मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीभक्तविजय|
अध्याय ४२

अध्याय ४२

संतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥    
जय जय वासुदेवा जगन्नाथा ॥ कमललोचना रुक्मिणीकांता ॥ निजभक्तांसी सुखदाता ॥ तुजविण सर्वथा असेना ॥१॥
जय जय पद्मनाभा विश्वमूर्ति ॥ विधिजनका वैकुंठपति ॥ विराट्स्वरूपा वामनमूर्ति ॥ अगम्यस्थिति वेदशास्त्रां ॥२॥
जय विश्वबाहो अपरिमिता ॥ विश्वचक्षु तूं देखता ॥ विश्वपदीं गमनकर्ता ॥ निगम वार्ता बोलतसे ॥३॥
हे विराट्स्वरूपा हृषीकेशी ॥ सर्वथा न कळेच निजभक्तांसी ॥ सगुणस्वरूप धरूनि तयांसी ॥ आपुलें भजनासी लाविलें ॥४॥
ते जैसी इच्छा धरिती चित्तीं ॥ तैसाच होसी क्षीराब्धिजापती ॥ जैसें बाळकासी धरून हातीं ॥ चाले हंसगती निजमाता ॥५॥
तें बोबडें बोले मंजुळ वचन ॥ तेणेंच संतोषे तिचें मन ॥ मग तैसेंच आपणही बोलून ॥ देत चुंबन निजप्रीतीं ॥६॥
तेवीं भक्तांसी कांहीं न कळतां ज्ञान ॥ आणि वेडेंवांकुडें करितां स्तवन ॥ तूं तैसाचि होसी जगज्जीवन ॥ निजकृपेनें आपुल्या ॥७॥
मागिले अध्यायीं अनुसंधान ॥ मृत्युंयजचरित्र रसाळ गहन ॥ ऐकोनि श्रोते जाहलें तल्लीन ॥ अगाध महिमान संटांचें ॥८॥
आतां साक्षात अवतार वासरमणी ॥ जाहला असे प्रतिष्ठानीं ॥ तें चरित्र रसाळ श्रवणीं ॥ परिसावें सज्जनीं निजप्रेमें ॥९॥
सूर्यउपासक एक ब्राह्मण ॥ सज्ञान पवित्र भाविक जाण ॥ तयासि जाहलें पुत्रनिधान ॥ संतोष मनीं वाटला ॥१०॥
तो दिवसेंदिवस जाहला थोर ॥ मग व्रतबंध केला सत्वर ॥ मायबापें तयावर ॥ लोभ अपार करिताती ॥११॥
अध्ययन सांगतां त्याजकारण ॥ पिता जाहला क्रोधायमान ॥ मग तो त्या भयेंकरून ॥ गेला रुसोन पुत्र त्याचा ॥१२॥
बाहेर जाऊनि करी तळमळ ॥ परी कोठें लपावया न मिळे स्थळ ॥ तंव अकस्मात एक देऊळ ॥ देखिलें तत्काळ दृष्टीसी ॥१३॥
तें मेदिनींत गुप्त होतें जाण ॥ तेथें नाहीं मनुष्याचें आगमन ॥ मग सत्वर आंट प्रवेशोन ॥ बैसला लपोन त्या ठायीं ॥१४॥
सूर्यनारायणाची मूर्ती ॥ त्या देवालयांत पुरातन होती ॥ त्याचे चरणीं सत्वरगती ॥ दंडवत प्रीतीं घातलें ॥१५॥
मुलाचा भावार्थ देखोनी ॥ प्रसन्न जाहला वासरमणी ॥ म्हणे अज्ञान लेंकरू असोनी ॥ निश्चय मनीं धरिलासे ॥१६॥
मग मनुष्यरूप धरूनि सत्वर ॥ तयासी भेटले दिवाकर ॥ दुग्ध पाजोनि पोटभर ॥ अभयवर दिधला ॥१७॥
म्हणे निर्भय असों देईं मन ॥ श्रीपांडुरंगाचें करी स्मरण ॥ कांहीं संकट पडतां जाण ॥ तुज मी पावेन तत्काळ ॥१८॥
इकडे मायबापें उद्विग्न मानसीं ॥ धुंडिती निजपुत्रासी ॥ सप्त दिवस लोटतां त्यासी ॥ परी कोठें दृष्टीसी पडेना ॥१९॥
तंव एके दिवसीं ब्राह्मणकुमार ॥ अकस्मात आला बाहेर ॥ तेथें एक होता द्विजवर ॥ तेणें दृष्टीस देखिला ॥२०॥
हांक मारितांचि त्वरित ॥ तंव तो पळाला देउळांत ॥ ब्राह्मणें येऊनि नगरांत ॥ पित्यांसी वृत्तांत सांगितला ॥२१॥
पुत्राची शुद्धि लागतां देख ॥ मायबापांसी वाटला हरिख ॥ सवें घेऊनि ग्रामवासी लोक ॥ पाहावयासी चालिले ॥२२॥
तों ओसाड देऊळ अरण्यांत ॥ देखोनि नवल करिती समस्त ॥ दिवट्या लावूनियां त्वरित ॥ धीटपणें आंत उतरलें ॥२३॥
तंव नारायणाची मूर्ती नयनीं ॥ देखोनि तेथें सकळिकांनीं ब्राह्मणकुमर त्याचे चरणीं ॥ मस्तक ठेवूनि निजेला ॥२४॥
मायबापें येऊनि जवळी ॥ पुत्रासी धरिलें हृदयकमळीं ॥ म्हणती एकटा कैसा वांचलासी ये स्थळीं ॥ अश्रुपात डोळां लोटले ॥२५॥
लोक पुसती त्याकारण ॥ तुझे कैसे वांचले प्राण ॥ क्षुधा तृषा लागतां जाण ॥ न मिळेचि अन्न या ठायीं ॥२६॥
म्हणे परम तेजस्वी देदीप्यमान ॥ येथें एक प्रकटला ब्राह्मण ॥ तो मज करवितो दुग्धपान ॥ तेणें प्राण वांचविले ॥२७॥
ऐकूनि बालकाचें वचन ॥ आश्चर्य करिती सकळ जन ॥ म्हणती त्यासी भेटला सूर्यनारायण ॥ भावार्थ देखोन निजनिष्ठा ॥२८॥
भास्कर प्रसन्न झाला त्यास ॥ म्हणोनि नाम ठेविलें भानुदास ॥ मग कडेवरी घेऊनि तयास ॥ आले नगरास आपुल्या ॥२९॥
म्हणती ईश्वरें वांचविले याचे प्राण ॥ आतां न बोलावें कठिण वचन ॥ नारायणें आपुल्यासी पुत्रदान ॥ कृपा करून दीधलें ॥३०॥
जैसी प्राक्तनीं असेल गती ॥ तैसेंचि घडोनि येईल पुढती ॥ आपण याची हळहळ चित्तीं ॥ व्यर्थ कासया करावी ॥३१॥
समाधान मानोनि चित्तीं ॥ मायबापांनीं धरिली प्रीती ॥ विद्याभ्यास सांगावा पुढती ॥ तरी जाईल मागुती रुसोनि ॥३२॥
वधू सत्वर विचारूनि जाण ॥ भानुदासाचें केलें लग्न ॥ ऐसे लोटतां बहुत दिन ॥ करीत भजन श्रीहरीचें ॥३३॥
आयुष्य सरोनि गेलियावरी ॥ मायबापें निर्वतलीं ते अवसरीं ॥ परी भानुदास निर्भय अंतरीं ॥ प्रपंचव्यवहारीं गुंतेना ॥३४॥
न करी कवणाचें उपार्जन ॥ उदीम व्यवसाय घेणें देणें ॥ न करी कदा राजसेवन ॥ पांडुरंगभजन करीतसे ॥३५॥
घरीं पाहिजे वस्त्र अन्न ॥ कांतेचें हळहळीत मन ॥ मुलेंलेंकुरें सर्व असोन ॥ उदास मन सर्वदा ॥३६॥
गृहस्थ मिळोनि चवघे जण ॥ भानुदासासी बोलती वचन ॥ कुटुंबासी पाहिजे वस्त्र अन्न ॥ तुम्हांकारण कळेना ॥३७॥
माता पिता होतीं शिरीं ॥ त्यांनीं संसार केला आजिवरी ॥ पुढें कैसी होईल परी ॥ तुम्ही अंतरीं उदास ॥३८॥
विद्याभ्यासही फार ॥ तुम्हांसी नाहीं जी साचार ॥ आतां कांहीं सांगतों विचार ॥ तो परिसा सादर निजकर्णी ॥३९॥
एकशत द्रव्य भांडवल जाण ॥ आम्हीं देतसों तुम्हांकारण ॥ त्याचें कापड घेऊन ॥ चाटेपण करावें ॥४०॥
नफा मिळेल तेणेंकरून ॥ कुटुंबासी करावें वस्त्र अन्न ॥ आमुचें मुद्दल जतन करून ॥ हळूचि देणें स्वइच्छा ॥४१॥
मग गृहस्थ जाऊनि बाजारासी ॥ कापड घेऊनि दिधलें तयासी ॥ इतर उदीम होते त्यांसी ॥ भानुदासासी निरविलें ॥४२॥
म्हणती तुम्ही जातसां बाजारीं ॥ तेव्हां न्यावें यासी बरोबरी ॥ बैसवूनि आपुलें शेजारीं ॥ प्रपंचव्यवहारीं लावावें ॥४३॥
गृहस्थांचें वचन ऐकोनि कानीं ॥ मान्य केलें व्यवसायांनीं ॥ मग भानुदासासी सवें घेऊनी ॥ आपुले सन्निध बैसविती ॥४४॥
मुळु उदानु अंगोळू ऐसी ॥ नंदभाषा सांगितली त्यासी ॥ केवला काठी पवित्र त्यासी ॥ सांगोनियां दीधलें ॥४५॥
सेलू पोकू आणि ढकार ॥ आवारू खूण सांगती सत्वर ॥ कोणतें कैसें द्यावें अंबर ॥ हाही विचार सांगितला ॥४६॥
मुद्दल जतन करूनि जाण ॥ लाभ सांगावा विचारून ॥ कोणासी बोलतां सत्य वचन ॥ तरी होतसे हान निश्चितीं ॥४७॥
भानुदास बोले तयांप्रती ॥ मी असत्य न वदें कल्पांतीं ॥ कांहीं न मिळो मजप्रती ॥ परी सत्य निश्चितीं बोलेन ॥४८॥
व्यवसायी हांसती सकळिक ॥ म्हणती याचें कपाळीं लिहिली भीक ॥ म्हणोनि आमुचें नायके एक ॥ दरिद्री देख या नांव ॥४९॥
एक म्हणती लागलिया लांचे ॥ मग असत्य उदंड बोलेल वाचे ॥ प्रपंचव्यवहारीं बोलतां साचें ॥ कोणी दैवाचें दिसेना ॥५०॥
जेवीं गर्भांधाचे दृष्टीस जाण ॥ अवघे आंधळे वाटती जन ॥ कीं रोग असतां शरीराकारण ॥ कडुवट पक्वान्न त्या भासे ॥५१॥
तेवीं आपुलें अंतरीं असत्य नर ॥ तयासी न दिसे कोणी खरें ॥ जैसें जयाचें असेल अंतर ॥ तैसेच इतर भासती ॥५२॥
भानुदासाचें धैर्य मोठें ॥ प्रपंचव्यवहारीं न बोले खोटें ॥ सकळ लोकांसीं नवल वाटे ॥ देखोनि निकटें तयासी ॥५३॥
कोणी गिराईक पुसे अंबर ॥ त्यासी किंमत सांगे खरोखर ॥ इतका नफा मुदलावर ॥ एकदा उत्तर बोलतसे ॥५४॥
चित्तास येईल तरी धेणं ॥ नाहीं तरी दुसरे दुकानीं जाणं ॥ इतुकें मात्र बोलोनि वचन ॥ मग नामस्मरण करीतसे ॥५५॥
जनीं जनार्दन भरला जाण ॥ निश्चय कळला सकळांकारण ॥ म्हणती भानुदास असत्य वचन ॥ न बोलेचि कल्पांतीं ॥५६॥
ऐसें जाणोनि ग्राहिक ॥ त्यापासीं जाती सकळिक ॥ इतर व्यवसायी अकर्मिक ॥ दुरून कौतुक पाहाती ॥५७॥
म्हणती आपुल्या सवें लाविलें यासी ॥ तें बाधक जाहलें आपुल्यासी ॥ मग द्वेष उपजला मानसीं ॥ दुराचारियांसी तेधवां ॥५८॥
म्हणती आम्हांशेजारीं बैसतो ॥ आणि ग्राहिक आपणाकडे नेतो ॥ आम्ही तोंडाकडे टकमकां पाहतों ॥ पोटीं जळतो उगेचि ॥५९॥
एक म्हणती घालितो मोहनी ॥ तेणेंचि जन जाती भुलोनी ॥ मागितलें मोल देती टाकोनी ॥ घसघस कोणी करीना ॥६०॥
एक म्हणती बैसला विश्वास ॥ तेणेंचि जन भजती त्यास ॥ आपण असत्य प्रपंचदास ॥ हें ईश्वरास मानेना ॥६१॥
एक म्हणती आतां बोलावें खरें ॥ दुजा देतसे प्रतिउत्तर ॥ आपुला विश्वास कोणी इतर ॥ यथार्थ साचार न मानिती ॥६२॥
एकदां वृत्ति ठसावे जैसी ॥ तेचि जन्मवर चाले तैसी ॥ प्रत्यक्ष आपुल्या दृष्टीसी ॥ भानुदासासी घडली कीं ॥६३॥
श्वान उगेंच बैसलें घरीं ॥ आणि मनुष्यें चोरून नेल्या भाकरी ॥ तरी आळ येईल श्वानावरी ॥ कोणासी अंतरीं कळेना ॥६४॥
व्याघ्रें धरितां निजशांतीसी ॥ म्हणतील जपतो मारावयासी ॥ धनलोभी होतांचि उदासी ॥ म्हणती नाडावयासी निघाला ॥६५॥
कीं जार तीर्थीं हिंडतां खरा ॥ म्हणती हा धुंडितो परदारा ॥ शांति धरूनि बैसतां मार्जारा ॥ म्हणती उंदिरा पाहतसे ॥६६॥
तेवीं आपुला जन्म असत्य बोलतां ॥ गेला असे सकळांदेखतां ॥ आतां यथार्थ जरी वर्ततां ॥ म्हणतील वृथा कपट हें ॥६७॥
आपुल्यादेखतां भानुदासाचा ॥ व्यवहार किंचित कापडाचा ॥ आतां तो थोर भाग्याचा ॥ ईश्वर तयाचा साह्यकारी ॥६८॥
आपण उदंड करितां भरोवरी ॥ परी पोटभर न मिळे भाकरी ॥ ऋणकरी येऊनि बैसती द्वारीं ॥ आतां परी कैसी करावी ॥६९॥
भानुदासासी संगतीसी लाविलें ॥ तैंपासोनि आपुलें निघालें दिवाळें ॥ ग्राहिक त्यानें सकळ नेलें ॥ आम्ही तळमळ करीतसों ॥७०॥
एके दिवसीं सकल व्यवसायी ॥ बाजारासी गेले पाहीं ॥ वाट ओसरतां लवलाहीं ॥ देउळीं येऊनि राहिले ॥७१॥
त्यांसवें भानुदास वैष्णवभक्त ॥ आला होता बाजारांत ॥ त्याजशेजारीं बिर्‍हाड त्वरित ॥ त्यानें आणोनि लाविलें ॥७२॥
तंव त्या गांवांत हरिदास येऊन ॥ त्यानें रात्रीं मांडिलें कीर्तन ॥ गांवांत फिरतसे बोलावणें ॥ कथेसी येणें म्हणोनि ॥७३॥
भानुसास ऐकोनि मात ऐसी ॥ उल्हास वाटला चित्तासी ॥ म्हणे आजि सुदिन एकादशी ॥ जावें कीर्तन ऐकावया ॥७४॥
व्यवसायिकांसी म्हणे ते अवसरीं ॥ आतां कीर्तनासी चलावें सत्वरीं ॥ आळस आणूनि न याल जरी ॥ निजाल बिर्‍हाडीं सकळिक ॥७५॥
तरी माझें दुकान रक्षून ॥ तुम्ही आपुल्यापासीं करा जतन ॥ ऐकोनि न याल जरी ॥ निजाल बिर्‍हाडीं सकळिक ॥७६॥
म्हणती तूं जाहलासी देवलसी ॥ अखंड सत्य वचन बोलसी ॥ आतां जावें हरिकथेसी ॥ आपुलें बिर्‍हाडासी घेऊनी ॥७७॥
आम्हां सकळांसी आला टणक ॥ आतां निद्रा करितों देख ॥ तरी बिर्‍हाड पाहूनि आणिक ॥ दुकान तेथें ठेवीं कां ॥७८॥
येथें तस्कर पडलिया पाहीं ॥ तरी आमुचें अंगीं शब्द नाहीं ॥ कीर्तनांत पडतें पदरीं कायी ॥ तें आम्हांसी कांहीं कळेना ॥७९॥
भानुदास उत्तर देत पाहाहो ॥ बिर्‍हाड जावो अथवा राहो ॥ परी पांडुरंगीं जडला भावो ॥ तो मी सर्वथा न सोडीं ॥८०॥
ऐसें बोलोनि वैष्णवभक्त ॥ बिर्‍हाड टाकोनि गेला त्वरित ॥ कीर्तनीं बैसले साधुसंत ॥ तेथें त्वरित पातला ॥८१॥
अति उल्हास धरूनि मानसीं ॥ नमस्कार केला हरिदासांसी ॥ म्हणे धन्य पर्वकाळ एकादशी ॥ क्षेम संतांसी दीधलें ॥८२॥
रामकृष्णचरित्र तारक जनीं ॥ वैष्णव गाती प्रेमेंकरूनी ॥ तों भानुदास आवडीकरूनी ॥ ऐकती श्रवणीं निजप्रेमें ॥८३॥
इकडे व्यवसायीं दुर्मती ॥ बिर्‍हाडीं बैसोनि विचार करिती ॥ कीं भानुदास गेला कीर्तनाप्रती ॥ बिर्‍हाड निश्चितीं टाकूनि ॥८४॥
तरी आतां करूनियां युक्त ॥ अश्व सोडोनि द्यावा त्वरित ॥ दिंड टाकावें गारींत ॥ तयासी मात न कळतां ॥८५॥
तो आपणासी पुसेल जर ॥ तरी त्यासी सांगावें आले तस्कर ॥ आम्हांसी निद्रा लागली फार ॥ तों गेले सत्वर न कळतां ॥८६॥
मग तो घरासी जाईल परतोन ॥ आपण कापड घेऊं वांटोन ॥ ऐसा विचार करूनि दुर्जन ॥ अश्व सोडून दीधला ॥८७॥
गर्ता पडली होती थोर ॥ त्यामाजी दिंड टाकिलें सत्वर ॥ टाळीया पिटोनि येरयेर ॥ देती उत्तर एकमेकां ॥८८॥
भानुदस लागला आमुचे संगती ॥ तैंपासोनि त्यासी आली संपत्ती ॥ दरिद्र आलें आम्हांप्रती ॥ ग्राहिक जाती त्याकडे ॥८९॥
ते ते सर्व चिंता आजि निरसली ॥ औषधावांचोनि खरूज गेली ॥ ऐसी एकमेकांसी बोली ॥ दुर्जनीं मांडिली तेधवां ॥९०॥
धर्माची हिरून घेतां संपत्ती ॥ जैसा दुर्योधन उल्हासला चित्तीं ॥ तैसे ते व्यवसायी दुर्मती ॥ संतोष मानिती निजमनीं ॥९१॥
ऐसा अपाय देखोनि त्वरित ॥ सत्वर पावले रुक्मिणीकांत ॥ म्हणे भानुदास बैसला कीर्तनांत ॥ निश्चळ चित्त करूनि ॥९२॥
दुर्मती मिळोनि अवघे जण ॥ गर्तेमाजी टाकिलें दुकान ॥ आतां विचार करावा कवण ॥ जगज्जीवन म्हणतसे ॥९३॥
अश्व जाईल एखादीकडे ॥ मग तो पाहील कोणीकडे ॥ त्याणें प्रपंचाची टाकूनि चाड ॥ लाविलें वेड मद्भजनीं ॥९४॥
ऐसें म्हणोनि पंढरीनाथ ॥ विप्रवेष धरिला त्वरित ॥ अश्व पाहूनि बाजारांत ॥ धरूनि बैसत तेधवां ॥९५॥
जो क्षीरसागरीं शेषशयन ॥ ज्याचे लक्ष्मी ध्यातसे चरण ॥ तो भक्तकैवारी मनमोहन ॥ अश्व धरून बैसला ॥९६॥
योगी बैसले समाधीसी ॥ त्यांच्या लवकरी न ये ध्यानासी ॥ तो भक्तकैवारी हृषीकेशी ॥ धरूनि अश्वासी बैसला ॥९७॥
व्रतें तीर्थें तपें योग ॥ करितां नातुडे श्रीरंग ॥ तो पुंडलीकवरद पांडुरंग ॥ अश्व धरून बैसला ॥९८॥
जो विरींचीचा निजजनिता ॥ अनंत ब्रह्मांडांचा कर्ता ॥ तो भानुदासाचा अश्व जातां ॥ धरूनि चोहटा बैसला ॥९९॥
व्यवसायी बैसले देउळांत ॥ ते भानुदासाची निंदा करीत ॥ म्हणती आतां येईल अकस्मात ॥ दुकान त्वरित पाहावया ॥१००॥
येथील वृत्तांत कळतां सकळ ॥ मग करीत बैसेल तळमळ ॥ ऐसें परस्परें बोलती खळ ॥ ऐकोनि घननीळ कोपला ॥१॥
अवकृपा करितां जगज्जीवन ॥ तों अकस्मात तस्कर आले जाण ॥ व्यवसायांचें दुकान लुटून ॥ केलें ताडन सकळांसी ॥२॥
सकळ घोडीं सोडोनि नेलीं ॥ मग रडात बैसले तये वेळीं ॥ म्हणती भानुदासाची छळणा केली ॥ ते प्रचीत दाविली पांडुरंगे ॥३॥
एक म्हणती ये संधी ॥ कर्मासारिखी होतसे बुद्धी ॥ आपण ज्ञानहीन त्रिशुद्धी ॥ विचार आधीं न केला ॥४॥
एक म्हणती प्राक्तन खोटें ॥ म्हणोनि कर्म घडलें ओखटें ॥ भानुदास भक्त एकनिष्ठ ॥ केली कटकट व्यर्थ तयासी ॥५॥
दीर्घस्वरें रडाती जाण ॥ कोणी नगरांतूनि नये धांवून ॥ तो मायालाघवी रुक्मिणीरमण ॥ घातलें मोहन सकळांसी ॥६॥
इकडे कीर्तनीं होय अनंदगजर ॥ मृदंग विणे वाजती सुस्वर ॥ तेणें नादें कोंदलें अंबर ॥ होत गजर नामाचा ॥७॥
चार घटिका यामिनी उरली होती ॥ तेव्हां वैष्णवीं केली आरती ॥ भावें ओंवाळूनि रुक्मिणीपती ॥ खिरापती वांटिल्या ॥८॥
नमस्कारूनि हरिदासासी ॥ भानुदास चालिले बिर्‍हाडासी ॥ तंव एक ब्राह्मण अश्वापासीं ॥ धरूनि वाटेसी बैसला ॥९॥
सन्निध चालोनि जातांचि पाहीं ॥ अश्व हिंसला ते समयीं ॥ म्हणे आपुला अश्व ये ठायीं ॥ कैसा आला कळेना ॥११०॥
तंव त्याचे गळ्यांत आंगवस्त्र घालून ॥ धरुनि बैसला एक ब्राह्मण ॥ तो भानुदासासी देखतांचि जाण ॥ अदृश्य झाला ते ठायीं ॥११॥
ऐसें कौतुक देखोनि सत्वरीं ॥ विस्मित झाला निजअंतरीं  ॥ मग अश्व धरूनि निजकरीं ॥ भानुदास बिर्‍हाडीं पातले ॥१२॥
तों व्यवसायी आपुले सांगती ॥ दीर्घस्वरें रुदन करिती ॥ वृत्तांत पुसतां तयांप्रती ॥मग ते सांगती सकळिक ॥१३॥
आम्ही दुर्बुद्धि भाग्यहीन ॥ करूं पातलों तुझें छळण ॥ गर्तेमाजी दिंड टाकून ॥ अश्व सोडून दीधला ॥१४॥
मग दोन प्रहर भरतां निशी ॥ तस्करें लुटिलें आम्हांसी ॥ प्राक्तनाची गति ऐसी ॥ कोणापासीं सांगावें ॥१५॥
घोडीं दिंडें गेलीं समस्त ॥ आणि मारही बैसला अपरिमित ॥ पुढें संसाराची मात ॥ खुंटली निश्चित दिसताहे ॥१६॥
आमुचे भांडवल बुडोनि गेलें ॥ तुझें ईश्वरें वांचविलें ॥ पैल गर्तेमाजी टाकिलें ॥ तें सांभाळिलें पाहिजे ॥१७॥
ऐसें वचन ऐकूनि सत्वर ॥ भानुदासाचें द्रवलें अंतर ॥ म्हणे अश्व धरूनि रुक्मिणीवर ॥ बैसले असतील वाटतें ॥१८॥
मग म्हणे रे कटकटा ॥ प्रपंचव्यवहार करितों खोटा ॥ तेथें आत्मसुखाचा नाहीं सांठा ॥ व्यर्थ करंटा भुललों मी ॥१९॥
सांवळा सुकुमार राजीवनयन ॥ पीतांबरधारी जगज्जीवन ॥ तो मजसाठीं विप्रवेष घेऊन ॥ अश्व धरून बैसला ॥१२०॥
जेणें शीण आला पंढरीनाथा ॥ तें कर्म आतां न करावें सर्वथा ॥ ऐसा अनुताप धरूनि चित्ता ॥ जाहला बोलता तयांसी ॥२१॥
व्यवसायांसी म्हणे भानुदास ॥ आतां स्वस्थ करावें मानस ॥ तस्करीं दंडिलें तुम्हांस ॥ तरी खेद चित्तास न करावा ॥२२॥
गर्तेंतूनि दिंड काढोनी ॥ वस्त्रें दिधलीं तयांसी वांटोनी ॥ अश्व द्रव्य त्यांसी अर्पूनी ॥ भानुदास तेथोनि निघाले ॥२३॥
निजमंदिरासी जाऊन ॥ करीत बैसला हरिभजन ॥ टाकोनियां मानाभिमान ॥ कीर्तनीं गुण गातसे ॥२४॥
न करी कोणाचें उपार्जन ॥ प्रपंचचिंतेंत न घाली मन ॥ कुटुंब कलत्र असोन ॥ उदासपणें वर्ततसे ॥२५॥
आषाढी कार्तिकी येतां बरी ॥ चालवी पंढरीची वारी ॥ टाळमृदंगघोषगजरीं ॥ कीर्तन करी वाळवंटीं ॥२६॥
नानापरींची कवित्वकळा ॥ रचूनि आळवी घनसांवळा ॥ हृदयीं प्रेमाचा जिव्हाळा ॥ कीर्तनीं गळां सद्गदित ॥२७॥
भानुदास कीर्तनीं उभे राहती ॥ तेव्हां स्वानंदजळें नेत्र भरती ॥ ते आवडी देखोनि रुक्मिणीपती ॥ नृत्य करिती त्या ठायीं ॥२८॥
दुर्बुद्धि अथवा अज्ञान खळ ॥ तेही ऐकूनि होती प्रेमळ ॥ म्हणती तया मुखींचें कीर्तन प्रांजळ ॥ सर्व काळ ऐकावें ॥२९॥
कैंची लटकी प्रपंचमाया ॥ कैंची नाशवंत काया ॥ ऐसें ज्ञान होऊनि श्रोतयां ॥ धरिती दया सर्वांभूतीं ॥१३०॥
अयाचित वृत्तीकरून ॥ कोणी देईल वस्त्र अन्न ॥ परी स्वमुखेंकरूनि जाण ॥ नाहीं मागणें कोणासी ॥३१॥
आपुलें आणी परावें ॥ हे कल्पनाचि नाहीं स्वभाव ॥ सर्वांभूतीं ऐक्यभाव ॥ विकल्पभाव टाकिला ॥३२॥
यापरी भानुदासाचें चित्त ॥ सदा सर्वकाळ वैराग्यभरित ॥ प्रेमउल्हासें दिवसरात ॥ भजन करीत श्रीहरीचें ॥३३॥
पुढीले अध्यायीं जगदुद्धारा ॥ राजा नेईल विद्यानगरा ॥ ते सुरस कथा ऐकतां चतुरा ॥ उल्हास अंतरा वाटेल ॥३४॥
संतसज्जन दैवतमेळीं ॥ महाराष्ट्र ओंव्या फुलें मोकळीं ॥ महीपति घेऊनि पुष्पांजळी ॥ उभा जवळी तिष्ठत ॥३५॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ द्विचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥३६॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP