( फाल्गुनरावांच्या घरापुढील रस्ता )
( कृत्तिकाबाई प्रवेश करते. )
कृत्तिका -- मी त्यांचा डोळा चुकवून घाईघाईनें देवदर्शन घेऊन तर आलें, पण स्वारीनं घरीं कांहीं घोटाळा केला नसला म्हणजे पुरे. नाहीतर कायसं म्हणतात ना ? " ठमाबाईचे झाले बारा राम आणि घरीं नवरोजींनीं साधलं काम, " त्यातलं व्हायचं ! अग बाई ! दरवाजा लावलाय. ( धक्का मारुन ) रोहिणी, अग रोहिणी, दार उघड - मेल्यांनो ! कुणी ओसुध्दां देत नाही. यांनीं आरंभलं आहे तरी काय आंत ? टपतां टपतां चोर सांपडणारसं वाटतं. पण हें दार कसं उघडणार ? अग चित्रे, रोहिणी ! मेल्या वाटतं सगळ्या ! आतां काय करावं ? अग, दार उघडा दार ! पण मी इकडे काय ओरडत उभी राहिलें ? तिकडच जाऊन छपून उभं राहावं. ( जाते. )
( रोहिणी व स्वाती दार उघडून बाहेर येतात. )
रोहिणी - इथें तर कुणी नाहीं, मग दारावर धक्के कोण मारीत होतं तें ? स्वाती, बघितल्यास अश्शा इथें चमत्कारिक संशयाच्या भूतचेष्टा चालतात. पाहिलं तर दोघंहि सरळ, पण संशयसमंधाची बाधा दोघांनाहि सारखीच. बरं ! आतां कधीं येशील आणखी ? जरा थांबेनास कां ?
स्वाती -- छे ग बाई ! येऊन कांहीं थोडा वेळ नाहीं झाला. जातें आतां. नाहींतर काय म्हणतात कीं नाहीं - आपण कुणाबिणी - काम संभाळून सगळं करायचं, बरं, पण रोहिणी, मीच काय म्हणून तुला वरचेवर भेटायला यावं ? तूं कां एकदां तिकडे येत नाहींस ?
रोहिणी - मी आणि तुला भेटायला येणार ? इतकं कुठं आहे बाई माझ नशीब ! मला अशी खाष्ट धनीण भेटली आहे कीं, इकडचं तिकडं व्हायला फुरसत मिळत नाहीं. बयाचं सारखं तोंड चाललेलं असतं. हें कर तें कर, तें ठेव हे आण, माडीवर जा, खालीं ये, - नको नोकरी, अस्सं झालं आहे मला !
स्वाती - मग राहिली आहेस कशाला इथं ? कुठंतरी चाकरीच करायची, मग काय ? ही नाहीं दुसरी !
रोहिणी - तें खरं ग; पण मिळाली पाहिजे ना वेळेवर ! तुझ्यासारखी जर मला एखादी मिळेल तर मी आज सोडायला तयार आहे. हें लुगड धनिणीनंच दिलं वाटतं ? अगदीं कोरंच आहे म्हणायचं.
स्वाती - हो, त्यांनींच दिलं. एक महिनाभरसुध्दा नेसल्या नाहींत. त्यांची माझ्यावर चांगली मर्जी आहे. लुगडीं, चोळ्या वरचेवर देतात. आपलं माणूस चांगल दिसावं म्हणून ही पहा त्यांनी मला नथसुध्दां घालायला दिली आहे. तुला नाही वाटतं कांहीं मिळत ?
रोहिणी - मला ? अग, त्यांच्या लुगड्यावर एक नव्हे, दोन नव्हे, दहा जणांचे डोळे ! माझ्या वाटणीला कुठून येणार तें ? ( कृत्तिकाबाई येते. )
कृत्तिका - ( आपल्याशीं ) तिकडेहि सामसूमच ! अग बाई, ही कोण माझ्या दाराशीं ?
स्वाती - बरं, जातें आतां. शंभरदां निघालें नि शंभरदां --
कृत्तिका - काय ग बहिरटे ! इतक्या हाका मारल्या , दारावर धक्के मारले, कान फुटले होते का तुझे ? दार उघडायला काय झाल होतं ?
रोहिणी - हांक ऐकल्याबरोबर दार उघडलं बाईसाहेब, पण कुणीचं नव्हतें.
कृत्तिका - ही कोण दुसरी ? काय ग ए, इथं काय ठेवलय् तुझं ? कशाला आली आहेस ? कांहीं काम का आहे ?
स्वाती - काम - माझं काम - माझं कसलं काम ?
कृत्तिका - असं काम, काम काय करतेस ? अशी घोटाळतेस कां ? स्पष्ट सांग. पोटशूळावर औषध मागायला, का अर्धशिशी टोंचून घ्यायला ? बायकांच्या दुखण्यावर रामबाण बघायला, का कुणी अडली आहे तिच्याकरतां मंत्राचं पाणी न्यायला आमच्या यजमानांकडे आली आहेस ?
स्वाती - त्यांच्याकडे कशाला मी येऊं ?
कृत्तिका - कशाला तें आपल्या मनाला विचार. कां ग - रोहिणी, आणि तुझी हिला मदत ! चांगलं - चांगलं ! चांगलं इमान राखतेस. अग सटवे !
रोहिणी - हें काय बाईसाहेब बोलतां आपण ? मी असलं काम करणारी बायको नव्हे हो ! ही बिचारी माझ्या गांवची, इथं श्रावणशेटच्या भरणीबाईंजवळ कुळंबीण असते. सहज मला भेटायला म्हणून आली होती. तसल्या फंदांतली नाहीं ही. अगदीं भोळी आहे बाईसाहेब !
कृत्तिका - अग, भोळी आहे म्हणूनच म्हणतें ! अशा भोळ्याभाबड्याच आमच्या यजमानांकडे दवापाणी, मात्रामंत्र मागायला यायच्या. बायकांना फुकट औषध द्यायचं सासुबाईंचं पुण्यव्रत चालवलं आहे ना त्यांनी ? कां ग, हें लुगडं तुला कुणीं दिलं ? खरचं सांग !
स्वाती - मला भरणीबाईसाहेबांनी दिलं.
कृत्तिका - हो, भरणीबाईसाहेब देताहेत असलं लुगडं ? कां दिलं, कुणीं दिलं, केव्हा दिलं, सगळ सगळं माझ्या ध्यानांत येऊन चुकलं आहे. जा आतां, जा नीघ. पुन्हा इकडे तोंड दाखवलंस तर खबरदार ! चल, हो चालती ( ती जाते ). ती पहा, ती पहा नटवी, कशी झुलत चालली आहे ती. ही भोळी का ? रोहिणीला वाटतं मी अगदीं बोळ्यानं दुध पितं नाहीं ग ? भरणीबाईनं तें लुगडं तिला दिलं का ? लबाड कुठली मुलखाची ! आमच्या ह्यांनींच दिलं कीं नाहीं ? खरं सांग ! नको सांगूस. भरणीबाईची आणि माझी चांगली ओळख आहे. मी आतां जाऊन तिला चिठ्ठी लिहितें. पण काय ग रोहिणी, हे कुठं आहेत ?
रोहिणी - कुठं बाहेर गेले आहेत बाईसाहेब.
कृत्तिका - बाहेर गेले ? ते कां गेले ? केव्हासे गेले ?
रोहिणी - खरोखरच मला ठाऊक नाहीं बाईसाहेब !
कृत्तिका - सांग खोटं; पाहिजे तितकं खोटं सांग ! पण मी कांहीं पत्ता काढल्याशिवाय अन्न घ्यायची नाहीं ! मी आतां जाऊन भरणीबाईंना पत्र लिहितें. तूं जा आणि त्या भादव्याला माझ्याकडे लावून दे. कसा माझा छळ मांडला आहे ! देवा, तुला डोळे आहेत ! ( जाते )