(गीतिवृत्त)
देवर्षि म्हणे, ‘मुनिहो ! जेथें यमनियमरक्षणा जपला
पूर्वीं भगवान् ब्रम्हा, साधाया आत्मसिद्धिला, तपला. ॥१॥
तो ब्रम्हागिरि द्विज हो ! सहयाच्या उत्तरेकडे शृंगीं
जो स्वाश्रितीं सुवत्सळ, पद्माकर जेंवि सर्वदा भृंगीं. ॥२॥
त्याच्या दक्षिणभागीं, जेथें द्रवले समस्तही वेद,
तो वेदगिरि, जयाचें दर्शन तत्काळ वारितें खेद. ॥३॥
या दोघांच्या मध्यें आहे सत्तीर्थ आमलक नामें;
मुक्तचि केले स्वाश्रित अगणित, या पुण्यसिद्धिच्या धामें. ॥४॥
दिव्य जनांलाचि दिसे, ज्या स्थानीं, दिव्यमूर्ति आमलकी;
ज्याच्या स्रानें - पानें करुनि म्हणे ‘हाय’ न प्रजा मळकी. ॥५॥
आमलकीतरुमूळापासूनि प्रकट जाहली वेणा;
जीची कीर्ति कळीला, सिंहाची गर्जना जसी एणा. ॥६॥
वेणेचा कृष्णेसीं योग महासिद्धिहेतु सन्मुनि हो !
बुध म्हणति, ‘कृष्णवेणा, तद्दर्शन कलियुगांत जन्मुनि हो.’ ॥७॥
कविम्हणति, ‘कृष्णवेणा हें अंतीं नाम यो, जिभे ! घोकीं;
लोकीं श्रेष्ठीं स्थापी; कोणालाही बुडों न दे शोकीं.’ ॥८॥
मुनि हो ! ककुद्मतीसीं कृष्णेसीं प्रीतिसंगम; ‘नमो’ ही
म्हणतां मुक्त करि तसा, हा जैसा साधुसंग मन मोही. ॥९॥
परम प्रेमळ हरिहर - भक्तांचा तेंवि धन्य संगम हा.
देतो सर्वांसि जसा, विपुला देनाचि अन्यसंग महा. ॥१०॥
झाला ककुद्मतीच्या, कृष्णेच्या, तेंवि संग ओघांचा,
जे ज्ञानभक्तियोग स्वछ जसा काय याचि दोघांचा. ॥११॥
याच्या कीर्तिपुढें परकीर्ति, खजूरीपुढें जशा शिंदी;
हा कलिसंगमल हरी, संगम लहरी सुधाब्धिअच्या निंदी. ॥१२॥
हिमगिरि गौरीस, तसा कीर्तिस याचा सुदंडक वियाला;
हा प्रीतिसंगम अतुळ; गाती गातिल उदंड कवि याला. ॥१३॥
कृष्णादक्षिणतीरीं गणिकाख्य सुतीर्थ तें अहो मुनिहो !
म्हणतें, ‘माज्या तेजीं मुक्त महापातकास होमुनि हो.’ ॥१४॥
पूर्वीं नरनारायण विधिला भेटावया स्वयें आले,
धाले तत्सत्कारें, जे मोहीं नित्य घालिते घाले. ॥१५॥
जो सकळतीर्थपूर्ण ब्रम्हाकमंडलु, तयांतुनि प्रकट
होय नदी, जाळाया श्रितपातक पापवासनांसकट. ॥१६॥
(वृत्त - अनुष्टुभ्)
म्हणती साधु करुनि प्रणिपात, ‘कमंडली
जीतें,’ निजक्षयरुजा गणि पातकमंडली. ॥१७॥
(गीतिवृत्त)
संगम कमंडलीचा कृष्णेशीं जो, तयाचि शुद्धतमीं
तपले नरनारायण, मनहि म्हणे, ‘ज्यांपुढें न उद्धत मीं.’ ॥१८॥
म्हणतें हें तीर्थ, ‘महापातक मद्यशचि हरिल, गा ! मातें.
कळि याच्या महिम्यातें केवळ वश, जेंवि हरि लगामातें.’ ॥१९॥
‘मुनि हो ! या तीर्थाचा महिमा आदर करूनि परिसा हो !
इतिहास उग्र, आधीं मन तुमचें, धृति धरूनि, परि साहो.’ ॥२०॥
होता गौतमनामा ऋषि तेजस्वी, स्मरारिचा भक्त,
त्यक्तक्रोध, जितेंद्रिय, धनधान्यसमन्वित, क्रियासक्त. ॥२१॥
रम्य महाकाळवनीं वसला बहु काळ, होय तो जीन.
मोजी न दशेसि, म्हणे, ‘अंतीं मन शिवपदींच योजीन.’ ॥२२॥
त्या वृद्धाची तरुणी, रूपवती, संगलालसा, भार्या;
ती पतिच्या फार जपे, किमपि जपेनाचि तो तिच्या कार्या. ॥२३॥
पतितें नित्य म्हणे ती. ‘माझें जातें वृथाचि तारुण्य;
पाषाणीं द्रव, तैसें तुझिया हृदयीं नसेचि कारुण्य. ॥२४॥
(वृत्तें - इंद्रवज्रा; उपजाति; शालिनी; वसंततिलका)
पुत्रार्थ संपादिति अंगना; कीं पुत्राविणें होयचि भंग नाकीं
कां व्यर्थ नानामिष ? ये रमाया; वाटे मला हे विष, येर माया. ॥२५॥
बळेंचिन घे साधुनि अंगसंग ती; स्त्रीची करी सन्मतिभंग संगती.
म्हणे. ‘मम स्वप्रिय बायको,’ पहा; करिल हो ! तीवरि काय कोप हा ? ॥२६॥
संध्याकाळीं गर्भ पोटांत राहे; चित्तीं चिंता साधु तो विप्र वाहे;
गर्भछद्में तें महापाप वाढे, जेणें व्हावे प्राप्त संताप गाढे. ॥२७॥
सिंहोदरी प्रसवली सुत विप्रजाया; हर्षोनि, हर्षित करी बहु विप्रजा या;
संस्कार सर्व करि गौतम नंदनाचे; नेणोनि भावि फळ तो बहु मंद नाचें. ॥२८॥
(गीतिवृत्त)
गौतम गर्गासि म्हणे, ‘कैसा होईल पुत्र हा ? गर्गा !
बा ! सांग भविष्य, तुला म्हणती ‘सर्वज्ञ’ बहु जसे भर्गा.’ ॥२९॥
त्याचें जातक पाहुनि गर्ग म्हणे, ‘गौतमा ! मुइवरा ! हे !
ऐसी तव कीर्ति, जिला बहु लाजुनि शारदी पुनिव राहे. ॥३०॥
बा ! तुज असा कसा सुत झाला ? होणार हा महापाप,
ब्रम्हान्घ, मातृगामी, मद्यप, देईल दर्शनें ताप. ॥३१॥
याचें नाम सुदाम; परम दुरात्मा; परंतु हा अंतीं
पावेल शांति कृष्नामाहात्म्यीं; गाइजेल ही संतीं.’ ॥३२॥
हें ऐकुनि धर्मात्मागौतम मूर्छित पडे, रडे, तापे,
स्त्रीतें म्हणे, ‘कशी गे ! प्रसवलिस महाघ तूं महापापे ! ॥३३॥
जेंवि बहु कुपुत्राचें, न फणीचें तेंवि, दे वपु त्रास,
देता झाला कैसा ऐसा मज देवदेव पुत्रास ? ॥३४॥
गृह शून्य अपुत्राचें. न कुपुत्राचेंचि शून्य गृह लोकीं ?’
इत्यादि विलाप करी तो गौतम, मग्न होय बहु शोकीं. ॥३५॥
शोकें हृदय तडकलें. बहुधा झालेंन हरिहरस्मरण;
बहु ‘हाय ! हाय ! वदला गौतम, तत्काळ पावला मरण. ॥३६॥
मृत पति, सुत शिशु, टाकुनि, संपादाया महाघ, रागेली
सच्चरितावरि, सहसा सोडुनि सिंहोदरी घरा गेली. ॥३७॥
ती कान्यकुब्जदेशीं गणीकांची नायिका स्वयें झाली.
भ्याली नाहीं नरका, बहु भक्षुनि मांस, ती सुरा प्याली. ॥३८॥
तारुण्यें, सौंदर्यें, चातुर्यें, सर्व तरुण लुटिले, तें
काय वदावें ? भुलले कामुक रंभेसि तेंवि कुटिलेतें. ॥३९॥
दांतीं वरपर्यंकीं चवरांहीं वीजिती तिला गणिका.
मणि काय ? काय कांचन ? वाढे ती. जेंवि वन्हिची कणिका. ॥४०॥
संपत्ति कामसेना ती सेवी आयती समा चवदा.
कामुक म्हणती, ‘तीतें, जी रंभा काय तीसमाच, वदा.’ ॥४१॥
तो शिशु सुहृज्जनाहीं वाढविला पुत्रसाच पोसून.
अत्यंत दृष्टचेष्टित जरि तो, तरि तदपराध सोसून. ॥४२॥
द्यूत करी, चोरी, त्या चोरा परसंपदा दुरापा न.
सुहृदांस न आटोपे. पाप सुदामा करी सुरापान. ॥४३॥
जे पापमार्गलुंपक त्यांत शिरे सत्यमार्गलुंपकसा;
रोधी त्यास न नरकत्रास, निवारिल गजासि कुंप कसा ? ॥४४॥
ब्राम्हाणहि सुदाम्यानें वधिले. तें पाप काय सांगावें ?
‘मां गावें. बहु लघु, हें गुरु’ म्हणती, मांगिणी न कां गावें ? ॥४५॥
ऐसें करुनि, सुदामा तो गेला कान्यकुब्ज देशातें;
घे पापकर्मपर्वत माथां, न ब्रम्हाकर्मलेशातें; ॥४६॥
बुडविति जना न कोटिहि अरि लोभक्रोधकामसे; नेला
ऋषिसुत दुष्कर्माला; कीं तो दे भोग कामसेनेला. ॥४७॥
वृत्त. गळां पडुनि, पुसे सर्व महापापपुंज तो तीस.
‘गणिका झालीस कसी ? पूर्वीं तूं सांग कोण होतीस ?’ ॥४८॥
(वृत्त - शार्दूलविक्रीडीत)
सांगे ती निजवृत्त, गोत्र पतिचें, जें नाम तें आपलें.
त्याचें मानस ऐकतां, उपजतां नातें, अघें तापलें.
होय व्याकुळ, ‘हायहाय’ चि वदे, दुर्जीविता त्रासला.
पर्यंकावरुनि क्षमेवरि पडे नष्टासुसा पासला. ॥४९॥
(वृत्तें - भुजंगप्रयात, इंद्रवज्रा; अनुष्टुम्; शार्दूलविक्रीडित; शालिनी; अनुष्टुभ्; शालिनी)
अघें आंत- बाहेरही ताप ल्याला; सुचेनाचि कांहीं तया तापल्याला;
म्हणे तो, ‘त्रिलोकीं अशा उद्धतातें दिसेनाचि, देईलजें शुद्धता, तें. ॥५०॥
ब्रम्हान्घही. मद्यप, मातृगामी, ऐसा महापातकराशि हा मीं;
कैसा तरुं या अघसागराला ? घोंटील उग्रा न घसा गराला.’ ॥५१॥
स्वदेहा, मानवे विष्ठामूत्रांच्या मणिका, पण
विटे सिंहोदरी, निंदी बहु तें गणिकापण. ॥५२॥
‘होत्यें धार्मिकभूमिदेवगृहिणी, म्यां भाग्य तें सोडिलें;
आप्तांचें मन शीलसद्गुणयश:स्नेहक्षयें मोडिलें;
लज्जामौक्तिकदामभूषण बरें अत्याग्रहें तोडिलें;
वेश्या होऊनि, सेवटीं अघ असें अत्युग्र हें जोडिलें. ॥५३॥
प्राणत्यागा योग्य हे मी अशीला, अन्य प्रायश्चित्त कैंचें अशीला ?
स्पर्शेल श्रीवन्हि या काय देहा ? कीं मोडीत क्रीडला कायदे हा. ॥५४॥
विटला जीव माझा हा; कशाला काय गेह या ?
जो रणीं मरणारा त्या स्वशाला काय गे ! हया ?’ ॥५५॥
तोही, तीही होय निर्विण्ण; दोघें नेलीं दैवें. जेंवि काष्ठादि ओघें;
कोणी कोणाच्या मुखातें न पाहे, होतें तेथें गेह. सर्वस्व, राहे. ॥५६॥
(गीतिवृत्त)
भ्रमतां वनांत, नामें देवल परमर्षि भेटला; भावें
नमिला त्यांहीं, तैसें तें, बुडतां जेंवि वेट लाभावें. ॥५७॥
देवल पुसे तयांतें, ‘दिसतां दु:खित, विरक्त; सांगातें
प्राणत्यागोद्यत कां ? कारण जें काय, सत्य सांगा तें.’ ॥५८॥
तीं दोघेंही म्हणती, ‘अश्राव्य, अवाच्य, तें महापाप
घडलें आम्हां, स्वामी ! तेणें अत्यंत पावलों ताप. ॥५९॥
मुनिवर्या ! सर्वज्ञा ! ज्ञानें तुजन कथितांहि समजावें;
शरणागताघ तुझिया तेजें, रविच्याहि सस्र्व तम, जावें.’ ॥६०॥
देवल म्हणे, ‘समजलें मज तुमचें सर्व वृत्त सुज्ञानें;
निष्कृति कृष्णा, दुसरी या पापा पाहिली न सुज्ञानें.’ ॥६१॥
(वृत्त- मालिनी)
नमुनि म्हणति दोघें, ‘देवला ! सांग बापा !
कथिसि, हरिल कृष्णा या अशा घोर पापा;
वद सदयवरा ! ती कोण ? कोठें पहावी
अनुसरुनि तनू हे जीस आम्ही वहावी ?’ ॥६२॥
(गीतिवृत्त)
देवल सांगे, ‘सहयप्रभवा कृष्णा महानदी आहे;
वाहे प्राचींत; जिच्या स्नानें पातक न लेशरी राहे. ॥६३॥
झाली श्रीकृष्णतनु श्रीकृष्णा, भवभयासि उडवाया;
योगमयी, तीर्थमयी, ज्ञानमयी, सर्व पाप बुडवाया. ॥६४॥
रक्षिल कृष्णाचि तुम्हां, कीं ती दोषाचळासि अशनीच;
ज्यां स्पर्शे वायु इचा, ते होति न यमभटांसि वश नीच. ॥६५॥
ब्रम्हानदीसंभेदीं जा, नरनारायणाश्रमींच वसा;
माघशतस्नानें ती कृष्णा पावेल निश्चयें नवसा.’ ॥६६॥
(वृत्तें - मालभारिणी; मालभारिणी; पुष्पिताग्रा)
बरवा रस हा असार साचा, न सुरांच्या गुण तो असा रसाचा;
मुनि हो ! नच पी तथापि याला; जडधी जाय दुज्या कथा पियाला. ॥६७॥
यश हें बहु मानसा धुयाला पटु; देती बहुमान साधु याला.
निववी पतिता, पहा निवारी हरिजेचें अति तापहानि वारी. ॥६८॥
न हरितनुधुनीयशासमान स्वरस, असें कळतां, कशास मान ?
त्रिदश कविहि देति, देवमाया भुलवि तयां, उमजों न दे वमाया. ॥६९॥