अध्याय ३ रा - श्लोक ११ ते १३
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
स विस्मयोत्फुल्लविलोचनो हरिं सुतं विलोक्यानकदुन्दुभिस्तदा ।
कृष्णावतारोत्सवसंभ्रमोऽस्पृशन्मुदा द्विजेभ्योऽयुतमाप्लुतो गवाम् ॥११॥
अनेकजन्मांचें शुद्ध पुण्य । ईश्वरानुग्रहें तें संपूर्ण । फळोन्मुख होतां सद्गुण । हृदयसदन वसविती ॥९३॥
सद्गुणीं संभवे अभेदभक्ति । तेव्हां साधनांची सीग वरौती । न चढे म्हणोनि श्रेष्ठ भक्ति । मोक्षापरती वाखाणे ॥९४॥
नाना साधनें चार्ही मुक्ति । साधक शिणोनि संपादिती । आर्त जिज्ञासु अर्थार्थी । हे व्युत्पत्ति तयांची ॥१९५॥
तैशी नोहे अभेदभक्ति । जिची अगाध प्रतापशक्ति । तुच्छ करूनि चार्ही मुक्ति । केला श्रीपति म्हणियारा ॥९६॥
अभेदभक्तीचा अधिकार । वसुदेव पावला समग्र । पूर्णब्रह्म निर्विकार । तो कृष्णावतार ज्या पोटीं ॥९७॥
तेणें देखोनि अद्भुत बाळ । विस्मयें दाटला केवळ । उत्फुल्लित नेत्रकमळ । पाहे चंचळ चकितत्वें ॥९८॥
तिमिरावरुद्ध प्रपंचजाळ । दृश्य जे कां मायापटळ । तें तें निवारूनि चांचल्य । नेत्र निश्चळ हरिरूपीं ॥९९॥
देवकीजठरीं मन्मथजनक । जाला अद्भुत बालक । त्यातें पाहोनि वृष्णिनायक । जाला सम्यक संतुष्ट ॥२००॥
कृष्णावताराची सूचना । तेचि काळीं जाली मना । तेणें आनंदें कवळी गगना । मयूर घना ज्यापरी ॥१॥
जाणोनि पुत्रजन्मकाळा । आनंदडोहीं निमग्न जाला । मनःक्षेत्रींच्या द्विजांला । संकल्प केला धेनूंचा ॥२॥
कारागृहेंच केलें स्नान । हस्तीं घेऊनि प्रेमजीवन । दहा सहस्र धेनुदान । द्विजार्पण मनें करी ॥३॥
होता कंसाचें कारागृहीं । प्रत्यक्ष विधान घडलें नाहीं । यालागीं मनोमयचि पाहीं । करी सर्वही वसुदेव ॥४॥
सकळ सुकृतांचें सार । माझे उदरीं कृष्णावतार । जातकर्मादि संस्कार । मारीषाकुमार मनें करी ॥२०५॥
अथैनमस्तौदवधार्य पूरुषं परं नताङ्गः कृतधीः कृताञ्जलिः ।
स्वरोचिषा भारत सूतकागृहं विरोचयन्तं गतभीः प्रभाववित् ॥१२॥
शुक म्हणे या भारता । जैसा गभस्ति प्रकाशतां । ब्रह्मांडगोळामाजीं ध्वांता । जग चेतविती नुरवूनि होय ॥६॥
नाशे सनिद्रास्वप्नभ्रम । सबाह्य निरसूनि जाय तम । तस्करभयाचा विराम । तेजोधाम प्रकटतां ॥७॥
तैसें अद्भुत तेजःपुंज बाल । स्वप्रकाशें बंदिशाळ । धवळी तैसेंचि हृदयकमळ । केलें सोज्ज्वळ जनकाचें ॥८॥
बाळबुद्धीची हरिली निद्रा । गेला स्वप्नभयाचा भेदरा । निर्भय पासूनि कंसादि चोरां । बाणला खरा प्रत्यय ॥९॥
बाळ नव्हे हा विष्णु केवळ । अष्टम गर्भ जो कंसकाळ । तोचि अवतरला गोपाळ । हें भूपाळ उमजला ॥२१०॥
प्रकृतीसि जो कां पर । तो हा श्रीकृष्णावतार । याचा पुरुषत्वप्रकार । पूर्ण साचार जाणतां ॥११॥
उडालें कंसभयाचें भान । प्रफुल्लित करूनि नयन । निर्भय बाळातें पाहोन । प्रभावज्ञ वसुदेव ॥१२॥
गरुडा न डंखी सर्प । न बाधी शंकरा कंदर्प । तैसा बाळ सप्रताप । वृष्णिभूप समजला ॥१३॥
बाळ नव्हे हा कैवल्यदानी । केला निश्चय प्रज्ञाभुवनीं । यालागीं कृतधीम्हणोनि । श्रीशुकमुनि बोलिला ॥१४॥
ऐसें कळलियानंतरें । नम्र सप्रेम अद्यादरें । स्तविता जाला तीं उत्तरें । उत्तराकुमारें परिसावीं ॥२१५॥
तें नम्रतेचें लक्षण । ग्ळाला आंगींचा अभिंमान । मी अनाथ हीन दीन । श्री भगवान हा होय ॥१६॥
म्हणोनि सर्वांगीं दाटला कंप । सद्गदित आलें बाष्प । स्वेद रोमांच पांगुळे जल्प । पुलक अमूप उकटले ॥१७॥
आनंदभरें विराली वृत्ति । स्वरूपसमरसीं मुराली स्मृति । उच्छ्वास सांडूनि मागौती । देहस्मृति सांवरिली ॥१८॥
परिमार्जूनि नेत्रोदक । बद्धांजलि पादोन्मुख । सुखावोनि प्रेमोत्सुक । स्तवनविवेक मांडिला ॥१९॥
जाणोनि अष्ट्मपुत्रजन्म । जातेष्ट्यादि ससंभ्रम । प्राकृतबाळकापरी प्रथम । पाहोनि नृपोत्तम हरिखेला ॥२२०॥
तंव अद्भुत देखोनि नयनीं । विवरूनि पाहे अंतःकरणीं । मग पुत्रबुद्धीतें सांडूनि वास्तव स्तवनीं प्रवर्त्तला ॥२१॥
तेणें स्तविलें जगदात्मया । तें तूं स्तुति ऐके राया । जिच्या श्रवणें प्राणी भया - । पासूनि मुक्त होतसे ॥२२॥
वासुदेव उवाच - विदितोऽसि भवान्साक्षात्पुरुषः प्रकृतेः परः । केवलानुभवानन्दस्वरूपःसर्वबुद्धिदृक् ॥१३॥
म्हणे आश्चर्यें वसुदेव । तूं प्रत्यक्ष देवाधिदेव । म्यां जाणितलासि स्वयमेव । चित्सुखानुभव सर्वगत ॥२३॥
शुद्धसत्त्वाचें जन्मस्थान । त्यासि प्रकृति हें अभिधान । तिसी अविदित ज्याचें ज्ञान । तो तूं भगवान परपुरुष ॥२४॥
पुरुष प्रकृतीसि पर । मी तंव परोक्षगोचर । ऐसें म्हणसी तरी विचार । ऐक साचार मुकुंदा ॥२२५॥
दृश्यातीत तूं गोपाळ । दृश्यप्रकाशक केवळ । अचल अमल अविकळ । शुद्ध सोज्ज्वळ सन्मात्र ॥२६॥
इंद्रियद्वारा प्रकाशून । दृश्य करिसी वर्तमान । प्राणप्रवाहें इंद्रिय सज्ञान । त्या प्राणासि ज्ञान मनोजन्य ॥२७॥
मनाहूनि पर बुद्धि । याहूनि पर जे त्रिशुद्धि । एवं गुणत्रयावधि । प्रकृति नुसधी जे ठायीं ॥२८॥
तये प्रकृतीसि जो पर । शुद्ध सन्मात्र अक्षर । तो तूं केवळ निर्विकार । परात्पर परमात्मा ॥२९॥
एवं सर्वातीत परात्पर । त्याचें आस्तिक्य केंवि साचार । तरी जो अनुभवाचें अभ्यंतर । सत्य साचार चिन्मात्र ॥२३०॥
ज्याचेनि इंद्रियां विषयानंद । ज्याचेनि प्राणासि स्वानंद । ज्याचेनि मनासि हर्षानंद । परमानंद तो आत्मा ॥३१॥
इंद्रियें देखती दृश्यातें । मन देखे इंद्रियांतें । बुद्धि देखे त्या मनातें । जो बुद्धीतें देखता ॥३२॥
पूति आणि सुरभिगंध । द्विविध नासिकाखेदानंद । मधुरअम्लादि रसास्वाद । सुखदुःखद रसनेतें ॥३३॥
श्वेतपीतादि सुंदर । व्याघ्रसर्पादि भीकर । हा द्विविध प्रकार । नेत्रद्वार अनुभवी ॥३४॥
श्रीतोष्ण मृदुकठिण । येहि सुखदुःखांचें परिज्ञान । त्वगिंद्रियद्वारा जाण । जीवचैतन्य अनुभवी ॥२३५॥
निंदा स्तुति हर्ष खेद । श्रोत्रद्वारा उमजे विषद । याच्या अनुभवें करणवृंद । ज्ञानप्रद अवभासे ॥३६॥
प्राणमार्गें मनोवृत्ति । करी इंद्रियांची प्रवृत्ति । तेव्हां विषयसुखाची ज्ञातीं । इंद्रियें होतीं पटुतर ॥३७॥
टाळी बैसली श्रवणीं । कीं अनेक परीच्या नादध्वनी । किंवा बधिरत्व आलें कर्णीं । तें अंतःकरणीं प्रकाशे ॥३८॥
त्वचेसि स्पर्शज्ञान आलें । हें मनासीच जाणवलें । आंध्य मांद्य नेत्रां आलें । हेंही कळलें हृत्कमळीं ॥३९॥
जेव्हां रसनेसि वैरस्य । तेव्हां न चोजवे कोण्ही रस । हें जाणे जो चित्प्रकाश । त्याचा वास हृत्कमळीं ॥२४०॥
जेव्हां श्लेष्मा करी प्रकोप । तैं गंधज्ञाना होय लोप । हें जो जाणे प्रकाशदीप । तो चिद्रूप हृत्कमळीं ॥४१॥
मनःसंकल्प जो जो कीजे । तो घडे न घडे हें जेणें जाणिजे । बुद्धिनामें तें बोलिजे । जेणें तेजें ते दृष्टि ॥४२॥
लज्जा तोष दोष आधि । मानापमान जेव्हां बाधी । र्ही धी भी श्री इत्यादि शब्दीं । बुद्धीची शुद्धि जो जाणे ॥४३॥
तो तूं आत्मा बुद्धिद्रष्टा । तुझेनि प्रकाशें प्रकृतिचेष्टा । तुज पावतां नाश कष्टा । होय प्रतिष्ठा स्वस्वरूपीं ॥४४॥
तो म्यां ओळखिलासि आद्या । वेदवेदांतप्रतिपाद्या । तो तूं कैसा विश्ववंद्या । करणवेद्यासारिखा ॥२४५॥
जरी तूं म्हणसी मुरारि । मी जन्मलों देवकीजठरीं । त्या मज कासया स्तुतीची थोरी । नानापरी बोलसी ॥४६॥
तरी ऐकें गा जगत्पति । जैशी जैशी केली स्तुति । तोचि तूं निर्गुण परंज्योति । गर्भसंभूतिविरहित ॥४७॥
N/A
References : N/A
Last Updated : April 26, 2017
TOP