अध्याय १२ वा - श्लोक १ ते ४
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - क्कचिद्वनाशाय मनो दधद्व्रजात्प्रातः समुत्थाय वयस्यवत्सपान् ।
प्रबोधयञ्छृंगरवेण चारुणा विनिर्गतो वत्सपुरःसरो हरिः ॥१॥
कोणे एके काळीं हरि । विचार करी अभ्यंतरीं । घेऊनि सदन्नें शिदोरी । वनामाझारीं जेवावें ॥३९॥
हा हेत धरूनि अंतःकरणीं । प्रातःकाळीं चक्रपाणि । आपुल्या संवगडियां लावूनी । मुरलीस्वनीं प्रबोधी ॥४०॥
नारदादि पूर्णज्ञानी । ज्यातें निशीच्या अवसानीं । प्रबोधिती सामगानीं । तानमानीं सप्रेमें ॥४१॥
तेणें एथें मधुसूदनें । मंजुळ शृंगध्वनीचे स्वनें । वत्सप संवगडे जागवणें । नंदनपणें नंदाच्या ॥४२॥
प्राण प्रबोधी इंद्रियगणा । मेघ जीववी मरतिया तृणा । कीं मृत्यु पावलिया अमृतपाना । करितां चेतना लाहती ॥४३॥
तेंवि हरीच्या श्रृंगस्वनें । जागृत केलीं जगाचीं मनें । कर्तृचेष्टाज्ञानादिकरणें । विश्वाभिमानें अधिष्ठिलीं ॥४४॥
तेणें गोपाळ वत्स गोपी । प्रबोध पावलीं हरिसंकल्पीं । प्रातःकृत्य पूर्वानुकल्पीं । वत्सवत्सपीं संपविलें ॥४५॥
दोहनें करूनि वनाप्रति । प्रबुद्ध गोपाळ गाई नेती । पुढें घालूनि वत्सपंक्ति । वना श्रीपति निघाला ॥४६॥
xxगस्वनें वत्सपांसी । खुणावितांच हृषीकेशी । सूर्यासवें किरणें जैशीं । तेंवि कृष्णेंशीं संवगडे ॥४७॥
तेनैव साकं पृथुकाः सहस्रशः स्निग्धाः सुशिग्वेतविषाणवेणवः ।
स्वान्स्वान्सहस्रोपरिसंख्ययान्वितान्वत्सान्पुरस्कृत्य विनिर्ययुर्मुदा ॥२॥
कृष्णपूरित शृंगध्वनि । पडतां संवगडियांचे कानीं । नादासवें खडबडोनी । त्वरा करोनि निघाले ॥४८॥
श्रीकृष्णाच्या समागमें । सहस्रोंसहस्र वत्सगुल्में । घेऊनि वत्सप सप्रेमें । अनेक सहस्र चालिले ॥४९॥
प्रथम वनभोजनाकारणें । जाळिया भरिलिया सदन्नें । घेऊनि वेणू वेत्र विषाणें । विविध वसनें कांबळिया ॥५०॥
पुढें घालूनि वत्सकळप । मागें चालती ते वत्सप । भोंवते रामकृष्ण समीप । क्रीडा अमूप दाविती ॥५१॥
ऐसे लहान थोर किशोर । पुढें घालूनि वत्सभार । निघाले स्वानंदें निर्भर । नंदकुमार वेष्टूनी ॥५२॥
कृष्णवत्सैअरसंख्यातैर्यूथीकृत्य स्ववत्सकान् । चारयन्तोऽर्भलीलाभिर्विजह्रुस्तत्र तत्र ह ॥३॥
कृष्णासवें असंख्यात । जीं निर्मुक्त अव्याहत । त्यामाजि मिळवूनि समस्त । करूनि यूथ चारिती ॥५३॥
क्रीडा करिती स्थळोस्थळीं । हुतुतू हमामा हुमली । कोठें खेळती चेंडूफळी बाळकेली अनेका ॥५४॥
नाना परीचे आविष्कार । अनेक विचित्र श्रृंगार । परिसा तयांचा विस्तार । कथी मुनिवर जो भूपा ॥५५॥
फलप्रवालस्तबकसुमनः पिच्छधातुभिः । काचगुंजामणिस्वर्णभूषिता अप्यभूषयन् ॥४॥
तांबडीं पिवळीं हिरवीं काळीं । चित्रविचित्र रंगी फळीं । वेंचूनि सोलूनि मोकळीं । माळा गोपाळीं ओढूनि ॥५६॥
शिरीं दंडीं आणि मनगटीं । कानीं गळां आणि कंठीं । बांधती पायीं आणि कटितटीं । आणि यष्टिविषाणीं ॥५७॥
फळें पुष्पें पल्लवाग्रें । तृणशलाका सरळ वक्र । तुरे निर्मूनि विचित्र । गोपकुमार तुरंविती ॥५८॥
कानीं केशीं श्रवणीं शिरीं । गुच्छ खोंविती नानापरी । बर्हिबर्हाचे पिंजरीं । अतिसाजिरीं गुंफिती ॥५९॥
हंस कलापी भारद्वाज । इत्यादि जे जे सुंदर द्विज । ज्यांचे पक्ष तेजःपुंज । गोपतनुज भूषिती ॥६०॥
ऐसे सुंदर द्विजांचे पिच्छ । त्यांचे विचित्र निर्मूनि गुच्छ । मुकुटीं शोभा शोभे स्वच्छ । रत्नें तुच्छ ज्यांपुढें ॥६१॥
श्वेत पीत कृष्ण रक्त । गैरिकादि धातु अनंत । विचित्र लेपनीं प्रभादीप्त । भानु खद्योत ज्यांपुढें ॥६२॥
सकळ तेजांचें जें बीज । तो गोकुळीं गरुडध्वज । दावी नटनाट्याची ओज । नाचे भोज भक्तीचें ॥६३॥
कृष्णातुल्य कृष्णप्रेमळ । ज्यांचें अनंत सुकृतबळ । वश्य करूनि श्रीगोपाळ । भंवतीं मिळते जाहले ॥६४॥
कृष्ण विश्वाचें मोहन । जिहीं त्यां कृष्णासि मोहिलें जाण । वियोग न साहे अर्ध क्षण । केला स्वाधीन निज वेधें ॥६५॥
कृष्णागळे कृष्णसखे । कृष्ण ध्याती गाती मुखें । कृष्णप्रेमाचेनि सुखें । मानिती फिकें कैवल्य ॥६६॥
तृष्णाउष्णातीत रवी - । पासोनि ज्याची कांति बरवी । कांचगुंजादि लेणें मिरवी । अभिमान विरवी दिविजांचा ॥६७॥
सूर्यप्रभेच्या अंगीकारें । मिडगणतेजें लोपती हिरे । तेंवि हरीच्या अळंकारें । असाम्यभास्करें गुंजादि ॥६८॥
जेंवि प्रतापें यातुधानी समरीं । भंगिले पीयूषपाणि । त्यातें श्रीरामसन्निधानीं । वानरगणीं विटंबिले ॥६९॥
तेंवि श्रीकृष्णाच्या अंगसंगें । कांचगुंजा धातुरंगें । विद्युत्प्रभा घालूनि मागें । म्हणती उणें रविबिंबा ॥७०॥
रत्नखचित रुक्मलेणीं । अमूल्य वैडूर्य चिंतामणि । पूर्वींच विचित्र वस्त्राभरणीं । पुत्र जननीं शोभविले ॥७१॥
पूर्वींच अलंकार होते अंगीं । त्यावरी कांचगुंजादि झगमगी । पिच्छादिशोभा कृष्णाजोगी । सहसा वाउगी न म्हणावी ॥७२॥
वैकुंठ सांडूनि जलचर होणें । कमठ क्रोडत्व मिरविणें । कांचगुंजा धातु तेणें । कवण्या गुणें न धराव्या ॥७३॥
जन्मा अपूर्व लाहोनि भाग्य । जे जे होती प्रतिष्ठेयोग्य । हेमरत्नाभरणीं अंग । तिहीं चांग मिरवावें ॥७४॥
कृष्ण सर्वांतरव्यापक । ब्रह्मादिस्तंबपर्यंत एक । योग्यायोग्य हा विवेक । मानसिक ते ठायीं ॥७५॥
गंगे भेटतां पवित्र जळ । धातु स्पर्शसंगें निर्मळ । इंधनभेदा गिळी अनळ । मलयाचळ तरुखंडा ॥७६॥
तैसें कृष्णें अंगीकेले । ते ब्रह्मादिकां वंद्य झाले । तयापुढें सुकृतमूल्यें । कोण आगळें पाहा पां ॥७७॥
यालागीं फळपुष्पप्रवाळ । कांचगुंजा धातुमेळ । नानापिच्छगुच्छ गोपाळ । सुकृत बहळ तुरंबी ॥७८॥
बाल्यनटनाट्याची परी । विचित्र संपादणी करी । ते ते कौशल्यकुसरी । शुकवैखरी वर्णितसे ॥७९॥
N/A
References : N/A
Last Updated : April 28, 2017
TOP