ज्याच्या दृष्टिपुढें सुरसेना समरांत परम दभ्रा, त्या
शुंभ विलोकी निहता प्राणसमा ध्वस्तप्रमदभ्रत्या. १
त्याहि विलोकी ध्वस्ता विध्वस्ताशेषसुरसभा सेना,
ज्यांच्या नवनव सुयशाहूनि मना अमृत सुरस भासेना. २
बंधुवधें, सैन्यवधें शुंभ क्षोभे लयाग्निसीं तोले,
त्या देवीस कडकडुनि जड कडु निपटचि रणीं असें बोले :- ३
" साहंकारे ! दुष्टे ! दुर्गे ! शौर्यें धरूं नको गर्व,
अन्यांचें बळ आश्रय करुनि, करिसि युद्ध हें वृथा सर्व ". ४
श्रीदुर्गा त्यासि म्हणे, " रे ! दुष्टा ! ऐक साधुधी - रहिता,
मी एकलीच आहें या विश्वामाजि साधुधीर - हिता. ५
ज्या ब्रह्माणीप्रमुखा माज्याचि विभूति, जाण पापा ! हें;
मजमाजि समस्ताही या करितत प्रवेश हा, पाहें. " ६
हें म्हणतां ब्रह्माणीप्रमुखा त्या देवता स्वगेहांत,
सर्वा प्रवेशल्या श्रीदुर्गेच्या तत्क्षणींच देहांत. ७
देवींच्या वृंदातें निजरूपीं, जेंवि भूमि कुंभातें;
नेउनि विलयासि, म्हणे सर्वाद्या सर्वमूर्ति शुंभातें :- ८
" होतीं प्रकट त्रिजगीं साधुहित, करुनि असाधुवध, माजीं
म्यां आवरिलीं रूपें तीं, सुबहुमतें श्रुतींस अधमा ! जीं. ९
मीं एकलीच आतां उरल्यें आहें रणांत, न चपाप,
हूं हाण बाण, जाण स्त्री न मज, तुला घडे, नच पाप. " १०
ऐसें बोलुनि, देवी आरंभी भव्यसमरसत्रास,
ज्यातें पाहुनि झाले सर्व महेंद्रादि अमर सत्रास. ११
शस्त्रास्त्रें देवीनें जीं त्या समरांत सोडिलीं होतीं,
शुंभें प्रतिशस्त्रास्त्रें योजुनि तत्काळ मोडिलीं हो ! तीं. १२
देवीही शुंभाच्या खंडी लीळेंकरूनि शस्त्रातें,
अस्त्रातेंही उडवी, वात्या जसि शुष्कसूक्ष्मवस्त्रातें. १३
परमेश्वरी करी जें, मीं वर्णू आज काय बा ! ‘ हूं ’ तें ?
परशस्त्रास्त्रांतेंचि न, दे बहुत तिच्याहि लाज बाहूंतें. १४
कोंडी पळभरि शुंभ श्रीमज्जगदीश्वरीस शर - भवनीं,
परशर झाले दुर्गाशरवृंदीं जेंवि सिंह शरभ - वनीं. १५
म्हणति सुरीं, " झगडतसे शिरिं याया वामपाद पर मेला !
परमेला हा जिंकिल तरि, पुरवुनि काम पादप रमेला. " १६
स्वाछादकशरपटल छेदी, खंडूनि शुंभचापातें,
जेंवि परा विद्या जनिमृतिहेत्वज्ञानरूपपापातें. १७
मग शुंभ शक्तितें धरि, चक्रें खंडी तिलाहि परमा ती,
शतचंद्रचर्म - असि घे, त्यांचीहि करावयासि पर माती. १८
चुरिलें शिवाशरानीं त्या असिसह चर्म रविकरामळ तें;
कीं अविनीताचें यश, करितांहि सहाय पविकरा, मळतें. १९
केला जगदाद्येनें कीळेनें संगरीं विरथ, बकला
बहुधा, बहुधाष्टर्यें घे मुद्रर, न रहावया शिर, थबकला. २०
येतां धांवत खंडी बाणाहीं मुद्ररा शिवा राया !
तह्रि येचि शालिराशिप्रति जैसा मुद्रराशि वाराया. २१
न पराभूतिसि साहे, मासीसि स्पर्शतां जसा कुष्टी,
जगदंबेच्या हृदयीं हाणी धांवोनि दुष्ट तो मुष्टी. २२
देवी क्षितिवरि धडडड पाडी, हाणुनि उरीं, अरीस तळें,
होइल सुबहुमत कसें आत्मगुणें सागरापरीस तळें ? २३
सहसा उडुनि, शिवेतें घेउनि गगनांत जाय मग नीच;
जरिहि निराधरा ती करि अरिसीं बाहुयुद्ध गगनींच. २४
तें प्रथम सिद्धमुनिजनविस्मयकारक नियुद्ध बहुरुचिर,
झालें त्या श्रीदुर्गादैत्यासीं खांगणी अतुळ सुचिर. २५
सुचिर नियुद्ध व्योमीं करुनि, धरुनि अरिस, हरिसह जगातें
सुखवाया, फ़िरवि, अधिक जरि सकळांपरिस, परि सहज गा ! तें. २६
फ़िरउनि भरभर गरगर अंबा लंबालिसंनिभसुकेशी,
ती आपटी महीवरि शुंभतनू जीवनाप्रति मुकेशी. २७
उठुनि, वळुनि मुष्टि, सबळ खळ कंदुकसा पुह्ना उसळला जो,
त्या पाहुनि, ‘ नच लवणें, स्तव्रत, ’ म्हणतां न कां मुसळ लाजो ? २८
विकट निकट ये, हाणुनि मुष्टि, विदारूनि वक्ष, माराया;
तेव्हां सदयाहि करी जगदंबा लेश न क्षमा, राया ! २९
शुंभातें जयमूळें शूळें हृदयांत चंडिका ताडी,
शत्रुशतशमनशीला लीलालेशेंचि भूतळीं पाडी. ३०
झाला असतां तो खळ सुरमदनगभिन्नवक्षम रणातें,
पावे, शूळाघातें होतां मग भिन्न वक्ष, मरणातें. ३१
पडतां, तेणें सकळा भू सद्वीपा ससागरा सनगा
कांपविली, एक न त्या देवीचें मात्र कांपलें मन गा ! ३२
मग लागल्या कराया राया ! मार्गेंचि यान सागरगा ;
तो जेंवि तापमोहप्रद, होय न तेंवि मानसा गर, गा ! ३३
विश्व प्रसन्न झालें, होय जसें भास्करोदयीं कमळ;
उत्पातमेघ शमले, सर्व व्योम प्रकाशलें अमळ. ३४
झाले प्रहर्षनिर्भरमानस सुर, जे महाधिनें गलित;
गंधर्वांहीं केलें गान शिवासद्यशोमृतें ललित. ३५
वाजविलीं बहु वाद्यें सुपटु शतसहस्त्र वादकांहीं हो !
तद्रवहृतकर्णांला, नच रुचला इतर वाद, कांहीं हो ! ३६
अतिमुदित अप्सरांचे गण तेव्हां नाचले शत ज्ञाते,
निज भान धरूं देती नच त्यांचे नाच लेश तज्ञा ते. ३७
मंद, सुगंध, सुशीतळ, वायु तदा लागले वहायाला;
सुप्रभ होय दिवाकर, त्यातें पद्महि सुखें पहायाला. ३८
पेटत नव्हते पूर्वीं जे अग्ने, सुखेंचि पेटले हो ! ते,
होते खिन्न, मुदित मग होउनि बहु त्यांसि भेटले होते. ३९
कादंबिनी शिवेतें, जो शतमखमुख तयाहि लेखातें
चारकमयूराएसें, तच्चरितहि अमृतवर्ष लेखा तें. ४०