अंक पहिला - प्रवेश दुसरा

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


( आश्विनशेट स्वत:शीं बोलत फिरतो. )

अश्विन -- मी आज करणार आहें त्या गोष्टीला माझा जिवलग मित्र वैशाखशेठ याचासुध्दां मनापासून सल्ला नाहीं आणि त्याचंहि म्हणण वाजवी आहे. कारण अशा प्रसंगीं राजरस्ता सोडून मी जर मुद्दाम बिकट पायवाटेनं जायचं मनांत आणलं, तर तें त्याला कसं पसंत पडणार ? पण करावं काय ? ऐन पंचविशीच्या जवानींत लागोपाठ तीन बायका दगावल्या. वेल लावावी, खतपाणी घालावें आणि अशी कुठं फुलाफळाला येते न येते तोच अचानक काहीं रोग पडून मरुन जावी, तशांतला माझ्या तिन्ही बायकांचा प्रकार झाला ! शेवटी अगदीं जिकिरीस येऊन माघमाघेश्वर म्हणून कोणी हिंदुस्थानांतले एक नामांकित ज्योतिषी आले होते, त्यांनाहि पत्रिका दाखविली. पत्रिका पाहताच त्यांनी सांगितलं कीं, ’ तुम्हाला मंगळ अत्यंत अनिष्ट असून, भार्यास्थानावर सर्व दुष्ट ग्रहांची पूर्णदृष्टि आहे. अर्थात लग्नाची बायको कांही तुम्हाला लाभायची नाही, तेव्हा, या भानगडीत पडू नका; लग्नात काहीं प्रकार करुन पाहिलात तर मात्र स्त्रीसुखाचा संभव दिसतो. ’ हे त्यांचं पत्रिकावाचन मला पटून लग्नाचा बेत अजिबात सोडून दिला आणि ज्योतिषी महाराजांनी सुचविल्याप्रमाणें एखादी उत्तम चालीरीतीची नायकिणीची मुलगी पाहून, तिच्याशी विवाहाच्या स्त्रीप्रमाणें संसारसुख घ्यावं असा निश्चय केला.माझ्या सुदैवानं, मघा नायकिणीची मुलगी रेवती ही हवी होती त्यापेक्षा दसपट चांगली मिळाली. जवळजवळ एक महिनाभर तिच्या घरी राबता ठेवून परीक्षा पाहिली; पण तिच्यात व्यंग असं तर दिसलं नाहीचं, उलट तिच्या मनांत माझ्यासारख्या एका गृहस्थाशी लग्नाच्या स्त्रीप्रमाणे संबंध ठेवून, जन्मभर संसार करावा असं असून गेली तीन वर्ष ती अगदीं कडकडीत कुमारिकाव्रतानं राहिली आहे. योगायोग जुळून यावयाचा म्हणजे असा येतो झालं. काल मन मोकळ करुन प्रत्यक्ष दोघांचं बोलणं झालं. नक्की रुकाराची वचनभाक इथं येऊन, श्रीरमाकांतासमोर देतें असं सांगून निघून गेली. ( कान देऊन ) हा प्रकार एकंदरीत धर्मदुष्टीनं किंचित् गौण असला तरी, प्रेमसुखाच्या नजरेनं हा आमचा जुळणारा संबंध उत्तम आहे असं कोण म्हणणार नाही ? ( कान देऊन ) हा रुमझुम रुमझुम मंजुळ आवाज कसला बरं ? अथवा प्रश्न कशाला ? तिच्याच पैजणांचा ! अहाहा ! साधी चालण्याची पावलसुध्दा कशी तालांत पडतात ! पैजण तरी किती सुरेल आहे ! रुमझुम- रुमझुम ओहो ! यावं यावं, तृषितचातकमेघमाले, यावं !

पद
( लावणीचे चाल )
सुकांत चंद्रानना पातली भ्रधनु सरसावुनी ॥
कटाक्ष खरशर सोडुनि भेदित ह्रदयाचि गजगामिनी ॥
रदन दिसति जणुं शशिबिंबाचे खंड मुखीं खोंविले ॥
कुरळ केश शिरिं सरळ नासिका नेत्र कमलिनीदलें ॥

( रेवती येते )
रेवती - खाशी ! तान तर खूप ठेवून दिली ! इतके दिवस हा गाण्याचा गुण चोरुन ठेवला म्हणायचा !
अश्विन - या संगीतदेवतेपुढं लाजेनं लपून बसला होता, तो तसाच प्रसंग आल्याशिवाय कसा बाहेर निघायचा ?
रेवती - मग आज प्रसंग आला वाटतं ?
अश्विन - हो, असं या प्रफुल्लित मुखकमलावरुन वाटातं.
रेवती - मनांत मांडे खायला नको कोण म्हणणार ?
अश्विन - पण प्रत्यक्ष मिळाल्यावर मनांत कोण खाणार ?
रेवती - वाहवा ! अगदीं प्रासाला प्रास जुळवून भाषण चाललं आहे ! आपण ही कवीची दीक्षा घेतली तरी केव्हापासून ?
अश्विन - या सदगुणलावण्याच्या जाळ्यांत गुंतलो, तेव्हांपासून !
रेवती - कवीतेला विषय तरी कोणता असा ?
अश्विन - कोणता म्हणजे ? तूं, तुझं तारुण्य, तुझं रुप, तुझे गुण, तुझं हसण, बोलण, चालणं, सर्व तूं !
रेवती - ते जाऊं द्या मेलं. पुरुषांना तारीफच फार करायला पाहिजे. पण मला आज आपण आपली तसबीर द्यायची कबूल केली होती ना ? का, लोणकढी दिली ?
अश्विन - अग, अस्सल सोडून नक्कल कशाला ? म्हणून नाही दिली !
रेवती - चला, बोलूं नका माझ्याशीं !  ( रागाने तोंड वळविते. )
अश्विन - बस्स ! याचं नांव मुरका ! आतां झालं माझ काम. ही घे तसबीर ! ( देतो ) माझ्यापेक्षां तिचंच नशीभ मोठं !
रेवती - ( पाहून हंसत ) ही आपली कां तसबीर ?

पद ( जाव मोरे बैया )
साम्य तिळहि नच दिसत मुखाचें ॥ नाम तरी कोरवा शिरावरि ॥
ओळखु येईल चित्र कुणाचें ॥धृ०॥
मजजवळी असे याहुनि सुंदर प्रीतिचितारिणि करिचें प्रतिबिंब सुबक या मूर्तीचें ॥१॥

अश्विन - दाखीव, दाखीव तर पाहूं कुठें आहे ती. म्हणजे तिच्याच हातची तुझी एक माझ्याजवळ आहे ती तुला दाखवतों. हं, पाहूं !
रेवती - ही कोण घाई पण ! ही पहा - ह्रदयांत लटकावून ठेवली आहे.
अश्विन - शाबास ! शाबास ! मिळाल मला उत्तर ! चल तर रमाकांतासमोर परस्पर वचनभाकपूर्वक वरदानग्रहणाचा मंगलविधि आनंदोत्साहानं करुं.
रेवती - पण आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. तेवढी मात्र आपण निरंतर ध्यानांत बाळगायची.
अश्विन - एक कां ? हजारो सांग. आतां उद्योग काय दुसरा ? तूं सांगणार आणि मी ऐकणार ? हं सांग, सांग लवकर.
रेवती - सांगायच हेंच कीं, आपला स्वभाव थोडा उतावळा दिसतो. उगीच कांहीं तरी कल्पनेवर कल्पना रचून माझ्याविषयीं कधीं निरर्थक संशय घ्याल तर मला --
अश्विन - समजलों, तोंड नको अस्सं करुंस, पण तुझ्याविषयीं संशय येईल कसा ?
रेवती - पण याच मंगलकालीं आपलं सुववून ठेवतें, माझाहि स्वभाव अजून किंचित् अल्लड, थट्टेखोर आहे, तेव्हां एखादं --
अश्विन - आलं ध्यानांत. अशा स्वभावांतच तर खरी मजा आहे !
रेवती - तसंच मी बरीच मत्सरी, थोडी मानी आणि जराशी रुसरी आहें, म्हणून --
अश्विन - मग यांत काय ? हे गुण तर संसाराला लज्जत आणतात. हं , झालं सांगून ?
रेवती - नाहीं. आणखी शेवटचं थोडं सांगायचंय् .
पद ( हमसे नजरिया )
प्रथम करा हा विचार पुरता ॥ आवरोनि ममता ॥धृ०॥
धनाढ्य आपण मान्य कुळींचे ॥ हीन कुळीची मी मज वरितां ॥१॥
करितील  निंदा हंसतिल सारे ॥ जाति धर्म कुलहि अवगणितां ॥२॥
लग्नगांठ ही पडे एकदां ॥ न ये पुन्हा कधिं ती सोडवितां ॥३॥
अश्विन - आलं ध्यानांत, बरं चल. ( देवासमोर जाऊन )

रेवती -         
पद ( निपटनिडर )
मंगलदिनिं तन, मन, धन, दान, पदिं करीतें ॥
सहाचरणसूचक हा कर करांत देतें ॥धृ०॥
स्वीकारुनि पत्निपदीं धन्य मज करावें ॥
आर्यव्रत सेविन ही शपथ मीहि घेतें ॥१॥

अश्विन -
पद ( भय हें नवें )
कर हा करीं धरिला शुभांगी ॥ सुदिनीं रमाकांतासमोरी ॥धृ०॥
सुखदा सदा मत्स्वामिनी तूं ॥ गृहसंपदा उपभोगि सारी ॥१॥

पण या सर्वांवर एक --
रेवती - छे. तें पहा तिकडून कुणीतरी येत आहे. आज रात्री सत्यनारायण आहे. तेव्हां लवकर यायचं. मी कार्तिकनाथाला जाऊन घरी जातें.
अश्विन - मी येऊं का कार्तिकनाथापर्यंत ? म्हणजे मिळूनच दर्शन घेऊं.
रेवती - भलतचं कांहीतरी ! ( डोळ्यांनी खुणावतें आणि जाते. )
अश्विन - अहाहा !
पद ( आज अंजन )
धन्य आनंददिन पूर्ण मम कामना ॥
मुदित कुलदेवता सफल आराधना ॥धृ०॥
लाभ व्हावा जिचा लोभ धरिला महा ॥
प्राप्त मज होय ती युवति मधुरानना ॥१॥  ( जातो )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP