अध्याय ३ रा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तस्माद्भद्रे स्वतनयान्मया व्यापादितानपि । माऽनुशोच यतः सर्वः स्वकृतं विन्दतेऽवशः ॥२१॥
वसुदेव तो ज्ञानराशि । शोक बाधी देवकीसि । म्हणोनि विवेकें बहिणीसि । विचारासि सांगतो ॥२६५॥
अहो भद्रे विचारराशि । आत्मबोधाचिये प्रकाशीं । अविद्येची निरसूनि निशी । मोहपाशीं न पडिजे ॥६६॥
देहबुद्धि सांडूनि पाहीं । पुत्र तुझे नव्हती कांहीं । मी मारितां नव्हे कांहीं । हे भ्रांति देहीं कर्माची ॥६७॥
कर्मान्वयें पाहतां जाण । प्राणिमात्र कर्माधीन । कृतकर्मासि वश होऊन । करी भ्रमण परवशता ॥६८॥
स्वकृत भोगिल्यावीण न सरे । म्हणोनि अनेक जन्मफेरे । ख्याती तैसेंचि निमित्तांतरें । कर्म पसरे पुढें पुढें ॥६९॥
यास्तव तुझीं म्यां लेंकुरें । जरी मारिलीं असती निकुरें तेंहीं स्वकर्म भोगिलें खरें । तूं शोकपूरें न लोटें ॥२७०॥
यास्तव सहसा शोक न करीं । ज्ञानें कर्में दोहीं परी । विवरूनि पाहतां अंतरीं । शोकासि उरी असेना ॥७१॥
एव ऐकें वो बहिणी । ऐशी आशंका तुझिये मनीं । दोष नसतां ब्रह्महननीं । हत्त्या कोठूनि बाधी ते ॥७२॥
शिवापाठी ब्रह्मकपाट । वृत्रहत्त्यी त्रिदशां कष्ट । प्रायश्चित्तविधीचे पाट । शास्त्रसंघाट बोलती ॥७३॥
ब्रह्मराक्षस महाक्रूर । रावणादिक दुष्ट असुर । त्यांचे हत्येचा परिहार । श्रीरामचंद्र आचरला ॥७४॥
रामेश्वर ज्योतिर्लिंग । स्थापूनि निष्पाप केलें जग । ऐसा हरिहरांचा प्रसंग । तैं ज्ञानमार्ग नव्हता हा ॥२७५॥
ऐसें न म्हणें ममानुजे । गुह्य सांगेन तें तूं बुझें । जेणें अंतर उमजे तुझें । तैसें वोजे परियेसीं ॥७६॥
हरिहर धर्मंस्थापक । तयाधीन वर्त्तती लोक । म्हणोनि प्रायश्चित्तविवेक । तिहीं सम्यक विवरिला ॥७७॥
श्रेष्ठ आचरोनि स्वयें दावी । येणें मार्गें अबलां लावी । पुढें तयांसि न पदे गोंवी । निजात्मपदवी पावती ॥७८॥
एरव्हीं संहारितां सृष्टि । पापें रुद्र होता कष्टी । तैं प्रायश्चित्ताची रहाटी । पुन्हा सृष्टि न गिळिता ॥७९॥
म्हणोनि ज्ञानदृष्टीपुढें । भेदभ्रमाचें स्वप्न उडे । देहीं दृढ अहंता वाढे । तोंवरी न खंडे अज्ञान ॥२८०॥
यावद्धतोऽस्मि हन्तास्मीत्यात्मान मन्यतेऽस्वदृक् । तावत्तदभिमान्यज्ञो बाध्यबाधकतामियात् ॥२२॥
अपरोक्षसाक्षात्कारेंवीण । स्वस्वरूपाचें विपरीत ज्ञान । तेणें गुणें देहाभिमान । दृढ अज्ञान वाढवी ॥८१॥
मी मरता आणि मारिता । ऐशी स्फुरे जंव अहंता । तंववरी आपली अनोळखता । पावे बद्धता अज्ञानें ॥८२॥
बाध्य म्हणजे महापाप । बाधक तें कर्मसंकल्प । देहात्मवादें हा आरोप । आत्मा निर्लेप नेणता ॥८३॥
देहाचें मरण आणि मारणें । आत्मत्वें मानिलें जेणें । त्याचे देहबुद्धीचें ठाणें । कोण्या गुणें उठेल ॥८४॥
म्हणोनि तुम्ही विचारखाणी । विशोक होऊनि अंतःकरणीं । माझिया अपराधाच्या श्रेणी । अंतरींहूनि विसराव्या ॥२८५॥
क्षमध्वं मम दौरात्म्यं साधवो दीनवत्सलाः । इत्युक्त्वाश्रुमुखः पादौ श्यालः स्वस्रोरथाग्रहीत् ॥२३॥
वसुदेवाचा शालक कंस । बहिणी आणि मेहुणियास । विनीत होऊनि विशेष । स्वापराधा क्षातवी ॥८६॥
म्हणे केवढें माझें दौर्जन्य । ऐकोनि वारियावरील वचन । स्नेह सांडिला उन्मळून । देहरक्षण करावया ॥८७॥
एक सुहृद स्नेहाळ पूर्ण । समरांगणीं ओपिती प्राण । करूनि सुहृदाचें रक्षण । धन्य धन्य म्हणविती ॥८८॥
भगिनीचिया प्राणघाता । मी प्रवर्त्तलों देहस्वार्था । तुम्हीं विवेकें त्या अनर्था - । पासूनि तत्त्वतां रक्षिलें ॥८९॥
मियां दुर्जनें महाक्रूरें । मारिलीं उपजतांचि लेंकुरें । कर्में ठकिलें हेंचि खरें । म्हणोनि विचार सांडावलों ॥२९०॥
तुम्हांसी बंधन केलें निगडीं । कम्रें बुद्धि दिधली कुडी । लज्जा वाटे वदतां तोंडीं । अधम ब्रह्मांडीं मी एक ॥९१॥
तुम्ही साधु निरपराधी । शत्रुमित्रीं समानबुद्धी । मी दुरात्मा अपराधी । कृपानिधि मज तुम्ही ॥९२॥
देहलोभें विषयचाडें । घडॊं नयेतितुकें घडे । साधु क्षमेचे मेरू गाढे । सहसा कुडें नाठवती ॥९३॥
क्षमाक्षीराब्धिजलशायी । साधु समत्वें झाले पाहीं । ते दुर्जनमशकछळणा घायीं । न पवती देहीं उपोढ ॥९४॥
साधु समत्वें दीनवत्सल । साधु भूतात्मे दीनदयाळ । साधु कारुण्यें कोमळ । क्षमाशील पुण्यात्मे ॥२९५॥
साधु सुखाचे सुधाकर । संसारश्रांता अमरागार । साधु भवाब्धीचें पार । सत्य साचार दाविती ॥९६॥
परोपकाराचिया श्रेणी । करितां न शिणती अंतःकरणीं । ऐशी साधूंची अगाध करणी । लिहितां धरणी चुटपुटी ॥९७॥
आतां माझिया अपराधकोटि । स्मरोनि निष्ठुर न होइजे पोटीं । आठवूनि आपली दुष्ट रहाटी । पडे सृष्टीं मूर्च्छित ॥९८॥
टाहो फोडूनि दीर्घ रडे । स्फुंदस्फुंदोनि मूर्च्छित पडे । म्हणे कैसें कर्म कुडें । कोणापुढें न वदवे ॥९९॥
वसुदेवदेवकीचे चरण । दृढ धरूनि करी रुदन । म्हणे अपराध क्षमा करून । स्नेहवर्धन करावें ॥३००॥
गंगे क्षालिती जेंवि समळ । ते मलनाशिनी गंगा अमळ । तैशीं तुम्ही दीनदयाळ । मजवरी स्नेहाळ होइजे ॥१॥
वर्षाकाळींचें अमंगळ । वाहोनि गेलिया समळ डहूळ । मग पातला शरत्काळ । निवडे निर्भळ चिद्गंगा ॥२॥
तैशी कर्माची कुटिल वेळा । क्षालूनि गेलिया क्लेशकाळा । आतां निर्मळ क्षमाशीळा । स्नेह आगळा पावन ॥३॥
मजवरी करूनि कृपादृष्टि । मम दौरात्म्य न धरिंजे पोटीं । प्रार्थीं चरण वंदूनि मुकुटीं । पसरूनि ओटी क्षांतवी ॥४॥
ऐसा बंधूचा अनुताप । देखोनि देवकी सदय सकृप । जैशी धरित्री ग्रीष्मींचा ताप । सांडी आप वर्षतां ॥३०५॥
मोचयामास निगडाद्विश्रब्धः कन्यकागिरा । देवकीं वसुदेवं च दर्शयन्नात्मसौहृदम् ॥२४॥
मग तोडूनि लोहबंधनें । मुक्त केलीं दोघें जणें । अमरीं वरद ओपिलीं वचनें । कंस तेणें कळवळिला ॥६॥
घोरोग्रसेनात्मजापासून । त्राहें म्हणून प्रार्थिला भगवान । तेणें योगमाया प्रेरून । कंसाचें मन मोहिलें ॥७॥
मग विश्वासोनि मायावचना । केलें निगडविमोचना । क्षणोक्षणीं लागे चरणां । करी प्रार्थना स्नेहवादें ॥८॥
म्हणे काया झालिया कृश । विवर्ण कांति धूसर केंस । चिरकाळ भोगिले मदर्थ क्लेश । अशेष दोष मजमाथां ॥९॥
म्हणोनि कंठीं घातली मिठी । रुदन करूनि धरी हनुवटी । हस्तें कुरवाळूनि पाठी । सांगे गोष्टी स्नेहाळ ॥३१०॥
एथूनि सरली क्लेशनिशी । उदया आला सुकृतशशी । माझिया अपराधांच्या राशि । क्षमामंजूषीं सांठवा ॥११॥
श्वेतवस्त्र साबणें उजळे । तैसें निर्मळ नोहे काळें । वसुदेव देवकी पुण्यशीळें । झालीं स्नेहाळें विनवितां ॥१२॥
भ्रातुः समनुतप्तस्य क्षान्तरोषा च देवकी । व्यसृजद्वसुदेवश्च प्रहस्य तमुवाच ह ॥२५॥
ऐकूनि बंधूची विनवणी । सशोक अनुतापाची वाणी । देवकीवसुदेव कळवळूनि । खेद सांडोनि राहिलीं ॥१३॥
हास्यवदनें कंसाप्रति । मधुरोत्तरीं गौरविती । कंसें बोधिल्या त्या उक्ति । सन्मानिती स्वीकारें ॥१४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 26, 2017
TOP