अध्याय ३ रा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
सिद्धचारणगन्धर्वैरप्सरःकिन्नरोरगैः । उपाहृतोरुबलिभिः स्तूयमानेदमब्रवीत् ॥११॥
सिद्धलोकींच्या सिद्धसुमनीं । सिद्धवस्त्रादि अनुलेपनीं । सिद्धोपचारवस्त्राभरणीं । सिद्ध येऊनि अर्चिती ॥९५॥
सिद्धकन्यादि सुवासिनी । सिद्धलोकींच्या विधिविधानीं । पूजिती ससिद्ध येऊनि । सिद्धयोगिनी सिद्धिदा ॥९६॥
तैशीं चारणीं स्वसूत्रज्ञानें । गंधर्वीं गांधर्वविद्याचरणें । अप्सरादिकांचीं पूजनें । वश्याचरणें सूत्रोक्त ॥९७॥
किन्नर किन्नरींसमवेत । करिती सपर्या सूत्रोक्त । स्वाधिकारें यथोचित । अभिवांच्छीतफलदात्री ॥९८॥
नानायातीचे दिव्य फणी । सवें घेऊनि सुपद्मिनी । आले विमानीं बैसोनि । बळि श्रीचरणीं अर्पिती ॥९९॥
विविध द्रव्यें विविध पात्रें । विविध कुलाचारमंत्रें । विविधाचरणें सकलत्रें । यथासूत्रें अर्चिती ॥१००॥
एक पढती नानास्तोत्रें । एक वर्णिती श्रीचरित्रें । नवरसरंगीं एक गात्रें । तानमानें नर्तविती ॥१॥
लास्यें हास्यें तौर्यत्रिक । सूक्तपाठ करिती एक । एक कौलाचारविवेक । कौलभार्गें विचरती ॥२॥
एक म्हणती समयाष्टक । एक म्हणती मुख्य दौतिक । कामकळेचा विवेक । बिंदु एक शंसिती ॥३॥
एक म्हणती कलावती । एक म्हणती लीलावती । एक म्हणती परंज्योति । परा शक्ति श्री षोढा ॥४॥
ऐसें आपुलाले भावीं । पूजिली सिद्धादि सकळ देवीं । यथोक्तफळदा शांभवी । नाना स्तवीं स्तवियेली ॥१०५॥
गंधर्व सप्तस्वरें गाती । किन्नरी चपळांगें नर्तती । अप्सरा संगीतें नाचती । ताल धरिती किंपुरुष ॥६॥
सिद्ध वर्षती दिव्य सुमनीं । स्तवनीं तिष्ठती नाना फणी । ऐशी स्तूयमाना देवी गगनीं । कंसें नयनीं देखिली ॥७॥
हें बोलिली तेव्हां वचन । तेंचि पुढील श्लोकीं कथन । निरूपिजेल सावधान । श्रोतीं श्रवण करावें ॥८॥
किं मया हतया मन्द जातः खलु तवान्तकृत् । यत्र क्क वा पूर्वशत्रुर्मा हिसीः कृपणान् वृथा ॥१२॥
ऐसें देखोनिया नयनीं । साशंकित अंतःकरणीं । तंव ते बोलिली संबोधूनी । विश्वमोहिनी जगदंबा ॥९॥
तें कंसें मात्र ऐकिलें श्रवणीं । येरां अश्रुत सर्वकरणीं । पुण्यावीण अभीष्टदानी । श्रीभवानी कें जोडे ॥११०॥
कस होता पुण्यशरीरी । तरी कां बाळांतें संहारी । ऐशी आशंका कोणी करी । तेणें सादरीं परिसावें ॥११॥
त्याचें विरोधमार्गें भजन । नित्य न खंडे अनुसंधान । कृष्णमयचि सर्वाचरण । कृष्णीं तन मन वेधलें ॥१२॥
आसुरी संपत्तीचें ज्ञान । देहलोभें बाळहनन । यश आयुष्य तेणें क्षीण । पावे मरण हरिहस्तें ॥१३॥
कंसें मारिले जे बाळक । त्यांचें पूर्वींल पातक । परिसाल तयाचा विवेक । पंचायशावे अध्यायीं ॥१४॥
असो कंसातें योगजननी । म्हणे रे मंदा ऐकें वाणी । शत्रु जन्मोनि आणिके स्थानीं । मज मारूनि साध्य काय ॥११५॥
तुझा शत्रु जन्मांतरींचा । कोणेके स्थळीं त्याचा । जन्मोनि वास आहे साचा । हे सत्य वाचा पैं माझी ॥१६॥
तुझा अंतक त्रिशुद्धि । स्थलांतरीं पावे वृद्धि । अरे मूर्खा मंदबुद्धि । वृथा न वधीं अनाथें ॥१७॥
दुर्मंत्रियांचा ऐकोनि मंत्र । बाळें वधील हें चरित्र । जाणोनि भूतभविष्यसूत्र । बोधी विचित्र संकेतें ॥१८॥
मंदा मारिसी मातें वृथा । दीना कृपणा अति अनाथा । शत्रु जन्मला या वाक्यार्था । जाणोनि स्वार्था विचारीं ॥१९॥
इति प्रभाष्य तं देवी माया भगवती भुवि । बहुनामनिकेतेषु बहुनामा बभूव ह ॥१३॥
इतुकें बोलूनि कंसाप्रति । देवी योगमाया भगवती । झाली भूलोकीं अवतरती । नाना व्यक्ति धरूनी ॥१२०॥
द्वितीयाध्यायीं आज्ञापन । करूनि दिधलें वरदान । त्या प्रभुवरानुसारें जाण । स्थानाभिधान पावली ॥२१॥
बहुत नामें बहुतां व्यक्तीं । बहुतां क्षेत्रीं बहुतां वस्तीं । बहुचरित्रें बहुधा कीर्त्ति । बहुधा गाती बहुलोकीं ॥२२॥
तयाभिहितमाकर्ण्य कंसः परमविस्मितः । देवकीं वसुदेवं च विमुच्य प्रश्रितोऽब्रवीत् ॥१४॥
ऐशी देवी सुपूजित । गगनीं देखोनि मूर्त्तिमंत । तिच्या वचनेंकरूनि चित्त । झालें विस्मित कंसाचें ॥२३॥
देवकीअष्टमगर्भाचा बाळ । तोचि कंसा तुझा काळ । म्हणोनि होतों प्रयत्नशीळ । तोही विफल झाला कीं ॥२४॥
देववाणी असत्य झाली । तेथ इतरांची काय चाली । देवकी बहिण म्यां आपुली । वृथा जाचिली बंधनीं ॥१२५॥
ऐसा विस्मित झाला मनीं । मग वसुदेवदेवकी इयें दोन्ही । परम कारुण्यें कळवळूनि । बंधनींहूनि सोडिलीं ॥२६॥
बेडी पायींची तोडून । मुक्त केलीं बंदीहून । कृपेनें अंतरीं द्रवोन । काय वचन बोलिला ॥२७॥
अहो भगिन्यहो भाम मया वां बत पाप्मना । पुरुषाद इवापत्यं बहवो हिंसिताः सुताः ॥१५॥
म्हणे भावोजी वसुदेवा । परम विस्मय हा वाटे जीवा । मनुष्याचा काय केवा । मिथ्या देवांमाजीं वर्ते ॥२८॥
म्यां ऐकोनि आकाशवाणी । यत्न केला आत्मरक्षणीं । तोही मिथ्या आजपासूनी । कळलें मनीं मजलागीं ॥२९॥
अवो बहिणी देवकीये । महादुःख हें सांगों काय । निरपराधें पीडिली गाय । महानिरय भोगीन ॥१३०॥
परम कष्ट हे अघोर । म्यां निर्दयें तुमचे कुमार । बहुत मारिले निष्ठुर । केलें अंतर पापिष्ठें ॥३१॥
मी पापात्मा पापराशि । पावेन कोण्या दुर्गतीसी । तोंड दाखवितां लोकांसी । लज्जा मानसीं मज वाटे ॥३२॥
सर्प मार्जार व्याघ्रादिक । आपुला आपण भक्षिती तोक । किंवा पुरुषाद नरभक्षक । मीही एक तैसाचि ॥३३॥
जैसें आपुलें मारिती बाळ । तैसेचि भगिनीगर्भगोळ । निर्दय होऊनि मारिले सकळ । मी केवळ राक्षस ॥३४॥
जैसे राक्षस निर्घृण । मीही तैसाचि दयाहीन । बहुत तुमचे पैं नंदन । मारितां मन न द्रवलें ॥१३५॥
अग्निसमान तेजःपुंज । दिव्य तुमचे ते आत्मज । मारिले ऐसा मी निर्लज्ज । कोण वोज पैं माझी ॥३६॥
N/A
References : N/A
Last Updated : April 26, 2017
TOP