(गीतिवृत्त)
ऋषि म्हणति, ‘ब्रम्हाण्यें श्रीकृष्णें प्रेषिलासि रक्षाया,
सत्पात्र तूंचि सुयशा भवमग्नोद्धारकर्मदक्षा ! या. ॥१॥
(वृत्त - स्रग्धरा)
त्वां प्रहरादध्रुवादि, स्वहित कथुनियां, नारदा ! धन्य केला;
बा ! तूं या मंडळीला, पवनसुत जसा त्या धराकन्यकेला;
त्वद्वाक्पीयूषपानेंकरुनि, बहु सुखें आमचा काय कोंदे.
श्रीमत्कृष्णानदीचा निरुपम महिमा सर्वही आयकों दे.’ ॥२॥
(गीतिवृत्त)
जें पुसिलें श्रीकृष्णामाहात्म्य, द्रुहिणपुत्र सांगे हें.
सफळ प्रणतमनोरथ करुणेच्या, न करिजेल कां, गेहें ? ॥३॥
देवर्षि म्हणे, ‘मुनि हो ! पुसतां परमादरें जसें मजला
विधिहि असेंचि पुसे त्या, जो नतजन उद्धरावया सजला.’ ॥४॥
प्रभु सांगे, ‘कृष्णेचा महिमा अहिमानवावामरस्तव्य,
भव्यप्रभाव विश्वीं, जो सुकृतरसिकमनीं सदा नव्य. ॥५॥
ऐकुनि सांग स्वजना, वत्सा ! चतुरानना ! बुधाधारा !
कृष्णेची जलकणिका सुहित करी, नच असी सुधाधाराअ. ॥६॥
बा ! होय मन्मयी हे श्रीकृष्णा मत्कळा सुधासम जे
म्हणतिल, ते बाळचि, जो मत्सेवक तत्व त्या बुधा समजे. ॥७॥
स्रानें, पानें, स्तवनें, स्मरणें, कृष्णेचिया महाघ सरे.
वैकुंठपदींहि चढे प्राणी, तेथुनि जसा न हा घसरे. ॥८॥
नि:शंक न प्रवर्ते, कृष्णेचें फार भय असे कलिला.
स्पर्शुनि जगदघ हरितो, जो वायु स्पर्शला इच्या सलिला. ॥९॥
धात्या ! साक्षान्मत्तनु कृष्णा, साक्षान्महेशतन् वेणा;
भजतां यांसि, चुकतिल प्राण्यांच्या रोगमृत्युजनु - वेणा. ॥१०॥
(वृत्त - वसंततिलका)
मुक्तिप्रद, प्रकट मार्ग, पुराण आहे;
त्यातें धरूनि, विरळ स्वपदासि लाहे.
कृष्णासमाश्रित सुखें सुगतीस पाहे;
कीं तो सुदुस्तर, सविन्घ, सदा न वाहे. ॥११॥
(वृत्त - अनुष्टुभ्)
होय मुक्त सुखें, कृष्णावेणासंश्रित जो जन.
यछिरीं कल्पवल्ली त्या काय दुर्लभ भोजन ? ॥१२॥
तारिती सर्व जीवांतें कृष्णावेणा महानद्या.
मोटेंचि देती फळ या, म्हणो कोणी ‘लहान द्या.’ ॥१३॥
(गीतिवृत्त)
असती सिद्धचि संतत आश्रितजीवासि निजपदा न्याया;
द्याया अमृत जनांतें; आम्हांहुनि बहु गुणें वदान्या या. ॥१४॥
करितिल कृष्णास्नान, स्मरतिल, धरितिलहि जे मम ध्यान,
तच्चित्तीं प्रकटुनि, मीं दीप्त करिन भवभयापह ज्ञान. ॥१५॥
(वृत्त - शार्दूलविक्रीडित)
कृष्णेतें स्त्रजितों, स्वयें कलिभय त्यागूनि, तूंहि प्रजा
निर्मीं, त्या सुयशा वरीं, बहु सुखें गातील सद्विप्र ज्या.
सर्वत्र द्युमणिप्रभा प्रसरतां, जो पांथ, बाधा तया
कैंची ? कीं न घडे पराभव तमापासूनि वा ! धातया !’ ॥१६॥
(गीतिवृत्त)
ऐसें बोलुनि, भगवान्, शमवाया विषयभोगतृष्णेतें,
प्रकट करी तनुपासुनि निरुपमतमरम्यमूर्ति कृष्णेतें. ॥१७॥
(वृत्तें - शार्दूलविक्रीडित; इंद्रवंशा; शिखरिणी; अनुष्टुभ्)
वर्ण श्याम तसा, जसाचि हरिच्या श्रीमूर्तिचा शोभला.
चक्रांका, सुचतुर्भुजा, गुण जिचा निर्दोष जो, तो भला.
श्रीशाचा महिमा, विलोकुनि जितें, त्याचि क्षणीं लोभला,
‘माया केवळ आपणावरि’ म्हणे, चित्तीं प्रभु क्षोभला. ॥१८॥
ती शोभली फार महानदी सती, जीच्या पुढें योग लहान दीसती.
चित्तीं म्हणे, ‘जे करितील मज्जन, ते अन्यपापें हरितील मज्जन. ॥१९॥
असी कृष्णादेवी निजतनुभवा, विश्वसुहिता,
दिली कृष्णें, तीतें शतधृति म्हणे, ‘हे स्वदुहिता.’
तयाचा जो लोकप्रियहित मिळाला सुरस, त्या
बहु प्रेमें सर्वा करिति नुति, पूजा, सुरसत्या. ॥२०॥
भाग्येंकरूनि भव्याची मावली पावली मग;
ब्रम्हा रची श्रीहरिच्या उक्तिनें युक्तिनें जग. ॥२१॥
(गीतिवृत्त)
जगदघहरें सुतीर्थें रचिलीं, या निर्मिल्या जगीं विधिनें,
त्यावरि भूवरि कृष्णा तीर्थांबा आणिली दयानिधिनें. ॥२२॥
जैसी सुरभि स्वर्गीं विविधविषयभुक्तिदान दीनां दे:
या भूतळीं तदधिका हे कृष्णा मुक्तिदा नदी नांदे. ॥२३॥