अध्याय ३ रा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


विश्वं यदेतत्स्वतनौ निशान्ते यथावकाशं पुरुषः परो भवान् ।
बिभर्त्ति सो‍ऽयं मम गर्भगोऽभूदहो नृलोकस्य विडम्बनं हि तत् ॥३१॥

तूं आदिपुरुष परात्पर । जाणोनि प्रलयाचा अवसर । स्वशरीरीं जगदाकार । सविस्तर सांठवसी ॥८१॥
अविद्याभ्रमाची सरली राती । करणतारकां उपरमगति । उदेला स्वप्रकाशगभस्ति । तो निशातीं तूं एक ॥८२॥
आपुले तनूमाजीं जगा । सांठवूनि होसी जागा । दृश्य स्वप्नाचिया लिंगा । ठाव अवघा तुजमाजीं ॥८३॥
अथवा दिव्य सहस्रयुगांच्या अंतीं । वैराजपुरुषाची सुषुप्ति । येणेंचि क्रमें सर्वांप्रति । होय सुषुप्ति स्वमानें ॥८४॥
तितुकीचि निशी क्रमिल्या अंतीं । पावति यथापूर्व जागृति । तैं तुझिये शरीरीं जगाची स्थिति । होय पुढती यथावकाशें ॥५८५॥
विस्तृत चरण तो भूलोक । भुवर्लोक तो जानुनी देख । ऊरू जाणावा स्वर्लोक । महर्लोक पैं जठर ॥८६॥
जनलोक तो कंठस्थान । तपोलोक तें श्रीमुख जाण । सत्यलोक ब्रह्मसदन । मूर्द्धस्थान जाणिजे ॥८७॥
एवं निशांतीं सर्व लोक । तनूमाजीं धरिसी सम्यक । तें हें रूप विश्वात्मक । माझा तोक म्हणवितां ॥८८॥
अघटित मानिती सर्व लोक । म्हणती केवळ विश्वात्मक । देवकीगर्भीं हा बाळक । हें कौतुक जाणोनि ॥८९॥
तरंगापोटीं जन्मला सिंधु । कीं चकोरनयनाम्रुतें इंदु । तेंवि मम गर्भीं तूं एवंविधु । हा विसंवादु जग मानी ॥५९०॥
हेंचि आश्चर्य चक्रपाणि । माझे उदरीं तूं जन्मोनि । मनुष्यलोकींची तूं संपादणी । करिसी अवगणी सारिखी ॥९१॥
ऐशी देवकीची विज्ञापना । ऐकोनि सर्वज्ञांचा राणा । अभिप्राय आणितां मना । विवंचना हे कील ॥९२॥
कंसभयापासून रक्षणें । आदिरूप न प्रकटणें । कंसालागीं कळों न देणें । तुझें जन्मणें मम उदरीं ॥९३॥
आणि दिव्यरूपें पुत्र म्हणवितां । जगीं पावेन उपहास्यता । बाळ होणें या अतौता । अर्थ न वदतां दाविला ॥९४॥
इतुके विवरूनि लक्ष्मीपति । अंगीकारूनि तिची विनति । आदिरूपाच्या संकेतीं । पूर्व वरदोक्ति बोधित ॥९५॥

श्रीभगवानुवाच - त्वमेव पूर्वसर्गेऽभूः पृश्निः स्वायंभुवे सति ।
तदायं सुतपा नाम प्रजापतिरकल्मषः ॥३२॥

संपूर्ण यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । ऐसें अनंत गुणगांभीर्य । तो सुरवर्य भगवान ॥९६॥
चौदा श्लोकीं श्रीभगवान । करील पूर्वजन्मींचें कथन । श्रोतीं होऊनि सावधान । तें भगवद्वचन ऐकावें ॥९७॥
हरि म्हणे वो ऐकें जननी । पूर्व जन्मींची वृत्तांतकहाणी । तुज कळावी म्हणोनि । हें रूप नयनीं दाविलें ॥९८॥
तरी तूं स्वायंभुवे मन्वंतरीं । पृश्नि या नामें तूं सुंदरी । सुतपा प्रजापतीचे घरीं । सदाचारी होतीस ॥९९॥
तैं हा वसुदेव आपण । प्रजापति तपोधन । सुतपा याचेंचि अभिधान । निर्दूषण रवितुल्य ॥६००॥
तुम्ही अकल्मष दंपती । शांत दांत शुद्धवृत्ति । ब्रह्मा आज्ञापी तुम्हांप्रति । प्रजासर्गार्थ जे काळीं ॥१॥

युवां वै ब्रह्मणादिष्टौ प्रजासर्गे यदा ततः । सन्नियम्येन्द्रियग्रामं तेपाथे परमं तपः ॥३३॥

तेव्हां तुम्हीं इंद्रियग्राम । निरोधिला करूनि नियम । तप आचरलां जें परम । तो अनुक्रम अवधारा ॥२॥

वर्षवातातपहिमघर्मकालगुणाननु । सहमानौ श्वासरोधविनिर्धूतमनोमलौ ॥३४॥

गिरिकंदरीं घालूनि माळा । तेथ क्रमिलें वर्षाकाळ । जळीं बैसोनि हिंवाळा । आकंठ जळा सेविलें ॥३॥
उष्णकाळीं महापंचाग्नि । वात साहिला निरावरणीं । ऐशीं माझिये प्राप्ती लागूनि । नियमसाधनीं प्रवर्त्तला ॥४॥
रजतमीं चित्त होतें मैलें । तें प्राणायामाचेनि बळें । जालूनि अकल्प कलिमलें । आणिलें अमळें सत्त्वशुद्धि ॥६०५॥
एवं निरोधोनिया श्वास । पूर्ण साधोनि योगाभ्यास । तेणें शोधिलें मानसास । केलें निर्दोष निर्मळ ॥६॥
एक म्हणती अभ्यासमार्गें । कैवल्य लाभे अष्टांगयोगें । ऐसें जल्पती वाउगें । हीं साधनांगें प्राप्तीचीं ॥७॥
इहीं होय चित्तशुद्धि । तैं विवेकें उजळे बुद्धि । सर्व निरसती उपाधि । पावे सिद्धि स्वबोध ॥८॥
होतां चित्तशुद्धि पूर्ण । ठसावे सप्रेम ज्ञानभजन । सगुणनिर्गुण समसमान । पूर्वसाधन योगबळें ॥९॥
देवकीसि म्हणे भगवान । ऐसें चित्त शोधूनि पूर्ण । याचि रूपातें आराधन । केलें जाण ते काळीं ॥६१०॥

शीर्णपर्णानिलाहारावुपशान्तेन चेतसा । मत्तः कामानभीप्सन्तौ मदाराधनमीहतुः ॥३५॥

मनुष्याचा संवत्सर । तें देवांचें अहोरात्र । येणें मानें अब्ध थोर । तें साचार दिव्यवर्ष ॥११॥
दिव्य वर्षें चारी सहस्र । गलितपत्रांचा केला आहार । त्याउपरी चारी सहस्र । आहार केला पवनाचा ॥१२॥
त्याहीउपरी चारी सहस्र । श्वासरोधें निराधार । होऊनि मदाराधनपर । ध्यानीं एकाग्र मद्योगें ॥१३॥
ऐशी तपश्चर्या अवघड । परी प्रशांतचित्तें राहिलां दृढ । कामक्रोधांची त्यजिली भीड । धरिला वाड मम प्रेमा ॥१४॥
तपें तोषवावें मज हा नेम । तोषल्या इच्छावा हाचि काम । मदाराधनीं उत्कृष्ट प्रेम । यावीण काम न इच्छां ॥६१५॥
अनेक काम भजनात्मक । तें मजचि मागावें सम्यक । मज वेगळा भाव आणिक । कोणी एक नातळलां ॥१६॥
दिव्य बारा सहस्र वर्षें । याचि निश्चयें तपोत्कर्षें । अन्यकामनावातस्पर्शें । संकल्पलेशें नातळलां ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP