श्रीकल्याणकृत पदें - मारुती

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


१. ( चाल - देव पावला रे )
भीमराया रे सखया भीमराया रे ।
राघवप्रिय सकळावर्या वारीं मम माया ॥ध्रु.॥
तनु सुकुमारा कामा मारा केला कपिवीरा । वायोकुमरा संकटहारा पावे उदारा ॥१॥
तूं रणधीरा गुणगंभीरा दडिसी असुरा । रजनीचरा दशमुखनिकुरा मारिसी बनकरा ॥२॥
भुमिजा शोधूनि सिंधू लंघुनी भेटसि बलभीमा ।
अठरा पद्में आनंद जाला मानिसी विश्रामा ॥३॥
जयजयकार सकळहि गर्जति भेटति श्रीरामा ।
मारुति श्रीगुरु कल्याणांकित पदप्रेमा ॥४॥

२. ( चाल - मांडूं खेळ जगामाजीं )
प्रताप वदला रे वदला न वचे कोणा रे ॥ध्रु.॥
राघवशुद्धि जाऊनि बुद्धि मगरीसुतवरदानी ।
राक्षस मारुनि दधिनिधि लंघुनि महिकावति ये सदनीं ॥१॥
नाटकरूपी शक्तिस्वरूपी आपनचि होउनि ठेला ।
गोंधळ घालुनि राघव आणुनि बंदविमोचन केला ॥२॥
महिविर मर्दुनि भूपा रगडुनि चरणीं पिष्टचि केला ।
तडफड तडफड राक्षस मेला नगरलोक हडबडिला ॥३॥
लत्ताप्रहारें कपाट फोडुनि बाहेर राम विराजे ।
पळा पळा रे हनुमान आला अद्भुत बोंब गाजे ॥४॥
राक्षसवरदी शोधुनि हरदी अळिकुळ मारित आला ।
अहिरावण तो बाणीं जाळूनि राघव विजयी जाला ॥५॥
अहिमहि मारुनि वानर घेउनि मारुति रघुपति आले ।
बिभिषण सुग्रिव तल्लीन होउनि कल्याण प्रेमें भरलें ॥६॥

३. ( चाल - सामर्थ्याचा. )
सुंदर कर्कशरूपी । धगधग दिव्य स्वरूपी ।
अद्भुत रुद्रप्रतापी । दानवदंडण पापी ॥१॥
मंद्रातुल्य प्रतीमा । मुखारविंदीं उपमा ।
निशिपती राजित महिमा । अतुळ न तुळे सीमा ॥२॥
कांचनचिर लंगोटी । घंटा किंकिणी दाटी ।
सामर्थ्याच्या कोटी । रुळती चरणांगुष्ठीं ॥३॥
प्रगटत भुभुःकारें । राक्षस म्हणती बा रे ।
कलिमल न थरे थारे । कल्याणहृदयस्था रे ॥४॥

४. ( राग - भीमपलास; ताल - धुमाळी )
कैपक्षी भीमराया । निगमांतर विवराया ।
ब्रह्मानंद वराया । चंचळ मन आवराया ॥१॥
संकट दुष्ट हराया । मारकुमार कराया ।
गुरुपदरेणु धराया । भाविक जन उद्धराया ॥२॥
रघुपतिचा कैवारी । दुर्घट विघ्न निवारी ।
भजन पुजन मंदवारीं । कल्याणजनहितकारी ॥३॥

५. ( राग - खमाज; ताल - धुमाळी )
अहो जी बलभीमा बलभीमा ॥ध्रु.॥
भक्तजनांतें निरवुनि त्यातें । स्वामी गेले निजधामा ॥१॥
रामदासाचा कैवारी साचा । तुजविण कोण आम्हां ॥२॥
करुणाकरा दीनोद्धारा । कल्याणकारी सुखधामा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP