अंक पहिला - भाग १ ला
नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’
नांदी
पद -- ( भूप त्रिताल. )
वंदन त्या ईशा उमेशा ॥ स्वजनशुभंकर नटवेषा ॥धृ०॥
श्रीमन्मंगलदायक नमिला ॥ स्तविली मग ती सत्कविमाला ॥
चिंतुनियां मनिं बलवंताला ॥ गोविंद रची नव कवनाला ॥
सेवा बुध हो गुणलेशा ॥१॥
पद -- ( काफी , चाल -- साध्य नसे. )
अवन करो तुमचें ॥ सदा तो आत्मसमाधी त्या शंभूचा ॥धृ॥
पर्यका दृढ रज्जु जसे ते ॥भुजंग वेष्टिती यज्जानूंतें ॥
प्राणनिरोधें झाला ॥सकलेंद्रियगण नियमित ज्याचा ॥१॥
बाह्यज्ञानाविरहीत राहे ॥ निश्चल मानस होऊनि पाहे ॥
अभ्यंतरिं आत्म्याला ॥ अनुभव घे जो स्वानंदाचा ॥२॥
साकी
श्यामवर्ण मेघोपम शोभे नीलकंठ ज्यावरती ॥
गौरीची भुजलता विराजे विद्दुल्लेखेसम ती ॥
रक्षक तो होवो ॥ तुम्हां इच्छित फल देवो ॥१॥
सुत्रधार : पुरे - पुरे. सभासदांच्या कौतुकाचा भंग करणारा इतका परिश्रम कशाला पाहिजे ? ( पारिर्श्चक जातात. ) आतां सभासदांस हात जोडून माझी अशी विनंती आहे कीं , -
साकी
शूद्रककविकृत मृच्छकटिक जें मान्य प्रकरण लोकां ॥
संक्षेपें तें संगीतीं मी दावितसें अवलोका ॥
टाकुनि दोषांतें ॥ सेवा कविगुणलेशातें ॥१॥
असो. अति परिश्रमानें मला फार क्षुधा लागली आहे, तर घरीं जाऊन फराळाची काहीं तरी तजवीज पहावी. ( इकडे तिकडे फिरुन ) हें माझॆ ग्रह ; तर आतां आंत जावें . ( तसें करुन ) अरे, आमच्या घरांत हें आज काही नवेच प्रकरण दिसतें . तांदुळाच्या धुवणाने पाट रस्त्यातून वाहताहेत, जळकी कढई ओढल्यामुळें भुईवर जी काळी रेघ उमटली आहे तेणेंकरुन वैष्णवाची मुलगी कपाळीं अंगार्याची रेघ लावून जशी शोभते, तशी ही भूमि फारच शोभते आहे. अधिकच प्रदीप्त होऊं लागली. हें आज आहे तरी काय ?-
पद -- ( चाल-- पूर्ण दैव कैकयिचें आजिं उदेलें .)
थाट्माट सदनिं नवा बघुनि वाटतें ॥
पूर्वपुण्यफल मजला आज लाभतें ॥धृ०॥
घाशितसे चंदन ही कोणि कामिनी ॥
वाटी हे अंगराग कोणि बैसुनि ॥
कुसुमहार गुंफित ही लक्ष लावुनी ॥
रम्य रंगवल्लि इथें कोणि काढिते ॥
-- तर आतां भार्येलाच हांक मारुन विचारावें म्हणजे खरें काय आहे तें समजेल. ( पडद्याकडे पाहून ) प्रिये, जरा इकडे ये पाहूं .
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP