अध्याय ३ रा - श्लोक १६ ते १८

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स त्वहं त्यक्तकारुण्यस्त्यक्तज्ञातिसुहृत्खलः । कॉंल्लोकान्वै गमिष्यामि ब्रह्मदेव मृतः श्वसन् ॥१६॥

तोचि मी हा खळ दुर्मति । त्यक्तकारुण्य त्यक्तज्ञाति । त्यक्तस्वजनसुहृत्पंक्ति । मंदमति पापिष्ठ ॥३७॥
जैसा ब्रह्मघाती जीवंतचि प्रेत । त्याहीहून मी पतित । महापापाचे पर्वत । यातना अद्भुत मज होती ॥३८॥
एवढें आचरलों पातक । पुढें पावेन कोण लोक । नाहीं केला म्यां विवेक । करी शोक अतिदुःखें ॥३९॥
केवढा अपराध पैं हा माझा । निर्दयें मारिल्या भगिनीप्रजा । जेव्हां दंडील निरयराजा । कोणे वोजा तें चुके ॥१४०॥

दैवमप्यनृतं वक्ति न मर्त्या एव केलवम् । यद्विश्रम्भादहं पापः स्वसुर्निहतवान् शिशून् ॥१७॥

मनुष्येंच अनृत वदती । ऐशी लोकीं किंवदंती । देवही आले तेचि पंक्ती । विचित्र गति कर्माची ॥४१॥
दैवही झालें अनृतशीळ । नव्हती मनुष्येंच केवळ । ज्या विश्वासें भगिनीबाळ । मारूनि खळ मी झालों ॥४२॥
दैववचनीं विश्वासूनि । भगिनीपुत्रांचिये हननीं । मी प्रवर्त्तलों न कळोनि । दैववाणी अनृत हे ॥४३॥
एवं ठकिलें मज अदृष्टें । तस्मात् माझेंचि कर्म खोटें । दुःख सांगतां लज्जा वाटे । नये मुखवटें दावितां ॥४४॥
नानापरी करूनि रुदन । देवकीवसुदेवांचा शीण । निवारूनि समाधान । करी तें कथन अवधारा ॥१४५॥
कार्यापूर्वीं नम्र दीन । कार्यप्रसंगीं होय कठिण । कार्याअंतीं परमलीन । शिश्न दुर्जन साम्यत्वें ॥४६॥

मा शोचतं महाभागावात्मजान् स्वकृतंभुजः । जन्तवो न सदैकत्र दैवाधीनास्तदासते ॥१८॥

अष्टमगर्भपर्यंत क्रूर । कंस झाला तो निष्ठुर । आतां होऊनि परम नम्र । मधुरोत्तर संबोखी ॥४७॥
जैसा अनुताप केला वरी । तैसाचि राहता जरी अंतरीं । तेव्हां निष्था हे आसुरी । वदती वैखरी कोणाची ॥४८॥
आसुरी संपत्तीचे जे नर । त्यांचा वृथाचि बाह्याचार । अंतरीं निश्चया नाहीं थार । भग्न जिव्हार प्रलोभें ॥४९॥
शास्त्रव्युत्पत्तिविवेकमेळें । विचार बोले तोंडबळें । अंतरीं कल्पनाविषय खवळे । वितर्कौमाळे ऊठती ॥१५०॥
क्षणक्षणां पालटे मन । होय कल्पनेअधीन । निश्चयाचें समाधान । विश्वासावीण न थारे ॥५१॥
शास्त्रबोधें इंद्रियां कळलें । तैसेंचि अंतर नाहीं वळलें । कळलें तेव्हांचि मावळलें । चित्त बावळलें प्रपंचीं ॥५२॥
त्याचेंचि नांव आसुरी ज्ञान । कामक्रोधलोभाधीन । मोहभ्रमें भ्रमिष्टपण । निश्चय पूर्ण असेना ॥५३॥
जैसा यवन ब्राह्मण झाला । वेदशास्त्रादि अभ्यास केला । होता तैसाचि बोले बोला । परी धर्म आचरला नवजाय ॥५४॥
विरक्त किंवा विषयासक्त । बद्ध किंवा आपण मुक्त । कर्मयोगी किंवा भक्त । नाहीं सिद्धांत एकही ॥१५५॥
क्षणैक ज्ञानी क्षणैक भक्त । क्षणैक विरक्त क्षणैक मुक्त । ऐसा बाष्कळ विषयासक्त । मोहग्रस्त आसुरी ॥५६॥
असो आसुरी ऐसें ज्ञान । कंसें केलें समाधान । तेंचि ऐका निरूपण । सावधान होऊनि ॥५७॥
अहो देवकीवसुदेव । तुम्ही भाग्याचीं सदैव । मी दुर्भाग्य निर्दैव । न धरीं कींव निर्दय ॥५८॥
महाभाग हें संबोधन । कैसें केलें काय म्हणोन । पदबंधन पुत्रहनन । भाग्य कोणें वर्णिलें ॥५९॥
ऐसा न करावा वितर्क । ऐका एथींचा विवेक । आपुलें कर्म पापात्मक । कसा नावेक वाटलें ॥१६०॥
देवकीवसुदेवा कंस म्हणे । तुम्ही भाग्याचीं शुद्ध पुण्यें । तुमची कीर्ति स्मृतिपुराणें । पुढें वाखाणिती तिहीं लोकीं ॥६१॥
प्रथम पुत्र कीर्तिमंत । अर्पूनि संरक्षिलें सत्य । एवढा सोसूनि दुःखावर्त्त । कीर्तिमंत जाहलां ॥६२॥
शूर सर्वांगीं सोसूनि घाय । लोकीं मिरवे पावोनि जय । क्षेम राहोनि पराजय । पात्र होय निंदेचें ॥६३॥
तेंवि तुम्ही सोसूनि शीण । लोकीं झालां धन्य धन्य । महाभाग्याचीं संपूर्ण । मी अभाग्य हीन अपेशें ॥६४॥
पुण्यें जाहलां धैर्यमेरू । गत पुत्रांचा शोक करूं । नका म्हणोनि दक्षिण करू । मुखावरूनि उतरिला ॥१६५॥
दोघां कवळूनि पोटासी । स्वपल्लवें नेत्र पुसी । हनुवटी धरूनि उकसाबुकसीं । महामोहेंशीं स्फुंदत ॥६६॥
माझे विसरावे अपराध । सांडा मृत पुत्रांचा खेद । मी तों दुरात्मा बुद्धिमंद । परी कांहीं अनुवाद ऐकावा ॥६७॥
पूर्वीं कर्म जैसें केलें । तेंचि ब्रह्मरेखे लिहिलें । पुत्रीं स्वकृत तें भोगिलें । निमित्त दिधलें मजलागीं ॥६८॥
गगनवाणिचें ऐकोनि वाक्य । देवकीहननाचा अविवेक । माझा चुकविला सम्यक । तुम्हीं विवेक सांगोनि ॥६९॥
तोचि तुमचा तुम्हांजवळी । मी सांगतों ये काळीं । न पडावें या शोकजाळीं । गोष्टी मानिली पाहिजे ॥१७०॥
तरी प्राणी एकरूप सर्व काळीं । कोण आहे भूमंडळीं । कोण पां सदैव एके स्थळीं । सुहृदमेळीं नांदती ॥७१॥
देह तितुका नाशवंत । गर्भामाजीं ग्रासी मृत्य । जन्मल्या बाळदशा जात । तैसें वेंचत तारुण्य ॥७२॥
वृद्धाप्यही हरपलें । प्राणी काळें मरूनि गेले । षड्विकार ऐसे झाले । कोण्या बोलें शाश्वत ॥७३॥
एक उपजे एक मरे । एक त्यांच्या शोकें झुरे । एक मागती लेंकुरें । देवदेव्हारे करूनि ॥७४॥
ऐसें एकरूप शरीर । सदैव नाहीं तो प्रकार । दावावया षड्विकार । ज्ञाते थोर बोलती ॥१७५॥
सुहृद्भावें स्नेह जडले । तेथ विरुद्ध कर्म घडलें । परस्परें वैर पडलें । प्रेम विघडलें अंतरींचें ॥७६॥
सदैव सुहृदाचें अंतर । न करी एकचि प्रेमादर । कथिला तोचि हा प्रकार । ऐका विचार वसतीचा ॥७७॥
सहोदर अथवा मित्र । सुहृद आप्त पुत्र कलत्र । सदैव सहवास एकत्र । कोठें सर्वत्र विचारा ॥७८॥
सेवावाणिज्ययात्रामिसें । स्नेहरोधें रोषावेषें । राजविग्रहें विद्याभ्यासें । वियोग ऐसे पावती ॥७९॥
अन्य प्राणी निकट होती । जवळील ते दूर जाती । ऐशी विचित्र दैवगति । प्राणी भोगिती स्वर्जितें ॥१८०॥
तस्मात्प्राणी दैवाधीन । सदैव एकत्र नसती जाण । अनादिमायाप्रवाह गहन । ऐसें सर्वज्ञ जाणती ॥८१॥
नसती एकरूप शरीरें । पालटताती षड्विकारें । रोषें तोषें परस्परें । सुहृदांतरें वावटती ॥८२॥
सदैव एकत्र वसति न घडे । दैवयोगें सर्वही बिघडे । ऐसें जयासि कळलें उघडें । तो अवघड कैसेनी ॥८३॥
ऐसा जाणूनि विवेक । मृत पुत्रांचा न कीजे शोक । माझे अपराध अनेक । स्मरोनि दुःख न धरावें ॥८४॥
सर्वांसी अदृष्ट प्रमाण । मी निमित्तासी कारण । तुम्ही ज्ञातीं विचक्षण । माझे अवगुण न मानावे ॥१८५॥
येचि अर्थी सदृष्टांत । सावध ऐकवा वृत्तांत । देहमात्र नाशवंत । आत्मा शाश्वत अविनाशी ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP