अध्याय ३ रा - श्लोक २६ ते २७
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
योऽयं कालस्तस्य तेऽव्यक्तबन्धो चेशःटामाहुश्चेष्टते येन विश्वम् ।
निमेषादिर्वत्सरान्तो महीयांस्तं त्वेशानं क्षेमधाम प्रपद्ये ॥२६॥
ऐकें गा ये अव्यक्तबंधु । जेणें संबोधनें गोविंदु । संबोधिला तो अर्थ विशदु । श्रोतीं सावध परिसावा ॥७८॥
अव्यक्तनामें जे कां प्रकृति । तिसी प्रवर्त्तक तूं जगत्पति । म्हणूनि अव्यक्तबंधु या संबोधनोक्ति । देवकी सती संबोधी ॥७९॥
महाप्रळयाचें कारण । जो हा काळ विशाळ जाण । पुनः पुनः परिवर्त्तन । हें क्रीडन जयाचें ॥४८०॥
दशाक्षरें श्वासा येका । श्वासषट्कें पळात्मका । साठि पळांचा भरतां लेखा । तैं होय देखा एक घटि ॥८१॥
तीनसे साठि श्वास फ्रेर । तेणेंचि मानें घटिका भरे । साठि घटिकांचे भरतां फेरे । एका वासरें होइजे ॥८२॥
सप्त वासरांचें चक्र । दोनी वेळां करी फेर । तेव्हां एक तिथीचें चक्र । तें फिरे द्विवार तो मास ॥८३॥
दों मासांचा एक ऋतु । तिहीं ऋतूंचें अयन होत । दोन्हीं अयनें जेव्हां भरत । तेव्हां होत संवत्सर ॥८४॥
संवत्सरासि वर्ष म्हणणें । एका वर्षा दोनी अयनें । सहा ऋतु बारा महिने । येणें प्रमाणें प्रतिअब्ध ॥४८५॥
सूर्यभ्रमणें कालगणना । त्यासि सौरमान ऐशी संज्ञा । चंद्रभ्रमणें चांद्रमाना । केली संज्ञा दैवज्ञीं ॥८६॥
अश्विन्यादि नक्षत्रभ्रम । त्यासि नाक्षत्रमान ऐसें नाम । यवनीं आदरिला जो क्रम । सावननियम संज्ञेचा ॥८७॥
सांगों काळाचे अवयव । योग करणें राशिभाव । तरी ग्रंथ वाढेल हा भेव । म्हणोनि सर्व आवरिलें ॥८८॥
कृष्ण शुक्ल दोनी पक्ष । तो पितरांचा रात्रंदिवस । उत्तरायण तो सुरांचा दिवस । दक्षिणायन ते रजनी ॥८९॥
मानुषी घटीचा अवकाश । तो देवांचा श्वासोच्छ्वास । येणेंचि मानें पळें घटिकांस । अहोरात्रास जाणावें ॥४९०॥
एवं मनुष्यांचें वर्ष मात्र । तें देवांचें अहोरात्र । ऐसे साठी संवत्सर । तें वत्सरचक्र जाणिजे ॥९१॥
बहात्तरी शतें संख्या फेरे । जैं संवत्सराचें चक्र फिरे । तैं कलियुगाचें मान पुरे । बत्तीस सहस्र चारि लक्ष ॥९२॥
कलिद्विगुण द्वापार जाण । त्रेतायुग कलित्रिगुण । कलि केलिया चतुर्गुण । तेंचि म्हणणें कृतयुग ॥९३॥
एवं त्रेताळीस लक्ष । वरी वीस सहस्र अधिक । इतुका चौकडीचा अंक । महर्युग एक या नांव ॥९४॥
ऐशीं महर्युगें दोन सहस्र । तें विधीचें अहोरात्र । येणें मानें शताब्द मात्र । ब्रह्मयाचें परमायु ॥४९५॥
ब्रह्मयाचें जन्ममरण । तेणें विष्णूचें मानगणन । विष्णूवरूनि रुद्रमान । रुद्रावरूनि ईशाचें ॥९६॥
ईशावरूनि प्रधानमान । रात्रीही जाणिजे तत्समान । एवढें कालमहिमान । परिवर्त्तन तच्चेष्टा ॥९७॥
विश्वसृजनावनाप्ययन । हे काळाची चेष्टा जाण । तो तूं कालात्मा भगवान । तव क्रीडन तें म्हणती ॥९८॥
तव लीलेतें अनुलक्षून । काळ चेष्टे सनातन । यथानुक्रमें परिवर्त्तन । अगाधपण हें तुझें ॥९९॥
तो तूं कालात्मा अनंता । कालकाला काळातीता । क्षेमधाम श्रीअच्युता । शरणागता अभिरक्षीं ॥५००॥
जेथवरी काळाचे वर्त्तन । तेथवरी न चुके जन्ममरण । तूं काळातीत निर्भय स्थान । यालागीं शरण तुजलागीं ॥१॥
क्षेमधाम कैसा म्हणसी । तरी ऐकावें हृषीकेशी । प्राणी बिहाला कालसर्पासी । निर्भाअसी धुंडितां ॥२॥
मर्त्यो मृत्युव्यालभीतः पलायॅंल्लोकान्सर्वान्निर्भयं नाध्यगच्छत् ।
त्वत्पादाब्जं प्राप्य यदृच्छयाद्य स्वस्थः शेते मृत्युरस्मादपैति ॥२७॥
पूर्वश्लोकीं कथिला काळ । तोचि प्रत्यक्ष मृत्युव्याळ । त्याच्या भयें लोक सकळ । प्राणी चपळ पळाला ॥३॥
पळोनि आला भूलोकासी । तेथ काळ डंखी गर्भवासीं । पहातां निर्भयत्व चौपासी । कोण देशीं नाडळे ॥४॥
राजा सकळ प्रजा रक्षी । जो संपन्न सेनाध्यक्षी । काळ त्यातेंचि मुख्य भक्षी । मग कैपक्षी त्या कैंचा ॥५०५॥
एवं भुवर्लोक स्वर्लोक । महर्लोक जनलोक तपोलोक । शेखीं प्रवेशला सत्यलोक । तपोत्कर्षेंकरूनि ॥६॥
परी तेथही काळव्याळ । बळें रिघोनि डंखी सकळ । आयुष्य सरे तों तळमळ । वृथा चळवळ करिताती ॥७॥
पाशीं गुंतला जेविं पन्नग । तेणें मुखीं धरिला भेक । तो मक्षिकांचा विवेक । न करी देख ज्यापरी ॥८॥
तैसे येक येकाचे काळ । ऐसाचि अवघा ब्रह्मगोळ । तेणें काळभयें प्राणी व्याकुळ । निर्भयस्थळ लाहे ॥९॥
सर्व लोकांप्रति गेला । परी मृत्यु तेथेंही लागला । कोठें निर्भयता न पावला । तळमळीत ठेला काळभयें ॥५१०॥
तंव अकस्मात संत्संगति । घडतां अनुतप उपजला चित्तीं । महद्भाग्यें भगवद्भक्ति । सप्रेम चित्तीं ठसावली ॥११॥
तेव्हां इहामुत्रार्थविराह । अनित्य जाणोनि आला उबग । शमदमें प्रवृत्तीचा त्याग । उपरमयोग विषयांचा ॥१२॥
हरिभजनीं रमलें चित्त । उपरम विषयप्रवृत्तींत । हरिप्रेमामृतें तृप्त । तितिक्षावंत यालागीं ॥१३॥
नाशिवंतीं धरिल्या ममता । शोक वाढे नाश होतां । अविनाश हरिपद चिंतितां । उल्हासतां विशोक ॥१४॥
देहीं अहंता उभारे । तैंच निंदास्तुति स्फुरे । हर्षामर्ष आविष्कारे । मग वोथरे सुखदुःखें ॥५१५॥
ते अहंता हरिचरणीं । लीन केली सोहंभजनीं । तैं हर्षामर्षाची कहाणी । कोणें श्रवणीं ऐकावी ॥१६॥
ईश्वरानुग्रहें सद्गुरुप्राप्ति । तेणें सच्छास्त्रश्रवणीं रति । हरिगुणांची अगाध कीर्त्ति । नाहंकृति स्वलाभें ॥१७॥
हरिप्रेमें भरतां मन । कृपें कळवळूनि भगवान । सर्व भूतीं स्वानंदघन । दयाजीवन वर्षतु ॥१८॥
जेथ भाव तेथ देव । सहजें विवर्त्ता अभाव । चौथे भक्तीचा सद्भाव । अवघें वास्तव चिन्मात्र ॥१९॥
ज्यासि आंधाराचे डोहळे । तेणें झांकावे आपुलेचि डोळे । वांचूनि त्रैलोक्य आंधळें । वृथा बावळें करूं म्हणे ॥५२०॥
तेंवि प्रवृत्तीचा उपरम । करूनि होइजे आत्माराम । विश्वीं प्रवृत्तीचा नेम । करूनि अधम नाडती ॥२१॥
पराचे नेमितां दोषगुण । स्वहितीं होय नागवण । यालागीं मुरडूनि अंतःकरण । श्रीहरिचरण सेवावे ॥२२॥
तृषा लागतां आपुले पोटीं । आपणचि जळ प्राशिजे ओंठीं । बळें लावितां लोकांपाठीं । कोणी न घोंटी परेच्छे ॥२३॥
विशेष काय सांगूं एथ । पुत्रही झाला पूर्ण भक्त । पिता हिरण्यकशिपु भ्रांत । तो अविरक्त राहिला ॥२४॥
पुत्रें पिता उद्धरिला । हा अर्थ मीमांसकीं आदरिला । योगिवृंदीं अनादरिला । तो परिसिला पाहिजे ॥५२५॥
मीमांसकांचा स्वर्ग सगुण । केलिया जोडे यज्ञादि पुण्य । अवघे वांटूनि पितृगण । ब्रह्मसदन पावविती ॥२६॥
तैसें नव्हे ज्ञानभजन । आपण होइजे कृष्णार्पण । अभिन्नबोधें प्रेमा गहन । सग्ण निर्गुण समसाम्य ॥२७॥
हरिप्रेमा नव्हे धन । जें वांटूनि घेती पितृगण । तेथींची अनारिसी खूण । भक्त सज्ञान जाणती ॥२८॥
आपुलेपणीं कांहीं न उरणें । हरिप्रेमरसीं मुरणें । समरसोनि भजनीं उरणें । जेव्हां स्फुरणें साक्षित्त्वें ॥२९॥
आपण मरोनि फिरोनि आला । तेणें इतरा आधार दिला । साच मानी जो या बोला । तो गलबला हाकारू ॥५३०॥
तप्त लोह गिळी जळ । तें इतर जळासी करी मेळ । तैंचि भेदोनि गेला जो मायापटळ । तो करी सांभाळ पितरांचा ॥३१॥
निमेषमात्र स्वरूपोन्मुख । होतां घडले कोटि मख । तेणें पुण्यें स्वर्गसुख । पितृप्रमुख भोगिती ॥३२॥
वांचूनि कैवल्यसुखाची प्राप्ति । तें दुर्लभचि तयांप्रति । एक केलिया भगवद्भक्ति । सायुज्यप्राप्ति अक्षय्य ॥३३॥
तोयीं तोय घृतीं घृत । दुग्धीं दुग्ध अमृतीं अमृत । हेमीं हेम होय मिश्रित । तेंवि विरक्त हरिभजनीं ॥३४॥
पिता पुत्र अथवा बंधु । जंववरी विरक्त नसतां शुद्ध । तंववरी हरिप्रेमाचा स्वानंदबोधु । सहसा अगाधु नातुडे ॥५३५॥
विरक्त असो भलती याति । तो अधिकारी भगवद्भक्ति । प्रेमाथिली स्वानंदप्राप्ति । तो निश्चितीं पावेल ॥३६॥
अविरक्त आप्त तो परकीय । विरक्त परावा आप्त होय । यालागीं शिष्य ज्ञान लाहे । कृपानुग्रहें अधिकारें ॥३७॥
सर्वभूतीं भगवद्भाव । तेथ आपपरासी कैंचा ठाव । विरक्तां भाविकां हा निर्वाह । परी अविरक्त सद्भाव धरीना ॥३८॥
म्हणोनि दुर्लभ भगवद्भक्ति । अनेक जन्मांच्या संचितीं । अकस्मात होय प्राप्ति । निर्भयस्थिति जी नांव ॥३९॥
सहस्रें सहस्र जन्मांतरें । तपःसमाधि अध्वरें । निष्काम इत्यादि सुकृतभरें । जगदीश्वरें तोषिजे ॥५४०॥
तेव्हां अकस्मात भगवच्चरणीं । प्रेमा जडे निश्चयभजनीं । भरों प्रेमाचिये कथनीं । तरी ग्रंथवर्धनीं भय वाटे ॥४१॥
पहातां श्लोक साधारण । यदृच्छया पदावरून । भांबावलों तें श्रोतेजन । क्षमापन करावें ॥४२॥
आतां श्लोकोपसंहार । मृत्युसर्पाभेणें नर । पळतां लोकलोकांतर । निर्भय थार न पावे ॥४३॥
देवकी म्हणे अनादि आद्या । अकस्मात विश्ववंद्या । प्राप्त झाला चरणारविंदा । श्रीमुकुंदा महद्भाग्यें ॥४४॥
तंव तूं परेहूनि परता । प्रधान चेष्टे तुझिया सत्ता । काळ पळाला देखोनि भक्तां । तूं नियंता काळाचा ॥५४५॥
भक्त हरिचरणीं प्रेमळ । तेणें नेणती काळवेळ । मग काळचि होऊनि कृपाळ । करी सांभाळ भक्तांचा ॥४६॥
N/A
References : N/A
Last Updated : April 26, 2017
TOP