अध्याय ३ रा - श्लोक २९ ते ३१
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तस्यां रात्र्यां व्यतीतायां कंस आहूय मन्त्रिणः । तेभ्य आचष्ट तत्सर्वं यदुक्तं योगनिद्रया ॥२९॥
शयनीं निद्रा न लागे डोळां । आठवी योगमायेची लीळा । उठी बैसे वेळोवेळां । उताविळा उदयार्थ ॥४८॥
तंव जेंगटें जाणविली वेळा । चेइला विद्यार्थियांचा मेळा । एक गाती रागमाळा । उषःकाला जाणोनि ॥४९॥
भैरव भूपाळ बिलावल । बीभास रामकलि मंजूळ । तान मान लक्ष्मीलील । पुण्यशील जागविती ॥३५०॥
ऋचावर्ग ऋक्शाखिक । यजुषें पढती यजुःपाठक । एक सामगायनीं सामक । बृहत्सामें पढताती ॥५१॥
अग्निहोत्री संध्यास्नानें । करूनि करिती प्रादुपीकरणें । पात्रासादनें परिस्तरणें । परिसमूहनें मंत्रोक्त ॥५२॥
मुग्धा मधुपानीं कामुक । झाले सव्रीड साशंक । वनिता वेष्टूनि अंशुक । कबरी कंचुक सांवरिती ॥५३॥
कुक्कुटगणीं केला टाहो । पुढें झाला अरुणोदयो । धेनु हंबरती दोहो । करिती पाहो बल्लव ॥५४॥
भुजंग केला स्वैरिणीकंठलग्न । कामप्रेमें दृढालिंगन । पद्मगर्भींचें षट्पदगण । तैसे उठोन ते जाती ॥३५५॥
शकुंताच्या कलभाषणीं । अस्ति प्राप्ति दोघीजणी । जरासंधाच्या नंदिनी कंसकामिनी चेइल्या ॥५६॥
तंव पातला पार्षदगण । प्रभात सुचविती आळवून । सेकसंमार्जनोपलेपन । रंगवल्लिका रेखिती ॥५७॥
तंव प्राचीकाष्ठामातृजठर । सांडूनि उदेला माठर । तेणें उजळितां रत्नागार । प्रभा विचित्र फांकली ॥५८॥
वज्र गोमेद मुक्ताश्रेणी । पाच पेरोज वैडूर्यमणि । गोपुरीं जडिले खणोखणीं । ते निजकिरणीं फांकले ॥५९॥
सहस्रकरांचे सहस्र तरणि । तैसें रत्नार्क स्वप्रभाकिरणीं । नयनोत्पली पौराब्जिनी । मथुराभुवनीं बोधिल्या ॥३६०॥
ऐशी अतिक्रमिली निशी । कंस उद्विग्र मानसीं । येऊनि बैसला सभेसी । मंत्रियांसी पाचारी ॥६१॥
दूत धांवती शतानुशत । जाणविती राजवृत्तांत । ऐकोनि राजाज्ञासंकेत । मंत्री त्वरित पातले ॥६२॥
प्रलंब आणि बकासुर । तृणावर्त्त अघासुर । शकट पूतना चाणूर । धेनुकासुर अरिष्ट ॥६३॥
सुनामा न्यग्रोध आणि शंकु । सृष्टि तुष्टिमान सहकंकु । राष्ट्रपालादि प्रमुख । हे बंधु सुटंक कंसाचे ॥६४॥
यांसही प्रधानामाजीं मान । म्हणोनि आणिलें पाचारून । मुष्टिक केशी व्योमगहन । प्रभासदन पातले ॥३६५॥
झषोक्ष सिंह कीटधट । यारांसि तें दुष्ट खेट । सर्व होऊनि एकवट । रचिती अनिष्ट जगातें ॥६६॥
तैसे मिळविले दुष्टमंत्री । इतर दवडिले संज्ञासूत्रीं । वृत्तांत मंत्रियांचे श्रोत्रीं । सांगे रात्रीं वर्त्तला ॥६७॥
म्हणे परिसाहो अमात्यगण । वृथा गेला आमुचा यत्न । आतां उपाय कीजे कोण । तुम्ही सर्वज्ञ मज सांगा ॥६८॥
गगनवाणीचिया बोलें । देवकीहननचि आदरिलें । तेथें वसुदेवें प्रार्थिलें । म्हणोनि ठेलें तें वर्म ॥६९॥
पुढें नारदाचेनि वचनीं । दोघां ठेविलें निर्बंधनीं । प्रवर्त्तलों बालहननीं । गर्भ यत्नीं मारिले ॥३७०॥
षड्गर्भांचा केला घात । झाला सप्तमगर्भपात । अष्टगर्भवृत्तांत । सावचित्त परियेसा ॥७१॥
अष्टम गर्भ तो माझा वैरी । म्हणोनि रक्षितां नानापरीं । देवकी प्रसवली आजिचे रात्रीं । झाली कुमारी आठवी ॥७२॥
देवकी म्हणे वांचवीं कुमारी । ती निर्भर्त्सिली निष्ठुरोत्तरीं । बळें आपटितां चमत्कारीं । गेली खेचरी आकाशा ॥७३॥
ऊर्ध्व अवलोकिली नयनीं । अष्टादशायुधें धारिणी । परिवेष्टित देवयानीं । निर्जरगणीं पूजिली ॥७४॥
तिणें मारूनि दीर्घ हांक । म्हणे रे कंसा तवांतक । वाढे स्थलांतरीं सम्यक । वृथा बाळकें न मारीं ॥३७५॥
प्रस्तुत जन्मोनि तुझा वैरी । वृद्धि पावे स्थलांतरीं । बाळें अनाथें वृथा न मारीं । ऐसे खेचरी बोलिली ॥७६॥
ऐकोनिया खेचरीवचन । माझें खोंचलें अंतःकरण । पायाळावरी विद्युत्पतन । तैसें मम मन मूर्च्छित ॥७७॥
अद्यापि विसर न पडे मना । गात्रें तापलीं फणफणा । कंप रोमांच शुष्कता वदना । नेर भ्रमणा न सांडिती ॥७८॥
कविगुरूंहूनि विचक्षण । तुम्ही सर्वज्ञ प्रधान । यदर्थीं उपाय कीजे कोण । तो मज यत्नीं सांगिजे ॥७९॥
जेणें शत्रूचेंण उन्मळे मूळ । आपण ऐश्वर्येंशीं कुशळ । राहोनि जिंकूं पृथ्वीतळ । मंत्र प्रांजळ हा योजा ॥३८०॥
ऐकोनि स्वामीचें गदित । शृगाल जैसे वनपंडित । तैसे उठिले अकस्मात । वृथा जल्पत प्रतापें ॥८१॥
आकर्ण्य भर्तृगदितं तमूचुर्देवशत्रवः । देवान् प्रति कृतामर्षा दैतेया नातिकोविदाः ॥३०॥
रावणाचिये सभास्थानीं । जैसे प्रहस्तादिराक्षसगणीं । अव्हेरूनि बिभीषणवाणी । केली वल्गनी ज्यापरी ॥८२॥
नाना धूम्राक्षचंडमुंडप्रमुखां । शुंभनिशुंभसभेसि देखा । पुसतां देती रणआवांका । तेंवि दुर्विवेका कंसमंत्री ॥८३॥
जे आधींच दैत्यजाती । देवप्रताप ऐकतां खंती । जैसा देखोनिया हत्ती । श्वान भुंकती पुरगर्भीं ॥८४॥
तैसे ते देवशत्रु समस्त । ज्ञानहीन परि पंडित । सत्य मानूनि विवर्त्त । दृश्य शाश्वत जाणते ॥३८५॥
तप्ततैल शीतोदकें । खवळे पावक घृताभिषेकें । तैसें फुंपाटती अमषें । अमरद्वेषें दुरात्मे ॥८६॥
ऐसे मंत्री कंसाप्रति । काय विचार बोलती । ते तूं ऐकें पुण्यकीर्ति । परीक्षिते कुरुवर्या ॥८७॥
एवं चेतर्हि भोजेन्द्र पुरग्रामव्रजादिषु । अनिर्दशान् निर्दशांश्च हनिष्यामोऽद्य वै शिशून् ॥३१॥
मंत्री म्हणती भोजेंद्रा । राया ऐकें विचारचतुरा । वृत्तांत कथिला तो अंतरा - । माजीं निर्धारा आणिला ॥८८॥
स्थलांतरीं वाढतो वैरी । ऐसें बोलिली जरी खेचरी । यदर्थीं यत्न लौकरी । सांगों त्यापरी योजिजे ॥८९॥
पूतना ससैन्य याचि कार्या । आज्ञापिजे भोजराया । पुरीं पट्टणीं प्रवेशोनिया । मुख्य कार्या साधावें ॥३९०॥
ज्यासि लोटले दहा दिवस । त्या बाळकांचा कीजे नाश । तेथूनि अर्वाक् जन्म ज्यांस । तींही निःशेष मारावीं ॥९१॥
प्रकट न कीजे बलात्कार । होऊं नेदिजे लोकाचार । बाहेर फुटों नेदितां मंत्र । कार्य सत्वर साधावें ॥९२॥
आजपासूनि हा निर्धारू । आम्ही बाळांतें संहारू । पुरग्रामें व्रजाकरू । सविस्तर शोधूनी ॥९३॥
पुरीं ग्रामीं व्रजीं पाहीं । बाळें असतीं जे जे ठायीं । आजीच संहारूं लवलाहीं । आज्ञा देईं भोजेंद्रा ॥९४॥
सर्व उपसोनि सांडितां जळ । होय मत्स्यांचें निर्मूळ । तेंवि अबाल पृथ्वीतळ । करितां काळ मग कैंचा ॥३९५॥
ऐशी दुर्मंत्रियांची वाणी । ऐकोनि कंस अंतःकरणीं । निवाला जैसें विषाचें पाणी । भेक प्राशूनि सुखावे ॥९६॥
मग पाचारोनिया पूतना । तियेसि दिधली अनुज्ञा । घेऊनि बालग्रहांची सेना । बालहनना प्रवर्तली ॥९७॥
भूत प्रेत पिशाचक । यक्ष राक्षस विनायक । कोठरा खेति ज्येष्ठप्रमुख । पूतनागणही स्वनामें ॥९८॥
मातृका उन्माद अपस्मार । प्राणेंद्रियां द्रोहकर । शाकिनी डाकिनी कूष्मांड थोर । महाघोर यातुधानी ॥९९॥
ऐशी बालग्रहाची सेना । शोधी नगरां पुरां पट्टनां । खेट खर्वट वनोपवनां । ते पूतना शिशुहंत्री ॥४००॥
न पाहतां जातिकुळ । न म्हणे सभाग्य दुर्बळ । न म्हणे वंध्या संतानशीळ । बाळें बाळ निर्दाळी ॥१॥
मैळी मुकी होऊनि पैठी । झोंबती बाळकांचे कंठीं । हाहाकारें लौकिक गोष्टी । म्हणतां सटी सिंतवली ॥२॥
एक करिती पंचमीपूजा । म्हणती वांचवी आमुच्या प्रजा । पूतना प्रेरिली कंसकाजा । कोणी या गुजा नेणती ॥३॥
कोठें सीत कोठें ज्वर । कोठें देवी आणि गोवर । पोटीं कश्मल महाघोर । शिशुसंहार या मिषें ॥४॥
दांत डोळे अग्निस्फोट । टाळू पडोनि पावती कष्ट । फेंपरीं अपस्मारें दुष्ट । बाळें संघाटें मारिती ॥४०५॥
ऐशी बाळांची महामारी । पूतना भ्रमे पृथ्वीवरी । अद्याप बालग्रहाची फेरी । त्या आचारी फिरतसे ॥६॥
असो पूतनेची हे कथा । मंत्री कंसाची मानसव्यथा । विचारें निरसिती त्याचि अर्था । ऐकें समर्था कुरुवर्या ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : April 26, 2017
TOP