृतीय चरित्र - अध्याय चवथा

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


शुंभ क्रोधें खवळे, श्रवण करुनि चंडमुंडवधवार्ता;
आज्ञापी सैन्यांतें तो, व्हाया स्वस्त्रियाहि अधवार्ता.     १
जें कंबुधौम्रकालकदौर्हृदमौर्यादि, सर्व ते योध
घेउनि शुंभ निघाला, गेला देवीसमीप सक्रोध.     २
देवी पाहे आलें अतिभीषण दैत्यसैन्य जें तूर्ण,
स्वधनुर्गुणनादाहीं करि भूगगनावकाश ती पूर्ण.      ३
सिंहहि बहुतचि गर्जे, काळीही गर्जना करी मोटी,
त्या नादांतें परिसुनि, असुरांच्या त्यांसि वेढिती कोटी.     ४
विधिहरिहरगुहवासवदेहांपासुनि निधोनि तद्रूपा,
शक्ति शिवेप्रति आल्या, देवहित - पराहितार्थ गा ! भूपा !     ५
त्या शक्तींसह येउनि ईशानप्रभु असें शिवेसि वदे,
‘ मत्प्रेमें शीघ्र असुर मारुनि, विश्वासि तूं शिवे ! शिव दे. ’     ६
तों त्या देवीदेहापासूनि निघोनि, चंडिका शक्ती
पावे परमभयंकरमूर्ति शिवाशतनिनादिनी व्यक्ती.     ७
वात्या उन्मूलाया सर्वामरसाधुरिपुचमूकदली
प्रकटुनि, ईशानातें मग ती अपराजिता असें वदली :-     ८
" भगवंता ! दूतत्व स्वीकारुनि या क्षणींच तूं आंगें
सत्कीर्तिस्तव जा त्या शुंभनिशुंभांकडे, असें सांगें :-     ९
‘ त्रैलोक्यातें पावो शक्र, जयाचें तयासि ओपा हो !
सेवूत अमर हवितें, धर्म तुम्हांतें म्हणोनि ‘ ओ ’ पाहो.     १०
जरि आपण वांचावें, ऐसें इछित असाल, आजि तरी
पाताळासि तुम्हीं जा, सामतरी हितकरी, न आजितरी.     ११
बळगर्वें रणकामचि, तरि म्यां केला असे पुढें कर, या;
माझ्या देवूत शिवा तुमच्या मांसेंकरूनि ढेंकर या. "     १२
कथुनि असें, पाठविला दूतपणें शिव, म्हणोनि ती देवी
शिवदूती, भक्त सदा या सन्नामा सुधाधिका सेवी.     १३
कथिला त्या देवीचा तैसाचि नितोप तो तयां शर्वें,
गर्वें मान्य न केला दुष्टांहीं, ज्यांत मंगळें सर्वें.     १४
शिव झाला दूत, वृथा मरति, म्हणुनि बहु दयाळु कळवळला,
परि त्याच्या हितबोधें दोघांतुनि एकही न खळ वळला.     १५
शुंभ शिवेवरि गेला स्वभट पुढें करुनि सर्वही, राज्या !
वंदीलचि कर जोडुनि, सोडुनि काठिन्यगर्व, हीरा ज्या.     १६
विविधायुधवृष्टि असुर सर्वहि कात्यायनीवरि करीती,
न तिसीं या मेघांच्या प्रळयींच्या साजती बरिक रीती.      १७
देवीचे दिनकरकरखरतर शर परविमुक्तशस्त्रांतें.
भस्म करिति तक्ताळ ज्वाळ जसे धौतसूक्ष्मवस्त्रांतें.     १८
मारी ब्रह्माणी ही स्वकमंडलुवारिचे सटाके शें,
परिभविली न परें जसि करिच्या सुदृढेंहि हरिसटा केशें.     १९
माहेश्वरी त्रिशूळें, चक्रें दैत्यांसि वैष्णवी मारी
तैसीच शक्तिनें ती देवी शिखिवाहनाहि कौमारी.     २०
निजचक्रतुंडदंष्ट्रा यांहीं मारी परांसि वाराही,
तैसीच नारसिंही, बहु भी जीच्या नखांसि वाराही.     २१
चंडाट्टहास करुनि, क्षितिवरि पाडुनि, अनेक शिवदूती
भक्षी पर, भर हरि जी, तिस ‘ साधु ’ न भू मनें कसि वदू ती ?     २२
यापरि मातृगणातें प्रकुपित पाहोनि, पावलें दैन्य,
त्रासें पलायन करी शुंभाचें निहतशेष जें सैन्य.     २३
तेव्हां होय महासुर परम कुपित रक्तबीज बा ! राया !
धांवे मातृगणातें, अत्यद्भुत युद्ध करुनि, माराया.     २४
घाली तो ऐंद्रीसीं गांठि, करुनिया त्वरा, गदापाणी,
त्या  क्षोभद होय कुलिश, जैसें आमज्वरा गदा पाणी.     २५
क्षतरक्तबीजदेहापासुनि जितुकाहि रक्तबिंदु निघे,
त्याचा होय महासुर, जो किमपि उणेंपणें न निंदुनि घे.     २६
तत्तुल्यांचा व्हाया रक्ताचा मायबाप थेंब गळे,
कीं चालती बकाच्या बक, बगळ्याच्याहि बा ! पथें बगळे.     २७
ऐसे शतश: क्षतजप्रभव पुरुष रक्तबीजसम, राज्या !
सांगों काय करिति त्या मातृगणासीं असीम समरा ज्या ?     २८
ऐंद्रीनें क्षत केलें शिर, हाणुनि वज्र पुनरपि, तयाचें;
तद्रक्तज पुरुष वरिति तछील, जसेंचि सुनर पितयाचें.     २९
त्या शोणितबीजातें निजचक्रेंकरुनि वैष्णवी ताडी,
ऐंद्री, कौमारीही, शूळें माहेश्वरी उरीं फ़ाडी.     ३०
त्या शक्तींतें ताडी तो शोणितबीजही गदाघातें,
बहु मानवले सर्वहि सुर त्याच्या त्या महागदाघातें.     ३१
शक्तींनीं क्षत करितां, सर्वांगीं उसळले क्षतजाबिंदु,
बहु कोटि पुरुष झाले, सिंधुतरंगीं जसे तरणि इंदु.     ३२
ते रक्तोद्भव पुरुष व्यापुनि करिती भयार्त विश्वास,
निश्वास उष्ण सोडिति देव, जयाचा नयेचि विश्वास.     ३३
भ्याले निर्जर पाहुनि, काळीतें चंडिका स्वयें सांगे :-
" चामुंडे ! मुख पसरीं, तूं खाद्य स्वादु सांडिसी कां ? गे !     ३४
माझ्या शस्त्राघातें अरिरक्ताचा उडेल जो बिंदु,
तो तव मुखीं पडावा, गुरुपर्वीं जेंवि राहुच्या इंदु.     ३५
जे रक्तबिंदुपासुनि होतिल उत्पन्न पुरुष, तव तुंडीं,
ते नच उरतिल, पडले शलभ जसे दीप्तवह्रिच्या कुंडीं.      ३६
पी रक्तातें घटघट, गटगट ते गीळ, जेंवि अंजीर,     
नव यश गाइल कविकुळ अवलंबुनि चरण, जेंवि मंजीर.     ३७
या युक्तिनेंचि होइल समरीं हा रक्तबीज नीरक्त,     
सर्वहि तुझिया सामर चामरकर भक्त वीजनीं रक्त. "     ३८
काळी म्हणे, " शिवे ! तुज किति हा लघुकाय ? न पर मेरु चला,    
विश्वास निदेश तुझा अमृताहुनि काय न परमे ! रुचला ? "     ३९
त्या शोणितबीजातें निजशूळें चंडिका नृपा ! हाणी,
वाहे तद्देहांतुनि रक्त, जसें टोंचितां घटा पाणी.     ४०
जिकडे शोणित वाहे, तिकडे पसरूनि वदन ती देवी
काळी कराळवदना त्या शोणितबीजशोणिता सेवी.     ४१
शोणितबीज गदेनें ताडी, परि चंडिकेसि अल्पाही
पीडा न उग्रहि गदाघात करी, जेंवि हरिस तल्पाही.     ४२
वदनीं होती, त्यांतें भावी बहु सुरस, मानवे, चावे;
शतकोटितद्रदांनीं पर वृत्रासुरसमान वेचावे.     ४३
रक्तज कुतर्क - से, ती विद्या - सी, ते नवेनवे दमुनी,
शुंभनिशुंभहि मानी, तिस केवळ मानवे न वेद - मुनी.     ४४
देवी शूळें, वज्रें, खड्गें हाणी तसेंचि ऋष्टीनें;
दृष्टीनेंहि हतप्रभ करि अरितें खिळुनि बानवृष्टीनें.     ४५
काळी तद्रक्ताचे, जाया तद्रचित पाप, थेंब हुत
निजमुखकुंडीं करि, जरि मळला होताहि कापथें बहुत.     ४६
केला नीरक्त असा, अति दारुण रक्तबीज तो खचला,
सुर, मुनि म्हणति, ‘ नमुनि, यश वर्णुनि, देवूं शिवेसि तोख चला. ’     ४७
तो मातृगण प्रमुदित झाला विजयेंकरूनि, मग नाचे,
जयजयकारें भरिती सुर, मुनि उद्देश सर्व गगनाचे.     ४८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP