केशवचैतन्यकथातरु - अध्याय चवथा

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


श्रीगणेशायनम: ॥ श्रीकेशवचैतन्य आपण । तैलंग देशातें सोडून । त्रिंबकेश्वरासी आगमन । करिते जाले एकाकी ॥१॥
करुनि कुक्शावर्तस्नाना । घेऊनि त्रिबकेश्वरदर्शना । केली ब्रह्मगिरीप्रदक्षणा । एका दिवसामाझारीं. ॥२॥
मग पावले उत्तमनगरी । मांडवी पुष्पावतीचे तिरीं । येऊनि राहिलें सत्वरीं । गुरुआज्ञेप्रमाणें. ॥३॥
श्रीगुरूचे पूर्वस्थळीं । वसते जाले तये वेळीं । ध्यानस्थ बैसे चंद्रमौळी । तैसें तपें आचरिलें. ॥४॥
स्वरूप सुंदर गौरवर्ण । भाळ विशाळ आकर्ण नयन । सरळ नासिक लंबायमान । चुबुक लहान शोभतसे. ॥५॥
कंबुकंठाचियेपरि । उच्च ग्रीवा अति साजिरी । रत्नकंकणेंचि ठेविलीं हारी । तैसी शोभे दंतपंक्ती. ॥६॥
ओष्ठ साजिरे प्रवाळवर्ण । उंच कपोल हास्यवदन । पाहुनि लज्जा पावे मदन । तैसें मुख नेटकें. ॥७॥
आजानुबाहू अंगुळ्या सरळ । नखें चंद्रप्रकाश सोज्वळ । दोर्दंड अंशु विशाळ । वृषस्कंधचिये परि. ॥८॥
विशाळ शोभे वक्षस्थळ । उदरीं त्रिवळी दिसे प्रांजळ । रोमलता करी झळाळ । नाभी सखोल साजिरी. ॥९॥
जानुजंघा कर्दळीस्तंभ । आरक्त तळवे नखें सुप्रभ । पदपृष्ठीं कूर्मसंनिभ । गूढ गुल्फ नेटके ॥१०॥
मस्तकीं जटा पीतवर्ण । तेजस्वी दिसते जैसें सुवर्ण । सर्वांगीं केलें भस्मोद्धारण । दिगंबर मूर्ति गोजिरी. ॥११॥
भूतळीं घालुनि सिद्धासन । करावें वायूचें प्राशन । फळ मूळ कंद अथवा अन्न । न भक्षावें सर्वथा. ॥१२॥
नासिकाग्रीं दृष्टि ठेवून । हृदयीं वृत्ती करावी लीन । स्थावरजंगमात्मक जन । ब्रम्हमय जयातें. ॥१३॥
ऐसें श्रीकेशवचैतन्य । यांनीं सेविलें घोर अरण्य । ही वार्ता बहुकाळ जघन्य । जाली नाहीं सर्वथा. ॥१४॥
तया वनाची विचित्र शोभा । चिंचिणी वटवृक्ष लागले नभा । अश्वत्थ चूत कदंबां । गणती नाहीं तये स्थळीं. ॥१५॥
कुच जलकुच पाटल । फणस पुन्नाग आणि बकुळ । अशोक औदुंबर तमाल । चंदन लवंग डोलती. ॥१६॥
निष्कंटक बिल्वजाती । नागचापें बहु असती । कुरुबक मरुबकांवरी मालती । गुच्छ डोलती पुष्पांचे. ॥१७॥
मंजुळ प्रियाळ तिलक । साम्वा हिंताल अमलक । माकंद कुंद तिलक । भुइचांपे फुलले. ॥१८॥  
सोनचांपे केतकीवन । ताडवृक्ष चुंबीत गगन । बदरी कपित्थ आपले आपण फळभारें लवताती. ॥१९॥
रामफळ निंब आणि माड । गुलतुर दाडिंब निरगुंढ हिंगु मधुमालती निबिड । पुष्पगुच्छ डोलती. ॥२०॥
मोगरा तुळशी वैजयंती । देवदार कर्दळी मालती । गुंजा जासुंदी कुंजाकृती । होऊनि ठेल्या ठायीं ठायीं. ॥२१॥
अर्जुनवृक्ष चालले सरळ । वेणु चुंबिती अंतराळ । हिरडे गोंधणी सिताफळ । वनकेळी डोलती. ॥२२॥
जुईचे कुंज ठायीं ठायीं । कृष्नागर मांदार पिंवळी जाई । अंजीरवृक्षां गणती नाहीं । फळें पडती भूतळीं. ॥२३॥
ऐसें अनेक वृक्षांचें वन । दिसतसे शोभायमान । माजी विहरती श्वापदगण । व्याघ्र सांबरें वानरगण । मर्कटें पीतनीळवर्ण । रोही अस्वलें असती. ॥२५॥
ठायीं ठायीं कोकिळ कूजती । मयूरें टाहो फोडूनि नाचती । रावे चिमण्या अनेक जाती । पारवे घुमती आनंदें. ॥२६॥
तास होले गवळण । गरुडपक्षी करिती उड्डाण । बाजससाणे पाहुन । बुलबुल्या चिमण्या पळताती. ॥२७॥
खालीं वरी उडती चंडोल । साळुंक्या करिती गलबल । बदक बगळे पाहूनि जळ । वसते जाले ते ठायीं. ॥२८॥
भ्रमर करिती गुंजारव । तितिर पक्षी घेती धांव । काकपक्ष्यांनीं सोडिला गांव । फळें पुष्कळ पाहुनी. ॥२९॥
भोंवतीं पर्वतांचीं शिखरें । माजीं गुहा दर्‍या गव्हारें । ठायीं ठायीं उदकांचे झरे । अखंडीत वाहती ॥३०॥
मांडवीपष्पावतीचें पुलीन । अति रम्य शोभायमान । कुश काश असती व्यापून । उभय तटीं जियेच्या. ॥३१॥
भिल्ली आणि पुरंध्री । फिरत असतां वनसंचारी । त्यांनीं शुकयोगींद्राचे परी । चैतन्यमूर्ति पाहिली. ॥३२॥
ते उत्तमनगरीप्रति येऊन । तेथील शिष्ट ब्राह्मणांलागून । कळविते जाले वर्तमान । योगींद्र कोणी आला आहे. ॥३३॥
ऐसें सर्वांनीं ऐकिलों । शिष्ट ब्राम्हण दर्शनासी आले । साष्टांग प्रणिपात घातले । आणि वृत्तांत सांगती. ॥३४॥
‘ तुमचे पूर्वाश्रमीचा पुत्र । नरसिंहभट नामें सुपात्र । लक्ष्मी नामें तयाचें कलत्र । अंतर्वत्नी जालिया. ॥३५॥
यानंतर पावले निधान । पोटीं जन्मलें पुत्ररत्न । स्वरूप नेटकें सुलक्षण । अष्टमदिन आजिचा. ’ ॥३६॥
तेथें वृद्ध वृद्ध ब्राह्मण । म्हणती, ‘ अजिचा सुदिन । जालें श्रीचरणदर्शन । आम्हांलागीं ये स्थळीं. ॥३७॥
अतिप्रियकर जें श्रीरंगा । दर्शनें दुरितें नेत भंगा । आळशावरी लोटली गंगा । तैसें आह्मां जाहलें. ॥३८॥
उत्तमनगरीचे संपूर्ण जन । घेती स्वामीचें दर्शन । ब्राह्मण करिती वेदपठण । कोणी गायन करिताती. ॥३९॥
ऐसा नित्य समारंभ । व्हावयासी जाला प्रारंभ । मार्गीं उभारुनि ध्वजस्तंभ । कीर्तनें होती ठायीं ठायीं. ॥४०॥
गांवोगांवचे यात्रेकरी येती । किती एक नवसालागीं करिती । संपूर्णाचें मनोरथ पुरती । चैतन्यप्रसादेंकरूनि. ॥४१॥
प्राप्त होतां तेरावा दिन । लक्ष्मीबाई । पुत्र घेऊन । घ्यावयालागीं चरणदर्शन । स्वामीसन्निध पातली. ॥४२॥
श्रीचरणीं बाळ ठेवून । उंच स्वरें करी रुदन । ह्मणे, ‘या मुलाचें पालणपोषण । कोण करील स्वामिराया ! ॥४३॥
याचिया जन्मास तेरावा दिन, । नाहीं केलें नामकरण । दैवें करूनि आगमन । जालें स्वामीचरणापाशीं. ’ ॥४४॥
मग स्वामी ह्मणती, ‘ स्वस्थ असावें । याचें संगोपन अघवें । मी करीन हें जाणावें निश्चयेंसीं सांगतो. ॥४५॥
माझिया आश्रमींचें नाम । यासीं ठेवावें न करूनि संभ्रम । हा विव्दान् होऊनि नि:सीम । सेवा करील आमुची. ॥४६॥
आतां शोकालागीं सांडावें । तुवां निजगृहाप्रति जावें । आजि मुहूर्त आहे बरें । नाम ठेवावयासी, ’ ॥४७॥
मग स्वामीसी करून नमस्कार । पायांवरी घातला कुमार । निज गृहाप्रति आली सत्वर । लक्ष्मीबाई ते काळीं. ॥४८॥
सुवासिनी ब्राह्मण मिळविले । विधियुक्त नामकरण केलें । केशवभट नाम ठेविलें । तया मुलाचें सर्वांनीं. ॥४९॥
ग्रामांतील द्रव्यसंपन्न । त्यांनीं पाठवूनि धन धान्य । केलें तयाचें संगोपन । स्वामीआज्ञेप्रमाणें. ॥५०॥
आतां मुकुंदभट जोशी । उत्तमनगरींचा रहिवासी । ग्रामांत मागुनी भिक्षेसी । उदरनिर्वाह करितसे. ॥५१॥
तेणें नित्य नेमें करून । घेत असावें स्वामीदर्शन । सांगावें आपलें वर्तमान । गृहकृत्यांचें सर्वदां. ॥५२॥
पाहुनि ते त्याच्या सद्भावा । स्वामींनीं लोभ करीत असावा । तेणें संतोष फार जिवा । मुकुंदभटजीचे संतोष फार जिवा । मुकुंदभटजीचे होतसे ॥५३॥
रेणुकाबाई नामें तयाची भार्या । दुर्भाषणी कलहप्रिया । सर्वदा उच्च भोंवया । कपाळीं आंठीं घालितसे. ॥५४॥
क्रोधयुक्त जैसी सर्पिणी । भांडत असावें दिवस रजनी । संतप्त होऊनि आपुल्या मनीं । भर्त्यास गांजीत असावें. ॥५५॥
तियेचे गृहीं न येती कोणी । आप्त सोहिरे जांचे वैरिणी । सदा निर्भय निर्लज्जपणीं । उदासवृत्ती असे पैं. ॥५६॥
जोशी उठोनि प्रात:काळीं । गेला चैतन्यस्वामीजवळीं । प्रार्थितसे वेळोवेळीं । भिक्षेसी यावें ह्मणउनी. ॥५७॥
स्वामी ह्मणती, ‘ मुकुंदभटा ! । अन्न न सोसे माझिया पोटा । तुझी स्त्री आहे कटकटा । गृहासि न ये तुझ्या मी. ’ ॥५८॥
जोशी हस्त जोडोनि प्रार्थित । वारंवार आग्रह करित । ‘ स्वामी ! पुरवावे मनोरथ । मज अनाथ दुर्बळाचे. ’ ॥५९॥
ऐशापरी आग्रह करी । गडबडा लोळे पायांवरी । संकट पाहुनि तये अवसरीं । स्वामी बोलले, ‘ येतों मी. ’ ॥६०॥  
मग निघाला तेथुनी । अतिआनंद जाला मनीं । मार्गीं येतां तये क्षणीं । खळें एक पाहिलें ॥६१॥
शुद्रासंनिध जाऊन । सांगता जाला वर्तमान, । ‘ स्वामी येताती भिक्षेलागून । कांहीं धान्य द्यावें तुवां. ’ ॥६२॥
तेणें शेरभर कर्डया देऊन । मार्गस्थ केला आर्ष ब्राह्मण । तो स्वगृहाप्रती येऊन । वदता जाला भार्येसी. ॥६३॥
‘ आमुचे श्रीगुरू चैतन्यमूर्ति । भिक्षेसी येती गृहाप्रति । कैच्या सावरित बैसलीस भिंती । पाकनिष्पत्ती करावी. ’ ॥६४॥
तिनें नदीचें पाणी आणून । घातलें होतें सारवण । आला दोन प्रहर दिन । तापली होती क्षुधेनें. ॥६५॥
भोंवतीं मुलें बाळें रडती । गडबडां भूमीसीं लोळती । अन्न नाहीं खावयाप्रती । गृहामाजीं तिळभरी. ॥६६॥
ऐकुनि पतीचे वचनाला । रेणुकाबाइला क्रोध आला । म्हणे, ‘ मेल्या ! या मुलांला । काय देऊं खावयासी ? ॥६७॥
कर्डया आणिल्या शेरभर, । आणि मज ह्मणतोसी ‘ पाक कर ’, । गुरूचे भिक्षेचा बडिवार । सांगत आलासी ये वेळीं. ॥६८॥
मेला गुरु तुझा दुष्ट, । तूंही तैसाचि महादुष्ट, । आहा रे दैवा ! काय कष्ट । लिहिले माझे कपाळी ? ॥६९॥
घरांत भांड्यांचा विटाळ । येक तेंही फुटकें पाळें । नेसावयासीं नाहीं सोंवळें । लुगडें काळें फाटकें. ॥७०॥
घरीं भाजीचा देंठ नाहीं । संन्यासी येईल लवलाही । त्यापुढें फोडोनि डोई । काय घालूं कपाळ ? ’ ॥७१॥
ऐसें बोलोनि संतापली । मग घेऊनि काष्ठें चुलींतलीं । नवर्‍याचे पाठींत घातलीं । तेव्हां तो पुढें पळतसे. ॥७२॥
शिव्या देत रस्त्यांत आली । तंव गांवांतली मंडळी मिळाली, । सर्वांनीं दुर्शशा पाहिली । मुकुंदभट जोशीयाची. ॥७३॥
रेणुकाबाई सांगे लोकांसी, । ‘ हा ह्मणवितो ग्रामजोशी । न जातां वृत्तीचे गांवासी । संन्याशापाशीं बैसतो. ॥७४॥
व्यतीपात अथवा एकादशी । न सांगे हा पंचांगासी । न करी हा कारट्यासी । म्हणतो दोष फार आहे. ॥७५॥
हा जन्माचा भिकारी । कोनाचें आर्जव न करी । अन्न मिळेना पोटभरी । या व्दाडाच्या संगतीनें. ॥७६॥
वडिलांनी द्रव्य वेंचून । घरांत कूप बांधिला जाण । परी त्यांतील गाळ काढून । नीट करिना हा आळसी. ॥७७॥
मुलें माझीं लहान तान्हीं खायासी मिळेना तयांलागुनी । दिसताती दैन्यवाणीं । फुकाचें पाणी मिळेना. ॥७८॥
याचा मजला त्रास आला । होईन कां संन्यास मेला । याचा माझा संग तुटला । ह्मणजे सुखी होईन मी. ॥७९॥
हा नवरा नव्हे माझा वैरी । कैसा पडला माझे पदरीं ! । आहा रे दैवा ! कष्टलें भारी ’ । म्हणोनि लागली रडावया. ॥८०॥
मग शेजारी पाजारी जन । म्हणती, ‘ हा ऐसाचि आहे दुर्जन, । रेणुकाबाई तूं मोठी सुजन, । रडूं नको, उगी रहा. ॥८१॥
आम्हीं देतों साहित्यासी । तुवां जाऊनि स्वगृहासी । भिक्षा करावी स्वामीसी । पाक सत्वर करूनि. ’ ॥८२॥
रेणुकाबाईनें तैसेंचि केलें । तंव अडीच प्रहर होत आले. । स्वामीलागीं स्मरण जालें । जोशी सांगुन गेला तें. ॥८३॥
‘ अद्यापि बोलावूं नाहीं आला । आपणचि जावें त्याची गृहाला ’ । मग महासर्प बोलाविला । आरूढ जाले तयावरी. ॥८४॥
हे ऐकुनि वर्तमान । सामोरे गेले संपूर्ण जन । आले स्वामीप्रति घेऊन । मुकुंदभटाचे गृहासी. ॥८५॥
पाहतां स्वामीचे चरणांला । रेणुकाबाईचा क्रोध गेला । मग करिती जाली प्रार्थनेला । स्वामीपाशीं येऊनि. ॥८६॥
‘ कूप आहे माझे आंगणें । परी तयालागीं नाहीं पाणी । उशीर लागला म्हणुनि । स्वामीराया दयाळा ! ’ ॥८७॥
मग तांब्या भरूनि पाणी । देती जाली स्वामीलागुनी । पाद पक्षाळिता तये स्थानीं । गंगा येती जहाली. ॥८८॥
स्वामींनीं आंगुळी फिरविली । वाटोळी तेथें खांच केली । तेथोनि गंगा चालली । वाड्यांत पाणी माईना. ॥८९॥
नदीप्रत चालिला पाट । पाणी शुभ्र चांगलें धुवट । खल्लाळ वाजती घडघडांत । संपूर्ण जन पाहती. ॥९०॥
कितीयेक जन स्नानें करिती । पंचारती ओंवाळिती । ब्राह्मणांसी वायनें देती । सुवासिनी मिळाल्या. ॥९१॥
होती वाजंत्र्याचे गजर । वाद्यें वाजती अपार । आनंदले नारीनर । करिते जाले उत्साह. ॥९२॥
म्हणती, ‘ मुकुंदभट धन्य । रेणुकाबाई दैववान । आम्हांसीं घडलें गंगास्नान । योगें करून जियेच्या. ’ ॥९३॥
रेणुकाबाई बोले आपण, । ‘ लेंकुरें आहेत माझीं लहान । उदकांत जातील बुडोन । गंगा खालीं न्यावी पैं. ’ ॥९४॥
स्वामीनी गंगेसी प्रार्थिलें, । ‘ आपण खाली जावें ’ ह्मणाले । त्या प्रकारें उदक गेलें । भूमिमाजीं संपूर्ण. ॥९५॥
असो. स्वामीनीं पुडी करून । उभयतां स्त्रीपुरुषांलागुन । देते जाले आशीर्वचन, ‘ लोकीं मान्य व्हाल तुह्मी. ॥९६॥
जैशी शोभती शिवपार्वती । तैसी परस्परांची होईल प्रीति, । दरिद्र जाऊनि संपत्ती । प्राप्त होईल तुह्मांसी. ॥९७॥
मुलगे होतील विद्वान । पायां पडतिल, संपूर्ण जन, । अंतीं तुह्मांसी मोक्ष होऊन । कृतार्थ व्हाल उभयतां. ’ ॥९८॥
ऐसा वर देतेक्षणीं । मुकुंदभट आनंदले मनीं । तैसेसेच रेणुकाबाई त्याची पत्नी । संतोष पावती जाली, ॥९९॥
‘ म्हणती, धन्य धन्य श्रीगुरुराया ! । आह्मां दीनावरी केली दया, । काय उतराई होऊं पाया । सनाथ आम्हांसि पैं केलें ’ ॥१००॥
सर्व ग्रामस्थांसीं बोलावून । केलें तयांचें समाधान । मागुती सर्पावरी बैसून । जाते जाले वनाप्रति. ॥१०१॥
ऐसें चरित्र जालेयावरी । आनंद पावली उत्तमनगरी । ऐसी वार्ता देशांतरीं । प्रगट होती जाहली. ॥१०२॥
तेथिल जन लंगडेलुळे । कितीयेकांचे गेले डोळे । कितीयेक संततीच्या मुळें । दु:खित असती जे जन. ॥१०३॥
तयांनीं मनीं निश्चय केला । कीं जावें स्वामीचे दर्शनाला । त्यांचे अशीर्वादें आम्हांला । इच्छित प्राप्त होईल. ॥१०४॥
स्वामी विचार करिती मनीं, । ‘ प्राणी आपलाले कर्मेंकरूनि । सुखी दु:खी असती जनीं । विचार कोणी न करिती. ॥१०५॥
मुळीं असत्य हा संसार । तयामाजीं दु:खेचि फार । याचा न करितां विचार । आम्हांसि म्हणति सांग करा. ॥१०६॥
प्रथम जन्मालागीं येणें । तेचि दु:खासीं आमंत्रणें । हें न विचारिती शाहणे । आणिक बंधन इच्छिती. ॥१०७॥
कोणी परमार्था न पुसती । आणि प्रपंच सांग व्हावा म्हणती । काय सांगावें मूढांप्रति ? । विवेक नाहीं यांजला ॥१०८॥
आतां आपण करावी समाधि । चुकवाची जनउपाधी । भेटूं नये कोणासी कधीं । ऐसेंचि आजी करावें. ’ ॥१०९॥
मग मांडवीपुष्पवतीचे तीरीं । निबिड वृक्षांमाझारीं । आणि महासिद्धि प्रगटवूनि वरीं । बसते जाले समाधिस्त. ॥११०॥
घालूनि दृढ वज्रासन । अंतरीं आकर्षुनि घेतला प्राण । ऊर्ध्व करुनि आपण । नाभीप्रदेशीं न्याहाटिलें. ॥१११॥
सहस्रदळीची वेधा करुन । सुषुम्नामार्गें योजिलें मन । तयाचे अनुसारें प्राण । ऊर्ध्वगामी पैं केले. ॥११२॥
मूलबंद उड्यान जालंदर । बंधत्रय योजिले परिकर । खेचरी मुद्रेंकरुनि सधर । जिव्हा तालूंत नेमिली. ॥११३॥
षट्चक्रें भेदुनि वरी । ब्रह्मांडीं सहस्रदळाशेजारीं । ब्रह्माकार वृत्ति बरी । निज निर्धारीं पैं केली. ॥११४॥
मनाचें जालें उन्मन । तेव्हां सहस्रदळीं झुकला प्राण । सहजीं जालें विस्मरण । माघारी येणें राहिलें. ॥११५॥
जैसें जीवनीं जीवन । कीं गमनीं मिळालें गमन । तैसें चिदाकाशीं केशवचैतन्य । येकीभावातें पावले. ॥११६॥
ते वेळीं विमानारूढ होऊन । येते जसले देव संपूर्ण । अंतरिक्षीं उभें राहून । पुष्पवृष्टी करिताती. ॥११७॥
गंधर्व करिती गायन । नृत्य करिती अप्सरागण । शब्देकरूनि भरलें गगन । अनेक वाद्यें वाजती. ॥११८॥
स्तुतिस्तवन देव करिती । ह्मणति, ‘ धन्य हे चैतन्यमूरित । ब्रह्मविद् योगींद्रचक्रवर्ती । ब्रह्मरूपीं मिळाले. ’ ॥११९॥
आसन जालें असतां निश्चळ । आंगावरी वाढलें वारूळ । देव जाते जाले सकळ । समाधी ऐसी पाहुनि. ॥१२०॥
शके तेराशें त्र्याण्णव । प्रजापति संवत्सराचें नांव । वैशाख वद्य द्वादशी पर्व । गुरुवारस ते दिनीं. ॥१२१॥
बादशाहासी कळतां वर्तमान । तेणें परम आवडीकरून । अरबी शक लिहून । ठेविला असे कागदीं. ॥१२२॥
‘ ईशन्नेस बैनसमान ’ ( ? ) ऐसा सन । केशवचैतन्यबाबा आपण । होते जाले समाधिसंपन्न । पुष्पावतीतिरासी. ॥१२३॥ उत्तमनगरीचे संपूर्ण जण । उत्साहं करिती नामस्मरण । कोणी करिती ब्राह्मणभोजन । कथा कीर्तनें करूनी. ॥१२४॥
पंचम अध्यायीं कथा परिकर । वर्णिली जाईल सविस्तर । ते श्रोतेजनीं होऊनि सादर । श्रवण केली पाहिजे. ॥१२५॥
निरंजन रघुनाथ जनस्थानवासी । कथा वर्णिली पुण्यराशी । श्रवणमात्रें गुरुभक्तांसि । आल्हाददायक निश्चयीं. ॥१२६॥ श्रीचैतन्यविजयकल्पतरु । संपूर्णफलदायनी उदारु । श्रवणपठणें दु:खपरिहरु । होईल श्रोत्यावक्त्यांचा. ॥१२७॥
॥ श्रीराघवचैतन्य केशवचैतन्यार्पणमस्तु. ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP