मैत्रे० : ( पडद्यांतून ) बाबा रे, मी सध्या कामांत आहे, मला काहीं यायला होणार नाहीं ; तूं दुसरा कोणी ब्राह्नण पहा.
सूत्र० : अरे , नाही का म्हणतोस ? आजचें भोजन उत्तम- चमचमीत आहे. तुला कोणचीहि अडचण नाही , शिवाय दक्षणाहि चांगली मिळेल , पहा.
मैत्रे० : ( पडद्यांतून त्रासून ) काय रे , तुला पहिल्यानेच सांगितले ना कीं , मला यायला होणार नाहीं म्हणून ? मग येण्याविषयी तुझा मला इतका आग्रह कां ?
सूत्र० : यानें तर मला धुडकावलें . असो ! दुसरा ब्राह्मण पाहूं . ( जातो. )
मैत्रे० : ( प्रवेश करुन ) शिव - शिव ! या मैत्रैयानें दुसर्यांचीं आमंत्रणें का खावीं ? काय अवस्था झाली ही ? अवस्थे, तूं आमची फार चांगली परीक्षा केलीस. दैवाची गति तरी काय विलक्षण पहा ! जो मी मैत्रैय नुकताच चारुदत्ताच्या संपत्तीवर मौजा मारीत होतो , ढेकरांबरोबर सुगंध देणारे असे मसालेदार मोदक खाऊन मधल्या चौकाच्या दारात स्वस्थ बसत होतो , चितार्याची बोटें जशी अनेक प्रकारच्या रंगानी भरलेली असतात तसे माझे हात नानाप्रकारच्या पक्वान्नांनी भरलेले असत, कंटाळा आला म्हणजे बोटाचा स्पर्श मात्र करुन पात्रांतील पदार्थ पलीकडे सारीत होतो, रस्त्यांत पोळ जसे रवंथ करीत उभे राहतात तसा मी बेफिकीर रहात होतो ; तोच मी मैत्रैय, माझ्या मित्राला दरिद्रता आली म्हणून दिवसा इकडेतिकडे कोठें तरी आपला निर्वाह करुन रात्री वस्तीला मात्र त्याच्या घरी येतो. असो. चारुदत्ताचा प्रिय मित्र जो चूर्णवृध्द त्यानें शेला जाईच्या फुलांनी सुवासिक करुन त्याला देण्याकरितां माझ्यापाशी दिला आहे ; तर तिकडेच जावें . ( इकडेतिकडे फिरुन पुढें पाहून ) हा पहा, चारुदत्त स्नानसंध्या आटोपून गृहदेवतांना बलि देण्याकरितां इकडेच येत आहे.
( चारुदत्त प्रवेश करतो. )
चारुदत्त : ( आकाशाकडे पाहून , दु:खाचा सुस्कारा टाकून )
पद -- ( त्रिताल. )
सार्थचि ते वद्ती ॥ लोकीं ॥ प्रारब्धाची गति न कळे ती ॥धृ॥
सारसादि जे बलि भक्षुनियां ॥ क्रिडत होते सदनांगणिं या ॥
वाढे सांप्रत तृण त्या ठाया ॥ पुण्यबली हा कीटक खाती ॥१॥
मैत्रै० : ( जवळ जाऊन ) मित्रा , तुला स्वस्ति असो ,तुझी अभिवृध्दि होवो !
चारु० : मित्रा मैत्रैया, आलास ? फार चांगले झालें . ये, बैस खालीं .
मैत्रै० : ( बसून ) मित्रा ,तुझा प्रिय मित्र जो चूर्णवृध्द त्याने हा शेला , जाईच्या फुलांनी सुवासित करुन तुला देण्याकरितां दिला आहे ; तर हा घे .
चारु० : ( शेला घेऊन संचित बसतो. )
मैत्रै० : अरे, चिंतन कसलें करतोस ?
चारु० : मित्रा , काय सांगूं --
दिंडी
दु:ख भोगुनि मग सेवितां सुखातें ॥
अंधकारीं दीपसें तोष देतें ॥
परी सौख्या भोगोनि दु:ख येतां ॥
सतनु परि तो मृत मनुज जाण तात ॥१॥
मैत्रै० : बरें मित्रा, दारोद्र्य आणि मरण यातूंन तुलां कोणतें बरें वाटतें ?
चारु० :
ठुंबरी -- ( चाल -- बैरागी मोरे राम .)
मरण बरें वाटतें ॥ दारिद्रयाहुन मित्रा तें ॥धृ॥
दु:ख एकदां त्या मरणाचें ॥ परि होतें जें दारिद्रयाचें ॥
सततचि तें जाळितें ॥१॥