विट : त्या श्रेष्ट चारुदत्तच्या गुणाला .
शका० : अं : ! आतां कशाचें रे त्याचे गुण ! त्याच्या घरांत एक घासभर अन्नसुध्दां कोणाला मिळत नाहीं , मग गुण ते कोणते ?
विट : अरें , असें म्हणू नकोस. उन्हाळ्यात पुष्कळ लोकांची तृषा भागवून जसा एखादा तलाव शुष्क होतो, त्याच्याप्रमाणें त्या श्रेष्ठ चारुदत्ताची स्थिती आहे .
शका० : तूं एवढी जो त्याची प्रतिष्ठा सांगतोस, असा कोण रे हा रांडलेक ? कोणत्या रे बटकीच्या पोटचा ?
विट : मूर्खा, तो नावाचा श्रेष्ठ चारुदत्त आहे , त्याची बरोबरी कोण करणार ? -
पद-- ( चाल-- अष्ट्मूर्ती परमेश० )
दीन जनांचा कल्पतरुचि जो साह्य सज्जनांचा ॥
विद्याविनयें सदा नम्र किती कोश सदगुणांचा ॥धृ०॥
सदाचरणरत जननिकषचि आदर्श शिक्षितांचा ॥
मर्यादेचा सागर आदर राखी सकलांचा ॥
सुह्रज्जना संतोषदायी बहु निधि औदार्याचा ॥
ऐसा सदगुणमणिमंडित जो धन्य जन्म त्याचा ॥१॥
-- एवढ्याकरतां आपण येथून जावें हें फार चांगले.
शका० : वसंतसेनेला घेतल्याशिवायच ?
विट : अरे, ती तुला केव्हाच सोडून गेली.
शका० : ती कशी गेली रे ?
विट : कशी गेली सांगू ? - जशी आंधळ्याला दृष्टी सोडून जाते अथवा मूर्खाला बुध्दि सोडून जाते, तशी ती तुला सोडून गेली. समजलास ? म्हणून आपणहि आतां जाऊं चल.
शका० : कसेंहि असो, वसंतसेनेला घेतल्याशिवाय मी इथून हालायचा नाही.
विट : अरें, मूर्खा , पण तुला हें कसे नाहीं कळत् , कीं --
कामदा
स्तंभबंधनें होत वश करी ॥ वाजि होय तो रज्जु मुखिं जरी
लुब्ध कामिनी व्हावया नरा ॥ हेतु ह्र्दयिंचा प्रेम गुण खरा ॥१॥
_ म्हणून मुकाट्यानें जावे हे बरें !
शका० : तुला जायचें असेल तर तूं जा , मी तिला घेतल्याशिवाय येथून हालायचा नाही .
विट : बरें तर ; हा पहा मी चाललों . ( विट जातो. )
शका० : अरे , माझा मित्र विट खरेंच गेला ! ( मैत्रेयाला पाहून ) अहो काकपदशीर्षमस्तकदुष्ट्बटुक हो , - बसा - बसा , खाली बसा.
मैत्रे० : आम्हाला बसविलेंच आहे !
शका० : कोणीं ?
मैत्रे० : आमच्या दुदैवानें.
शका० : बरें तर उठा, उठा आता.
मैत्रे० : उठूं .
शका० : केव्हां ?
मैत्रे० : आमच्या बोकांडीचें दुदैंव उठून जाईल तेव्हां .
शका० : बरें , तर रडा, रडा आतां .
मैत्रे० : रडविलेच आहे आम्हाला.
शका० : कोणीं ?
मैत्रे० : दारिद्रयानें .
शका० : बरें तर हसा , हसा आतां .
मैत्रे० : हंसूं.
शका० : केव्हां ?
मैत्रे० : आमच्या चारुदत्ताला पुन: संपत्ति येईल तेव्हां .
शका० : अरे , दुष्ट भटुरग्या, भिकारड्या चारुदत्ताला माझा एक निरोप सांगशील का ? त्याला म्हणावे , जिच्यापाशी पुष्कळ संपत्ती आहे , अशी जी कलावंतीणीची पोरगी वसंतसेना , ती कामदेवाच्या उत्सवापासून तुझ्यावर अनुरक्त झाली आहे. आम्ही बलात्कारानें तिला वश करीत असतां ती तुझ्या घरांत शिरली आहे. ती जर मुकाट्याने माझ्या स्वाधीन करशील, तर चावडीवर गेल्याशिवाय माझा खट्ला तुच संपविलास असे होऊन , मी तुझ्यावर कृपा करीन ; आणि तसे जर न करशील तर , मरेपर्यत तुझे आणि माझे वैर राहील, असें सांग. आणि तूहि खूप समज, मी राजशालक संस्थानक आहे. माझ्यापुढें हळू बोलत जा आणि मला ऐंकू येईल असें हळूं बोलत जा , आणि मी आपल्या रंगमहालाच्या गच्चीवर बसलों असता मला ऐंकू येईल असें हळू बोलत जा. असें जर न करशील तर, कवाडाच्या संधीत सांपडलेल्या सुपारीप्रमाणे तुझे डोकेच फोडीन !
मैत्रे० : सांगेन बरें तुमचा निरोप.