अंक पहिला - प्रवेश पहिला

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


नांदी ( आलनबी )
सौख्य वितरो ॥ सदा नव ॥ तुम्हां सदाशिव ॥
हिमगिरिजा धव ॥
साधुजनांचा ताप परिहरो ॥धृ०॥
स्वकरें निज शिरिं गंगाबसवी ॥
मत्सरभावे सतीस रुसवी ॥
शशि लक्षिसि तूं अशिवे केवीं ॥
पुसे रुसे तो भविं तारो ॥१॥
साकी
बलवत्पदनत गोविंदानें संगीतीं नटवीलें ॥
संशय - कल्लोळाख्य सुनाटक हास्यरसें आश्रियलें ॥
प्रयोगरुपें तें ॥ श्रवणेक्षींण घ्या स्थिरचित्तें ॥१॥
( नांदीनंतर साधु प्रवेश करुन )
पद
ह्रदयिं धरा हा बोध खरा ॥ संसारीं शांतिचा झरा ॥धृ०॥
संशय खट झोटिंग महा ॥ देउं नका त्या ठाव जरा ॥१॥
निशाचरी कल्पना खुळी ॥ कवटाळिल ही भीति धरा ॥२॥
बहुरुपा ती जनवाणी ॥ खरी मानितां घात पुरा ॥३॥
आमच्या कार्तिकनाथाच्या दीपोत्सवाकरितां बाईसाहेबांनी एक मण तेल देण्याचं कबूल केलं -

फाल्गुनराव - ( पडद्यात ) जा येथून, तुला कांहीं मिळणार नाहीं! स
साधु - अहो, असे उगीच अंगावर कां येतां ? बाईसाहेबांनी कबूल केलं, म्हणून मी मागायला आलों.
फाल्गुनराव - ( पडद्यात ) नुसते ढोंगी --
साधु - तुम्हांला धर्मादाय करायचा नसेल तर करुं नका; उगीच संशय कां घेतां ? ही संशयाची वृत्ति दानधर्माच्या आड येऊन पुण्यक्षय करते, इतकंच नव्हे तर संसारातील रोजच्या कृत्यांतहि हें संशयाचं पिशाच्च सुखांत माती कालवतं. नका करुं दानधर्म! मी जातो; पण तुमच्याहि स्वत:च्या कल्याणासाठीं माझा बोध ध्यानांत ठेवा.
ह्र्दयिं धरा हा बोध खरा ॥ -            ( जातो. )
फाल्गुनराव -- ( बाहेर येऊन. ) अरे ढोंग्या --

पद
शिणवुं नको कंठ असा ॥ तृषित न मी बोधरसा ॥
ढोंग्या न राही उभाही, जरासा ॥धृ०॥
साधु न तुम्हि, भोंदु चोर ॥ धूर्त कपटी शठ कठोर ॥
पाडितसां व्यसनिं थोर ॥ देवखुळ्या स्त्रीपुरुषां ॥१॥

चल नीघ; समजलों. माझ्या बायकोला कुणाचा तरी निरोप पोंचवायला नाहींतर चिठ्ठीचपाटी द्यायला, कुणी तरी आला असेल झालं. ती जरी कसली हिकमती ! आज म्हणे मावशीला भेटायला जातें, आज बहिणीचा निरोप आला होता, आज काय आत्याबाईनें बोलावणं पाठवलन्; दररोज नवी नवी युक्ति काढीत होती; पण आता त्यांतली एकदेखील युक्ति चालूं द्यायचा नाहीं म्हणावं; आणि एवढ्यासाठीं तर या विशाखपुराबाहेरच्या स्वत:च्या बंगल्यांत येऊन राहिलों. हो, अशा बायकोला शहरांत राहून जपणार किती? त्यांतून चंगीभंगी छत्तिसरंगी अशा लोकांचा सुळसुळाट अलीकडे तर अगदीं अनावर झाला आहे. रामदास, हरदास, पुराणिक, वेदात्नी, ब्रह्मचारी, एकापेक्षां एक बिलंदर! तें कांहीं नव्हे, मीं केलं हेंच फार उत्तम! तिला बाहेर जायला नको आणि तिच्याशीं कुणी बोलायला नको. यांत मला मात्र पहारा करावा लागतो, पण तो पुरवला. आतां एकटं जे बसायचं तें तिला हांक मारुन दमयंतीचं चरित्र तरी वाचायला सांगावं. अग ए, त्या आतल्या चंदनी पेटींत वरतींच एक पुस्तक आहे, तें घेऊन ये पाहूं. ऐकलंस का ग ? अरे ! ओ देत नाही. ( दाराकडे जात ) कां, आतां मौनव्रत धरणार वाटतं ? अन्, इथेहि दिसत नाही ! अग ए, कुठे आहेस ग ? ( इकडे तिकडे पाहून ) गेली वाटतं ! दिल्यान् तुरी हातावर ! भादव्या, अरे ए भादव्या, चल लवकर, फाल्गुनराव बसा आता हांका मारीत ! ए भादव्या, आलास कीं नाहींस रे ? हासुध्दां चोर तिलाच सामील झाला वाटतं ! ( भादव्या येतो. त्यास ) काय रे, कुठें आहे ती ?
भादव्या - मागल्या दारानं कार्तिकनाथाच्या देवळाकडे गेल्या धनीसाहेब.
फाल्गुन - मागल्या दारानं ! भादव्या, जा आधीं, आत्तांच्या आत्तां गवंड्याला बोलावून घेऊन ये आणि तो दरवाजा आधीं बंद करुन टाक ! आजपासून नियम; दोन दरवाजांच्या घरांत म्हणून राहावयाचं नाही. या दरवाजावर बसलों तर त्या दरवाजानं गेली ! अशा सतरा दार आणि तेहतीस खिडक्यांच्या घरांत नवर्‍याला शंभर डोळे असले तरी कसे पुरणार ? तूं काय म्हटलंस ? कार्तिकनाथाच्या देवळात गेली ?
भादव्या - होय धनीसाहेब.
फाल्गुन - अगदीं नटून सजून गेली का रे ?
भादव्या - म्हणजे कशा धनीसाहेब ? रोजच्याप्रमाणं गेल्या.
फाल्गुन - अंगावर सगळे दागिने होते का ? तो बुट्टीचा शालू नेसली होती का ? नाकांत नवी नथ होती का ? अंगावर तो बादली शेला होता ?
भादव्या - होय, होता धनीसाहेब.
फाल्गुन - झालं तर. आणखी काय पाहिजे ?
भादव्या - या आपल्या बोलण्याचा रोख निराळा दिसतोय. उर्मट म्हणून दोन तोंडांत मारा, पण बाईसाहेबांविषयीं इतकी बारीक चौकशी करणं बर नव्हे सरकार ! मी चाकर माणूस; पण अलिकडे आपली बाईसाहेबांवर इतराजी झाल्यासारखी दिसते.
फाल्गुन - इतराजी झाली असती तर तिनं इतके देव्हारे कशाला माजविले असते ? मी बायल्या होऊन, भुंग्याप्रमाणं तिच्याभोवतीं पिंगा घालायला लागलों असं तिच्या लक्षांत येतांच, तिनें मर्यादेचा बुरखा दिलान् झुगारुन आणि लागली नाचायला हवी तशी ! मीच जर प्रथम तिला करड्या नजरेनं उठतां लाथ आणि बसतां बुक्कीचा खुराक चालू केला असता, तर माझ्या करड्या घोडींप्रमाणं ती कह्यांत राहिली असती. पण म्हटलं, शिकलीसवरलेली आहे, घरंदाजाची आहे, तेव्हां भलतीच खोड असायची नाही. पण शिकण्यावर काय आहे ? वरच्या रंगानं आंतलं रुप थोडचं पालटतं ? खापरी ती खापरीच !
भादव्या - गुन्हा माफ असावा धनीसाहेब. बाईसाहेबांना नाव ठेवायला एक तिळाएवढी जागा दिसत नाहीं; मग आपण भलतीच खोड कोणती म्हणतां ती भगवानाला ठाऊक!
फाल्गुन - तिला नावं ठेवायला तुला तिळाएवढी जागा दिसत नाही; पण मला भोपळ्याएवढी दिसते, त्याला काय करतोस ? ह्या गोष्टी कोणापाशीं बोलायच्या नाहींत; कारण गृहच्छिद्रं आहेत हीं ? पण तूं माझा जुना, इमानी, विश्वासातला नोकर म्हणून तुला मसलतीत घेतों. हें बघ, तिनं माझ्या काळजाला घरें पाडलीं आहेत, तिनं माझ्या तोंडाला काजळ फासायचा घाट घातला आहे !
भादव्या -- छे: छे:, छे: छे: ! धनीसाहेब , आपल्या मनांत जेव्हां अशा विपरीत कल्पना येतात, तेव्हां त्यांच्यावर खास देवाचा कोप झाला ! आपण कशावरुन म्हणतां तें म्हणा, पण मी तर फूल उचलून सांगतो कीं, आपला संशय अगदीं पोकळ - फोल टरफल आहे. त्यांत कांहीं अर्थ नाहीं !
फाल्गुन -- पोकळ संशय म्हणतोस ? अरे, परवां जेष्ठ्यांच्या लग्नांत वरातीच्या दिवशीं तिच्या काय चेष्टा चालल्या होत्या त्या मी ह्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. कांहीं तरी कारण काढून मधेंच हंसायचं, माझ्याकडे बघून नाक मुरडायचं, मोठ्या नखर्‍यानं इकडे तिकडे मिरवायचं, पुरुषाच्या अंगाला मुद्दाम लगटून जायचं; अरे, अशा एक का हजार गोष्टी ! लग्न झाल्यावर काहीं दिवस अशी चोख वागली कीं, पिंजारलेल्या मोरपंखाच्या डोळ्यांप्रमाणं परपुरुषाच्या डोळ्याला डोळा ठरायचा नाहीं ! पण अलीकडे तो सभ्यपणा, ती मर्यादा, ती लज्जा सारीं नाहींशीं झालीं ! इतकं कशाला ? आतां ती मला विचारल्याशिवाय कार्तिकनाथाला कां गेली ?
भादव्या - फार दिवसांत जायला झालं नाहीं म्हणून गेल्या असतील; त्यांत काय आहे ?
फाल्गुन -- त्यांत काय ? तूं पागल आहेस, तुला कळत नाहीं. देवाचं दर्शन घ्यायला नव्हे; तर या वेळीं देवळांत घिरटय घालणार्‍या सोद्यांना आपल दर्शन द्यायला गेली आहे ती ! देव घरांत नव्हते का ? पण अशा बायकांना नट्टापट्टा करुन देवळांतच गेलं पाहिजे. सारी लफंगी मंडळी या वेळेलाच तेथं जमायची !
भादव्या - अन्याय ! अन्याय ! अन्याय ! धनीसाहेबम अन्याय करतां आहां ! हीच बाईसाहेबांची निंदा जर दुसर्‍यांनी कुणीं केली असती, तर खून पडला असता इथं - खून !
फाल्गुन -- अरे चोरा, मिलाफ्या ! त्या लबाड ठकड्या बायकोची तरफदारी करतोस काय ? माझा पगार आणि तिची नोकरी !
भादव्या - सरकार, हा माझा रामराम नोकरीला ! द्या मला हुकूम ! कुठेंहि राबून पोट भरीन; पण बाईसाहेबांसारख्या शुध्द, निर्मळ बायकोला लबाड म्हणणार्‍या धन्याची भाकरी नाहीं खायचा ! करा माझा पगार चुकता ! हा मी चाललों ! ( पथारी, तांब्या, कांबळें, धोतर, गोळा करुं लागतो. )
फाल्गुन -- ( आपल्या मनाशीं ) या गुलामाला इतक्यांत बुजवून उपयोगी नाहीं; जरा चुचकारुनच घेतला पाहिजे. कारण, खरीखोटी खात्री असल्याशिवाय हा नोकरी सोडायला तयार व्हायचा नाहीं; आणि मी तरी असं प्रत्यक्ष काय पाहिलं आहे ? अजून हें माझं कदाचित् तर्कटहि असेल ! ( उघड ) तशी मी तिला अजून लबाड ठरवीत नाहीं रे ! पण हीं लक्षणं वाईट कीं नाहींत ? बायकांची जात. लगाम ढिला सोडून उपयोगी नाहीं, इतकंच म्हणणं माझं. ठेव तें सगळं जिथल्या तिथं !
भादव्या - ( ठेवीत ) हं, हे आपल म्हणणं रास्त दिसतं. धनीसाहेब, माझी अक्कल किती ? पण काहीं पाहिल्यावाचून असा संशय धरण आपल्यासारख्या थोरांना जरा--
फाल्गुन -- ( लटके हंसत ) हा बावळटा  ! हे सगळं तूं खरं समजलास वाटतं ? इतकावेळ मी तुझं मन बघण्यासाठी तस बोलत होतो. बरं, तूं जा आतां; आणखी कुत्र्याला फिरवून आण. जाऊन आलास म्हणजे तुला दुसरे काहीं जरुरीचे काम सांगायचं आहे.
भादव्या -- बरं तर, कुत्र्याला फिरवून हा आलोंच बघा धनीसाहेब. ( जातो )
फाल्गुन -- ( गेला असे पाहून ) खात्रीनें सांगतो, माझ्या बायकोनं याला पैसा दाखविला आणि त्याला हा लालचावला. बरं आहे म्हणावं ! कुठं गेली म्हणाला हा? कार्तिकनाथाच्या देवळाकडे काय ? असाच जातों आणि असेल तशी पकडून आणतो ! तिला खांबाशी जखडून टाकलं नाही तर नांव दुसरं ! पण फाल्गुनराव, अशा अवदसेशी लग्नच केलं नसतंस तर !

पद ( शंका घेशी घोर )
खोटी बुध्दि केविं झाली ॥
भटिं लग्नधटि खोटी धरिली ॥
वरिली स्त्री ती खोटी निघाली ॥धृ०॥
थोर कुळावरि भाळुनि गेलों ॥
बाह्य सुशिक्षण रुपा दिपलों ॥
पाय पुजुनि धरिं कृत्या आणिली ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP