अध्याय २४
संतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥
जय भीमातीरवासी रुक्मिणीरमणा ॥ भक्तजनपालका नारायणा ॥ जडमूढतारका पतितपावना ॥ जगज्जीवना आदिपुरुषा ॥१॥
दोनी कर ठेवूनि कटीं ॥ उभा राहिलासी जगजेठी ॥ नासाग्रीं ठेऊनि दिठी ॥ पाहसी वाट भक्तांची ॥२॥
अंबरीषाच्या कैवारें सत्वर ॥ घेतले दहा अवतार ॥ नानाचरित्रें अपार ॥ केलीं साचार स्वलीलें ॥३॥
आतां कर ठेवूनि जघनीं ॥ उभा राहिलासी चक्रपाणी ॥ भक्तमहिमा प्रकट करूनी ॥ लाविलें ध्यानीं जडजीवां ॥४॥
याति कुळ न पाहसी ॥ नामयासवें जेविलासी ॥ चोख्याचीं ढोरें ओढिसी ॥ शेले विणिसी कबीराचे ॥५॥
त्यांचीं चरित्रें अति अद्भुत ॥ तूंचि वदविसी यथार्थ ॥ आतां श्रोते हो सावधचित्त ॥ करा श्रवण निजप्रीतीं ॥६॥
मागील अध्यायीं निरूपण ॥ जीवा तत्वा दोघे ब्राह्मण ॥ कबीरासी सत्वर येऊन ॥ जाहलें वर्तमान सांगितलें ॥७॥
कबीर भक्त अति प्रेमळ ॥ उदास विरक्त सर्वकाळ ॥ सांडोनि चित्ताची तळमळ ॥ करी निश्चळ रामभजन ॥८॥
चित्तीं नाहीं आशापाश ॥ शेण सुवर्ण सारिखेंच दिसे ॥ हिरे रत्नें खडे तैसे ॥ भासती दृष्टीस कबीराच्या ॥९॥
ब्रह्मा आणि पिपीलिका ॥ मेरु मशक दिसे सारिखा ॥ बृहस्पति आणि मूर्ख मुका ॥ दृष्टीस सारिखा कबीराचे ॥१०॥
जागृत स्वप्न सुषुप्तीसी ॥ श्रीरामभजन अहर्निशीं ॥ खंडण नाहीं तयासी ॥ हरिभजनासी विनटला ॥११॥
आणिक एक होता सावकार ॥ परम भाविक अति उदार ॥ पांच पुत्र तयासी थोर ॥ घरीं सर्व संपत्ति ॥१२॥
धनधान्यही अपरिमित ॥ लावण्यस्त्री कुलवंत ॥ आणिकही सोयरे सुहृद आप्त ॥ मान्य असे सर्वांसी ॥१३॥
ऐसें असतां तयासी ॥ पंडुरोग जाहला शरीरासी ॥ कृमि पडले सर्वांगासी ॥ पूर्वकर्में तयाच्या ॥१४॥
घरीं संपत्ति आरोग्य काया ॥ पुत्र कलत्र उत्तम जाया ॥ सर्वांभूतीं समान दया ॥ विरळा कोणी असेल कोणी ॥१५॥
सर्व शास्त्रीं वक्ता निपुण ॥ निरभिमानी उत्तमवर्ण ॥ न पाहे लोकांचे दोषगुण ॥ विरळा कोणी असेल कीं ॥१६॥
कोणाचें न करी ऊपार्जन ॥ राजा रंक सारिखेचि जाण ॥ परस्त्री मातेसमान ॥ विरळाकोणी असेल कीं ॥१७॥
अखंड करी परोपकार ॥ राहिली चित्ताची तळमळ ॥ श्रीहरिभजनीं सर्वकाळ ॥ कोणी विरळा असेल कीं ॥१८॥
सर्व संपत्ति आणि धन ॥ जयासी मृत्तिकेसमान ॥ दुष्काळीं करी अन्नदान ॥ विरळा कोणी असेल कीं ॥१९॥
जैसें जयाचें जन्मांतर ॥ तैसेंच फळ तदनुसार ॥ सावकाराचें शरीर ॥ बहुत जर्जर जाहलें ॥२०॥
सर्वांगासी पडले किडे ॥ दुर्गंधि सुटली चहूंकडे ॥ कोणी न पाहती तयाकडे ॥ सर्वत्र जन कंटालती ॥२१॥
पाळिलीं पोशिलीं जन्मवरी ॥ अंतकाळीं मोकलिलीं दूरी ॥ वैकुंठपति श्रीहरी ॥ नाहीं अंतरीं आठविला ॥२२॥
वैद्य म्हणती दारोण रोग ॥ नाना औषधें देती सांग ॥ परी कृपा न करिता पांडुरंग ॥ अधिकाधिकचि होतसे ॥२३॥
ज्योतिषी सांगती ग्रह दारुण ॥ खळबळले असती संपूर्ण ॥ आरोग्य व्हावयाकारण ॥ तयांचा जप करावा ॥२४॥
देवऋषी म्हणती घाला गोंधळ ॥ अंबा क्षोभली असे प्रवळ ॥ जोगवा मागतांचि तत्काळ ॥ आरोग्य होईल निश्चयेंसीं ॥२५॥
ऐसे ऐकितां नाना उपाय ॥ तों अधिकाधिक होतसे अपाय ॥ नाठवितां श्रीहरीचे पाय ॥ विष होय अमृताचें ॥२६॥
एक ब्राह्मण येती घरा ॥ म्हणती मल्लारीमाहात्म्यजप करा ॥ एक म्हणती द्रव्य सत्वरा ॥ वांटा आजि विप्रांसी ॥२७॥
एक म्हणती वाचा सप्तशती ॥ आरोग्य करील श्रीभगवती ॥ जे जे जैसे उपाय सांगती ॥ तैसें करिती पुत्र त्याचे ॥२८॥
एक म्हणती सूर्यनारायण ॥ यासी करावें अर्ध्यदान ॥ एक म्हणती पुरश्चरण ॥ गायत्रीचें करावें ॥२९॥
एक म्हणती विश्वेश्वरा ॥ महारुद्र अभिषेक करा ॥ एक म्हणती हरेश्वरा ॥ प्रदक्षिणा घाला कीं ॥३०॥
एक म्हणती गजवदन ॥ हाचि करावा प्रसन्न ॥ संकष्टचतुर्थीव्रत करून ॥ लाडू मोदक अर्पावे ॥३१॥
एक म्हणती पंचाक्षरी ॥ आतां आणावा सत्वरी ॥ एक म्हणती कैवारी ॥ काळभैरव उपासावा ॥३२॥
एक म्हणती विप्र बोलावून ॥ त्यासी द्यावें गजदान ॥ एक म्हणती तुळा करून ॥ द्रव्य वांटा विप्रांसी ॥३३॥
ऐसें ऐकोनि सकळ ॥ उपाय केले तत्काळ ॥ द्रव्य वेंचिलें सकळ ॥ आरोग्य व्हावयाकारणें ॥३४॥
परी दिवसेंदिवस जर्जर ॥ अधिकचि जाहला सावकार ॥ दुर्गंधी सुटली थोर ॥ कोणी जवळ न येती ॥३५॥
किडे पडले सर्वांगासी ॥ जीव होतसे कासाविसे ॥ मग म्हणे भागीरथीसी ॥ देह अर्पण करावा ॥३६॥
पुत्र कांता सोयरे स्वजन ॥ सावकारें जवळ बोलावून ॥ म्हणे माझा देह नेऊन ॥ भागीरथींत टाकावा ॥३७॥
तुम्हीं उपाय केले बहुत ॥ परी माझें कर्म विपरीत ॥ आतां देहांतप्रायश्चित्त ॥ भागीरथींत घेईन ॥३८॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ शोक करिती मोहेंकरून ॥ मग सावकारातें उचलोन ॥ गंगातीरासी पैं नेलें ॥३९॥
कौतुक पाहावयाकारण ॥ अमित मिळाले विश्वजन ॥ सावकार देतो प्राण ॥ व्यथा कठिण म्हणऊनि ॥४०॥
भागीरथीचिये कांठीं ॥ असंभाव्य जाहली दाटी ॥ नरनारी पाहती दृष्टीं ॥ नवल करिती देखोनि ॥४१॥
एक म्हणती आत्महत्या ॥ यानें न करावी सर्वथा ॥ एक म्हणती पुत्रकांता ॥ कैसीं यासी उबगली ॥४२॥
एकासी एक उत्तर देती ॥ शेवटी आपुली ऐसीच गती ॥ आतां तरी सावधान चित्तीं ॥ श्रीहरिभजन करावें ॥४३॥
ऐकूनि जनांचें उत्तर ॥ तयांसी म्हणे सावकार ॥ आतां मजला सत्वर ॥ भागीरथींत लोटावें ॥४४॥
न सोसवे दुर्धर व्यथा ॥ वचन मानलें समस्तां ॥ चार कुंभ आणूनि तत्त्वतां ॥ हातापायांसी बांधिले ॥४५॥
तंव तेथें पद्मनाभ ब्राह्मण ॥ आला करावया स्नान ॥ मुखें करीत नामस्मरण ॥ राम कृष्ण गोविंद ॥४६॥
तो कबीराचा शिष्य जाण ॥ सप्रेम करीत नामस्मरण ॥ तुळसीमाळा गळां घालून ॥ विष्णुभक्त पातला ॥४७॥
तों भागीरथाचे कांठीं ॥ असंभाव्य जाहलीसे दाटी ॥ नरनारी पाहोनि दृष्टीं ॥ होताती कष्ठी निजमोहें ॥४८॥
पद्मनाभ पुसे ते वेळां ॥ काय कौतुक पाहतां डोळां ॥ त्यांणीं सर्व वृत्तांत सांगितला ॥ विष्णुभक्ता जवळी पैं ॥४९॥
ऐकोनि जनांचें बोलणें ॥ तत्काळ जवळीं आला त्वरेनें ॥ सावकारासी बोलिला वचन ॥ म्हणे आपण प्राण न द्यावा ॥५०॥
चौर्यांशी लक्ष योनी हिंडतां ॥ हा नरदेह लाधला अवचिता ॥ तेथेंही करितां आत्महत्त्या ॥ नव्हे सुटका कल्पांतीं ॥५१॥
कर्मभूमीस मनुष्यजनन ॥ तरी कांहीं करावें हरिभजन ॥ तरीच जन्ममरणाचें खंडण ॥ होईल जाण निश्चयेंसीं ॥५२॥
पद्मनाभास म्हणे सावकार ॥ कर्म बलवंत अति दुस्तर ॥ म्यां उपाय केले फार ॥ आरोग व्हावयाकारणें ॥५३॥
सर्वांगासी पडले किडे ॥ दुर्गंधि सुटली चहूंकडे ॥ आप्तवर्गांसी पडलें सांकडें ॥ उपाय सरले अवघेचि ॥५४॥
मग पद्मनाभ तयासी म्हणे ॥ एक उपाय राहिला जाण ॥ त्रिवाचा म्हणतां राम राम ॥ व्यथा संपूर्ण दूर होय ॥५५॥
वेदशास्त्रपुराणश्रवण ॥ जप तप करितां अनुष्ठान ॥ वाचेसी न येतां रामनाम ॥ तरी व्यर्थ गेलें अवघेंचि ॥५६॥
नाना दैवतें उपासितां ॥ योग यज्ञ हवन करितां ॥ हरिनाम वाचेसी न येतां ॥ व्यर्थ गेलें अवघेंचि ॥५७॥
तीर्थें करितां बहु श्रमला ॥ सर्व व्रतेंही आचरला ॥ रामनामीं विमुख जाहला ॥ तरी व्यर्थ गेलें उच्चारण ॥५८॥
प्राणायाम वज्रासन ॥ गोभूरत्नें अन्नदान ॥ हृदयीं नाठवितां रघुनंदन ॥ व्यर्थ गेलें अवघेंचि ॥५९॥
कर्मारंभीं उच्चारण ॥ म्हणती केशव नारायण ॥ करितां शेवटीं विष्णुस्मरण ॥ कर्म संपूर्ण होय तेव्हां ॥६०॥
राम राम म्हणे आतां ॥ निरसेल तत्काळ तुझी व्यथा ॥ ऐसें सावकारासी तत्वतां ॥ कबीरशिष्य बोलिला ॥६१॥
अमित मिळाले विश्वजन ॥ पद्मनाभ म्हणे त्यांकारण ॥ त्रिवार करितां रामस्मरण ॥ भवरोग जाईल तत्काळ ॥६२॥
ऐकतां विष्णुभक्ताचें वचन ॥ सकळ करिती नामस्मरण ॥ त्रिवार करितां उच्चारण ॥ नवल अद्भुत वर्तलें ॥६३॥
होतां रामनामाचा गजर ॥ तत्काळ जाहलें दिव्य शरीर ॥ भक्तमहिमा बहु थोर ॥ न कळे साचार सुरवरां ॥६४॥
जे कौतुक पाहावया आले जन ॥ त्यांणीं उच्चारितां राम म्हणून ॥ त्यांचें संकटनिरसन ॥ तत्काळ जाहलें तेधवां ॥६५॥
शरीररोगी नाहीं एक ॥ ऐसे जहाले सकळ लोक ॥ नानापरींचीं दुःखें अनेक ॥ तत्काळ त्यांचीं निरसलीं ॥६६॥
कोनासी सीतज्वर होता ॥ कोणास क्षयरोग तत्वतां ॥ राम राम मुखीं म्हणतां ॥ आरोग्य जाहलें तेधवां ॥६७॥
कोणासी होतें कर्णमूळ ॥ कोणासी होती दाढसाकळ ॥ राम राम मुखीं म्हणतां सकळ ॥ आरोग्य जाहलें तेधवां ॥६८॥
कोणाचें आंगास होता नारू ॥ कोणासीं जाहलें होतें धांवरू ॥ त्यांहीं स्मरतां जानकीवरू ॥ शरीरीं आरोग्य जाहलें पैं ॥६९॥
कोनासी होतें पोटदुःख ॥ कोणासी गुडघी जाहली देख ॥ त्यांहीं स्मरतां रघुनायक ॥ शरीर दिव्य जाहलें कीं ॥७०॥
कोणासी नायटे खरूज जाण ॥ कोणासी कोड शुभ्रवर्ण ॥ त्यांहीं स्मरतां रघुनंदन ॥ संपूर्ण व्यथा पळाल्या ॥७१॥
कोणासी दिसत नव्हतें नयनीं ॥ कोणी बधिर होते कर्णीं ॥ त्यांणीं स्मरतांचि चापपाणी ॥ आरोग्य जाहलें तत्काळ ॥७२॥
खोकला पडसें रक्तपिती ॥ कोणासी मांडशूळव्याधि होती ॥ तिहीं स्मरतां अयोध्यापती ॥ आरोग्य जाहलें तत्काळ ॥७३॥
कोणासी भूतबाधा जाणा ॥ करणी चेटकप्रयोग नाना ॥ त्यांहीं स्मरतां रघुनंदना ॥ आरोग्य जाहलें तत्काळ ॥७४॥
असो आतां बहु भाषण ॥ अष्टोत्तरशत व्याधि दारुण ॥ होतां पद्मनाभाचें दर्शन ॥ उठाउठीं पळाल्या ॥७५॥
सावकार उठोनि सत्वर ॥ पद्मनाभासी घाली नमस्कार ॥ म्हणे धन्य तूं वैष्णववीर ॥ विश्वोधारक जन्मलासी ॥७६॥
वाराणसीचे सकळ जन ॥ पद्मनाभाचे वंदिती चरण ॥ अहोरात्र श्रीरामभजन ॥ करिते जाहले स्वानंदें ॥७७॥
जागृती स्वप्न सुषुप्तीसीं ॥ श्रीरामभजन अहर्निशीं ॥ श्रीरामरूप वाराणसी ॥ पद्मनाभें केली हो ॥७८॥
असो ऐसें वर्तमान ॥ कबीरासी सांगती अवघे जन ॥ म्हणती पद्मनाभ ब्राह्मण ॥ सांप्रदायी तूमचा ॥७९॥
त्रिवार राम म्हणवूनि मुखीं ॥ सकळ जनांसी केलें सुखी ॥ ऐसें कौतुक मृत्युलोकीं ॥ नाहीं कोणीं देखिलें ॥८०॥
मग पद्मनाभासी कबीर म्हणे ॥ त्रिवार कां करविलें रामस्मरण ॥ दोहोंचि अक्षरीं सकळ जन ॥ पूर्णकाम होती तत्काळ ॥८१॥
रामनामाचा महिमा थोर ॥ तुज कळला नाहीं साचार ॥ येचिविषयीं सविस्तर ॥ पूर्वकथन तुज सांगतों ॥८२॥
महापातकी वाल्हा कोळी ॥ नारदें उपदेशिला तत्काळीं ॥ जपतां रामनामावळी ॥ वाल्मीक ऋषि तो जाहला ॥८३॥
अवतरला नसतां रघुनंदन ॥ तों आधींचि कथिलें रामायण ॥ शतकोटि भविष्य पुरातन ॥ केलें लेखन निजबुद्धी ॥८४॥
कैलासपति पार्वतीरमण ॥ वांटिता जाहला रामायण ॥ स्वर्गमृत्युपाताळींचे जन ॥ आले विभाग घ्यावया ॥८५॥
मग शतकोटींची वांटणी ॥ शंकरें दिधली त्रिलोकांकरूनी ॥ तें कबीरं स्वमुखेंकरूनी ॥ पद्मनाभासी सांगितलें ॥८६॥
तेहतीस कोटी मृत्युलोकीं ॥ तितुकेंचि दिधलें वैकुंठलोकीं ॥ तितुकेंचि पाताळलोकीं ॥ देत धूर्जटी ते वेळे ॥८७॥
एक कोटी उरलें जाणा ॥ वांटिता जाहला कैलासराणा ॥ तेहतीस लक्ष स्वर्गभुवना ॥ तितुकेंचि मृत्युपाताळीं ॥८८॥
शतसहस्र उरलें होतें ॥ तें वांटूनि दिधलें कैलासनाथें ॥ जैसा पिता निजपुत्रांतें ॥ देत स्वहस्तें निजधन ॥८९॥
तेहतीस सहस्र पाताळीं ॥ देता जाहला चंद्रमौळी ॥ तितुकेंचि या भूमंडळीं ॥ स्वर्गी तितुकेंचि देतसे ॥९०॥
एक सहस्र उरलें बाकी ॥ तीन तीन शतें तिहीं लोकीं ॥ एक शत उरलें शेखीं ॥ तेंही वांटूनि दीधलें ॥९१॥
तेहतीस श्लोक भूमंडळीं ॥ तितुकेचि स्वर्गपाताळीं ॥ एक श्लोक तये वेळीं ॥ उरला असे वांटितां ॥९२॥
बत्तीस अक्षरें त्याचीं जाण ॥ तीस वांटिलीं त्रिभुवनाकारण ॥ उरलीं दोन तीं उमारमणें ॥ आपणाजवळ ठेविलीं ॥९३॥
कमठ अवतार धरिला हरीनें ॥ तेव्हां केलें समुद्रमंथन ॥ महाविष अतिदारुण ॥ निघतें जाहलें त्यांतूनि ॥९४॥
तें जाळीत चालिलें त्रिभुवन ॥ देवांसी संकट पडिलें जाण ॥ दोन अक्षरें उमारमण ॥ म्हणतां जाहला ते वेळीं ॥९५॥
राम म्हणतांचि तत्काळ ॥ सदाशिव जाहला शीतळ ॥ त्वां कासया तीन वेळ ॥ उच्चार करविला त्यांलागीं ॥९६॥
ऐसें बोलतां कबीर भक्त ॥ पद्मनाभ घाली दंडवत ॥ आणिक चरित्र रसाळ अद्भुत ॥ परिसा निजभक्त भाविक हो ॥९७॥
कांता पुत्र असोनि जाण ॥ कबीराचें उदास विरक्त मन ॥ जैसा वासरमणि घटीं बिंबोन ॥ न भिजेचि जाण सर्वथा ॥९८॥
नातरी जळीं पद्मपत्र असतां ॥ तें न भिजेचि जाण सर्वथा ॥ कीं विलासी मुख दर्पणीं पाहतां ॥ न गुंते तत्वतां त्यामाजी ॥९९॥
तैशा रीतीं भक्त कबीर ॥ प्रपंचीं न गुंते साचार ॥ उदास विरक्त सत्वधीर ॥ भजन साचार करीतसे ॥१००॥
तों कोणे एके दिवसीं जाण ॥ दहा सहस्र वैष्णव जन ॥ ऊर्ध्वत्रिपुंड्र तुलसीभूषण ॥ आनंदवना पातले ॥१॥
टोपी मुद्रा लावूनि अंगीं ॥ भजन करिती प्रेमरंगीं ॥ ऐसे वैष्णव बैरागी ॥ पातले वेगीं नगरांत ॥२॥
सीताराम स्मरून हांका ॥ पुसते जाहले गांवच्या लोकां ॥ या नगरांत वैष्णव निका ॥ श्रीरामसखा कोण आहे ॥३॥
सिधा देऊनि वैष्णवासी ॥ तृप्त करील सत्वराशी ॥ ऐसा दाता या स्थळासी ॥ सांगा आम्हांसी लवलाहें ॥४॥
ऐकोनि बैराग्याचें वचन ॥ काय बोलती गांवींचे जन ॥ या क्षेत्रामाजी जातीचा यवन ॥ कबीर सधन नांदतो ॥५॥
तो दहा सहस्र वैष्णवांसी ॥ तृप्त करील निश्चयेंसीं ॥ ऐसें कुटिळ बैराग्यांसी ॥ विनोदेंसीं बोलिले ॥६॥
घरीं असोनि धनधान्य ॥ जो क्षुधितांसी न घाली भोजन ॥ दाखवूनि दे दुजियाचें सदन ॥ दरिद्री जाण तो एक ॥७॥
सोपे माड्या बांधोनि पाहें ॥ जो पथिकासी नेदीच ठाये ॥ तयासी मंदिर म्हणों नये ॥ श्मशान होय तें एक ॥८॥
मुखीं असोनि कवित्वस्फूर्ती ॥ भगवद्गुण जे न वर्णिती ॥ पाखंडमतें भलतेंचि जल्पती ॥ लांव निश्चितीं ते वाचा ॥९॥
शरीरीं शक्ति असोन फार ॥ कधीं न घडेच परोपकार ॥ तो सर्वथा नव्हे नर ॥ ग्रामसूकर जाणावा ॥११०॥
असो बैरागी मागतां अन्न ॥ गांवचें लोक अति कृपण ॥ आपुल्यावरील झट टाळून ॥ दाविती सदन कबीराचें ॥११॥
मग सकळ साधु तीर्थवासी ॥ गेले कबीराच्या घरासी ॥ सीताराम द्वारापासीं ॥ साद घालिती ते वेळां ॥१२॥
कानीं ऐकतां हे मात ॥ बाहेर आला कमालतात ॥ सद्भावेंकरूनि प्रणिपात ॥ आलिंगन देत निजप्रीतीं ॥१३॥
साधु बोलती तयासी उत्तर ॥ दहा सहस्र वैष्णववीर ॥ तीर्थें करीत महीवर ॥ आलों सत्वर या ठाया ॥१४॥
क्षेत्रींचे लोक सांगती मात ॥ कीं अन्नदाता कमाल तात ॥ ऐकोनि साधूंचें मनोगत ॥ अवश्य म्हणत तेधवां ॥१५॥
बाजारीं तुळसीदास वाणी ॥ कबीर गेला त्याचें दुकानीं ॥ म्हणे पाहुणे संत आले सदनीं ॥ सामग्री काढूनि त्यांत देईं ॥१६॥
ऐसी ऐकोनियां मात ॥ वाणी बोले अति उन्मत्त ॥ म्हणे आपुली कांत एक रात ॥ देसील भोगार्थ मज जरी ॥१७॥
तरी दहा सहस्र वैष्णव जन ॥ सिधा देऊनि तृप्त करीन ॥ कबीरें अवश्य म्हणून ॥ भाकवचन दिधलें ॥१८॥
कामातुर तुळसीदास ॥ सामग्री देत वैष्णवांस ॥ मैदा तांदूळ डाळ सर्वांस ॥ शर्करा समवेत दिधली ॥१९॥
साधुसंत जाहले तृप्त ॥ कबीर चित्तीं हर्षयुक्त ॥ म्हणे सुदिन आजिचा दिसत ॥ वैष्णव भक्त भेटले ॥१२०॥
निशी होतांचि कांतेप्रती ॥ निजगुज सांगे एकांतीं ॥ तुजला विकूनि एकरातीं ॥ आलों निश्चितीं मी आजि ॥२१॥
तुळसीदास वाणी बाजारांत ॥ सावकार आहे उदार बहुत ॥ त्यानें सामग्री देऊनि त्वरित ॥ साधुसंत तृप्त केले ॥२२॥
त्याची इच्छा करावी पूर्ण ॥ कांहीं संकोच न धरावा मन ॥ ऐकोनि भ्रताराचें वचन ॥ अवश्य म्हणे पतिव्रता ॥२३॥
कांतेसी धरूनियां करीं ॥ गेला वाणीयाचें मंदिरीं ॥ तुळसीदास कामातुर अंतरीं ॥ वाट निर्धारीं पाहतसे ॥२४॥
तंव ते लावण्यसागरींची लहरी ॥ भ्रतारानें धरिली निजकरीं ॥ दृष्टीस देखोनि ते अवसरीं ॥ सावकार अंतरीं संतोषला ॥२६॥
कबीर कांतेसी बोले उत्तर ॥ आजची रात्र चारही प्रहर ॥ माम आज्ञेनें साचार ॥ भोगदान यासी देईं ॥२७॥
ऐसें सांगूनि कमालतात ॥ आपण घरासी गेला त्वरित ॥ श्रीरामभजन प्रेमयुक्त ॥ करीत बैसला निजप्रीतीं ॥२८॥
असो भ्रतार आज्ञेनें तत्त्वतां ॥ वाणियासी बोले कबीरकांता ॥ तुझा उपकार न ये सांगतां ॥ साधुसंतां तृप्त केलें ॥२९॥
विषयवासना धरिली बहुत ॥ तरी पुरवीं आपुले मनोरथ ॥ ऐसें बोलोनियां त्वरित ॥ भजन करीत सप्रेम ॥१३०॥
कामें व्यापिला तुळसीदास ॥ चित्तीं वाटला अति उल्हास ॥ म्हणे धन्य आजिचा दिवस ॥ आलिंगावयास पातला ॥३१॥
जैसा सतेज देखूनियां दीप ॥ पतंग त्यावरी घालीत झेंप ॥ तैसाचि वाणी तो पापरूप ॥ कामें अमूप वेष्टिला ॥३२॥
तंव कोतवालाचें रूप धरून ॥ तेथें आले श्रीरघुनंदन ॥ करीं असती धनुष्यबाण ॥ क्रोधें नयन आरक्त ॥३३॥
पृष्ठीसी ढाल हातीं बरशी ॥ काय बोले अयोध्यावासी ॥ हें कर्म खोटें कासया करिसी ॥ पापराशी दुर्जना ॥३४॥
चापासी शर लावून ॥ म्हणे येथेंचि तुझा घेतों प्राण ॥ वाणी थरथरां कांपून ॥ म्हणे अपराधी पूर्ण मी तुझा ॥३५॥
जितुकें मागसी संपत्तिधन ॥ तितुकें देईन तुजलागून ॥ परी तूं माझे वांचवीं प्राण ॥ म्हणोनि चरण धरियेले ॥३६॥
लज्जित होतां रतिनाथ ॥ धातु जिराली जेथींच्या तेथ ॥ पंचविषयांचा मथितार्थ ॥ विसरलें चित्त तेधवां ॥३७॥
दक्षिणवारा सुटतां सहज ॥ वितळोनि जाय मेघराज ॥ तेवीं एकांतीं येतांचि रघुराज ॥ काम सहज नाश पावे ॥३८॥
दिव्य देतां जळाले हात ॥ मग सहजचि वादी होय कुंठित ॥ कीं तस्कर धरितां मोटेसहित ॥ मग होय लज्जित बोलतां ॥३९॥
दृष्टीं देखतां अयोध्याधीशा ॥ तैसेंचि जाहलें तुळसीदासा ॥ म्हणे कोण उपाय करावा कैसा ॥ हे मज सहसा न सुचेचि ॥१४०॥
कोतवाल बोले वाणिया लावूनी ॥ कबीरकांता हे माझी भगिनी ॥ नमस्कार करी इजलागूनी ॥ सक्रोध होऊनि बोलत ॥४१॥
ऐसें बोलतां अयोध्यानाथ ॥ वाणी उठला भीतभीत ॥ नमस्कारूनि कबीर कांतेप्रत ॥ म्हणे अन्याय माते जाहला वो ॥४२॥
अपराध क्षमा करूनि मनीं ॥ आतां जावें तूं आपुलें सदनीं ॥ वाणियासी सांगे धनुष्यपाणी ॥ आजपासूनि सावध ॥४३॥
धनमदें भुलोनि जाण ॥ भलतेचि करिसी अवगुण ॥ आतां अनुताप मनीं धरून ॥ जाई शरण कबीरासी ॥४४॥
कमालमातेसी अयोध्यापती ॥ नेऊन घाली सदनाप्रती ॥ आपण जाहले अदृश्यगती ॥ लाघवी श्रीपति कृपाळू ॥४५॥
कबीर म्हणे कांतेलागून ॥ तूं कां आलीस त्वरेंकरून ॥ वाणियास दिधलें वचन ॥ सत्वासी हानी त्वां केली ॥४६॥
ऐकूनि पतिव्रता बोलत ॥ गांवचा कोतवाल आला तेथ ॥ तेणें शिक्षा करूनि वाणियाप्रत ॥ सदनीं मातें आणिलें ॥४७॥
ऐशी ऐकूनियां मात ॥ सक्रोध जाहला कबीरभक्त ॥ कोतवालाच्या घरीं त्वरित ॥ जाऊनि बोलत तयासी ॥४८॥
हांक मारितां वैष्णव वीर ॥ जागृत जाहला घरटीकार ॥ सत्वर येऊनियां बाहेर ॥ घाली नमस्कार साष्टांगें ॥४९॥
कबीर म्हणे तयालागून ॥ मी एक रात्र कांता वाणियास देऊन ॥ त्यापासीं सामग्री घेऊन ॥ संतसज्जन पूजिले ॥१५०॥
मी तुझे वडिलांचें लागतों काये ॥ तेथें कां गेलास लवलाहें ॥ वाणियासी शिक्षा केलीस पाहें ॥ उचित नव्हे हें तुजला ॥५१॥
भूमिदानासी अधिकारी राजा ॥ पित्यानें वरासी द्यावी आत्मजा ॥ भ्रतारावांचूनि स्वामी दुजा ॥ कांतेलागोनि असेना ॥५२॥
ऐसें असतां दुर्बुद्धी ॥ तूं कां गेलासी एकांतसंधीं ॥ माझें सत्व ढाळिलें तूं अपराधी ॥ जाणवलें बुद्धी माझिया ॥५३॥
कोतवाल तत्काळ धरी चरण ॥ म्हणे मज विदित नसे हें वर्तमान ॥ म्यां वाणी देखिला असेल जाण ॥ तरी जातील नयन तत्काळ ॥५४॥
तुम्ही संत वैष्णवभक्त ॥ मी बोलेन जरी असत्य मात ॥ तरी रौरवयातना निश्चित ॥ कल्पपर्यंत होतील ॥५५॥
कबीर विस्मित जाहला मनीं ॥ म्हणे हे श्रीरामाची करणी ॥ तो भक्तवत्सल चापपाणी ॥ निर्विघ्न रक्षित निजदासां ॥५६॥
तुळसीदासाचें तुळसीदासाचें गृहासी त्वरित ॥ सत्वर गेला कबीर भक्त ॥ म्हणे कोतवालाचें रूपें निश्चित ॥ तुज रघुनाथ भेटले ॥५७॥
नाना साधनें करितां सायासीं ॥ दृष्टीं न पडे अयोध्यावासी ॥ तो तुज भेटला अनायासीं ॥ पार भाग्यासी न देखों ॥५८॥
ऐकोनि कबीराचें वचन ॥ तुळसीदासें धरिले चरण ॥ म्हणे तुझे कांतेचें करितां छळण ॥ मज रघुनंदन भेटला ॥५९॥
आणीकां ठायीं करितों व्यभिचार ॥ तरी भोगणें लागते नरक घोर ॥ म्हणोनि कबीराचे चरणांवर ॥ पुनः नमस्कार घातला ॥१६०॥
पाठीं बांधोनि पाषाण ॥ समुद्र गेला उतरून ॥ कीं प्राण वांचले विष खाऊन ॥ मजकारणें तेवीं जहालें ॥६१॥
तुळसीदासास अनुताप जाहला ॥ श्रीरामभजनीं तो लागला ॥ कबीर परतोनि घरासी आला ॥ हृदयीं बिंबला रघुनाथ ॥६२॥
लावण्यस्त्री पतिव्रता जाण ॥ कबीरासी पदार्थ अनुकूल दोन ॥ आणि विषयीं उदास चित्तापासून ॥ श्रीरामभजन करीतसे ॥६३॥
अहो हें संतचरित्र रसाळवाणी ॥ कीं हें विवेकरत्नांचीच खाणी ॥ कीं अमृतकुंडलें रसास्वादनीं ॥ शोभती कर्णीं संतांचिया ॥६४॥
कीं संतचरित्र हे भीमरथी ॥ नानाचरित्र पुष्पावती ॥ अनुतापतीर्थीं महीपती ॥ स्नान करीत स्वानंदें ॥६५॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ चतुर्विंशाध्याय रसाळ हा ॥१६६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP