कृष्णामाहात्म्य - अध्याय तिसरा

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


(वृत्तें - शिखरिणी; अनुष्टुभ्‌)

जगत्पूज्या कृष्णा परम गुरुची मूर्ति सुसती.
तिच्या माहात्म्यातें मुनि, नमुनियां पाय, पुसती.
कृपावर्षें ज्याच्या भय तिळ न संसारदव दे ,
महात्मा तो ऐसें, करुनि करुणा, नारद वदे, ॥१॥

‘या प्रश्रें तुमची मोटी माझीही धन्यता पहा.
म्हणतील भवत्ताप ‘हा’ तसे अन्य ताप ‘हा’. ॥२॥

(गीतिवृत्त)

श्रीकृष्णामाहात्म्यश्रवणेछा जेधवां मनीं झाली,
आली तुमच्या हस्तीं मुक्ति, प्रेमें जसि प्रिया आली. ॥३॥

जेथें श्रीकृष्णेचें माहात्म्यश्रवण तोचि वरदेश,
सर्व मनोरथ पुरवी, नुरवी, कळिविन्घ, विष्णु वरदेश. ॥४॥

कृष्णेच्या भक्ताचा, कोणाहि पुढें, न हात पसरेल;
त्या परम सभाग्याचें कल्पांतींहि न महातप सरेल. ॥५॥

(घृत्त - शार्दूलविक्रीडित)

पक्षांचा ध्वनि ऐकतांचि हृदयीं जे पक्षिपाळा अही
भीती, त्यांसि लपावया स्थळ बिळीं दे ती दयार्द्रा मही.
कृष्णेच्या सुयशासि कांपति अघें, दे त्यां न थारा खही.
तीं, जींत प्रभुचित्रगुप्त - लिखितें, ती होय दग्धा वही. ॥६॥

(गीतिवृत्त)

महिमा कृष्णेचा जो, याचें ‘कलिदलन’ नाम या गाते
जे जन, होती योगा जैसे तैसेचि धाम यागा ते. ॥७॥

(वृत्त - अनुष्टुभ्‌)

मंदरीं पुसिलें स्कंदें कृष्णामाहात्म्य आदरें
त्यातें जगल्लताकंदें कथिलें त्या उमावरें. ॥८॥

(गीतिवृत्त)

रोमांचिततनु होऊनि, यछ्रवणीं निश्चळा उमा राहे
कृष्णाकीर्ति परिसिली म्यां, नमुनि प्रभुसुता कुमारा, हे, ॥९॥

या माहात्म्यश्रवणा शुचि सज्जन शैव भागवत मात्र
पात्र, प्रसिद्ध ज्यांचें, सात्विक भावासि होय गृह, गात्र ॥१०॥

(वृत्तें - उपजाति; शार्दूलविक्रीडित)

कृष्णातटीं जो वश योगयाग या, कधीं तशांतें न म्हणेचि ‘या’ गया.
सर्वां ऋणांपासुनि जीव सोडवी; न मागती प्रत्युत हात जोडवी. ॥११॥

ब्रम्हा, विष्णु, महेश्वर, प्रभु, कलिप्रारंभ होतां क्रिया
व्हाया सत्फलदा, सुपुण्यनिधि या भूच्या कराया प्रिया,
कृष्णा घेऊनि आदरें उतरले आनंद अर्पावया,
विश्वातें विपुलें महामृतरसें, तप्तांसि तर्पावया. ॥१२॥

(गीतिवृत्त)

ब्रम्हादि देव भूवरि अवलोकित सुप्रदेश जों आले,
तों ते तपस्विवर्या सत्पुरुषातें विलोकिते झाले. ॥१३॥

त्या पुरुषातें पुसती ते सुर, ‘तूं कोण ? वांछिसी काय ?
घे इष्ट शिष्टवर्या ! बहु कृश झाला तप:श्रमें काय. ॥१४॥

किमपि अदेय नसे, या कृष्णेच्या आगमोत्सवामाजी;
‘मा’ जीभ न बोले; ती श्रेष्ठा, पुरवील अर्थिकामा जी.’ ॥१५॥

(वृत्त - इंद्रवज्रा)

हें ऐकतां तापस फार हर्षे, प्रेमाश्रुधारा घनसाचि वर्षे;
वंदी, स्तवी जोडुनि अंजलीला; वर्णी प्रभूंच्या पदकंजलीला. ॥१६॥

(गीतिवृत्त)

‘प्रभु हो ! तप करितों, कीं न बुडोत कलींत जीव सर्व तमीं;
आलों शरण तुम्हांतें, जोडुनियां हस्त, सहय पर्वत मीं. ॥१७॥

झालां प्रसन्न, तरि द्या वर हा, माझीच हे असो कन्या.
कृष्णानदी प्रवर्तो मजपासुनि, यश असें नसो अन्या. ॥१८॥

(वृत्ते - अनुष्टुभ्‌; पृथ्वी)

करितों प्राप्त व्हाया मीं पुण्यता, धन्यता, पसा.
द्या कृष्णा हे, मुक्ति जैसी देतसां अन्य तापसां.’ ॥१९॥

असा नमुनि मागतां सुवर उद्धराया जना,
तदुक्त रुचलें बहु त्रिभुवनेश्वरांच्या मना:
प्रसन्नमति पाहती सकळ देव कृष्णानना,
ज्से तृषित चातक प्रियकरा उदारा घना. ॥२०॥

(वृत्त - शिखरिणी)

म्हणे कृष्णा, ‘सह्या ! अससि शुचिधर्मा, नत नया;
तुझी होऊं मीं कां सकळजनशर्मा न तनया ?
मिळाली ती कन्या जसि भुवनमाता हिमनगा,
तुला मीं, या नात्या परम वश माझेंहि मन गा ! ॥२१॥

(गीतिवृत्त)

सहया ! मीं जेंवि, तुज्या होतिल बहु मदनुजा नद्या कन्या
अन्या, वाढवितिल यश, करितिल तुजलाहि धन्य त्या धन्या, ॥२२॥

मीं सहयसुता होत्यें; सुरमुनि हो ! सहयजा म्हणा मातें,
यासि सुखें करिन, शिवा करित असे जसि तया, प्रणामातें,’ ॥२३॥

(वृत्त - अनुष्टुभ्‌)

या वात्सल्यें सर्व देवसंघ विस्मय पावला.
म्हणे, ‘कृष्णे ! तुझा, जो या कृष्णाचा, तोचि पावला. ॥२४॥

भक्तवत्सलता नित्य, प्रभुहृत्सारसा जसी,
कृष्णे ! तुझ्याहि सेवी; या सदगुणें फार साजसी.’ ॥२५॥

(गीतिवृत्त)

सहय, प्रमुदित होऊनि, कृष्णेसि म्हणे, “महाप्रसाद’ असें;
गौरीप्रसादभाजन जेंवि हिमाचल, तसाचि मीहि असें.” ॥२६॥

कृष्णेसह कृष्णातें, ब्रम्हादिसुरां समेत, घेवून
सहय स्वपदा गेला तच्चरणावरि शिरोब्ज ठेवून. ॥२७॥

सहयाचळीं मिळाले वसुरुद्रादित्य सर्व नाकर्षी,
राजर्षि, महर्षि सकळ, तो कृष्णोत्सव तयांसि आकर्षी. ॥२८॥

गंधर्व, यक्ष, किन्नर, विद्याधर, सिद्ध, साध्य, आशाप.
यांला तो उत्सव हित, मलिन कलिनरक तयांस हा शाप. ॥२९॥

ते अळि, तो पद्माकर, ते पिक, तो वृक्षराज आंबा हो,
कृष्णोत्सव कल्पद्रुम त्या अर्थिजनां यशें न कां बाहो ? ॥३०॥

पूजी फळपुष्पादि द्रव्यें भव्यें तयांसि नग सहय,
स्वक्षय, तो मह कळतां, होइल कैसा कळीस मग सहय़? ॥३१॥

ऋषि, पितर, देव म्हणती, ‘झालेचि कृतार्थ सर्व नर, कास
कृष्णेची धरुनि, खळा कलिस, तसा त्यजिल गर्व नरकास. ॥३२॥

कृष्णेंत करुनि तर्पण, आम्हांला परम तृप्ति भव्याहीं
कव्याहीं देतिल नर, कर्मीं आदर धरुनि, हव्याहीं. ॥३३॥

कृष्णेंत जलांजलि जरि आम्हांस मिळेल. सौख्य अर्पावें
तरि काय हो स्वधेनें ? काय सुधेनेंहि अधिक तर्पावें. ? ॥३४॥

जाईल ज्या दिशेप्रति, होईलचि ती अलंकृता, पूता:
अमृतफळ मिलाल्यावरि, रसिक जन पुसेल कोण हो तूता ? ॥३५॥

तेचि सुभाग्य जन जगीं, तेचि शुभोदय समस्तवर देश,
तींच सुपुण्यक्षेत्रें, जेथें कृष्णाप्रवाह वरदेश. ॥३६॥

विस्तार स्वर्गाचा होइल, संकोच नरकवर्गाचा,
ईचा प्रवाह जैसा सर्वार्थप्रद मुहूर्त गर्गाचा. ॥३७॥

स्वर्गाची नि:श्रेणी कृष्णा भाग्यें नरांसि सांपडली.
कळि जरि तम तो, गमतो केवळ जड, यासि भूल कां पडली ? ॥३८॥

(वृत्तें - शालिनी, स्वागता)

कृष्णातीरीं जंगमत्वें वसावें, किंवा भाग्यें स्थाणुभावें असावें,
वर्षें शीतें कष्टतां आतपानें, आहे मोटी धन्यता वातपानें,’ ॥३९॥

बोलिले अमर यापरि सारे, त्यां म्हणे हरिहि ‘या, परिसा, रे !
दीसतो परि लहान गमू हा न, स्वयें हरिल हा नग मोहा. ॥४०॥

(गीतिवृत्त)

बसतों हया सहयाशिरीं श्वेताश्वत्थस्वरूप मीं सुगम.
कृष्णेचा मत्पादापासुनि होइल महायशा उगम.’ ॥४१॥

(वृत्त - इंद्रवज्रा)

अश्वत्थरूप प्रभु होय, धारा कृष्णाहि तन्मूलज तोयधारा;
त्या सर्व देवद्विजमंडलीला श्रीविष्णुची ती करि थंड लीला. ॥४२॥

(गीतिवृत्त)

सुरमुनि ‘जयजय’ वदती, पुष्पांच्या वर्षती सरी घनसे,
गंधर्वगीति निपुणा, परि द्याया हर्ष तीस रीघ नसे. ॥४३॥

गावूनि हरिहरांचीं मधुरें त्रिजगन्मनोहरें कृत्यें,
करित्या झाल्या हर्षें, त्या परम महीं, वराप्सरा नृत्यें. ॥४४॥

अघ हरित, जग प्रमुदित करित, तनुहि ती महानदी प्रसरे:
निबिडतमतम:प्रशमीं नच मागें. जरि लहान, दीप्र सरें. ॥४५॥

(वृत्त - शिस्त्ररिणी)

पुढें झाला हर्षें नरसहित नारायणमुनी.
तयामागें चाले त्वरितगति कृष्णा सुरधुनी;
प्रतापें पूर्वेचीं हरित दुरितें पुण्यसलिला
सुखें गेली; झाली बहुत हृदयीं भीति कलिला. ॥४६॥

(वृत्त - वसंततिलका)

सर्वांसि दे सुकृततेज नदी पिके तें
त्या सोडिती क्षण न ते जन दीपिकेतें.
जी देवुनि स्वसहवास वदे, ‘वसा रे !
माझ्या तटींच सहवासव देव सारे,’ ॥४७॥

(गीतिवृत्त)

सर्वदुरिततापन्घी पुण्या ऋग्वेदसंहिता आहे;
अतिपुण्यें तींत जसीं सूक्तें, येथेंहि बुध असें पाहे. ॥४८॥

कृष्णा पुण्या, तीर्थें अतिपुण्यें वर्तती इच्या पोटीं;
ज्यांचें सेवन करितां, भस्मचि होतात पातकें मोटीं ॥४९॥

सहयापासुनि सागरसंगमपर्यंत विप्र हो ! असती
तीर्थें अतिपुण्यें या कृष्णेच्या आश्रयें सुखें वसती. ॥५०॥

या कृष्णामाहात्म्यश्रवणें जळतात सर्वही दोष;
रोष न कळिकाळाचा चाले; श्रीविष्णु पावतो तोष. ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP