केशवचैतन्यकथातरु - अध्याय सहावा
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
श्रीगणेशायनम: ॥
आतां नमूं श्रीकेशवचैतन्य । जे सकळ साधुजनांसीं मान्य । कीर्ति ऐकतां श्रवणीं धन्य । प्राणी होती सर्वही. ॥१॥
ज्ञान वैराग्य प्रगट केलें । तेणें अनेक जन उद्धरिले । परि भक्तितत्त्व राहिलें । प्रगट करणें सर्वही. ॥२॥
मग तुकाराम वाणी । भक्ति कथिली तयालागुनी । ते विस्तारपूर्वक जनीं । श्रवण केली पाहिजे. ॥३॥
नदी इंद्रायणीचे तीरीं । देहुग्रामामाझारीं । विश्वंभरबाबा भक्ति करी । अखंडित विठ्ठलाची. ॥४॥
त्याची भार्या आमाबाई । तिची भक्ती श्रीविठ्ठलपायीं । भोळी भाविक होती पाही । अखंड भजनीं तत्पर. ॥५॥
ते जातीचे कुणबी वाणी । परि विठ्ठल कुलदेवता त्याचे सदनीं । सदनीं । तयासी पुत्र जाले दोन्ही । हरि मुकुंद या नामें. ॥६॥ ते दोघे निघाले रोजगारीं । चंदीचंदावरकराचे पदरीं । तयांसी होऊनि सरदारी । काम फौजेचें सांगितलें. ॥७॥
ते महापराक्रमी शूर । चंदीचंद्रावरास राहती निरंतर । संपत्ती वाढविलिसे थोर । ह्मणुनी तेथें राहिले. ॥८॥
मागें विश्वंभरबाबा वारले । ह्मणुन देहूस राहणें सोडिलें । मातोश्री आणि कुटुंब नेलें । चंदीचंदावरासी. ॥९॥
तेथें आमाबाईचिये स्वप्नीं । वारंवार विठोबा येऊनि । सांगे, ‘ तूं मजला टाकुनी । आलीस येथें कशासी ? ॥१०॥
मी देहुग्रामीं उपवासी, । नैवेद्य मिळेना मजसीं, । तूं तरी तया स्थळासी । चाल आतां सत्वरीं. ’ ॥११॥
आमाबाइ सांगे स्वपुत्रासी, । ‘ देव मरतो उपवासी । ह्मणुन देहुग्रामासी । बोलावितो मजलागीं, ’ ॥१२॥
पुत्रांनीं तियेतें वेडी ठरवून । नायकती तियेचें वचन, । मग एके दिवशीं जालें स्वप्न । तेंहि सांगे आमाबाई. ॥१३॥
‘ देव माझे स्वप्नीं येऊन । बोलता जाला मजलागुन । तुझे पुत्र पावतील मरण । शत्रुहस्तें करुनि. ’ ॥१४॥
तें पुत्रांतें सत्य न वाटून । पुत्र बैसले होते जाण । तंव राजाचें आलें पाचारण । परशत्रूवरी जावया. ॥१५॥
मातेसी करुनि नमस्कार । हरि मुकुंद निघाले सत्वर । होऊनि घोड्यांवरी स्वार । रणांगणीं पातले. ॥१६॥
परशत्रूचा होऊनि चढ । यांचे सैन्याचा जाहला मोड । हरिमुकुंदांचे सोडवूनि धड । मस्तकें नेलीं कापोनी. ॥१७॥
ऐसा प्रकार जालियावरी । उभय सुना घेऊनि बरोबरी । आमाबाई गेली श्रीपंढरी । देवदर्शन घेतलें ॥१८॥
आमाबाई ह्मणे देवासी, । ‘ तूं कां लागलासी पाठिसी ? । बुडवूनि आमचे वंशासीं । दिवेलागण मोडलीं. ’ ॥१९॥
देव ह्मणे, तुझें कुळीस । भक्तराज होईल ऐसा पुरुष । भक्तिमान करिल भूमंडळास । कीर्तनघोषें करुनि. ’ ॥२०॥
ऐसें ऐकुनी अमाबाई । बिर्डाडीं आली लवलाहीं । स्नुषा गर्भिणी होती हेंही । ठाउकें होतें तियेसी. ॥२१॥
नवमास भरतां सायासीं । सून प्रसूत जाली पंढरिसी । हर्ष न माये मानसीं । आमाबाईचे ते काळीं. ॥२२॥
मुलास तेरा दिवस जाले । विठोबा ऐसें नाम ठेविलें । पुढें कांहीं दिवसां आले । देहुलागीं सर्वही. ॥२३॥
देवाचे पूजानैवेद्यालागुन । विठोबा करिता जाला आपण । तयालागीं संतान । पदाजी होता जाहला. ॥२४॥
त्या पदाजीचे पोटीं । शंकर जाला भक्तकिरिटि । तयाचिये उदरसंपुटीं । कान्हया होता जाहला. ॥२५॥
त्या कान्हयासी पुत्र । बोल्होबा जाल जगन्मित्र । त्याचे पत्नी परम पवित्र । कणकाबाई या नामें. ॥२६॥
ते उभयतां बहुत भलीं । देवाची स्सेवा बहुत केली । दैवयोगें संपत्ती वाढली । उदीम व्यापारें करूनि. ॥२७॥
तयांसीं जाले तिघे पुत्र । होते जाले परम पवित्र । वडिल सांवजी वैराग्यस्वतंत्र । सेवूनि गेला तीर्थयात्रें. ॥२८॥
त्याचे पाठिचा तुकाराम । जो विठ्ठलभक्त अतिनि:सीम । कन्हया ठेविलें जयाचें नाम । तो कनिष्ठ असता जाहला. ॥२९॥
त्यांत तुकारामाचें चरित्र । जें परम पावन आणि पवित्र । श्रवन करिती त्यांचे श्रोत्र । पुनीत होती निश्चयीं. ॥३०॥
जन्मल्या दिवसापासून । विठ्ठलचरणीं जयाचें मन । महान सिद्धाचें लक्षण । जयाचे ठायीं वर्ततसे. ॥३१॥
तयानें केल्या दोन स्त्रिया । रखमाई आवली नामे जयां । सावध संसार करावया । दोघीही असत्या जाहल्या. ॥३२॥
बोल्होबा निवर्तल्यवरी । संसारओझें तुकयाचे शिरीं । अत्यंत पडतें जालें. परि । विठ्ठलचरणीं लक्ष त्याचें. ॥३३॥
देऊळामाजीं जाऊन । नित्य करावें भजन । श्रीज्ञानेश्वरीचें पठण । परम आदरें करावें. ॥३४॥
‘ अमानित्वा ’ दि लक्षण । जयाचे ठायीं आलें संपूर्ण । तीं लक्षणें कैसीं हें श्रवण । श्रोतेजनीं करावीं. ॥३५॥
प्रथम लक्षण अमानित्व असे । तें तुकयाचे ठायीं वर्ते कैसें । हें ऐकूनि घेईजे स्वस्थ मानसें । साधकांनीं निजप्रीतीं. ॥३६॥ नामस्मरणीं अति आदर । त्यावरी विठ्ठलसाक्षात्कार । कवितेचा जाला प्रसार । लोक मानूं लाग्ले ॥३७॥
तेव्हां नित्य प्रात:काळीं उठावें । ब्राह्मणाचे गृहीं जावें । सडासंमार्जन करावें । नदीचें पाणी आणुनी. ॥३८॥
मनुष्यमात्रें भेटतां वाटेंत । तयांसी करावा प्रणिपात । अवमानिती स्वजन आप्त । तैशापरि वर्तावें. ॥३९॥
वाटासरासी ओझें होतां भारी । तें ओझें घेऊनि आपले शिरीं । प्रविष्ट करावें त्याचे घरीं । सेवकाचे प्रकारें. ॥४०॥
कोणीकरितां स्तुतिस्तवन । त्रास पावे जयाचें मन । वारंवार करितां अपमान । संतोष बहु वाटतसे ॥४१॥
सन्मान करितां सर्व ज अनीं । होय साधकाची पुण्यहानी । हें मर्म तुकारामालागुनी । विदित असे पुरतें. ॥४२॥
आतां अदंभित्व कैशापरी । तें श्रवण करावें साधकचतुरीं । संग्रह होता जो तुकायाचें घरीं । तोलून दिधला स्वहस्तें. ॥४३॥
मग माध्यान्ह समय जाल्यावरी भिक्षा मागावी घरोघरीं । केव्हां करावी मजुरी । उदरनिर्वाहाकरणें. ॥४४॥
वक्तृत्व असतां बृहस्पतीपाडें । परि लोकीं आपणास ह्मणावें वेडें । यास्तव नाचे वेडें वाकुडें । मुखालागीं करूनी. ॥४५॥
करितां कीर्तनसमारंभ । लोकीं वाढेल आपला दंभ । जैसा वेडा असतो स्वयंभ । तैसा विचुक चावळे. ॥४६॥
अहिंसा तरी सर्वांपरि । येऊनि राहिली तुकयाचे घरीं । प्राणिमात्रांसीं पीडा न करी । सर्व परमात्मा म्हणऊनि. ॥४७॥
भजन करितां एकांत स्थानीं । शेतकरी म्हणे तुकयालागुनी, । ‘ शेत खाती पांखरें येऊनि । त्याची राखणी करीं तूं. ॥४८॥
मी जातों ग्रामासीं । एक महिना लागेल मजसीं । तोंपावेतों पाखरें राखिसी । तरि आदमण धान्य देईन मी. ’ ॥४९॥
भग तुकया माळ्यावरी बैसुन । पक्ष्यांचें न करितां निवारण । उलटें पक्ष्यांसि बोलावून । शेत चारित असावें. ॥५०॥
शेतकरी ग्रामाहूनि आला । तंव जोंधळा पांखरांनीं खाल्ला । कृषिवळ शिव्या देऊं लागला । तुकारामासी वेळोवेळीं. ॥५१॥
तुकया ह्मणे कुणब्यालागुन, । ‘ तुवां सांगितली पांखरांची राखण । तैसें केलें आदरेंकरूनि । पांखरें संतुष्ट जाहलीं. ’ ॥५२॥
सर्वांघटीं वासुदेव । ऐसा जयाचा दृढ भाव । जिवासी पिडा करण्याचें नांव । ठाऊक नाहीं जयासी. ॥५३॥
ऐसेंच कोणे एके अवसरीं । पित्याचें श्राद्ध आल्यावरि । तुकयाची कनिष्ठ अंतुरी । सांगती जाली तयातें. ॥५४॥
‘ आजी पितृतिथी आहे ह्मणुनि । गहुं आणिले पाहिजेत कोठुनि । तेणें कृषिवळासि मागुनि । गव्हाच्या पेंढ्या आणिल्या. ॥५५॥ मागीं येतां वृक्षाचे ठायीं । मोहोळ लागलें होतें पाहीं । त्यासी ढका लागतां कांहीं । मक्षिका तोडूं लागल्या. ॥५६॥
मग आंगावरिल वस्त्र टाकुन । तेथें उभा राहिला आपण । म्हणे, ‘ माझ्या विठोबालागुन । दु:ख जालें मजयोगें. ’ ॥५७॥ नखशिखांत माशा बैसून । तोडित्या जाल्या तुकयालागुन । परि तितुकें केलें सहन । हिंसा न व्हावी याकरितां. ॥५८॥
कोणाचें दुखवेल मन । म्हणून कठोर न बोले वचन । न करी तृणाचें छेदन । हिंसा होईल ह्मणवुनि. ॥५९॥
परम शांत वर्णिला वसिष्ठ । परि तयांहिपेक्षां तुकया वरिष्ठ । दुसर्यानें आपणांस देतां कष्ट । फिरुनि त्यासीच प्रार्थितसे. ॥६०॥ देहुग्रामामाझारी । साधु बाजीबाबा वेषधारी । तयाचे शेताभीतरीं । तुकयाची म्हैस जाऊनि ॥६१॥
तिणें कांहीं धान्य खाल्लें । ह्मणून माणुस सांगत आले । बाजी बाबासी निमित्य जालें । लोकांप्रति सांगावया. ॥६२॥
तुकयासि बहुत शिव्या दिल्या । मग दहावीस काठ्या मारिल्या । आपले हातासि मुग्या आल्या । तेव्हां गेला सोडुनि. ॥६३॥ तुकारामाचें शरीर । काठ्यांखालीं जालें चुर । परि न बोलतां एकहि उत्तर । विठ्ठलस्मरण करितसे. ॥६४॥
म्हणे, ‘ बाजीबाबा बहुत भले । परि तयांचे हात असती दुखवले ’ । ह्मणुन रात्रीं जाऊनि येकलें । त्यांचे हात रगडीतसे. ॥६५॥
ह्मणे, ‘ मोठ्यानें काठ्या मारितां । क्लेश जाहले तुमचे हाता । मजवरी क्षमा करावी आतां । मनांतिल राग टाकुनि. ’ ॥६६॥
ऐसें करूनि त्याचें समाधान । देवळासि आले आपण । करित बैसले नामस्मरण । विठ्ठलाचें आनंदें. ॥६७॥
आपणालागीं जो अपकारी । तयासि उलटा संतोष करी । ऐसा तुकारामापरि । नसे शांत कोणीही. ॥६८॥
आतां पांचवें आर्जवलक्षण । तें तुकयाचे ठायीं असे जाण । कोणां न करितां वक्र भाषण । सरळपणें असावें. ॥६९॥
मार्गीं जातां मेंढवाड्यांत । धरगराचा कुत्रा भुंकत । आला तुकयावरी चवताळत । चावावयाकारणें. ॥७०॥
त्यासी तुकया बोले उत्तर, । ‘ तुम्ही कशासी करितां गुरुगुर । ‘ येथें कांहीं नसतां गुरुगुर ? ’ । मग तो मुकाट्या राहिला. ॥७१॥
इतुकें सरळ अंत:करण । जें पशुकडून धरविलें मौन्य । सर्वीं वासुदेव ही विभावन । दृढ असे जयाच्या. ॥७२॥
आपणास घडावें आचार्यसेवन । यास्तव गुरु करावा कोण । हें पुसावें देवालागुन । ह्मणुनि गेला पंढरीसी. ॥७३॥
करुनि साष्टांग नमस्कार । उभा राहिला जोडुनि कर । विनंती करी वारंवार । श्रीविठ्ठलमूर्तिस. ॥७४॥
‘ देवा ! तूंचि माझी माता । आणि तूंचि माझा पिता । तूं माझा बंधु चुलता । आप्तसोईरा तूं सर्व ॥७५॥
देवा ! तूं परम गुरु । करावा माझा अंगिकारू । मज उपदेश करुनि परिकरु । जन्म मरण चुकवावें. ’ ॥७६॥
मग बोले रुक्मिणीकांत, । माझेंच स्वरूप असे ओतुरांत । तेथें केशवचैतन्य साक्षांत । उपदेश करतिल तुजलागीं. ॥७७॥
म्या वेदवाणी करून । मर्यादा केली असे जाण । जावें महानुभावासीं शरण । माझें स्वरूप समजावया. ॥७८॥
म्या रामअवताराचे ठायीं । वसिष्ठ गुरु केला पाहीं । तैसा कृष्णअवताराचे समयीं । संदिपन गुरु केला. ॥७९॥
माझी वेदआज्ञापालन । मीं याची केली असे जाण । गुरुरूपही मीच होऊन । उद्धार करी जगताचा. ॥८०॥
नामया माझा भक्त पाही । तयासीं मीं सांगितलें लवलाही । विसोबा खेंचरास जाई । शरण गुरुपदेशा. ’ ॥८१॥
ऐसें देवें सांगितल्यावरी । तुकया येता जाला ओतुरीं । बाजारांत जानु तेल्याचे द्वारीं । वखळेमध्यें राहिला. ॥८२॥
हा वेडा आहे ह्मणून । तयासीं कोणी न देती ठिकाण । मुखें करितो नामस्मरण । अन्य भाषण न करितां. ॥८३॥
रात्रौ तेथें करितां शयन । स्वप्नीं येऊनि एक ब्राह्मण । पावशेर तूप भोजनालागुन । मागता जाला तुकयासी. ॥८४॥
मग उठोनियां प्रात:काळीं । जाऊं लागला समाधीजवळीं । तंव मार्गें भेटले तयेवेळीं । केशवचैतन्य आपण. ॥८५॥
जाता होते मांडवीस्नाना । तेव्हां तुकयानें केलें साष्टांगनमना । आणि करिता जाला प्रार्थना । उपदेश करावा ह्मणउनि. ॥८६॥ तुकयाचा उत्तम अधिकार । पाहुनि मस्तकीं ठेविला कर । ‘ राम कृष्ण हरि ’ हा मंत्र । तयालागीं सांगितला. ॥८७॥
त्या मंत्राचा अर्थ सांगुन । तुकयासि ठसविलें पूर्ण ज्ञान । जेथें मायेचें नसे आवर्ण । तेंचि स्वरूप दाखविलें. ॥८८॥
तुकयातें जाला परमानंद । सरला देवभक्ताचा भेद साध्यसाधनाचा खेद । सर्वापरि मावळला. ॥८९॥
तुकया पुसतां गुरुपरंपरेशीं । गुरुराय सांगति तयासी । ‘ केशवचैतन्य नाम मजसी । गुरु राघवचैतन्य. ॥९०॥
व्यासप्रसाद तयावरी । व्यासातें नारद उपदेश करी । नारद ब्रह्मयातें वरी । श्रीविष्णु गुरु विधात्याचा. ’ ॥९१॥
ऐसी परंपरा सांगितल्यावरी । मागुति तुकया प्रार्थना करी, । ‘ हे गुरुपरंपरा समजलियावरी । पूर्वाश्रमींचे काय नाम ? ’ ॥९२॥
स्वामी म्हणती, ‘ तुकारामा ! । सांगूं नये पूर्वाश्रमींच्या नामा । तुझ्या पाहुनि अतिप्रेमा । सांगतों तें ऐक पां ॥९३॥
काशीक्षेत्रींचा अधिपती । जयां विश्वनाथ ऐसें ह्मणती । तेंचि नाम होतें मजप्रति । बाबाही म्हणती पूर्वाश्रमीं. ’ ॥९४॥
ऐसें तुकयातें सांगुन । स्वामी अदृश्य जालें आपण । तुकया वृत्तीवरी येऊन । विस्मय करिता जाहला. ॥९५॥
‘ गुरूंनीं मजवरी कृपा केली । परि सेवा कांहीं नाहीं घडली । स्वप्नीं तुपाची याचना केली । पडला विसर तयाचा. ’ ॥९६॥
माघ शुद्ध दशमी गुरुवासर । ते दिनीं तुकयाचा केला अंगिकार । मग विठ्ठलनामीं ठेऊनि आदर । देहूप्रति पातला. ॥९७॥
मग जे साधुसंत भेटती । तयांसीं मानुनी सद्गुरुमूर्ति । सेवा करितसे अतिप्रीति । पादसेवन करुनि. ॥९८॥
ऐसें आचार्यसेवन । उपासन घडतसे तुकयालागुन । अंतर्बाह्य शुचिष्मंतपण । शौच वर्ते जयासी. ॥९९॥
परमार्थ करावा जन्मवरी । विठ्ठल स्मरावा निजनिर्धारी । हेंचि धैर्य जया अंतरीं । अखंडित वर्ततसे. ॥१००॥
कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय । नामीं रूपीं लावावी सोय । हा जयाचा आत्मविनिग्रह । होऊनियां राहिल. ॥१०१॥
लावण्यलतिका रूपवती । परस्त्रीनें प्रार्थितां एकांतीं । तुकयानें त्यागुनि निश्चिती । मातेसमान मानिली. ॥१०२॥
त्यजिलें स्रक चंदनादि भोग । स्वर्ग मानिला जैसा रोग । ऐसें वैराग्याचें भाग्य । ज्याचे ठायीं वर्ततसे. ॥१०३॥
अहंकार ज्याचा जाला गलित । जन्ममरणासी त्रासलें चित्त । ह्मणें व्हावें किती फजीत । जन्मालागीं येऊनि. ॥१०४॥
विषयाचे ठायीं नसे प्रीति । विठ्ठलदास्यत्व सर्वदां चित्तीं । स्वजन धन गेलियाची खंती । नाहींच जयालागुनी. ॥१०५॥
इष्टानिष्ट आलिया घडुन । चित्तवृत्ति समसमान । नेणें दैवत विठ्ठलाविण । अव्यभिचारिणी भक्ति पैं. ॥१०६॥
इंद्रायणीचे तिरीं जाऊन । नित्य करावें भगवद्भजन । बहु आवडे तया विजन । जनसमुदाय रुचेना. ॥१०७॥
ऐसीं अष्टादश लक्षणें । गीतेमाजीं बोलिले भगवान । ते तुकारामाचे ठायीं संपूर्ण । यथासांग देखिली. ॥१०८॥
हीं लक्षणें व्हावया सुलक्षण । एक श्रीगुरुची कृपा जाण । श्रीकेशवचैतन्य आपण । भेटले तेणें सांग जाहलीं. ॥१०९॥ केशवचैतन्याची समाधी । जालियावरी शतावे अद्बीं । तुकारामातें ज्ञानसमृद्धी । प्रत्यक्ष येऊनि पैं केली. ॥११०॥
एकादशी प्राप्त होतां । स्वामीचे दर्शनाकरितां । यावें देहूहुनि तत्वतां । भजनगजर करावा. ॥१११॥
रात्रंदिवस करितां भजन । स्वामी संतोषोनियां पूर्ण । समाधींतुनी आपण । डोलत असावें निरंतर. ॥११२॥
ऐसा वृत्तांत जाल्यावरी । तया उत्तम नाम नगरीं । माझारी यादवबाबा ब्रह्मचारी । रामदासी पैं होता. ॥११३॥
तो सदाचारसंपन्न । श्रीरामचरणीं जयाचें मन । परि तत्त्वज्ञान नसे म्हणुन । तळमळ होती अंतरीं. ॥११४॥
स्वामी तुकयासी प्रत्यक्ष होऊन । बोधिलें शुद्ध तत्त्वज्ञान । उपदेशालागीं देऊन । आनंदरूप पैं केलें. ॥११५॥
असें आणुन मानसीं । जाऊनि बैसला समाधिपासीं । फळ मूळ न भक्षितां उपवासी । निग्रह करिता जाहला. ॥११६॥
पुढें काहीं दिवस जाहल्यावरी । फळ मूळ भक्षुनि हठयोग करी । ‘ स्वामींनीं कृपा करूनि बरी । उपदेश मजला करावा. ’ ॥११७॥ ऐसें चिंतुनिया मनीं । बसतां जाला अनुष्ठानीं । सर्वांगासी भस्म लावुनी । वस्त्रालागीं टाकिलें. ॥११८॥
ऐसा एक वर्षपर्यंत । राहातां जाला देउळांत । मग स्वामी येऊन स्वप्नांत । तयालागीं सांगती. ॥११९॥
‘ माझा उपदेश होणार नाहीं । तूं आतां येथुनि जाई ’ । तरि तो तैसाचि राहिला पाही । न जाईच सर्वथा. ॥१२०॥
द्वितीय दिनीं भृंगे आणि मुंगळे । येते जाले तांबडे काळे । तोडिती त्याचे पादमुळें । रक्त वाहूं लागलें. ॥१२१॥
तैसेच आवघे पाय फोडुन । अस्थिपर्यंत गेले भेदून । क हाते जाले मांसालागुन । दुःख तेणें जाहालें. ॥१२२॥
परि तेणें आवघेच केले सहन । न उठतां जाला तेथुन । देवळामाजीं राहिला पडुन । न जायेचि सर्वथा. ॥१२३॥
मग रात्रींचिये अवसरीं । ‘ उचलुन टाकिला नदीमाझारीं ’ । सर्वांग भिजल्यावरी । सावध होता जाहला. ॥१२४॥
ह्मणें ‘ मी येथें कोठुनि आलों ? । नदीमाजी येऊन पडलों । स्वामिसी न आवडता जालों । ह्मणोनि टाकिलें मज येथें. ’ ॥१२५॥ पुनरपि खरडात खरडत । येऊन बैसला देवालयांत । मोठा आक्रोश करुनि रडत । स्वामीप्रति बोलतसे ॥१२६॥
‘ चैतन्यस्वामी देवाधिदेवा ! । एक वर्ष केली तुमची सेवा । त्याचें फळ माझ्या जिवा । दु:ख दिलें हें काय ? ’ ॥१२७॥
मग चैतन्यमूर्ति प्रगट होऊन । तयालागीं दिधलें दर्शन । ह्मणती, ‘ पाहिलें तुझें मन । धैर्य असे कीं नाहीं हें. ’ ॥१२८॥
मग तयाचे मस्तकीं ठेवितां कर । वृत्ती होती जाली स्थीर । करूनि उपदेश परिकर । ब्रह्मसाक्षात्कार पैं केला. ॥१२९॥
स्वामी तयासी आशीर्वाद देती, । ‘ पृथ्वीभरी होईल तुझी कीर्ति ’ । मग लावितां स्वामी तीर्थाप्रति । शरीर दिव्य जाहाले. ॥१३०॥ करूनि स्वामीसी वंदन । यादोबा आले गृहालागून । दर्सना येती संपूर्ण जन । अति महिमान वाढलें. ॥१३१॥
श्रीराघवचैतन्य केशवचैतन्य । तया स्तवितां ग्रंथेंकरून । तेव्हां ते स्वप्नीं येऊन । बोलते जालें मजलागीं. ॥१३२॥
‘ तुवां हा जो ग्रंथ केला । तो आम्हांसी मान्य जाला । आतां वर देतों या ग्रंथाला । पठणकर्त्यासीं फळेल तो. ’ ॥१३३॥
‘ माझे समाधीपाशीं बैसुन । जो शतवार करिल ग्रंथपठण । तो होईल द्रव्यसंपन्न । दरिद्र जाईल तयाचें. ॥१३४॥
जो सहस्रवेळ पाठ करील । तयातें पुत्रसंतान होईल, । अयुत्संख्या जो वाचील । रोग जातील तयाचे. ॥१३५॥
जो करिल नित्य पठण । दशसहस्र अवर्तनें करून । त्यासीं रूपवती कांता जाण । प्राप्त होईल निश्चयीं. ॥१३६॥
जें ज्यास संकट पडेल कोणतेंही । त्याचें निवारिन मी आंगें पाही, । जो ग्रंथातें संग्रहाहोनि पाही । पिशाचभय त्या नाहीं. ॥१३७॥ ‘ जें जयासी इच्छित काम । जो पाठ करिल नेमें करून । त्याचे पूर्ण होती मनोधर्म । निश्चयीं वाक्य अवधारीं. ॥१३८॥ ‘ समाधिपासीं न होतां ग्रंथपठण । त्याणें असावें कोणत्या रीतिकरुन । शुचिष्मंत होऊनियां पूर्ण आदरें पठण करावें. ॥१३९॥
लक्ष वेळ ग्रंथ वाचितां । चैतन्यप्रसाद होईल निश्चितां । दश लक्ष वेळ जपतां । राज्यप्राप्ती होय त्यासी. ॥१४०॥
असंख्य करितां ग्रंथपठण । तयांसि होईल तत्वज्ञान. । ऐसा श्रीकेशवचैतन्य । आशिर्वाद देते झाले. ’ ॥१४१॥
कृष्णदासबैरागी परमभक्त । तेणें वर्णिला हा वृत्तांत । शके पंधराशें शहाण्णवांत । ग्रंथ पूर्ण पैं जाला. ॥१४२॥
त्या ग्रंथाचेनि आधारें । बोलिलो वेडींवांकुडें उत्तरें । परिसोत भावीक भोळे । कृपा करूनि मजलागीं. ॥१४३॥
शके सत्राशें नव । प्लवंगनाम संवत्सराचें नांव । ते कार्तिक शुद्ध येकादशी पर्व । ते दिनीं ग्रंथ पूर्ण जाला. ॥१४४॥ श्रीरघुनाथगुरुप्रसादेंकरून । गिरिनार पर्वतावरी जाऊन । जालें श्रीदत्तात्रयदर्शन । तो निरंजन विनवितसे. ॥१४५॥
‘ ऐकोनि घ्यावें श्रोतेजनीं । केशवचैतन्य याचा अभिमानी । जैसें वदविलें तयांनीं । तैसें लिहिला जाहलों. ’ ॥१४६॥
निरंजन रघुनाथ जनस्थानवासी । कथा वर्णिली पुण्यराशी । श्रवणमात्रें गुरुभक्तांसी । आल्हाददायक निश्चयीं. ॥१४७॥ श्रीचैतन्यविजयकल्पतरु । संपूर्ण फलदायनी उदारु । श्रवणपठणें दु:खपरिहारु । होईल श्रोत्यांवक्त्यांचा. ॥१४८॥
श्रीराघवचैतन्य केशवचैतन्यार्पणमस्तु. ॥ श्रीगुरवेनम: ॥ श्रीराम जय रम जय जय राम ॥ ॥ ॥
॥ समाप्त. ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2016
TOP