अध्याय १२ वा - श्लोक ५ ते ६

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


मुष्णंतोऽ‍न्योन्यशिक्यादीञ्ज्ञातानाराच्च चिक्षिपुः । तत्रत्याश्च पुनर्दूराद्धसंतश्च पुनर्ददुः ॥५॥

ऐसे सालंकृत गोपाळ । छाया पाहोनि सुशीतळ । बैसोनि करिती गदारोळ । सुखकल्लोळ समस्तां ॥८०॥
पूर्ण सदन्नें भरलीं जाळीं । कंठींचीं काढूनि ठेविती तळीं । वृतीवरी टाकूनि कांबळीं । वत्सप खेळीं गुंतती ॥८१॥
जाळिया चोरूनि परस्परें । विस्मयें बोलती व्यंग्योत्तरें । अन्वेषाच्या परिहारें । आविष्कारें दाटिती ॥८२॥
जाळीं पेंध्याचीं चोरिती । हळूच वडज्यापाशीं देती । झाडा देऊनि नाहीं म्हणती । लांबविती परस्परें ॥८३॥
वांकुड्यानें दिधला झाडा । सुदामा देऊं बैसला पुढां । वडज्यापासूनि घे वांकुडा । मग वडज्या झाडा देऊं ये ॥८४॥
ऐसें करूनि दृष्टिगूढ । परिहार बोलती अवघड । आणा वाहोनि झडझड । भंड उभंड बोलती ॥८५॥
तथापि देखिली ज्याची तेणें । झोंबोनि मागतां आंगवणें । दुसर्‍यापाशीं भिरकावणें । म्हणती ठेवणें सांभाळीं ॥८६॥
जाळी पाहोनि गळां पडे । तंव तो टाकी आणिकाकडे । हास्य करूनि वाडें कोडें । धडासि वेडें लाविती ॥८७॥
जैसें मानवी सुखाचें चाडें । सुकृतबळें स्वर्गा चढे । तंव त्या तेथें तें नातुडे । पुढतीं वावडे इहलोकीं ॥८८॥
ऐसें हुडकितां अनेक लोक । नातुडे आत्मतृप्तीचें सुख । शिणोनि उगतां नावेक । सुखसंतोष तैं जोडे ॥८९॥
तैशी जाळी न चढे करीं । तैं तो शिणोनि रुदना करी । प्रेत्ना रुसोनि प्रवेशे नगरीं । तेव्हां श्रीहरि समजावी ॥९०॥
स्वरूपतेचें आलिंगन । देऊनि करी समाधान । सायुज्यसाम्राज्यभोजन । करूं म्हणोनि आश्वासी ॥९१॥
ऐशी अन्योन्य चोरूनि जाळीं । परस्परें करिती रळी । परोपरीची वत्सपकेलि । दावी वनमाळी क्रीडोनी ॥९२॥

यदि दूरं गतः कृष्णो वनशोभेक्षणाय तम् । अहं पूर्वमहं पूर्वमिति संस्पृश्य रेमिरे ॥६॥

अनन्यवत्सवात्सल्यचाडें । सवेग कृष्ण धांवे पुढें । गुंतले भवभानीं संवगडे । कृष्णाकडे अंतरले ॥९३॥
दृश्यें गोंविले नेत्रपाशीं । सकाम सफळ बोरांटिसी । एक गुंतले वासनावासीं । तेणें मनासीं अनुगंड ॥९४॥
वेदवादाच्या पुष्पित वेली । देखोनि लेंकुरें विगुंतलीं । फलाभिलाषें क्रिया कौटाळी । स्वर्गताळीं वळंघावया ॥९५॥
कुटुंबसुखाची भल्लातकी । पक्क सफळित देखिली एकीं । स्नेह उततां तोंडीं नाकीं । गोडी ठाउकी मग झाली ॥९६॥
बाह्यदंभाचें उदुंबर । देखोनि भुलती वत्सपभार । फोडोनि पाहतां अभ्यंतर । कृमिविकार बुचबुचिती ॥९७॥
ऐकतां निंदेच्या तिंतिणी । तेणें जिव्हेसि सुटलें पाणी । सेवितां सरांग कणकणी । पदार्थ कोणी न चाविती ॥९८॥
वर्मस्पर्शाची लागतां ढांसी । वैसों नेदिती भोजनापाशीं । खोकी ओकी अहर्निशीं । अवघे चिळसी मानिती ॥९९॥
एक अविवेकी अविचारी । देखोदेखी आचारचारीं । भुलले अपक्क फळाहारीं । अरुचिकरीं थुंकिती ॥१००॥
देहबुद्धिच्या लगड्या आकारीं । देखोनि झोंबती एक साकारीं । टोंचतां कंटक षड्विकारीं । निर्विकारी आठवती ॥१॥
ममतेचीं भोंकरें । घेतां चिकटोनि पडती करें । भक्षूं जातां थुंकती वक्त्रें । वस्त्रें शरीरें लिगटती ॥२॥
पाहतां वनश्रीशोभा ऐशी । गडी गुंतले दृश्याभासीं । दुरी अंतरला हृषीकेशी । हें मानसीं उमजेना ॥३॥
आधीं कोण कृष्णा शिवे । ऐसें म्हणोनि घेती धांवे । सांडूनि अवघेचि दृश्यगोवे । निजस्वभावें तकटती ॥४॥
एक धांविले श्रवणमार्गें । दृश्याभास सांडूनि मागें । श्रीहरि टाकावया सवेगें । सप्रेम अंगें धांवती ॥१०५॥
एक कीर्तनें घेती धांवा । येरा कृष्ण करिती ठावा । सहित गडियांच्या समुदावा । अष्टभावा पावती ॥६॥
एक गुप्तत्वें स्मरण वाटे । लागोनि पाउलें टाकिती नेटें । अवघ्यां आधीं श्रीकृष्ण भेटे । म्हणोनि नेटें धांवती ॥७॥
एकीं चरणाचा मागोवा । घेवोनि साधितां पादसेवा । सांडिला अवघा भवहेवा । एका माधवा गिंवसिती ॥८॥
एकीं श्रीकृष्णाचें रूप । भूतमात्रीं देखोनि समीप । अर्चनपथें ससाक्षेप । वेगीं सकृप टाखिती ॥९॥
एकीं झांकूनि प्रवृत्तिडोळे । न देखों म्हणती कृष्णा वेगळें । वंदनमार्गें धांवती सरळे । कृष्ण करतळें स्पर्शावया ॥११०॥
एकीं दास्याच्या धोरणें । कायावाचासहित मनें । धांव घेतल्या कृष्णार्पणें । अभिन्नभजनें हरिप्राप्ति ॥११॥
एका जगदात्मक स्नेहाळा । सख्यभक्तिमार्ग मोकळा । लाहोनि धावतां चरणचपळा । प्रेमें गोपाळा टपिती ॥१२॥
एक केवल आत्मार्पणें । कृष्णामाजि मिळोनि जाणें । पुन्हा कल्पांतीं न निवडणें । पंथें येणें धांवती ॥१३॥
कृष्ण स्पर्शेन मीचि आधीं । म्हणोनि सप्रेमभजनविधि । धांवती सांडोनि देहबुद्धि । कृष्ण त्रिशुद्धि स्पर्शावया ॥१४॥
आधीं माधीं मी मी म्हणती । अवघे सप्रेमें धांवती । कृष्ण स्पर्शोनि मांदी भंवती । ते क्रीडती स्वानंदें ॥११५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP